अध्याय १२ : ओव्या २०-५९

२४ फेब्रुवारी २०२० निरुपण 
अध्याय १२ : भक्तीयोगः ( श्लोक १-४ /ज्ञानेश्वरी ओव्या २०-५९)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


अर्जुन उवाच ।
एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १॥
तरी सकलवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु । तो बोलता जाहला आत्मजु । पंडुनृपाचा ॥ २० ॥
कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्वरूप मज दाविलें । तें नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझें ॥ २१ ॥
आणि इये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें । तंव नको म्हणोनि देवें । वारिलें मातें ॥ २२ ॥
तरी व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत । भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ॥ २३ ॥
या दोनी जी वाटा । तूंतें पावावया वैकुंठा । व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे येथ ॥ २४ ॥
पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिये वाला येका । म्हणौनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडू ॥ २५ ॥
अमृताचिया सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी । तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलेया ॥ २६ ॥
हे कीर माझ्या चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती । परि पुसणें योगपती । तें याचिलागीं ॥ २७ ॥
जें देवा तुम्हीं नावेक । अंगिकारिलें व्यापक । तें साच कीं कवतिक । हें जाणावया ॥ २८ ॥
तरी तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम । भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥ २९ ॥
इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंतें श्रीहरी । बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥ ३० ॥
आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जें कानडें । कायिसयाहि सांगडें । नव्हेचि जें वस्तु ॥ ३१ ॥
तें अक्शर जी अव्यक्त । निर्देश देशरहित । सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ॥ ३२ ॥
तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता । कवणें योगु तत्त्वतां । जाणितला सांगा ॥ ३३ ॥
इया किरीटीचिया बोला । तो जगद्‍बंधु संतोषला । म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ॥ ३४ ॥
श्री भगवानुवाच ।
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २॥
तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं । रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥ ३५ ॥
कां वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता । तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ॥ ३६ ॥
परी ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु । तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥ ३७ ॥
तैसें सर्वेंद्रियांसहित । मजमाजीं सूनि चित्त । जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती ॥ ३८ ॥
इयापरी जे भक्त । आपणपें मज देत । तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥ ३९ ॥
ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते । सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं ॥ ३॥
आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोऽहंभावा । झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥ ४० ॥
मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । ते इंद्रियां कीर जोगें । कायि होईल ? ॥ ४१ ॥
परी ध्यानाही कुवाडें । म्हणौनि एके ठायीं न संपडे । व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ॥ ४२ ॥
जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें । जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥
जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे । ऐसें म्हणौनि उपाये । उपजतीचि ना ॥ ४४ ॥
जें चळे ना ढळे । सरे ना मैळे । तें आपुलेनीचि बळें । आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः । ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४॥

पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें । अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥
मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं । इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचिया ॥ ४७ ॥
अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा । मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥ ४८ ॥
आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले । निद्रेचें शोधिलें । काळवखें ॥ ४९ ॥
वज्राग्नीचिया ज्वाळीं । करूनि सप्तधातूंची होळी । व्याधींच्या सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ॥ ५० ॥
मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा । तया चोजवलें प्रभा । निमथावरी ॥ ५१ ॥
नवद्वारांचिया चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी । उघडिली खिडकी । ककारांतींची ॥ ५२ ॥
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी ॥ ५३ ॥
चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी । सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगीं ॥ ५४ ॥
मग मध्यमा मध्य विवरें । तेणें कोरिवें दादरें । ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्र ॥ ५५ ॥
वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन । काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥
ऐसे जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी । आंगविताती निरवधी । योगदुर्गें ॥ ५७ ॥
आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठीं । तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥ ५८ ॥
वांचूनि योगचेनि बळें । अधिक कांहीं मिळे । ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥ ५९ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099