अध्याय ५: ओव्या १०३-१८०

१० जून २०१८ निरुपण 
अध्याय ५: संन्यासयोग  (गीता श्लोक २०-२९/ ज्ञानेश्वरी ओव्या १०३-१८०)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


न प्रहृष्योत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २०॥
तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥ १०३ ॥
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ २१॥
जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥ १०५ ॥
सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें । रचिला म्हणौनि बाहिरें । पाउल न घाली ॥ १०६ ॥
सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥ १०७ ॥
तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेंचि फावलें । तया विषयो सहजें सांडवले । म्हणो काई ? ॥ १०८ ॥
एर्‍हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥ १०९ ॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२॥
जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंकु कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥ ११० ॥
नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥ १११ ॥
तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥ ११२ ॥
एर्‍हवीं विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ ११३ ॥
सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥ ११४ ॥
म्हणौनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥ ११५ ॥
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥ ११६ ॥
हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीचा साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ? ॥ ११७ ॥
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥
हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टी- । सारिखें दिसे ॥ ११९ ॥
म्हणौनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ १२० ॥
तें अंतर नेणती बापुडे । म्हणौनि अगत्य सेवणें घडे । सांगैं पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ १२१ ॥
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळींचे जळचर । सांडिती केवीं ॥ १२२ ॥
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥ १२३ ॥
नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें ॥ १२४ ॥
जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ? ॥ १२५ ॥
म्हणौनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥ १२६ ॥
या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥ १२७ ॥
पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष । निराशा तयां दुःख । दाविलें नावडे ॥ १२८ ॥

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्षरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्‍भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ २३॥
ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥ १२९ ॥
जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथि ॥ १३० ॥
परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥ १३१ ॥
भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी । मग सुखेंसि घे आंटी । गाढेपणें ॥ १३२ ॥
तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ॥ १३४ ॥
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एक होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें ॥ १३५ ॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः । स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः । छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५॥
म्हणौनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणाचि पावले स्वभावें । आत्माराम ॥ १३६ ॥
जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ॥ १३७ ॥
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥ १३८ ॥
ते विवेकाचें गांव । कीं परब्रम्हींचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥
ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥ १४० ॥
तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥ १४१ ॥
परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करी साधुहृदयराउळीं । मंगळौखा ॥ १४२ ॥
ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥ १४३ ॥
अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥ १४४ ॥
अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥ १४५ ॥
जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥ १४६ ॥
जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें । जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥ १४७ ॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६॥
जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥ १४८ ॥
तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥ १४९ ॥
ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें पुससी तरी भलें । संक्शेपें सांगों ॥ १५० ॥
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः । प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः । विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८॥
तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥ १५१ ॥
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी । तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां॥ १५२ ॥
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती॥ १५३ ॥
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे । मग एकेकु वेगळें । निवडूं नये॥ १५४ ॥
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥ १५५ ॥
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं॥ १५६ ॥
तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कें आहे । म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ १५७ ॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् । सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंज्ञासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥ १५८ ॥
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते॥ १५९ ॥
तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप । मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले॥ १६० ॥
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला॥ १६१ ॥
तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ? ॥ १६२ ॥
तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा॥ १६३ ॥
म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि॥ १६४ ॥
एर्‍हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायौतारा । सोहपा जैसा॥ १६५ ॥
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखियां अभोळां । एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर ॥ १६६ ॥
म्हणौनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि॥ १६७ ॥
तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका । तरी काय जाहलें आईकीजो कां । सुखें बोलों॥ १६८ ॥
अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ? ॥ १६९ ॥
आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें । आतां तें अद्‍भुतपण स्नेहाचें । कवण जाणे॥ १७० ॥
तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि । हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥ १७१ ॥
जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली । म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणें ॥ १७२ ॥
हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परि तें स्नेहरूपा न येल । बोलवरी॥ १७३ ॥
म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें । जो आपुलें मान नेणें । आपणचि॥ १७४ ॥
तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा॥ १७५ ॥
अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे। तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ॥ १७६ ॥
तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥ १७७ ॥
ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं । तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां॥ १७८ ॥
तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे॥ १७९ ॥
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु॥ १८० ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099