अध्याय १६ : ओव्या २१७-२७०

 २६  एप्रिल २०२१ निरुपण 

अध्याय १६ । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ( श्लोक ४-५ / ज्ञानेश्वरी ओव्या २१७-२७० )


दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ ४॥

तरी तयाचि असुरां । दोषांमाजीं जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ॥ २१७ ॥
जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनीं । ते तीर्थचि परी पतनीं । कारण होय ॥ २१८ ॥
कां विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटां । तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ॥ २१९ ॥
पैं आंगें बुडतां महापूरीं । जे वेगें काढी पैलतीरीं । ते नांवचि बांधिलिया शिरीं । बुडवी जैसी ॥ २२० ॥
कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां । तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥ २२१ ॥
तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरी तारिता तोचि दोखा- । लागीं होय ॥ २२२ ॥
म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे ॥ २२३ ॥
आतां मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे । आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥ २२४ ॥
कां मादुरी लोकांचा घोडा । गजपतिही मानी थोडा । कां कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥ २२५ ॥
तृणाचेनि इंधनें । आगी धांवे गगनें । थिल्लरबळें मीनें । न गणिजे सिंधु ॥ २२६ ॥
तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें । एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा ॥ २२७ ॥
अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी । मृगांबु देखोनि फोडी । पणियाडें मूर्ख ॥ २२८ ॥
किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें । तो दर्पु गा अनारिसें । न बोलें घेईं ॥ २२९ ॥
आणि जगा वेदीं विश्वासु । आणि विश्वासीं पूज्य ईशु । जगीं एक तेजसु । सूर्युचि हा ॥ २३० ॥
जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद । न मरणें निर्विवाद । जगा पढियें ॥ २३१ ॥
म्हणौनि जग उत्साहें । यातें वानूं जाये । कीं तें आइकोनि मत्सरु वाहे । फुगों लागे ॥ २३२ ॥
म्हणे ईश्वरातें खायें । तया वेदा विष सूयें । गौरवामाजीं त्राये । भंगीत असे ॥ २३३ ॥
पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती । टिटिभेनें आपांपती । वैरी केला ॥ २३४ ॥
तैसा अभिमानाचेनि मोहें । ईश्वराचेंही नाम न साहे । बापातें म्हणे मज हे । सवती जाली ॥ २३५ ॥
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥ २३६ ॥
आणि पुढिलांचें सुख । देखणियाचें होय मिख । चढे क्रोधाग्नीचें विख । मनोवृत्ती ॥ २३७ ॥
शीतळाचिये भेटी । तातला तेलीं आगी उठी । चंद्रु देखोनि जळे पोटीं । कोल्हा जैसा ॥ २३८ ॥
विश्वाचें आयुष्य जेणें उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥ २३९ ॥
जगाची सुखपहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट । दुधाचें काळकूट । होय व्याळीं ॥ २४० ॥
अगाधें समुद्रजळें । प्राशितां अधिक जळे । वडवाग्नी न मिळे । शांति कहीं ॥ २४१ ॥
तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें । तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥ २४२ ॥
आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी । बोलणें ते वृष्टी । इंगळांची ॥ २४३ ॥
येर जें क्रियाजात । तें तिखयाचें कर्वत । ऐसें सबाह्य खसासित । जयाचें गा ॥ २४४ ॥
तो मनुष्यांत अधमु जाण । पारुष्याचें अवतरण । आतां आइक खूण । अज्ञानाची ॥ २४५ ॥
तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणें पाषाणु जैसा । कां रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ॥ २४६ ॥
आगी उठिला आरोगणें । जैसा खाद्याखाद्य न म्हणे । कां परिसा पाडु नेणें । सोनया लोहा ॥ २४७ ॥
नातरी नानारसीं । रिघोनि दर्वी जैसी । परी रसस्वादासी । चाखों नेणें ॥ २४८ ॥
कां वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखीं । तैसे कृत्याकृत्यविवेकीं । अंधपण जें ॥ २४९ ॥
हें चोख हें मैळ । ऐसें नेणोनियां बाळ । देखे तें केवळ । मुखींचि घाली ॥ २५० ॥
तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥ २५१ ॥
तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन । एवं साही दोषांचें चिन्ह । सांगितलें ॥ २५२ ॥
इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ति दाटुगी । जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंग सानें ॥ २५३ ॥
कां तिघा वन्हींच्या पांती । पाहतां थोडे ठाय गमती । परी विश्वही प्राणाहुती । करूं न पुरे ॥ २५४ ॥
धातयाही गेलिया शरण । त्रिदोषीं न चुके मरण । तया तिहींची दुणी जाण । साही दोष हे ॥ २५५ ॥
इहीं साही दोषीं संपूर्णीं । जाली इयेचि उभारणी । म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे ॥ २५६ ॥
परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी । कां येती निंदकापासीं । अशेष पापें ॥ २५७ ॥
मरणाराचें आंग । पडिघाती अवघेचि रोग । कां कुमुहूर्तीं दुर्योग । एकवटती ॥ २५८ ॥
विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा । तैसें दोषीं इहीं नरा । अनिष्ट कीजे ॥ २५९ ॥
कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे । तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥ २६० ॥
मोक्षमार्गाकडे । जैं यांचा आंबुखा पडे । तैं न निघे म्हणौनि बुडे । संसारीं तो ॥ २६१ ॥
अधमां योनींच्या पाउटीं । उतरत जो किरीटी । स्थावरांही तळवटीं । बैसणें घे ॥ २६२ ॥
हें असो तयाच्या ठायीं । मिळोनि साही दोषीं इहीं । आसुरी संपत्ति पाहीं । वाढविजे ॥ २६३ ॥
ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनीं । सांगितलिया चिन्हीं । वेगळाल्या ॥ २६४ ॥

दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता । मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५॥

इया दोन्हींमाजीं पहिली । दैवी जे म्हणितली । ते मोक्षसूर्यें पाहली । उखाचि जाण ॥ २६५ ॥
येरी जे दुसरी । संपत्ति कां आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवां ॥ २६६ ॥
परी हें आइकोनि झणें । भय घेसी हो मनें । काय रात्रीचा दिनें । धाकु धरिजे ॥ २६७ ॥
हे आसुरी संपत्ति तया । बंधालागीं धनंजया । जो साही दोषां ययां । आश्रयो होय ॥ २६८ ॥
तूं तंव पांडवा । सांगितलेया दैवा । गुणनिधी बरवा । जन्मलासी ॥ २६९ ॥
म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामिया । होऊनि यावें उवाया । कैवल्याचिया ॥ २७० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099