अध्याय २: ओव्या १४५-१५१

१३ मे २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक 2३-२५ / ज्ञानेश्वरी ओव्या १४५-१५१ )




नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४॥
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥
हा प्रळयोदकें नाप्‍लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥१४७ ॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५॥
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
हा गुणत्रयरहितु । अनादि अविकृतु । व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥ १५० ॥
अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥

सारांश:-
मागच्यावेळी आपण बघितले कि जन्म-मृत्यू काय, संचित व प्रारब्ध कर्म, मृत्यू आणि जन्म यामधील गती म्हणजे काय?
यापुढील ओव्यांमध्ये आत्म्याविषयीचे वर्णन भगवंतांनी केले आहे. आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा वाळवू शकत नाही. तो नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल, सनातन, अनादी, अनंत असा आहे. आपण जेव्हा गाढ झोपतो तेव्हा शरीराविषयीचे सर्व भान नाहीसे झालेले असते; मन, बुद्धी, चित्त देखील नसतात. तरीदेखील झोपेतून उठल्यावर आपण म्हणतो कि मला गाढ झोप लागली. मग गाढ झोप लागली हे कोणाला कळले? ते म्हणजे आपले आत्मस्वरूप. हे आपल्याला कळत नाही कारण आपले विचार, कर्मे, दृष्टी फक्त कर्मेंद्रियांवरच, शरीरावरच केंद्रित असतात. हेच भगवान अर्जुनाला समजावत आहेत कि, "हे अर्जुना, शारीरिक सीमेच्या पलीकडे बघ जेणेकरून तुला कळेल कि ज्या नातेवाईकांविषयी तू काळजी करतो आहेस ते फक्त या जन्मापुरते तुझ्याशी संबंधित आहेत. कारण ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर हे नातेवाईक जीवित आहेत तो आत्मा अमर, नित्य, सनातन आहे. आणि युद्धामध्ये नाश पावणार आहे ती फक्त त्यांची शरीरे. हे जेव्हा तू जाणशील तेव्हा तुझा शोक बंद होईल. "

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099