१३ जून २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः । दंभाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५॥
ना शास्त्राचेनि कीर नांवें । खाकरोंही नेणती जीवें । परी शास्त्रज्ञांही शिवें । टेंकों नेदिती ॥ ९३ ॥
वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया । पंडितां डाकुलिया । वाजविती ॥ ९४ ॥
आपलेनीचि आटोपें । धनित्वाचेनि दर्पें । साचचि पाखंडाचीं तपें । आदरिती ॥ ९५ ॥
आपुलिया पुढिलांचिया । आंगीं घालूनि कातिया । रक्तमांसा प्रणीतया । भर भरु ॥ ९६ ॥
रिचविती जळतकुंडीं । लाविती चेड्याच्या तोंडीं । नवसियां देती उंडी । बाळकांची ॥ ९७ ॥
आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवतां वरीया । अन्नत्यागें सातरीया । ठाकती एक ॥ ९८ ॥
अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्रीं सुहाडा । पेरिती मग पुढां । तेंचि पिके ॥ ९९ ॥
बाहु नाहीं आपुलिया । आणि नावेतेंही धनंजया । न धरी होय तया । समुद्रीं जैसें ॥ १०० ॥
कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पाय खोळां । तो रोगिया जेवीं जिव्हाळा । सवता होय ॥ १०१ ॥
नाना पडिकराचेनि सळें । काढी आपुलेचि डोळे । तें वानवसां आंधळें । जैसें ठाके ॥ १०२ ॥
तैसें तयां आसुरां होये । निंदूनि शास्त्रांची सोये । सैंघ धांवताती मोहें । आडवीं जे कां ॥ १०३ ॥
कामु करवी तें करिती । क्रोधु मारवी ते मारिती । किंबहुना मातें पुरिती । दुःखाचा गुंडां ॥ १०४ ॥
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः । मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्ध्यासुरनिश्चयान् ॥ ६॥
आपुलां परावां देहीं । दुःख देती जें जें कांहीं । मज आत्मया तेतुलाही । होय शीणु ॥ १०५ ॥
पैं वाचेचेनिही पालवें । पापियां तयां नातळावें । परी पडिलें सांगावें । त्यजावया ॥ १०६ ॥
प्रेत बाहिरें घालिजे । कां अंत्यजु संभाषणीं त्यजिजे । हें असो हातें क्षाळिजे । कश्मलातें ? ॥ १०७ ॥
तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । तयांतें सांडावया तैसा । अनुवादु हा ॥ १०८ ॥
परी अर्जुना तूं तयांतें । देखसी तैं स्मर हो मातें । जे आन प्रायश्चित्त येथें । मानेल ना ॥ १०९ ॥
म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पैं येकी । जतन करावी निकी । सर्वांपरी ॥ ११० ॥
तरी धरावा तैसा संगु । जेणें पोखे सात्त्विक लागु । सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपें ॥ १११ ॥
एर्हवीं तरी पाहीं । स्वभाववृद्धीच्या ठाईं । आहारावांचूनि नाहीं । बळी हेतु ॥ ११२ ॥
प्रत्यक्ष पाहें पां वीरा । जो सावध घे मदिरा । तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणीं ॥ ११३ ॥
कां जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावीं । काय ज्वरु जालिया निववी । पयादिक ? ॥ ११४ ॥
नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी । कां आपुलिया{ऐ}सें करी । जैसें विष ॥ ११५ ॥
तेवीं जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु । आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥ ११६ ॥
जैसें भांडियाचेनि तापें । आंतुलें उदकही तापे । तैसी धातुवशें आटोपे । चित्तवृत्ती ॥ ११७ ॥
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तैं सत्त्वाची वाढी पाविजे । राजसा तामसा होईजे । येरी रसीं ॥ ११८ ॥
तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु । हें सांगों करीं आदरु । आकर्णनीं ॥ ११९ ॥
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः । यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिम शृणु ॥ ७॥
आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनी मोहरा । जालिया तेही वीरा । रोकडें दाऊं ॥ १२० ॥
तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति कीं बोनियांची । आणि जेवितां तंव गुणांची । दासी येथ ॥ १२१ ॥
जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता । पावोनियां त्रिविधता । चेष्टे त्रिधा ॥ १२२ ॥
म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु । तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ॥ १२३ ॥
पैं आहार लक्षण पहिले? । सांगों जें म्हणितलें । तें आईक गा भलें । रूप करूं ॥ १२४ ॥
आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८॥
