अध्याय २: ओव्या १ ते २९

१८ मार्च २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक १ ते ३ / ज्ञानेश्वरी ओव्या १ ते २९ )



एकनाथषष्ठीच्या निमित्याने तुकाराम महाराजांबद्दल प्राचीने सांगितले

एकनाथषष्ठीच्या निमित्याने एकनाथ महाराजांबद्दल मंजिरीने सांगितले

॥  श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ द्वितीयोऽध्यायः – अध्याय दुसरा ।
। साङ्ख्ययोगः ।

संजय उवाच ।
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥
मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥
तें कुळ देखोनि समस्त । स्‍नेह उपनलें अद्‍भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥
म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु । देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
श्रीभगवानुवाच ।
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २॥
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं । तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें । करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी । तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥ १० ॥
पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥
तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥
ना तरी पवनु मेघासी बिहे ? । कीं अमृतासी मरण आहे ? । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ? ॥ १४ ॥
कीं लवणेंचि जळ विरे ? । संसर्गें काळकूट मरे ? । सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ? ॥ १५ ॥
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला ? । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥
सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां । सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायी ? ॥ १९ ॥
हे असतीये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३॥
म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं । हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥ २३ ॥
तूं आधींचि काय नेणसी ? । कीं हे गोत्रज नोळखसी ? । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ? ॥ २४ ॥
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ? । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ २५ ॥
तरी आतां काय जाहलें । कायि स्‍नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥
मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥

सारांश
ह्या अध्यायाचे नाव आहे सांख्ययोग - बुद्धियोग .
संपूर्ण गीतेमध्ये पाच सिद्धांत आले आहेत ते ह्या अध्यायात भगवान सांगणार आहेत. सिद्धांत म्हणजे जे
कधीही बदलत नाहीत.
१. देह नश्वर आहे
२. आत्मा अमर आहे
३. माणूस हा परमेश्वराचा अंश आहे
४. कर्म अटळ आहे
५. स्वधर्म पालन हाच खरा धर्म
पाचही सिद्धांत ह्या अध्यायामध्ये आणि गीतेमध्ये पुनःपुनः येणार आहेत आणि भगवान आपल्याला
समजावून सांगणार आहेत. अर्जुनाला स्वधर्म सांगायचा आहे.
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, शोकाकुल झालेला अर्जुन रडू लागला. आपले संपूर्ण कुळ पाहून त्याच्या मनात
मोह निर्माण झाला आणि त्याचे चित्त द्रवले. जसा राजहंस चिखलात रुताल्यावर म्लान दिसतो तसे तो
दिसू लागला. तेंव्हा भगवान म्हणाले, अर्जुना युध्द टाकून जाणे तुला शोभते काय? तू कोण आहेस? काय करतो आहेस त्याचा विचार कर. तुला झालेय काय? तुझे नाव एकून अपयश पळून जाते, तू शौर्याचे आगर आहेस, क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस. तू युद्धात शंकरांला जिंकलेस. तुझा पराक्रम येवढा मोठा की त्रिभुवनदेखील क्षुद्र वाटू लागते.तोच तू वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून बसला आहेस. तू असा दिन का होतोस? तू मोहाला आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस, वेळीच सावध हो. मूर्खपणा सोडून दे, धनुष्य हातात घे. युद्धाच्या वेळी दया करणे क्षत्रियास योग्य आहे का सांग बरे?

हे तुझ्या कीर्तीचा नाश कारणारे  आहे. असा खेद करणे तुला शोभत नाही. हे सगळे काय आत्त्ताच तुझे सगे
सोयरे झाले काय? हे तुला आधी माहित नव्हते काय? तुझे नातेवाईक तुझ्याशी कसे वागले हे तुला मी का
सांगावे? मग आत्ता ह्या वेळी का खेद करतोस? युद्धप्रसंग तुझ्यासाठी नवीन नाही. तू हे फार वाईट केलेस.
जर तू मोह करशील तर तुझी प्रतिष्ठा जाईल. तू इह-परलोकाला अंतरशील  याप्रकारे अनेक प्रकारे भगवंतानी
अर्जुनाला समजावून सांगितले.


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099