उन्मेष देशपांडे याने Western Culture च्या अनुषंगाने त्रिगुणांचा विचार केला. US मध्ये असताना, आजूबाजूला रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव असताना, आम्हीं सत्वगुणाचा आधार घेऊन आमचे आयुष्य कसे उन्नत करू शकतो हे दाखवले. सध्याच्या Technology च्या युगातसुद्धा गीता/ज्ञानेश्वरीचे ज्ञान आमच्या आयुष्यात ताण/तणाव कमी करायला, चिंता/ काळजी कमी करायला आणि आनंदी करायला कसे उपयोगी पडू शकते ते दाखवले.
।।ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
यूएस किंवा वेस्टर्न कल्चर हि थिम आणि त्याबरोबर भगवद्गीतेतील १४व्या अध्यायाचा अभ्यास हा खूप अभिनव उपक्रम आहे असं मला वाटत. ह्या उपक्रमामध्ये सामील होण्याची संधी दिल्याबद्दल मी सद्भक्त विवेकदादा व ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाचे आभार मानतो.
रोज नेमून दिलेले श्लोक आणि त्या अंगाने त्याच्यावर मनन, चिंतन करायचे आहे, हे ह्या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
त्यानुसार, आज श्लोक क्रमांक ३ व ४ हे सेवेसाठी मिळाले आहेत. ते असे आहेत -
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधामहम्यम् । संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३॥
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ ४॥
आता ह्या श्लोकांचा अगदी सरळ सरळ अर्थ पहिल्यांदी बघूयात. -
३ऱ्या श्लोकात भगवंत असे म्हणतात, कि, सर्व विश्वाची उत्पत्ती परमात्म्या पासून झालेली आहे. महद्ब्रम्ह अशा प्रकृतीच्या ठिकाणी मी गर्भ ठेवतो व त्यापासून सर्व भूतमात्रे उत्पन्न होतात.
४थ्या श्लोकात भगवंत परत तेच वेगळ्या पद्धतीने रिपीट करतात - ह्या योनीच्या ठिकाणी जन्म पावणारे सर्व देह त्यांचा पिता मी आहे व माता हि प्रकृती आहे.
थोडक्यात आपण सर्व, इतकेच काय तर अवतीभोवती दिसणारे पक्षी, प्राणी, झाडे, किडे, मुंगी देखील तत्त्वतः एकाच माता पित्याची लेकरं आहोत हे स्पष्ट आहे.
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "हे विश्वची माझे घर | ऐसी जयाची मती स्थिर | किंबहुना चराचर |आपणची जाला |" संतांना हि समदृष्टी प्राप्त होते. जशी एकाच आई वडिलांची मुले स्वाभाविक रीतीने एकमेकांशी प्रेमाने व्यवहार करतात, करणे अपेक्षित आहे, त्याच न्यायाने जर भगवद्गीतेच तत्वज्ञान तेच सांगते आहे, आणि आता वैज्ञानिकहि तेच सिद्ध होत आहे असं म्हणत आहेत, तर मग आपल्या वृत्तीवर ते आरूढ व्हायला काय अडचण आहे?
खरं सांगायचं झालं तर यूएस किंवा वेस्टर्न कल्चर आणि सध्याच्या घडीला पुण्यासारख्या शहरात असलेली जीवनपद्धती ह्या मध्ये फार काही फरक आहे असं मला वाटत नाही. ग्लोबलायझेशन मुळे आणि इंटरनेटच्या युगात आता सर्व जगच तशाप्रकारे जवळ आलेलं आहे. त्यामुळे त्याचे जे काही फायदे तोटे आहेत ते दोन्हीही ठिकाणी तसे सारखेच आहेत. आणी तसा तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
साधकांच्या दृष्टीने तसा विचार करायचा झाला, आणि विवेक दादांनी जसं सांगितलं कि तुझे यूएसमधल्या अनुभवांच्या अंगाने तू हा अभ्यास कर, तर त्या दृष्टीनेही, मी पुण्यात असताना काय किंवा अमेरिकेत असतानाही कायम माझ्या सद्गुरुंच्या पंखालीच राहिलो असं मला आज मागे वळून बघताना जाणवतं. त्यांनीच मला सांभाळलं, योग्य मार्गावरून चालण्याचं बळही तेच पुरवत राहतात.
त्यामुळे सद्गुरूकृपेने मी वेस्टर्न कल्चर पासून तसा लांबच राहिलो. पुण्यात असताना देखील लहानपणापासूनच माझ्या आईमुळे परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा जवळून सहवास मिळाला, पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर स्वामी मकरंदनाथांनी मोठ्या कृपाळूपणे अंगीकार केल्यामुळे माझा अध्यात्ममार्गावरील प्रवास अधिकच ध्येयनिष्ठ पद्धतीने चालू राहिला.
"जो संसार दुःखे दुखावला । जो त्रिविध तापे पोळला । तोची एक अधिकारी जाला परमार्थासी ।।" अशाप्रकारचे प्रचंड ताप किंवा खूप दुःख अथवा सारखंच अपयश माझ्या वाट्याला आलं नाही. जेवढे सर्व साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात सर्वांच्याच वाट्याला जे काही सुख दुःखाचे प्रसंग येतात ते अनुभवत असताना, माझ्या सद्गुरूंचा जवळून सहवास मला त्यांच्याच कृपेने कायम मिळत राहिला. स्वामी केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या अवतीभोवती बाकीचे जीवन आखून घेतल्यामुळे मला वाटतं कि मला कधी तशाप्रकारे ज्याला चमक-धमक दुनिया म्हणतात त्याचं आकर्षणच वाटलं नाही.
कर्मधर्म संयोगाने जरी मी गेली १२ वर्षे अमेरिकेत असलो तरी, मी माझ्या स्वामिजींशी त्यांच्या कार्याशी अधिकअधिक जोडलाच जातो आहे, हे माझ्या स्वामीजींचे माझ्यावर असलेल्या प्रेमामुळेच शक्य आहे. माझा पिंड हा पूर्णपणे माझ्या स्वामीजींच्या प्रेमावरच पोसलेला आहे आणि तो तसाच पोसला जावो, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करून इथे थांबतो.
