अध्याय ११ : ओव्या ५०७-५६०

२२ डिसेंबर २०१९ निरुपण 
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक ३७-४२ / ज्ञानेश्वरी ओव्या ५०७-५६०)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे । अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ३७॥
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥ ५०७ ॥
आणि हें काय तूंतें पुसावें । येतुलें आम्हांसिही जाणवे । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ? ॥ ५०८ ॥
जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू । म्हणौनिया निशाचरां केरु । फिटला सहजें ॥ ५०९ ॥
हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥ ५१० ॥
जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्‍ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥ ५११ ॥
देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु । देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥ ५१२ ॥
जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा । तूंचि सदसत् देवा । तयाही अतीत तें तूं ॥ ५१३ ॥
त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ ३८॥
तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वां तूंचि अवधी । स्वयें तूं अनादि । पुरातनु ॥ ५१४ ॥
तूं सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान । भूतभविष्याचें ज्ञान । तुझ्याचि हातीं ॥ ५१५ ॥
जी श्रुतीचियां लोचनां । स्वरूपसुख तूंचि अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥ ५१६ ॥
म्हणौनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम । कल्पांतीं महद्‍ब्रह्म । तुजमाजीं रिगे ॥ ५१७ ॥
किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें । तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ॥ ५१८ ॥
वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च । नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९॥
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४०॥
जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी । हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥ ५१९ ॥
वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि तो तूं ॥ ५२० ॥
वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम । आदि जनक तूं ॥ ५२१ ॥
आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥ ५२२ ॥
ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पंडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२३ ॥
पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२४ ॥
पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२५ ॥
इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें ।  पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२६ ॥
ऐसीं रूपें तियें अद्‍भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें । तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥ ५२७ ॥
आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे । नेणें कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥ ५२८ ॥
किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी । कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥ ५२९ ॥
देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई । तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥ ५३० ॥
उभा माझिये पाठीसीं । म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी । सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडें तुज ॥ ५३१ ॥
आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा । म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥ ५३२ ॥
जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा । सकळकाळीं समा । सर्वरूपा ॥ ५३३ ॥
आघविया आकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥ ५३४ ॥
किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ । परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥ ५३५ ॥
म्हणौनिया देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां ।हें आलें मज सद्‍भावा । आतां तूंचि सर्व ॥ ५३६ ॥
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति । अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ४१॥
परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं ॥ ५३७ ॥
अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥ ५३८ ॥
परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला । कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥ ५३९ ॥
चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिली । तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥ ५४० ॥
हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें । एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥ ५४१ ॥
यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्हीं ॥ ५४२ ॥
तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥ ५४३ ॥
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु । एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ४२॥

तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं । तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळीं बोलों ॥ ५४४ ॥
विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों । न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥ ५४५ ॥
पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शारङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥
सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा । हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलों आम्हीं ॥ ५४७ ॥
देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां आविष्करूं । निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥
चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥ ५४९ ॥
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे ॥ ५५० ॥
देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥
देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥ ५५२ ॥
'कृष्ण म्हणौनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे । आपली आण घालिजे । जातां तुज ॥ ५५३ ॥
मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें । हें वोतटीचेनि दाटपणें । बहुत घडलें ॥ ५५४ ॥
म्हणौनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशि आहें समस्तां । अपराधांचि ॥ ५५५ ॥
यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखटीं । तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ॥ ५५६ ॥
जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें । तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥ ५५७ ॥
तैसी प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें । बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥ ५५८ ॥
आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें ॥ ५५९ ॥
तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधांसि ॥ ५६० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099