अध्याय ११ : ओव्या १-८०

१३ ऑक्टोबर २०१९ निरुपण 
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक १-२  / ज्ञानेश्वरी ओव्या १-८० )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥  श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ एकादशोऽध्यायः – अध्याय अकरावा । ।
। विश्वरूपदर्शनयोगः ।

आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं । येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥
अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं । तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले रस ॥ ३ ॥
परी शांताद्‍भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें । जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥ ४ ॥
ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं । तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥ ५ ॥
मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥ ६ ॥
माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥ ७ ॥
एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें । ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें ॥ ८ ॥
तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मर्‍हाठियां शब्दसोपानें । रचिली धर्मनिधानें । श्रिइनिवृत्तिदेवें ॥ ९ ॥
म्हणौनि भलतेणें एथ सद्‍भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ॥ १० ॥
हें असो ऐसें सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव । तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥ ११ ॥
जेथ शांताद्‍भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे । हें अल्पचि परी उघडें । कैवल्य एथ ॥ १२ ॥
तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो । परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला ॥ १३ ॥
एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मर्‍हाठिये ॥ १४ ॥
याचिलागीं माझें । विनविलें आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्ही ॥ १५ ॥
तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज ॥ १६ ॥
अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥ १७ ॥
तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें । म्हणौनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ॥ १८ ॥
हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥ १९ ॥
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल । तुमचेनि धर्में होईल । सुरवाडु जगा ॥ २० ॥
या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें । आतां सांगैं जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥ २१ ॥
तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें । मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही ॥ २२ ॥
अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविले लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ? ॥ २३ ॥
म्हणौनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं । तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥ २४ ॥
आतां बोलिजतसें आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ॥ २५ ॥
बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥ २६ ॥
तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे । तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें । हेंचि भलें ॥ २७ ॥
मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥ २८ ॥
हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी ॥ २९ ॥
हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड । कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ? ॥ ३० ॥
म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं । ते सहसा कैसें काई । सांगा म्हणों ? ॥ ३१ ॥
मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु । परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥ ३२ ॥
माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ? । परी तोही हें बोली । करीचिना ॥ ३३ ॥
मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ? ॥ ३४ ॥
तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥ ३५ ॥
हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचें हें निज । केवीं उराउरी मज । पुसों ये पां ? ॥ ३६ ॥
आणि न पुसेंचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणें । सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें ॥ ३७ ॥
म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें । येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥ ३८ ॥
परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें । दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥ ३९ ॥
अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ? ॥ ४० ॥
पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे । तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ? ॥ ४१ ॥
तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण । ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥ ४३ ॥
अर्जुन उवाच ।
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् । यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १॥
मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें । वाच्य केलें जें न बोलणें । कृपानिधे ॥ ४४ ॥
जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचे ठाव फिटती । तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें ॥ ४५ ॥
होतें हृदयाचिये परिवरीं । रोंविलें कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥ ४६ ॥
तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें । जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ॥ ४७ ॥
ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्ही । हें बोलों तरी आम्ही । तुज पावोनि कैंचे ॥ ४८ ॥
परी साचचि महामोहाचिये पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥ ४९ ॥
एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं । कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्हीं आथी म्हणों ॥ ५० ॥
मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें ॥ ५१ ॥
याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन । ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥
देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥ ५३ ॥
जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥
आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥ ५५ ॥
एर्‍हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥
हें जगचि आघवें बुडावें । वरी आकाशहि तुटोनि पडावें । परी झुंजणें न घडावें । गोत्रजेशीं मज ॥ ५७ ॥
ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी । चांगचि तूं जवळां एर्‍हवीं काढी । कवणु मातें ॥ ५८ ॥
नाथिलें आपण पां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्ही ॥ ५९ ॥
मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥ ६० ॥
दुराग्रह हिरण्याक्षें । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे । मग माहार्णव गवाक्षें । रिघोनि ठेला ॥ ६१ ॥
तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥ ६२ ॥
ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥ ६३ ॥
तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥ ६४ ॥
आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥ ६५ ॥
हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ? ॥ ६६ ॥
आणि मी तंव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारां । घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥
तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे ? । तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥ ६८ ॥
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया । त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २॥
पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजीं ॥ ६९ ॥
इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥ ७० ॥
आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु ॥ ७१ ॥
जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्मा{ऐ}शिया रत्‍नांतें विये । ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥ ७२ ॥
ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य । जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥
जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं । कां हातें सारूनि बाबुळीं । जळ देखिजे ॥ ७४ ॥
नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥ ७५ ॥
तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥ ७६ ॥
म्हणौनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा । परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥ ७७ ॥
तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों । काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ? ॥ ७८ ॥
जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ? ॥ ७९ ॥
म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें । तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं ॥ ८० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099