आता इथून पुढच्या स्वाध्यायात, अमेरिकेतले अनुभव, स्वामीजींचे कार्य, साधक विश्व ह्या बद्दल जसा जसा १४व्या अध्यायातला कॉन्टेक्स्ट असेल तसा तसा मी व्यक्त होत जाईन.
।।हरी ओम तत् सत।।
।।ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
आज सेवेसाठी खालील श्लोक आहेत -
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ ५॥
अर्थ - प्रकृती पासून उत्पन्न झालेले सत्व, रज आणि तम हे तीनही गुण जीवाला बांधून ठेवतात.
त्यामुळे "मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण । केल्या कर्माचे फळ आपण । भोगीन आता ।। " अशा प्रकारच्या देहबुद्धीमध्ये आपण अडकून राहतो.
तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥ ६॥
अर्थ - ह्या तीनही गुणांमध्ये सत्व हा उत्तम गुण असून देहबुद्धी मुळे साचलेले अज्ञानाचे मळभ दूर करण्यास मदत करतो.
परंतु, सत्वगुणाचा अहंकार जीवाला मारक ठरतो. आम्ही साधना करतो, आम्ही तसले काही खातपीत नाही, आम्ही वेडंवाकडं बोलत नाही, आमचं जीवन कसं साधं आणि स्वछ हा सुप्त अभिमान साधकाला अडचणीत आणतो.
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् । तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ॥ ७॥
अर्थ - रजोगुण मनुष्याला सतत कर्म आणि कर्मांमागून मिळणारी फळं ह्याभोवती नाचवत राहतो. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे इथून तिथे तिथून इथे फिरत राहतो. जिथे जाईल तिथे धरसोड वृत्ती, अतिरिक्त कामना आणि फलासक्ती हि त्याची वैशिट्य आहेत.
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें | दुसर्याचें अभिळाषावें | तो रजोगुण || असं समर्थ म्हणतात.
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् । प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८॥
अर्थ - प्रमाद, आळस, निद्रा आणि त्यामुळे प्राप्त होणारे अज्ञान हे तमोगुणाचे लक्षण आहे.
पृथ्वी पाताळीं जांवो । कां आकाशही वरी येवो ।परी उठणें हा भावो । उपजों नेणें ।। - एखाद्या धोंड्या प्रमाणे जीव वर्तन करतो. अशाप्रकारे, ह्या तीनही गुणांच्या ठिकाणी असलेल्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे जीवात्मा गुंतून पडतो असे भगवंत म्हणतात.
मी बे एरिया सिलिकॉन वॅली मध्ये काम करतो, इथे गूगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, ऍमेझॉन अशा नावाजलेल्या हजारो कंपन्या आहेत. साहजिकच, उत्तम बुद्धिमत्ता आणि अथक परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी इथे भरपूर संधी उपलब्ध आहेत, मुबलक पैसा आहे. चांगला पैसा हातात असेल तर अतिशय अद्ययावत अशा सुखसोयी सेवेसाठी हजर आहेत. तरीही, त्यामानाने इथे कोणीही समाधानी, आनंदी दिसत नाही.
ह्याचे कारण, देहाच्या अंगाने जीव वर्तन करत असताना हे तीनही गूण आलटूनपालटून त्या जीवाच्या वृत्तीचा ताबा घेत राहतात.
सत्वगुणामुळे अहंकार झालेली व्यक्ती दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी समजू लागते. त्याच व्यक्तीच्या ठिकाणी रजोगुण वाढला तर जास्त काम = जास्त पैसा = जास्त सुखसोयी ह्या मध्येच गुंतून पडते, तर तमोगुणाच्या प्राबल्यामुळे तीच व्यक्ती वेळ आळसात घालवू लागते, परिणामी, महत्वाच्या गोष्टी ऐनवेळी विसरणे, हातची संधी गेल्यामुळे क्रोध अनावर होऊन काही चुका हातून घडणे अशा दुष्टचक्रात सापडताना दिसते.
ह्याच्या पुढच्या श्लोकांवरचा स्वाध्याय आपण उद्या बघू.
।।हरी ओम तत् सत, श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु।।
ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
आज सेवेसाठी खालील श्लोक आहेत -
सत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत । ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत ॥ ९॥
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत । रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १०॥
ह्या दोन्ही श्लोकांचा वेगवेगळा अर्थ पाहण्याऐवजी आपण त्याचा कम्बाइन्ड अर्थ बघितला तर समजायला जास्त सोपे जाईल, असे वाटते.
म्हणून १० व्या श्लोकाचा अर्थ आणि ९व्या श्लोकात वर्णन केलेला त्याचा परिणाम अशा प्रकारे आपण आज बघुयात -
भगवंत म्हणतात कि,
जीवात्मा देहाच्या अंगाने वर्तन करीत असताना कधी कधी रज व तम गुणांपेक्षा सत्वगुण प्रबळ होतो (१०) - अशावेळी ती व्यक्ती सुखी, आनंदात असते. (९)
तर कधी सत्व आणि तम ह्या दोन्ही गुणांना बाजूला सारून रजोगुण उफाळून वर आला तर (१०) - त्याच व्यक्तीच्या ठिकाणी मनाचे चांचल्य दिसून येते. (९)
आणि कधी कधी सत्व आणि रज ह्या दोन्हींवर कडी करून तमोगुण डोकं वर काढतो तेव्हा (१०) - ती व्यक्ती मूढ होते. (९)
सत्वगुण -
भल्या पहाटे अथवा ब्राह्ममुहूर्त हि ध्यानधारणा, साधना, नामस्मरण, देवपूजा ह्या गोष्टींसाठी अगदी फायदेशीर मानली जाते, कारण स्वभावतःच अगदी सहज जीवात्म्याच्या ठिकाणी सत्वगुण भरून राहिलेला असतो. जर आदल्या रात्री लवकर झोपला असेल, निद्रा पूर्ण झालेली असेल, तर अशा व्यक्तीस एक प्रकारचे नैसर्गिक सुख आपोआप मिळतच असते, त्यामुळे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, "संसारासी त्रासे मन | कांहीं करावें भजन | ऐसें मनीं उठे ज्ञान | तो सत्वगुण ||" अशी काहीशी जीवात्म्याची मानसिक स्थिती असते. त्यामुळे ती व्यक्ती म्हणते आता संसाराचा विचार नको, आता फक्त मी आणि देवाचे भजन बस! देह शुचिर्भूत असावा, स्वछ असावा, असे स्वाभाविक स्फुरण देहात्म्यास होत राहते. व्यवस्थित विश्रांती झाल्यामुळे शारीरिक थकवा, मानसिक मरगळ पळालेली असते, बुद्धीला तरतरी असते, त्यामुळे चांगले विचार अंतःकरणात भरून राहतात.
