अध्याय २: ओव्या १३३ ते १४३

22 एप्रिल २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक १७ ते 21 / ज्ञानेश्वरी ओव्या १३३ ते १४३ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७॥
देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥ १३५ ॥
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ १८॥
आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें । म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् । उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९॥
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥ १३७ ॥
तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
न जायते म्र्यिते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २०॥ 
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् । कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१॥
जैसें स्वप्‍नामाजीं देखिजे । तें स्वप्‍नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥
तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे । तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥ १४२ ॥
तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणौनि तू हें नारोपी । भ्रांति बापा ॥ १४३ ॥

सारांश:-
दुधामध्ये लोणी असते पण पाहिल्याक्षणी ते दिसत नाही. दुधाचे दही लावावे लागते मग ताक करावे लागते मग घुसळून लोणी निघते. तसे आपल्या आत असलेले चैतन्य आपल्याला दिसत नाही, पण ते आहे. चैतन्य आहे म्हणून शरीर आहे. सगळ्याच्या आत तेच चैतन्य आहे त्याचे आज वर्णन आहे.

सारासार विचार केला असता त्यातील भ्रमात्मक ते असार आहे आणि ते नित्य आहे ते सार आहे. आत्मानात्मविवेक केल्यावर असे कळेल की सत्य काय आहे. चैतन्य शाश्वत, सर्वव्यापी आणि जन्ममरणहित आहे. शरीर हे स्वभावतः नाशवंत आहे. त्यामुळे अर्जुना, तू लढ हेच योग्य आहे.

तुझ्याकडे देहाभिमान असल्यामुळे तू मी मारणारा व हे मरणारे असे समजत आहेस. पण तुला खरे तत्व समजले नाही. जर तू तत्वतः विचार करशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाही.

जेंव्हा आपण स्वप्न पाहतो, तेव्हा सगळे खरे वाटते पण जागे होऊन पहावे तर काहीच नसते. त्याप्रमाणे हि माया आहे. ज्याप्रमाणे सावलीला शस्त्राने मारल्यास अंगाला घाव लागत नाही किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्यबिंब नाहीसे झालेले दिसते परंतु सूर्याचा नाश होत नाही. तू व्यर्थ ह्या मायेच्या भ्रमात पडला आहेस. आकाश ज्याप्रमाणे माठात माठाच्या आकारासारखे झालेले दिसते पण तो माठ फुटल्यावर ते सहजच आपल्या मूळरूपाने राहते त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ शरीराचा म्हणजे चैतन्याचा नाश होत नाही म्हणून तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस.




No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099