अध्याय १८ : ओव्या १२९८-१३५२

 १९ डिसेंबर २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक ६१-६४ / ज्ञानेश्वरी ओव्या १२९८-१३५२)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१॥

सर्व भूतांच्या अंतरीं । हृदय महाअंबरीं । चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं । उदयला असे जो ॥ १२९९ ॥
अवस्थात्रय तिन्हीं लोक । प्रकाशूनि अशेख । अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥ १३०० ॥
वेद्योदकाच्या सरोवरीं । फांकतां विषयकल्हारीं । इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमरातें ॥ १३०१ ॥
असो रूपक हें तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु । पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥ १३०२ ॥
स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौर्याशीं लक्ष ॥ १३०३ ॥
तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजातां । देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥ १३०४ ॥
तेथ जें देह जयापुढें । अनुरूपपणें मांडे । तें भूत तया आरूढे । हें मी म्हणौनि ॥ १३०५ ॥
सूत सूतें गुंतलें । तृण तृणचि बांधलें । कां आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं ॥ १३०६ ॥
तयापरी देहाकारें । आपणपेंचि दुसरें । देखोनि जीव आविष्करें । आत्मबुद्धि ॥ १३०७ ॥
ऐसेनि शरीराकारीं । यंत्रीं भूतें अवधारीं । वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥ १३०८ ॥
तेथ जया जें कर्मसूत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र । तें तिये गती पात्र । होंचि लागे ॥ १३०९ ॥
किंबहुना धनुर्धरा । भूतांतें स्वर्गसंसारा । माजीं भोवंडी तृणें वारा । आकाशीं जैसा ॥ १३१० ॥
भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे । तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥ १३११ ॥
जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया । चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकीं ॥ १३१२ ॥
तया सिंधू भरितें दाटें । सोमकांता पाझरु फुटे । कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो ॥ १३१३ ॥
तैसीं बीजप्रकृतिवशें । अनेकें भूतें येकें ईशें । चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयीं ॥ १३१४ ॥
अर्जुनपण न घेतां । मी ऐसें जें पंडुसुता । उठतसे तें तत्वता । तयाचें रूप ॥ १३१५ ॥
यालागीं तो प्रकृतीतें । प्रवर्तवील हें निरुतें । आणि तें झुंजवील तूंतें । न झुंजशी जऱ्ही ॥ १३१६ ॥
म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणें प्रकृती हे नेमावी । तिया सुखें राबवावीं । इंद्रियें आपुलीं ॥ १३१७ ॥
तूं करणें न करणें दोन्हीं । लाऊनि प्रकृतीच्या मानीं । प्रकृतीही कां अधीनी । हृदयस्था जया ॥ १३१८ ॥


तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ ६२॥

तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग । महोदधी कां गांग । रिगालें जैसें ॥ १३१९ ॥
मग तयाचेनि प्रसादें । सर्वोपशांतिप्रमदे । कांतु होऊनिया स्वानंदें । स्वरूपींचि रमसी ॥ १३२० ॥
संभूति जेणें संभवे । विश्रांति जेथें विसंवे । अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया ॥ १३२१ ॥
तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो । म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तूं गा ॥ १३२२ ॥


इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया । विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३॥

हें गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचें मथित । आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय ॥ १३२३ ॥
ज्ञान ऐसिया रूढी । वेदांतीं जयाची प्रौढी । वानितां कीर्ति चोखडी । पातली जगीं ॥ १३२४ ॥
बुद्ध्यादिकें डोळसें । हें जयाचें कां कडवसें । मी सर्वद्रष्टाही दिसें । पाहला जया ॥ १३२५ ॥
तें हें गा आत्मज्ञान । मज गोप्याचेंही गुप्त धन । परी तूं म्हणौनि आन । केवीं करूं ? ॥ १३२६ ॥
याकारणें गा पांडवा । आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा । तुज दिधला कणवा । जाकळिलेपणें ॥ १३२७ ॥
जैसी भुलली वोरसें । माय बोले बाळा दोषें । प्रीति ही परी तैसें । न करूंचि हो ॥ १३२८ ॥
येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे । कां दिव्याकरवीं करविजे । दिव्य जैसे ॥ १३२९ ॥
जयाचेनि अंगप्रकाशें । पाताळींचा परमाणु दिसे । तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदलें ॥ १३३० ॥
तैसें सर्वज्ञेंही मियां । सर्वही निर्धारूनियां । निकें होय तें धनंजया । सांगितलें तुज ॥ १३३१ ॥
आतां तूं ययावरी । निकें हें निर्धारीं । निर्धारूनि करीं । आवडे तैसें ॥ १३३२ ॥
यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला । तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी ॥ १३३३ ॥
वाढतयापुढें भुकेला । उपरोधें म्हणे मी धाला । तैं तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया ॥ १३३४ ॥
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु । न पुसिजे जैं आभारु । धरूनियां ॥ १३३५ ॥
तैं आपणपेंचि वंचे । आणि पापही वंचनाचें । आपणयाचि साचें । चुकविलें तेणें ॥ १३३६ ॥
पैं उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो कीं धनंजया । जें एकवेळ आवांकुनियां । सांगावें ज्ञान ॥ १३३७ ॥
तेथ पार्थु म्हणे दातारा । भलें जाणसी माझिया अंतरा । हें म्हणों तरी दुसरा । जाणता असे काई ? ॥ १३३८ ॥
येर ज्ञेय हें जी आघवें । तूं ज्ञाता एकचि स्वभावें । मा सूर्यु म्हणौनि वानावें । सूर्यातें काई ? ॥ १३३९ ॥
या बोला श्रीकृष्णें । म्हणितलें काय येणें । हेंचि थोडें गा वानणें । जें बुझतासि तूं ॥ १३४० ॥


सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः । इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४॥

तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ । वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां ॥ १३४१ ॥
हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे । तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें ॥ १३४२ ॥
कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया । कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ॥ १३४३ ॥
जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचें फळचि तेथ जोडे । काय दैवें न सांपडे । सानुकूळें ? ॥ १३४४ ॥
येऱ्हवीं द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरीं । भोगिजे तें अवधारीं । रहस्य हें ॥ १३४५ ॥
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जें प्रियोत्तमा । तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥
आरिसाचिया देखिलया । गोमटें कीजे धनंजया । तें तया नोहे आपणयां । लागीं जैसें ॥ १३४७ ॥
तैसें पार्था तुझेनि मिषें । मी बोलें आपणयाचि उद्देशें । माझ्या तुझ्या ठाईं असे । मीतूंपण गा ॥ १३४८ ॥
म्हणौनि जिव्हारींचें गुज । सांगतसे जीवासी तुज । हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन ॥ १३४९ ॥
पैम् जळा आपणपें देतां । लवण भुललें पंडुसुता । कीं आघवें तयाचें होतां । न लजेचि तें ॥ १३५० ॥
तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं । तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥
म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें । तें गोप्य माझें चोखडें । वाक्य आइक ॥ १३५२ ॥



No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099