रजोगुण -
जसजशी कामाची वेळ जवळ येते म्हणजे, ८ - ८.३० च्या सुमारास, एकप्रकारे ऑफिस, जो काही उद्योगधंदा असेल तिथले वेध लागणे सुरु होते. डेडलाईन्स, कामाच्या ठिकाणचे राजकारण, त्यातला आपला सहभाग, नफा-नुकसान अशा प्रकारे विचारचक्र सुरु होऊन अगदी सकाळी सकाळी जीवात्म्यास सुख देणारा सत्वगुण कुठल्याकुठे पळून जातो आणि टाइम इस मनी अशा प्रकारची एक जाणीव जीवात्म्याचा ताबा घेते. किती काम करणे आणि कुठे थांबणे हा विवेक हळूहळू इथल्या कल्चर मध्ये लुप्त होत चालला आहे. त्यामुळे जेवायला उशीर, झोपायला उशीर. त्यातून टीव्ही बघणे, मोबाईल चा अव्याहत वापर करणे, सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असणे ह्या सवयी असतील तर झोप अगदीच कमी.
समर्थ म्हणतात, "आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका। विवेकी हो॥", खरं तर रजोगुणाचा उपकार असा कि जर तो विवेक सांभाळून वापरला तर परमार्थ बाणेदार पणे करता येतो, पण नेमक्या क्षणी आपली ताकद कमी पडते.
माझ्या ओळखीतली एक भगिनी आहे ती म्हणते कि, लोकांबरोबर असलेले संबंध हे तिच्यासाठी एका इन्वेस्ट्मेन्ट्स सारखे आहेत कि ज्याच्यातून प्रत्येक बाजूनी चांगले रिटर्न्स हे मिळालेच पाहिजेत. अशा मनस्थितीत सुख कसे मिळणार बरे?
तमोगुण -
तमोगुण हा देहधारणेसाठी उपकारक आहे, त्यामुळे शरीराला, मनाला, बुद्धीला आवश्यक ती विश्रांती मिळते, जेणेकरून दुसऱ्या दिवसाची सुरवात फ्रेश व्हाव्ही.
परंतु, रजोगुणाच्या अगदी उलट म्हणजे काहीच करावेसे न वाटणे हे तमोगुणाच्या प्रादुर्भावामुळे होते. त्यामुळे जीवात्म्यास एक प्रकारचे जडत्व येते, मग दिवसा हि व्यक्ती डुलक्या काढू लागते, समर्थ म्हणतात, "अखंड भ्रांती पडे | केला निश्चय विघडे | अत्यंत निद्रा आवडे | तो तमोगुण ||".
इकडच्या बे एरिया कल्चर बद्दल बोलायचे झाल्यास, वर वर्णन केलेल्या सत्व, रज आणि तम गुणाचे नैसर्गिक वर्चस्व असणाऱ्या सर्व वेळांमध्ये रजोगुणाचा आश्रय घेऊन राहणारी सतत काम करण्याची वृत्ती फार बळावलेली दिसते. म्हणजे पहाटे काम, दिवसभर काम आणि रात्रीही हि काम. तसं शक्य असून देखील रात्री लवकर न झोपता फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर तासंतास वेळ कसा जातो हे कोणालाच समजेनासं झालं आहे. वीकडेस मध्ये येणारा कामाचा ताण घालवण्यासाठी "हॅपी अवर्स" नावाची संकल्पना जोर धरू लागली आहे, म्हणजे संध्याकाळी लवकर पब मध्ये जाऊन जेवले तर ड्रिंक्सवर सूट मिळते. खरंतर संध्यासमयी नैसर्गिक सत्वगुणाचा अविष्कार असतो, देवासमोर समई लावून हात पाय धुवून १० मिनटे डोळे मिटून शांत बसले तरी अपूर्व असे समाधान लाभते.
इकडे वीक-एन्ड कल्चर ला फार महत्व आहे. अतिरिक्त कामामुळे होणारी देहाची झीज भरून काढण्यासाठी म्हणून वीक-एन्ड चे दोन दिवस शक्यतो आराम, पुढल्या वीकची तयारी आणि फॅमिली टाइम ला बरेच महत्व आहे. इथली कुटुंब प्रणाली तशी कॉम्प्लिकेटेड आहे, तिच्या मध्ये सेल्फ सेंटर्डनेस आहे, पर्सनल स्पेस हि आपल्यलाला तशी ओळख नसलेली गोष्ट इकडे मात्र तिला बरीच मान्यता आहे. त्यामुळे इथे वेगवेगळ्या ठिकाणी वोलेण्टेररिंग साठी आव्हान केले जाते, त्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये देखील समावेश आहे.
असो, ह्याच्या पुढच्या श्लोकांवरचा स्वाध्याय आपण उद्या बघू.
।।हरी ओम तत् सत, श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु।।
।ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
आज सेवेसाठी खालील श्लोक आहेत -
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते । ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ ११॥
अर्थ - ज्यावेळी आपल्या ठिकाणी पवित्र विचार उत्पन्न होतात, तेव्हा समजावे कि सत्वगुण वाढला आहे.
