०६ डिसेंबर २०२० निरुपण
कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् । रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥ १६॥
येणेंचि पैं कारणें । जें निपजे सत्त्वगुणें । तें सुकृत ऐसें म्हणे । श्रौत समो ॥ २६० ॥
म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा । अपूर्व ये फळा । सात्त्विक तें ॥ २६१ ॥
मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी फळलिया ।जें सुखें चितारूनियां । फळती दुःखें ॥ २६२ ॥
कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख ।तैसें तें राजस देख । क्रियाफळ ॥ २६३ ॥
तामस कर्म जितुकें । अज्ञानफळेंचि पिके ।विषांकुर विखें । जियापरी ॥ २६४ ॥
सत्त्वात्संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च । प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १७॥
म्हणौनि बा रे अर्जुना । येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना ।जैसा कां दिनमाना । सूर्य हा पैं ॥ २६५ ॥
आणि तैसेंचि हें जाण । लोभासि रज कारण । आपुलें विस्मरण । अद्वैता जेवीं ॥ २६६ ॥
मोह अज्ञान प्रमादा । ययां मैळेया दोषवृंदा । पुढती पुढती प्रबुद्धा । तमचि मूळ ॥ २६७ ॥
ऐसें विचाराच्या डोळां । तिन्ही गुण हे वेगळवेगळां । दाविले जैसा आंवळा । तळहातींचा ॥ २६८ ॥
तंव रजतमें दोन्हीं । देखिलीं प्रौढ पतनीं । सत्त्वावांचूनि नाणीं । ज्ञानाकडे ॥ २६९ ॥
म्हणौनि सात्त्विक वृत्ती । एक जाले गा जन्मव्रती । सर्वत्यागें चतुर्थी । भक्ति जैसी ॥ २७० ॥
ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १८॥
तैसें सत्त्वाचेनि नटनाचें । असणें जाणें जयांचें । ते तनुत्यागीं स्वर्गींचे । राय होती ॥ २७१ ॥
इयाचि परी रजें । जिहीं कां जीजे मरिजे ।तिहीं मनुष्य होईजे । मृत्युलोकीं ॥ २७२ ॥
तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें । जेथ इये मरणवाटे । पडिलें नुठी ॥ २७३ ॥
आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र ॥ २७४ ॥
एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासी पंडुसुता । दाविली सकारणता । आघवीचि ॥ २७५ ॥
पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें । देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा ॥ २७६ ॥
जैसें कां स्वप्नींचेनि राजें । जैं परचक्र देखिजे । तैं हारी जैत होईजे । आपणपांचि ॥ २७७ ॥
तैसे मध्योर्ध्व अध । हे जे गुणवृत्तिभेद । ते दृष्टीवांचूनि शुद्ध । वस्तुचि असे ॥ २७८ ॥
नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टाऽनुपश्यति । गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १९॥
परी हे वाहणी असो । तरी तुज आन न दिसो ।परिसें तें सांगतसों । मागील गोठी ॥ २७९ ॥
तरी ऐसें जाणिजे । सामर्थ्यें तिन्ही सहजें । होती देहव्याजें । गुणचि हे ॥ २८० ॥
इंधनाचेनि आकारें । अग्नि जैसा अवतरे । कां आंगवे तरुवरें । भूमिरसु ॥ २८१ ॥
नाना दहिंयाचेनि मिसें । परिणमे दूधचि जैसें । कां मूर्त होय ऊंसें । गोडी जेवीं ॥ २८२ ॥
तैसें हे स्वांतःकरण । देहचि होती त्रिगुण । म्हणौनि बंधासि कारण । घडे कीर ॥ २८३ ॥
परी चोज हें धनुर्धरा । जे एवढा हा गुंफिरा । मोक्षाचा संसारा । उणा नोहे ॥ २८४ ॥
त्रिगुण आपुलालेनि धर्में । देहींचे माघुत साउमें । चाळितांही न खोमें । गुणातीतता ॥ २८५ ॥
ऐसी मुक्ति असे सहज । ते आतां परिसऊं तुज । जे तूं ज्ञानांबुज- । द्विरेफु कीं ॥ २८६ ॥
आणि गुणीं गुणाजोगें । चैतन्य नोहे मागें । बोलिलों तें खागें । तेवींचि हें ॥ २८७ ॥
तरी पार्था जैं ऐसें । बोधलेनि जीवें दिसे । स्वप्न कां जैसें । चेइलेनी ॥ २८८ ॥
नातरी आपण जळीं । बिंबलों तीरोनी न्याहळी ।चळण होतां कल्लोळीं । अनेकधा ॥ २८९ ॥
कां नटलेनि लाघवें । नटु जैसा न झकवे । तैसें गुणजात देखावें । न होनियां ॥ २९० ॥
पैं ऋतुत्रय आकाशें । धरूनियांही जैसें । नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा ॥ २९१ ॥
तैसें गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें । तिये अहं बैसे अहंतें । मूळकेचिये ॥ २९२ ॥
तैं तेथूनि मग पाहतां । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजित ॥ २९३ ॥
सत्त्वरजतमांचा । भेदीं पसरु कर्माचा । होत असे तो गुणांचा । विकारु हा ॥ २९४ ॥
ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा ।वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥ २९५ ॥
कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें । कमळीं विकासावें । जावें तमें ॥ २९६ ॥
ये कोणाचीं काजें कहीं । सवितिया जैसी नाहीं । तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप ॥ २९७ ॥
मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे । ययाचेनि निःशेखें । उरे तें मी ॥ २९८ ॥
ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया । ये गुणातीतत्व तया । अर्थपंथें ॥ २९९ ॥
No comments:
Post a Comment