अध्याय १४ : ओव्या ३२०-३७०

 २०  डिसेंबर  २०२० निरुपण 

अध्याय १४ : । गुणत्रयविभागयोगः । ( श्लोक २१ -२५  / ज्ञानेश्वरी ओव्या  ३२०-३७० )



अर्जुन उवाच ।
कैर्लिंगैस्त्रीन्गुणात्‍नेतानतीतो भवति प्रभो । किमाचारः कथंचैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥ २१॥

तेणें तोषें वीर पुसे । जी कोण्ही चिन्हीं तो दिसे । जयामाजीं वसे । ऐसा बोधु ॥ ३२० ॥
तो निर्गुण काय आचरे । कैसेनि गुण निस्तरे । हें सांगिजो माहेरें । कृपेचेनि ॥ ३२१ ॥
यया अर्जुनाचिया प्रश्ना । तो षड्गुणांचा राणा । परिहारु आकर्णा । बोलतु असे ॥ ३२२ ॥
म्हणे पार्था तुझी नवाई । हें येतुलेंचि पुससी काई । तें नामचि तया पाहीं । सत्य लटिकें ॥ ३२३ ॥
गुणातीत जया नांवें । तो गुणाधीन तरी नव्हे । ना होय तरी नांगवे । गुणां यया ॥ ३२४ ॥
परी अधीन कां नांगवें । हेंचि कैसेनि जाणावें । गुणांचिये रवरवे- । माजीं असतां ॥ ३२५ ॥
हा संदेह जरी वाहसी । तरी सुखें पुसों लाहसी । परिस आतां तयासी । रूप करूं ॥ ३२६ ॥

श्रीभगवानुवाच ।
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव । न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ॥ २२॥

तरी रजाचेनि माजें । देहीं कर्माचें आणोजें । प्रवृत्ति जैं घेईजे । वेंटाळुनि ॥ ३२७ ॥
तैं मीचि कां कर्मठ । ऐसा न ये श्रीमाठ । दरिद्रलिये बुद्धी वीट । तोही नाहीं ॥ ३२८ ॥
अथवा सत्त्वेंचि अधिकें । जैं सर्वेंद्रियीं ज्ञान फांके । तैं सुविद्यता तोखें । उभजेही ना ॥ ३२९ ॥
कां वाढिन्नलेनि तमें । न गिळिजेचि मोहभ्रमें । तैं अज्ञानत्वें न श्रमे । घेणेंही नाहीं ॥ ३३० ॥
पैं मोहाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । ज्ञानें कर्में नादरी । होतां न दुःखी ॥ ३३१ ॥
सायंप्रतर्मध्यान्हा । या तिन्ही काळांची गणना । नाहीं जेवीं तपना । तैसा असे ॥ ३३२ ॥
तया वेगळाचि काय प्रकाशें । ज्ञानित्व यावें असें । कायि जळार्णव पाउसें । साजा होय ? ॥ ३३३ ॥
ना प्रवर्तलेनि कर्में । कर्मठत्व तयां कां गमे । सांगें हिमवंतु हिमें । कांपे कायी ? ॥ ३३४ ॥
नातरी मोह आलिया । काई पां ज्ञाना मुकिजैल तया । हो मा आगीतें उन्हाळेया । जाळवत असे ? ॥ ३३५ ॥

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते । गुणा वर्तन्त इत्येव यो~वतिष्ठति नेङ्गते ॥ २३॥

तैसे गुणागुणकार्य हें । आघवेंचि आपण आहे । म्हणौनि एकेका नोहे । तडातोडी ॥ ३३६ ॥
येवढे गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती । वाटे जातां गुंती- । माजीं जैसा ॥ ३३७ ॥
तो जिणता ना हरवी । तैसा गुण नव्हे ना करवी । जैसी कां श्रोणवी । संग्रामींची ॥ ३३८ ॥
कां शरीरा{आं}तील प्राणु । घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु । नाना चोहटांचा स्थाणु । उदासु जैसा ॥ ३३९ ॥
आणि गुणाचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा । मृगजळाचा हेलावा । मेरु जैसा ॥ ३४० ॥
हें बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे । कां सूर्य ना गिळिजे । अंधकारें ? ॥ ३४१ ॥
स्वप्न कां गा जियापरी । जगतयातें न सिंतरी । गुणीं तैसा अवधारीं । न बंधिजे तो ॥ ३४२ ॥
गुणांसि कीर नातुडे । परी दुरूनि जैं पाहे कोडें । तैं गुणदोष सायिखडें । सभ्यु जैसा ॥ ३४३ ॥
सत्कर्में सात्त्विकीं । रज तें रजोविषयकीं । तम मोहादिकीं । वर्तत असे ॥ ३४४ ॥
परिस तयाचिया गा सत्ता । होती गुणक्रिया समस्ता । हें फुडें जाणे सविता । लौकिका जेवीं ॥ ३४५ ॥
समुद्रचि भरती । सोमकांतचि द्रवती । कुमुदें विकासती । चंद्रु तो उगा ॥ ३४६ ॥
कां वाराचि वाजे विझे । गगनें निश्चळ असिजे । तैसा गुणाचिये गजबजे । डोलेना जो ॥ ३४७ ॥
अर्जुना येणें लक्षणें । तो गुणातीतु जाणणें । परिस आतां आचरणें । तयाचीं जीं ॥ ३४८ ॥

समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः । तुल्यप्रियाप्रियोधीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ २४॥

तरी वस्त्रासि पाठीं पोटीं । नाहीं सुतावांचूनि किरीटी । ऐसें सुये दिठी । चराचर मद्रूपें ॥ ३४९ ॥
म्हणौनि सुखदुःखासरिसें । कांटाळें आचरे ऐसें । रिपुभक्तां जैसें । हरीचें देणें ॥ ३५० ॥
एर्‍हवीं तरी सहजें । सुखदुःख तैंचि सेविजे । देहजळीं होईजे । मासोळी जैं ॥ ३५१ ॥
आतां तें तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें । सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें ॥ ३५२ ॥
कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचें आंग । निस्तरली लगबग । खळाळाची ॥ ३५३ ॥
तेवीं आपणपांचि जया । वस्ती जाली गा धनंजया । तया देहीं अपैसया । सुख तैसें दुःख ॥ ३५४ ॥
रात्रि तैसें पाहलें । हें धारणा जेवीं एक जालें । आत्माराम देहीं आतलें । द्वंद्व तैसें ॥ ३५५ ॥
पैं निद्रिताचेनि आंगेंशीं । सापु तैशी उर्वशी । तेवीं स्वरूपस्था सरिशीं । देहीं द्वंद्वें ॥ ३५६ ॥
म्हणौनि तयाच्या ठायीं । शेणा सोनया विशेष नाहीं । रत्‍ना गुंडेया कांहीं । नेणिजे भेदु ॥ ३५७ ॥
घरा येवों पां स्वर्ग । कां वरिपडो वाघ । परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे ॥ ३५८ ॥
निवटलें न उपवडे । जळीनलें न विरूढे । साम्यबुद्धी न मोडे । तयापरी ॥ ३५९ ॥
हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । कां नीच म्हणौनि निंदिजो । परी नेणें जळों विझों । राखोंडी जैसी ॥ ३६० ॥
तैसी निंदा आणि स्तुती । नये कोण्हेचि व्यक्ती । नाहीं अंधारें कां वाती । सूर्या घरीं ॥ ३६१ ॥

मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ २५॥

ईश्वर म्हणौनि पूजिला । कां चोरु म्हणौनि गांजिला । वृषगजीं वेढिला । केला रावो ॥ ३६२ ॥
कां सुहृद पासीं आले । अथवा वैरी वरपडे जाले । परी नेणें राती पाहालें । तेज जेवीं ॥ ३६३ ॥
साहीं ऋतु येतां आकाशें । लिंपिजेचि ना जैसें । तेवीं वैशम्य मानसें । जाणिजेना ॥ ३६४ ॥
आणीकही एकु पाहीं । आचारु तयाच्या ठायीं । तरी व्यापारासि नाहीं । जालें दिसे ॥ ३६५ ॥
सर्वांरंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळले । जळती गा कर्मफळें । ते तो आगी ॥ ३६६ ॥
दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावोचि जीवीं नुगवें । सेवी जें कां स्वभावें । पैठें होये ॥ ३६७ ॥
सुखे ना शिणे । पाषाणु कां जेणें मानें । तैसी सांडीमांडी मनें । वर्जिली असे ॥ ३६८ ॥
आतां किती हा विस्तारु । जाणें ऐसा आचारु । जयातें तोचि साचारु । गुणातीतु ॥ ३६९ ॥
गुणांतें अतिक्रमणें । घडे उपायें जेणें । तो आतां आईक म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥ ३७० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099