स्वरूपानंद स्वामी म्हणतात, "सत्व वाढता विषय सर्वथा नावडती चित्ताते", मन स्वस्थ असते. जीवात्म्याची बुद्धी अग्र होते, त्याच्या बुद्धीला कोणतेही फाटे फुटत नाहीत. संसारदुःखाचा विसर पडतो, परमार्थाविषयी आवड निर्माण होते, परोपकार करावासा वाटतो, स्वछ-साधा वेष परिधान करावासा वाटतो, सत्पुरुषांचे दास्यत्व करण्याविषयी आवड निर्माण होते, वाचा सुधारते, देहबुद्धी कमी होते, तो क्षमाशील होतो, नम्र होतो, अन्नदान करावे असे त्याला वाटू लागते, कोणीही त्याच्याशी उर्मटपणे बोलले तरी तो आलेला क्रोध आवरून धरतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याठिकाणी विवेक जागा असतो.
लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा । रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १२॥
अर्थ - जीवात्म्याच्या ठिकाणी जर रजोगुणाची वृद्धी झाली तर तो मोहग्रस्त होतो, लोभी होतो, विषयभोगांची लालसा त्याच्याठिकाणी उत्पन्न होते. पर स्त्री आणि पर द्रव्य ह्या ठिकाणी त्याचे मन आसक्त होते. विनोबा म्हणतात त्याप्रमाणे डोंगर हटवावा, समुद्र बुजवावा अशा प्रकारची अचाट कर्मे आपल्या हातून घडावीत अशी आकांक्षा निर्माण होते, दाम असेल तर काम हि वृत्ती असते. समर्थ म्हणतात, "माता पिता आणि कांता | पुत्र सुना आणी दुहिता | इतुकियांची वाहे चिंता | तो रजोगुण ||"
जप-ध्यान, पाप-पुण्य असा कोणताही विचार त्याच्या ठिकाणी नसतो, मी सर्वांत श्रेष्ठ असा भाव असतो, कोव्हीड सारख्या परिस्थितीत, रजोगुणी व्यक्ती म्हणेल कि, बाकीचे मेले तरी चालतील, पण मी वाचलो पाहिजे. पोट भरण्यासाठी कितीही कष्ट सोसायची तयारी असते, पण देवळामध्ये ५ मिनिटे जाऊ म्हंटलं तर नको म्हणतो. ध्यानासाठी एक तास बस सांगितले तर म्हणतो वेळ वाया जातो, पण तोच वेळ एखादा चित्रपट बघताना वाया गेला असं वाटत नाही. अशा प्रकारे रजोगुणी माणसाचे वर्तन असते.
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च । तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥ १३॥
अर्थ - आणि जर तमोगुण वाढला तर, काम न करण्याकडे वृत्ती, भांडण-मारामाऱ्या किंवा वेळकाळ न बघता सारखे लोळत पडण्याची वृत्ती बळावते. अशा माणसाचा आहार देखील अति तळकट, अति तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे ह्याकडे असतो. अभक्ष भक्षण, अपेयपान, तसेच मध्यरात्री नंतर मित्रांबरोबर नको त्याठिकाणी जाणे अशा प्रकारचे वर्तन असते. अनावर क्रोध हे ह्या तमोगुणाचे प्रमुख लक्षण आहे, मग आपले आईवडील, बहीण भाऊ कोणीही असो त्याचे वर्तन असभ्य राहते, लोकांची भांडणे पाहावीत ह्याची त्याला आवड असते, दुसऱ्याचा घात करणे, अथवा आत्महत्येचे विचार मनात येणे, फळ-फुलं बहरून असलेली झाडं तोडून टाकणे, अस्वच्छ राहणे, केस, नखं न कापणे, देवाची निंदा करणे, देउळे फोडणे अशा प्रकारची कर्म तमोवृत्ती वाढली कि घडू लागतात.
समर्थ म्हणतात - उगेंचि खावें उगेंचि असावें | स्तब्ध होऊन बैसावें | कांहींच स्मरेना स्वभावें | तो तमोगुण ||
ह्या तीनही गुणांनी युक्त आपल्या अवतीभोवती अशा प्रकारची वर्तन करणारी माणसे आपण बघतो. आपल्याहातून देखील अशाप्रकारचे वर्तन घडत असते.
जर परमेश्वर कृपेने लक्षात आले कि आपला रजोगुण वाढतो आहे - आपले मन शांत झाले पाहिजे, जर लक्षात आले कि आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडत आहोंत, आपला तमोगुण वाढतो आहे - आपले मन शांत झाले पाहिजे, जर लक्षात आले कि सत्वगुणाचा अंहकार निर्माण होतो आहे - आपले मन शांत झाले पाहिजे. आपण व्यवहारात वर्तन करताना, वेळीच आपण सावध होऊन आपली विवेक शक्ती जागृत होण्याची कला साधली तर हे होऊ शकते.
बे एरिया कल्चर मध्ये कमालीची स्पर्धा आहे, त्यामुळे मानसिक ताण आहे, नैराश्य आहे. लोकांकडे पैसा आहे त्यामुळे मत्सर आहे, अजून पाहिजे अजून पाहिजे ह्या वृत्तीमुळे लोभ आहे. त्याच्या उलट इथे पुष्कळ मंदिरं देखील आहेत, त्यामुळे लोकांचा सेवाभावहि आहे. खूप मंडळी निस्वार्थी भावनेने लोकांना मदतही करत आहेत, त्यातून त्यांना अतीव समाधान मिळते. अशा प्रकारची सर्व सरमिसळ ह्या ठिकाणी आढळते.
माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर मी व माझ्यासारखे परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांचे अनुग्रहित साधक जे पुण्यातून, नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने किंवा भगिनी वर्ग जो लग्न झाल्यामुळे इथे आला आहे, अशा सर्वानी मिळून स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली इकडे एक केंद्र स्थापन केले आहे. गेली १४ वर्ष हे केंद्र नियमित चालू आहे, यामध्ये प्रामुख्याने गीता, ज्ञानेश्वरी व दासबोध ह्या सद्ग्रंथांचा अभ्यास केला जातो. त्याचा लाभ सर्वांना होतो आहे.
