अध्याय २: ओव्या १६४-१९०

२७ मे २०१७ निरुपण
अध्याय २: सांख्ययोग(गीता श्लोक २८-३१ / ज्ञानेश्वरी ओव्या १६४-१९० )


निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८॥
जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें । मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥
तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥
येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्‍न जैसें । तैसा आकारु हा मायवशें । तत्स्वरूपीं ॥ १६६ ॥
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार । कां परापेक्षां अळंकार । व्यक्ती कनकीं ॥ १६७ ॥
तैसे सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥
तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥
जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥
दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें । आचरताती ॥ १७१ ॥

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः । 
आश्चर्यवच्चैनमन्यः श्रुणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९॥
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥
एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊन चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥
एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले । एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥ १७४ ॥
जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत । परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळवणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३०॥
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥
जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥
एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । धर्माद्धि युद्धाच्छेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१॥

तूं अझुनी कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें । कीं युगचि हें बुडालें । जर्‍ही एथ ॥ १८१ ॥
तरी स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥ १८२ ॥
अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत । तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥
तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता । म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥ १८६ ॥
जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥
तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥ १८८ ॥
म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥
निष्कपटा होआवें । उसिणा घाई झुंजावें । हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥
सारांश:
येथे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत की जे जे उत्पन्न होते त्याचा नाश हा अटळ आहे.जन्म-मृत्यू टाळता न येणारे आहे.हा सृष्टी क्रम रहाटगाडया सारखा आहे.सुर्यालाही उदय -अस्त आहे. जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू आहे तसेच पुनर्जन्म ही निश्चित आहे.जे अटळ -अपरिहार्य आहे त्याबद्दल दुःख करणे चुकीचे आहे. दुसरे असे की जीव जन्माला येण्याआधी निराकार असतो, जन्माला आल्यावर त्याला आकार येतो,मृत्यूनंतर पुन्हा तो निराकार होतो.जे आधी नसते, नंतरही नसते, ते मध्येच असले तरीही त्याचे असणे हा केवळ भ्रमच असतो.उदा.मृगजळ हे सकाळी किंवा संध्याकाळी दिसत नाही तर मध्येच दुपारी दिसते पण त्याचे दिसणे हा निव्वळ भ्रम असतो.मग ते नाहीसे झाल्याने दुःख करायचे काहीच कारण नाही.
आत्मा हा जन्माला न येणारा, म्हातारा न होणारा आणि कधीही नाश न पावणारा आहे. आत्मा हा कोणी तयार केलेला नाही, म्हणजेच त्याला उत्पत्ती नाही  आणि म्हणूनच नाश ही नाही. त्याचे ज्ञान होणे जसे आश्चर्य आहे तसेच त्याचे वर्णन ही आश्चर्यकारक आहे. त्याविषयी ऐकणे आणि ऐकूनही ज्ञान न होणे हे ही नवलच आहे.त्याचा अनुभव येणे हे पण फार मोठे आश्चर्य आहे. कारण पाचही ज्ञानेंद्रियांच्या साह्याने त्याचे ज्ञान होत नाही. दृश्य जगाच्या अनुभव घेण्याच्या एकाही उपायाने, प्रयोगाने त्याचा अनुभव येत नाही.थोर अधिकारी संत महात्मे तो आत्मा कसा नाही हे सांगत-सांगत साधकाला आत्मस्वरूपाच्या अनुभवाच्या काठावर आणून सोडतात, तो अद्भूत प्रकार ऐकून काही अधिकारी श्रोत्यांना त्याचे ज्ञान होते तर काहींना त्याचा साधा अंदाजही लागत नाही.
रंग-रूप इत्यादी उपाधी विशेष आणि पंचज्ञानेंद्रियांच्या ज्ञानाची भेसळ होऊन विषय बाधा न होणारी शुद्ध जाणीव हे आत्म्याचे स्वरूप आहे.ज्या जाणिवेच्या आधाराने सर्व जीवन चालले असूनही तिचे ज्ञान न होणे हे मोठेच आश्चर्य आहे.
एखाद्या महाकाय प्राण्याच्या शरीरात किंवा लहान मुंगीच्या शरीरात अथवा सूक्ष्म जीवजंतूंमध्ये तोच आत्मा-चैतन्य असते. उपाधी लहान मोठी असली तर त्या चैतन्याच्या कमी-जास्त असण्याचा भ्रम होतो,परंतु तो सर्वत्र सारखाच आहे. लहान घट आणि मोठा रांजण ह्यांचा आकार जरी लहान-मोठा असला तरी त्यात व्यापलेले आकाश एकच आहे. ते चैतन्य विश्व व्यापी आहे. जे जग स्वभावतःच उत्पन्न आणि नाश पावते त्याचा शोक करणे व्यर्थ आहे.

अश्याप्रकारे आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करून भगवंत अर्जुनाला स्वधर्माचीही जाणीव करून देत आहेत. क्षत्रियाला युद्ध प्रसंगी मनामध्ये दया उत्पन्न होणे योग्य नाही. ज्याप्रमाणे चुकीच्या वेळी चुकीचे आचरण करणे हिताचे नसते त्याचप्रमाणे क्षत्रियाला आपला धर्म विसरणे हिताचे नाही. आपल्या धर्माप्रमाणे वागल्यास दोष नाही. जसे सरळ चालण्याने किंवा दिव्याचा आधाराने चालल्यास अपाय होत नाही. धर्मानुसार आचरण केल्याने सगळ्या मनोकामना सहजच पूर्ण होतात. क्षत्रियासाठी धर्मयुद्धय म्हणजे सहजच उघडलेला दरवाजा होय. वाटेने जात असताना ठेच लागून चिंतामणी सापडावा किंवा जांभई देताना तोंडात अमृत पडावे तसे हे अर्जुन तुझ्या गुणांवर मोहून जणू ही कीर्ती तुझ्याकडे आपणहून चालत आलेली आहे.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099