अध्याय २: ओव्या २३०-२४४

१७ जून  २०१७ निरुपण
अध्याय २: सांख्ययोग(गीता श्लोक ३९-४१ / ज्ञानेश्वरी ओव्या २३०-२४४)


निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९॥
हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली तुज येथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था। कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥ २३१ ॥
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेसीं उरिजे । अचुंबित ॥ २३२ ॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४०॥
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥
तियापरी जे सुबुद्धि । आपुलालिया निरवधि । हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥
अर्जुना तें पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ ४१॥

जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी । तैसी सद्‍बुद्धी हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥
पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥
तैसी दुर्लभ जे सद्‍बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥
तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥
म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
सारांश
आता पर्यंत भगवंत अर्जुनाला ज्ञानयोग/सांख्ययोग समजावून सांगत होते . आता या नंतर त्यांनी बुद्धियोगास प्रारंभ केला आहे.

योग हा शब्द युज या धातू  पासून बनला आहे, युज म्हणजे जोडणे. बुद्धियोग म्हणजे बुद्धीच्या माध्यमातून परमेश्वराशी अखंड अनुसंधान ठेवणे. परंतु अशी बुद्धी हि तयार (develop) व्हावी लागते ती काही सहज प्राप्त झालेली नसते . अश्या बुद्धीला निष्काम बुद्धी /व्यवसायात्मिका / सद्बुद्धी असे संबोधतात. ज्याप्रमाणे गंगेला (नदीला) समुद्राची ओढ असते आणि समुद्राशी एकरूप होणे ह्या एकच ध्येयाने ती वाटचाल करत असते त्याप्रमाणे जिचे आश्रयस्थान फक्त ईश्वर आहे अथवा जिचे ध्येय फक्त ईश्वरप्राप्ती आहे तीच सद्बुद्धी होय. ईश्वराशिवाय अन्य चिंतन म्हणजेच विषयचिंतन करते ती दुर्बुद्धी होय. ती या जगात सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण सदबुद्धी हि खूप दुर्मिळ आहे. मोठे मोठे विचारवंत, साधक या बुद्धीची इच्छा करतात. माउली म्हणतात कि एखादी अंधारी खोली आहे पण एक छोटीशी (दीपकळिका धाकुटी) ज्योत त्या अंधारमय खोलीला प्रकाशमय करण्याचे सामर्थ्य ठेवते त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प प्रमाणात जरी जागृत झाली तरी आपल्या आयुष्यातील अज्ञानमय अंधार नाहीसा करण्याचे सामर्थ्य ठेवते. म्हणून माउली म्हणतात कि सद्बुद्धीला कधीही कमी लेखू नये.

आता अशी बुद्धी प्राप्त झाल्यावर काय होते ते पाहू. ज्याप्रमाणे एखाद्या योध्याने वज्रासारखे चिलखत घातले असता त्याला शस्त्रांचा घाव जाणवत नाही. शस्त्रांचा स्पर्श हि न होता तो विजयी होऊ शकतो त्याप्रमाणे निष्काम बुद्धियोग (निष्काम कर्मयोग) साधल्यावर आपल्याला कर्मबंधने मुळीच बाधत नाहीत. इहलोकातील गोष्टी तर प्राप्त होतातच शिवाय मोक्ष ही प्राप्त होतो म्हणजे इहलोक आणि परलोक दोन्हीत यश मिळते अशी बुद्धी कर्म तर चोखपणे पार पाडते पण तिचे लक्ष कर्मफलाकडे आसक्त नसते. ज्याप्रमाणे एखाद्या मांत्रिकाला भुताची बाधा होत नाही त्याप्रमाणे दृश्य जगातील यश/अपयशाचा अथवा उपाध्यांचा परिणाम सद्बुद्धी प्राप्त झालेल्या साधकांवर होत नाही. अशा बुद्धीला पाप पुण्य हि स्पर्श करीत नाहीत कारण ती हेतूरहित असते. अशी बुद्धी पूर्व पुण्याईने अथवा अभ्यासाने प्राप्त झाली तर संसाराचे सारे भयच नाहीसे होते. अश्याप्रकारे भगवान सद्बुध्दिचे महत्व अर्जुनाला पटवून देतात.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099