।।हरी ओम तत् सत, श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु।।
।।ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
आज सेवेसाठी खालील श्लोक आहेत -
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् । तदोत्तमविदां लोकानमलान् प्रतिपद्यते ॥ १४॥
अर्थ - सत्व वृत्तीची व्यक्ती देह सोडल्यावर फिरून शुभलोकी जन्म पावते.
रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते । तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १५॥
अर्थ - रज वृत्तीची व्यक्ती देह सोडल्यावर फिरून कर्मासक्त अशा कुळात जन्म पावते. तर तम वृत्तीची व्यक्ती देह सोडल्यावर फिरून मूढयोनीत जन्म पावते.
कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् । रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥ १६॥
अर्थ - सत्वगुणामुळे सात्विक कर्माचे फळ जे समाधान, शांती असे असते. रजगुणामुळे दुःख पदरी पडते, तर तमोगुणामुळे जीवात्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार असतो.
सत्त्वात्संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च । प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १७॥
अर्थ - सत्वगुणामुळे जीवात्मा ज्ञानाचा अधिकारी होतो, रजोगुणामुळे ती व्यक्ती लोभी होते आणि तमोगुणी व्यक्तीकडून विविध अपराध होताना दिसतात.
ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १८॥
अर्थ - सत्वगुणामुळे स्वर्गप्राप्ती होते, रजोगुणामुळे मनुष्यलोकी जन्म घ्यावा लागतो आणि तमोगुणामुळे नरकात जागा मिळते.
त्रिगुणांमुळे होणारी फलप्राप्ती किंवा देह सोडल्यावर जीवात्म्यास मिळणारी गती ह्याबद्दलचे वर्णन वरील श्लोकांमध्ये केलेलं आहे. आपण देखील एखादी व्यक्ती गेली कि तिला सदगती मिळो अशी प्रार्थना करतो.
खरंतर मरणानंतरचे जग कसे असते ह्याबद्दल प्रत्येकाला उत्कंठा असते, पुनर्जन्म आहे का ह्याबद्दल देखील वेगवेगळे मतप्रवाह आहेत, परंतु ज्या अर्थी गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्यामध्ये हे सांगीतलेले आहे, त्या अर्थी आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवावयास काय हरकत आहे?
अगदी मरणानंतरचे आपण नको विचार करायला, परंतु, ह्या जन्मात देखील आपण बघतो, कि सत्वशील व्यक्ती हि सुखात असते. सुखात ह्याचा अर्थ श्रीमंतीत लोळत असते असा नव्हे. भले त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, ती वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत असेल, पण ध्यान-नाम, पूजा, परोपकार करण्याची भावना, सद्वासना, नम्रता, गोड बोलणे, कर्तव्यात कोणतीही कसूर ना ठेवणे, अशा प्रकारच्या स्वभावामुळे, ती व्यक्ती एक सात्विक समाधान निश्चित भोगत राहते. अशा सद्गुणांमुळे अवतीभोवतीच्या लोकांची ती व्यक्ती आवडती होते, म्हणून आपोआप ती व्यक्ती दुसऱ्याच्या आदरास, प्रेमास प्राप्त होते. अशा व्यक्तीस मोठ्या भाग्याने संतांचा देखील सहवास घडू शकतो, खरा स्वर्गलोक तो हाच.
रजोगुणि व्यक्ती, तिच्या धरसोड स्वभावामुळे, फळांच्या अपेक्षेमुळे, तिच्या अफाट महत्वाकांक्षी स्वभावामुळे, बऱ्यचवेळा निराशाच पदरी पडते. जसा एखादा घाण्याला जुंपलेला बैल असावा, तशी ती व्यक्ती मर मर कर्म करते, पण तो बैल जसा गोल गोल फिरून कुठेच जात नाही, तशी ती व्यक्ती देखील पारमार्थिक दृष्टया काहीच प्राप्त करून घेत नाही. एका व्यसायातून दुसरा व्यवसाय, दुसऱ्यातून तिसरा, अशा प्रकारे, वरवर सुख समृद्धी दिसत असली, तरी आतमध्ये ती व्यक्ती सुखी असेलच असं नाही. मुर्त्युलोक तो हाच.
तामसिक व्यक्ती हि अज्ञानी असते, हातून सतत घडणाऱ्या प्रमादांमुळे, साहजिकच ति व्यक्ती समाजात कोणालाच आवडत नाही. नसत्या केलेल्या उपद्व्यापांमुळे त्याच प्रमाणात भोगाव्या लागणाऱ्या शिक्षांमुळे ती व्यक्ती अधोगतीला जाते, तोच हा नरकवास.
यूसए मधील आयटी कल्चर पुरते बोलायचे झाल्यास, इथे रजोगुणाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसतो. बे एरिया मध्ये जणूकाही रजोगुणाचा धूर पसरलेला आहे असे वाटते. अगदी पहाटे पहाटे पासून ते रात्री उशिरा झोपी जाई पर्य्नत सर्वांचीच धावपळ हि फक्त पोटासाठी आहे. सुट्टयामंध्ये मिळालेला वेळ हा मिळवलेला पैसा वेगवेगळी ठिकाणे बघण्यासाठी, वेगवगेळे भोग भोगण्यासाठी वापरला जातो, म्हणजे परत त्यासाठी करावी लागणारी वेगळी धावपळ आहेच. इथे प्रत्येक महिन्यात काही ना काही डेस सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून विविध मार्कटिंग फर्म कम्बर कसून उभ्या आहेतच, जेणेकरून लोकांनि त्यांचा माल काही करून विकत घ्यावा. जसं, वॅलेंटाईन डे, मदर डे, फादर डे वगैरे वगैरे. अर्थात कोणताही समाज असला तरी सर्व प्रकारची लोक जगाच्या पाठीवर जिकडे तिकडे आढळतात, तशीच ती इथेहि आहेत, त्यानुसार, इथे सुज्ञ, विचारवंत, लोकही नक्की आहेत. मात्र तरुण पिढी फार लवकर इंडिपेंडंट होत असल्याने, इथल्या आईवडिलांसमोर बरीच आव्हाने आहेत.
म्हणूनच, हि गोष्ट ध्यानात ठेवून, पुण्यातुन इथे आलेल्या आम्ही काही साधकांनी, पूजनीय स्वामी मकरंदनाथ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे बालकेंद्र, युवा केंद्र सुरु केलेली आहेत. ती गेले ५-६ वर्षांहून अधिक काळ नियमितपणे चालली आहेत. हि मुलं गीता, मनाचे श्लोक, ध्यान-नाम ह्यांचा अभ्यास करत आहेत. परम पूजनीय स्वामीजींचे ते येथील आशास्थान आहेत.
।।हरी ओम तत् सत, श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु।।
।।ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
आज सेवेसाठी खालील श्लोक आहेत -
नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टाऽनुपश्यति । गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १९॥
अर्थ - त्रिगुणांकडे साक्षित्वाने पाहणारा हे जाणतो कि हे गुणच गुणात वर्तन करीत आहेत, असा जीवात्मा बोधासहित परमात्य्माशी एकरूपत्व साधतो.
गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् । जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ २०॥
अर्थ - असा पुरुष, त्रिगुणांना ओलांडून जन्म-मृत्यू-जरा आणि व्याधी ह्यांच्यापासून सुटका करून घेऊन शाश्वत सुखाचा आस्वाद घेतो.
१४ व्या अध्यायातील सर्वात महत्वाचे ज्याला आपण कळीचे श्लोक म्हणू शकू, असे हे आजचे दोन श्लोक आहेत.
भगवंतांनी १९व्या श्लोकात ध्यानाचे वर्णन अतिशय खुबीने केलेले आहे. त्रिगुणांच्या पलीकडे जायचे मूळ हे ध्यानसाधनेत आहेत. रोजच्या ध्यानात विचारांकडे साक्षित्वाने बघण्याचा अभ्यास केला असता, हळू हळू विचार कमी होतात. त्रिगुणांनी बद्ध असलेलया प्रकृती मधून उठलेले विचार देखील त्रिगुणात्मकच असतात. सकाळी लवकर स्वाभाविक रीतीने उपजणाऱ्या सत्व गुणाचा आश्रय घेऊन सोहं ध्यानासारखी गुरुपदिष्ट मार्गाने आचारलेली साधना अशा विचारांकडे अलिप्त भावनेने पाहिला फार मदत करते. नियमित घडू होणाऱ्या अशा साधनेने क्षण क्षण जीवात्मा परमात्म सुखाची गोडी अनुभवू लागतो. हळूहळू उत्थान दशेमध्ये देखील सद्गृकृपेने तो हा बोध टिकवून प्रकृतीपलीकडे उडी मारायला शिकतो.
मी म्हणजे देह बुद्धी नसून परमात्मस्वरूप आहे, असा बोध मधून मधून टिकवण्याची सवय जीवात्म्याला लागते. जीव हा शिवस्वरूप आहे हा बोध जसा जसा व्यवहारकाळी टिकू लागतो तसा तसा हा पुण्यपुरुष मोठया मौजेने जीवन जगतो. दुःख-जरा-व्याधी अशा अवस्थेमध्ये देखील मी म्हणजे देह नाही अशा सहज भावात तो असल्यामुळे तो बोधापासून च्युत होतच नाही. अर्थात हि फार मोठी अवस्था आहे आणि त्याचसाठी साधकाला दीर्घकाळ नियमित पणे श्रद्धायुक्त अंतःकरणाने साधना करावी लागते. परंतु हा साधनेचा मार्ग देखील सद्गुरूकृपेने त्याला फार उपकारक असाच वाटतो.
बे एरिया मध्ये नुकतेच आम्ही सर्व साधकांनी मिळून दीड दिवसाचे ऑनलाइन शिबीर केले. त्या शिबिराची संकल्पना "सक्सेसफुल परमार्थ अगेन्स्ट ऑल ऑडस" अशी होती. आदरणीय पंकजदादा करवंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, परम पूजनीय स्वामी मकरंदनाथ ह्यांच्या कृपाशीर्वादाने उत्तम असे हे शिबीर झाले. ४ वर्षांच्या बालसाधकांपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठ साधकांपर्यंत प्रत्येकाने अतिशय उत्साहाने ह्या शिबिरात भाग घेतला. अंदाजे ७५-८० साधक ह्या शिबिरास उपस्थित होते. ह्या शिबिरा अंतर्गत ध्यान-नाम ह्या सारख्या अंतरंग साधना होत्या, परिसंवाद होते, भजन होते. ह्या सर्वांचा गाभा म्हणजे, पावसचे परमहंस सदगुरु स्वामी स्वरूपानंद ह्याचं चरित्र होय. लौकिक त्याच बरोबर अमृतधारा ह्या त्यांनीच लिहिलेल्या छोटेखानी ग्रंथाद्वारे त्यांचं तत्त्वज्ञानाच्या अंगाने देखील स्वामींचे चरित्र दर्शन सर्वांनी घेतले. आजच्या १९ व २० व्या श्लोकांत वर्णन केलेला आत्मस्थ पुरुष कसा असतो ह्याचा काही बाही अभ्यास करण्याचा प्रयत्न ह्या शिबिरामध्ये झाला.
।।हरी ओम तत् सत, श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु।।
।।ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
आज सेवेसाठी खालील श्लोक आहेत -
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव । न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ॥ २२॥
अर्थ - ज्याच्या अंतःकरणात ज्ञान, प्रवृत्ती आणि मोह निर्माण झाले तरी, त्याला त्याचे वाईट वाटत नाही किंवा तो त्यान्ची अपेक्षाही करीत नाही.
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते । गुणा वर्तन्त इत्येव यो~वतिष्ठति नेङ्गते ॥ २३॥
अर्थ - जो शांतपणे ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीकडे साक्षीरूप होऊन पाहतो.
समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।तुल्यप्रियाप्रियोधीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ २४॥
अर्थ - जो निरंतर आत्मभावात स्थित असतो, सुखदुःख , माती-सोनं, प्रिय-अप्रिय, स्तुती-निंदा ज्याला समान असतात, जो धैर्यवान असतो.
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ २५॥
अर्थ - ज्याला मान-अपमान, शत्रू-मित्र सारखे असतात, जो सर्व कर्मात कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग करतो अशा पुरुषाला "गुणातीत" असं म्हणतात.
ह्याच्या आधीचे जे आपण श्लोक पाहिले, ते तसे त्रिगुणामध्ये वर्तन करणाऱ्या आपल्या सारख्यांचे होते, त्यामुळे ते आपल्या अनुभवाचे असल्यामुळे त्याबद्दल वर्णन करून सांगणे जमण्यासारखे होते. मात्र आता ह्या श्लोकांपासून गुणातीताचे वर्णन सुरु झाले आहे, ते आपल्याला कसे बरे सांगता येणार?
अर्थात आता यूएस कल्चर च्या परिभाषेत देखील हे सांगणे अगदीच दुरापास्त आहे. त्यामुळे ह्या श्लोकांसाठी मला संतांच्या उदाहरणांचाच आधार घ्यावा लागत आहे.
तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून शिवाजी राजांनी जेव्हा त्यांच्यासाठी सुवर्णालंकार, भरजरी कपडे पाठवले तेव्हा "हे आम्ही मृत्तिकेसमान" म्हणून अतिशय तेजस्वीपणे तुकाराम महाराजांनी ते परत पाठवून दिले. त्यावेळची तुकाराम महाराजांची परिस्थिती दुष्काळामुळे फार गांजलेली होती, त्यान्ची स्वतःची मुले अन्न अन्न करत त्य्नाच्या मांडीवर गतप्राण झाली होती. अशाही परिस्थितीमध्ये त्यांना संपत्तीचे कोणतेच आकर्षण नव्हते.
समर्थ रामदास एकदा भिक्षा मागताना, त्यांना एका भगिनीने पोतेरे फेकून मारले. ती त्यांना असं म्हणाली, "एवढा धष्ट्पुष्ट दिसतोस तर कष्ट करून का खात नाहीस". समर्थ रामदासानी तिच्या कल्याणाची प्रार्थना भाकून त्याच पोतेऱ्याच्या वाती बनवून तिला दिल्या.
अशा प्रकारे सर्वच संतांची उदाहरणे आपल्यालाही माहिती असतील. सद्गुरूंच वर्णनही द्वंद्वंतितं, त्रिगुणरहितम असंच केलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिरबुद्धीने वर्तन करणे हे गुणातीताच वैशिट्य आहे.
खरंच ह्या श्लोकांवर चिंतन करताना मला माझ्या स्वामीजींची फार आठवण येत होती. त्यांचे बोलणे, त्यांचे चालणे, त्यांचे हसणे, त्यांची सलगी देणे, त्यांचे लिहणे, त्यांचे वाचणे, त्यांचे नुसते असणे देखील किती समाधान देऊन जाते.
पुढा स्नेह पाझरे | माघा चालती अक्षरे | शब्द पाठी अवतरे | कृपा आधी || असंच त्यांचं वर्तन नेहमी असतं.
बे एरिया मध्ये इतक्या वर्षांच्या वास्तव्यात असे बरेच प्रसंग आले कि आता आपले पुढे काय व कसे होणार हे प्रश्न बऱ्याचवेळा पडले. पण स्वामिजींशी फोन वर बोलणे झाल्यावर सगळी भीती कुठल्याकुठे पळून जायची.
"ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूंचि आहेसी ब्रम्ह, येविषयी संदेह भ्रम धरूची नको", "तू तुझे सर्व तुझ्या सद्गुरूंवर सोडून दे", "मी तुझ्याबरोबर आहे", "ध्यान व नाम ह्याशिवाय आपल्याला पर्याय नाही", "जगाच्या पाठीवर कोठेही असले तरी साधक परमार्थ करू शकतो", हि त्यांची वाक्ये म्हणजे माझ्यासाठी लाइफसेव्हर्स आहेत.
काही वर्षांपूर्वी आई गेल्याचा धक्का सहन करणे मला फार अवघड गेले, ते दुःख मी काही सहज स्फुरलेल्या कवितांमधून बाहेर पडू लागले. त्याचवेळी, मी हळू हळू स्वामीजींपाशी मोकळा होऊ लागलो, आणि एकदिवस असंच स्वामीजींना मेसेज केल्यावर स्वामीजींचाहि लगेच रिप्लाय आला, "उन्मेष मी तुझ्याशी आईच्या नात्यात आहेच आहे," ते शब्द हृदयामध्ये इतके खोल जाऊन बसले आहेत कि, आता स्वामीजी म्हणजे आई आणि आई म्हणजे स्वामीजींच असाच माझा भाव आहे.
मी माझ्या स्वामींचा आहे आणि स्वामी हे माझे आहेत, एवढंच मला कळतं. माझा शेवटचा श्वास माझ्या स्वामींच्या मांडीवर डोकं ठेवून शान्तपणे सुटावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आज इथेच थांबतो, पुढे अजुनकाही लिहणं आज अशक्य होऊन गेलं आहे.
।।हरी ओम तत् सत, श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु।।
।।ओम परमहंस सद्गुरू मकरंदनाथाय नमः।।
आज सेवेसाठी खालील श्लोक आहेत -
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥ २६॥
अर्थ - जो अव्यभिचारी भक्तीद्वारे परमात्म्याचे भजन करतो, तो त्रिगुणांना ओलांडून परमात्मस्वरूप होतो.
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च । शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ २७॥
अर्थ - अविनाशी परब्रम्हाचा आणि शाश्वत सुखाचा परमात्मा हाच आश्रय आहे.
सर्वार्थाचा त्याग करून श्रद्धायुक्त अंतःकरणानें, प्रेमभावाने जो परमात्म्याचे भजन करतो, त्याला अव्यभिचारी भक्त असे म्हणतात.
खुद्द भगवंत ज्याच्या आधीन व्हाव्हे असं अर्जुनामध्ये काय बरं होते?, तर तो दैवी गुणांनी युक्त होता, तो ऋजू अंतःकरणाचा होता आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे तो भगवंताचा भक्त होता, भगवंतांनी सांगावं आणि आपण ते मोठया प्रेमाने करावं एवढंच त्याला माहित होते.
गोंदवलेकर महाराज म्हणतात, कि आपल्याला विषयांवर प्रेम करा असं कोणी सांगावं लागतं का, ते आपल्या ठिकाणी अगदी सहज असतं. तसं संतांच्या ठिकाणी सर्वांविषयी प्रेम हे अगदी सहज असत.
१६व्या शतकात मीराबाईंनी कृष्णप्रेमात रंगून हजाराहून अधिक अभंग लिहले, त्यांना राजस्थानी बोली भाषेत पाडा असं म्हणतात. वयाच्या १६व्या वर्षी चित्तोडचा राजा भोजशी मीराबाईंचा जरी विवाह झाला असला तरी रुढ अर्थाने त्या कधी वैवाहीक आणि पारंपारिक आयुष्यात रमल्याच नाहीत. लहानपणीच कृष्ण हाच माझा पती असं त्यांनी मानलं होतं, कृष्णाच्या निस्सीम भक्तीमुळे त्या राजघराणे सोडून सामान्य लोकांमध्येही मिसळत असत. त्यापायी त्यांना अनेक अत्याचार सहन करावे लागले. त्यांच्यावर दोन वेळा विषप्रयोगही करण्यात आला. वयाच्या तिसाव्या वर्षी मीराबाई मथुरा, वृंदावन आणि शेवटी द्वारिकेत जाऊन कृष्णपद्मी कायमच्या लिन झाल्या. हे असं प्रेम आपल्याठिकाणी कसं निर्माण होणार?
त्या म्हणतात -
हरि गुन गावत नाचूंगी॥ध्रु०॥
आपने मंदिरमों बैठ बैठकर। गीता भागवत बाचूंगी॥१॥
ग्यान ध्यानकी गठरी बांधकर। हरीहर संग मैं लागूंगी॥२॥
मीराके प्रभु गिरिधर नागर। सदा प्रेमरस चाखुंगी॥३॥
अजून एका पाडात त्या म्हणतात -
हे री मैं तो प्रेम दिवानी, मेरो दरद न जाणै कोय।
सूली ऊपर सेज हमारी सोवण किस विध होय।
गगन मंडल पर सेज पिया की किस विध मिलणा होय।
घायलकी गत घायल जाणै जो कोई घायल होय।
जौहरि की गति जौहरी जाणै दूजा न जाणै कोय।
दरद की मारी बन-बन डोलूँ बैद मिल्या नहिं कोय।
मीराँ की प्रभु पीर मिटे जब बैद साँवलिया होय।
बे एरिया मध्ये जे केंद्र चालते, त्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला एका मध्यवर्ती संकल्पाचा अभ्यास करतो, त्यापैकी एक प्रेमभाव आहे.
कदाचित मीराबाईच्या ह्या आणि अशाप्रकारच्या सर्व अभंगात आपल्याला प्रेमभाव ह्या संकल्पाचा अभ्यास करण्यासाठी म्ह्णून काही खाणाखुणा मिळू शकतील.
परमपूजनीय स्वामीजी म्हणतात, कि सद्गुरुंच्या व्यापक प्रेमाची आपल्याला नुसती कल्पना येणंही आपल्याला तसं अवघडच आहे, पण जर लक्षणार्थाने आपल्याला त्यांच्या प्रेमाचा काहीएक अंश समजायला सोपा जावा म्हणून व्यवहारामध्ये अतिशय पवित्र अशा प्रेमाची दोन उदहारण देता येऊ शकतील ती म्हणजे
१ - आईचं आणि मुलाचं प्रेम - त्यात सुद्धा आईच्या बाजूनी असलेल्या प्रेमाची व्याप्ती आणि खोली जास्तच असते
आणि दुसरं म्हणजे - पती पत्नी मध्ये असलेलं पवित्र असं नातं.
प्रेमभाव कोणामध्ये कोणत्या घटनेने, कोणत्या अभ्य्साने निर्माण होईल, तसा तो होतो का हे सांगणे तसे अवघडंच जाते, खरंतर जन्मजात तशी प्रकृतीचं लाभत असावी.
काही व्यक्ती आपण पाहतो, त्या सद्वर्तनी असतात, प्रामाणिक असतात, सदाचारी असतात, निष्कलंक असतात, पण प्रेमळ असणं हि फार फार दुर्मिळ आणि युनिकच गोष्ट राहते, ती संतांची अख्यतारी आहे. म्हणून आपण संत ज्या वाटेवरून गेले, त्या वाटांवरची पायधूळ मस्तकी लावून त्या वाट चोखाळण्याचे काम करीत राहावे, एक दिवस, भगवंत आपल्याही हृदयात खऱ्या प्रेमाचा अंकुर पेरल्याशिवाय निश्चितच राहणार नाही खास.
आजच्या दिवशी ह्या स्वाध्यायाचा शेवट करताना पुन्हा एकदा सद्भक्त विवेक दादा आणि आपणा सर्वांचे आभार मानतो. ह्या ८ दिवसात मला माझ्या स्वामींच्या स्मरणात डूब देण्याची, त्याच्या प्रेमात अजून एकदा न्हाहून निघण्याची संधी मिळाली. "तो मज आठवतो गुरुराया...प्राणविसावा माझा, प्राणविसावा माझा".
।।हरी ओम तत् सत, श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु।।
No comments:
Post a Comment