तरी सत्त्वगुणाकडे । जें दैवें भोक्ता पडे । तैं मधुरीं रसीं वाढे । मेचु तया ॥ १२५ ॥
आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे । आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ॥ १२६ ॥
आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें । जिभेलागीं स्नेहाळें । स्वादें जियें ॥ १२७ ॥
रसें गाढीं वरी ढिलीं । द्रवभावीं आथिलीं । ठायें ठावो सांडिलीं । अग्नितापें ॥ १२८ ॥
आंगें सानें परीणामें थोरु । जैसें गुरुमुखींचें अक्षरु । तैशी अल्पीं जिहीं अपारु । तृप्ति राहे ॥ १२९ ॥
आणि मुखीं जैसीं गोडें । तैसीचिहि ते आंतुलेकडे । तिये अन्नीं प्रीति वाढे । सात्त्विकांसी ॥ १३० ॥
एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचें त्राण । नीच नवें हें ॥ १३१ ॥
येणें सात्त्विक रसें । जंव देहीं मेहो वरीषे । तंव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा ॥ १३२ ॥
सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती । दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ॥ १३३ ॥
आणि शरीरा हन मानसा । बळाचा पैं कुवासा । हा आहारु तरी दशा । कैंची रोगां ॥ १३४ ॥
हा सात्त्विकु होय भोग्यु । तैं भोगावया आरोग्यु । शरीरासी भाग्यु । उदयलें जाणो ॥ १३५ ॥
आणि सुखाचें घेणें देणें । निकें उवाया ये येणें । हें असो वाढे साजणें । आनंदेंसीं ॥ १३६ ॥
ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु । करी हा उपकारु । सबाह्यासी ॥ १३७ ॥
आतां राजसासि प्रीती । जिहीं रसीं आथी । करूं तयाही व्यक्ती । प्रसंगें गा ॥ १३८ ॥
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९॥
तरी मारें उणें काळकुट । तेणें मानें जें कडुवट । कां चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥ १३९ ॥
कणिकीतें जैसें पाणी । तैसेंचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥ १४० ॥
ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे । ऊन्हाचेनि मिषें तोंडें । आगीचि गिळी ॥ १४१ ॥
वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे । तैसें उन्ह मागे । राजसु तो ॥ ११४२ ॥
वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसें तीख तो खाये । जें घायेविण रुपे ॥ १४३ ॥
आणि राखेहूनि कोरडें । आंत बाहेरी येके पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥ १४४ ॥
परस्परें दांतां । आदळु होय खातां । तो गा तोंडीं घेतां । तोषों लागे ॥ १४५ ॥
आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरी परवडिजती मोहरी । जियें घेतां होती धुवारी । नाकेंतोंडें ॥ १४६ ॥
हें असो उगें आगीतें । म्हणे तैसें राइतें । पढियें प्राणापरौतें । राजसासि गा ॥ १४७ ॥
ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा । अन्नमिषें अग्नि भडभडां । पोटीं भरी ॥ १४८ ॥
तैसाचि लवंगा सुंठे । मग भुईं गा सेजे खाटे । पाणियाचें न सुटे । तोंडोनि पात्र ॥ १४९ ॥
ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले । ते चेववावया घातलें । माजवण पोटीं ॥ १५० ॥
तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें ॥ १५१ ॥
एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा । परीणामाचाहि विसुरा । सांगितला ॥ १५२ ॥
आतां तया तामसा । आवडे आहारु जैसा । तेंही सांगों चिळसा । झणें तुम्ही ॥ १५३ ॥
तरी कुहिलें उष्टें खातां । न मनिजे तेणें अनहिता । जैसें कां उपहिता । म्हैसी खाय ॥ १५४ ॥
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् । उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥ १०॥
निपजलें अन्न तैसें । दुपाहरीं कां येरें दिवसें । अतिकरें तैं तामसें । घेईजे तें ॥ १५५ ॥
नातरी अर्ध उकडिलें । कां निपट करपोनि गेलें । तैसेंही खाय चुकलें । रसा जें येवों ॥ १५६ ॥
जया कां आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । तें अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाहीं ॥ १५७ ॥
ऐसेनि कहीं विपायें । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तंव राहे । व्याघ्रु जैसा ॥ १५८ ॥
कां बहुवें दिवशीं वोलांडिलें । स्वादपणें सांडिलें । शुष्क अथवा सडलें । गाभिणेंही हो ॥ १५९ ॥
तेंही बाळाचे हातवरी । चिवडिलें जैसी राडी करी । का सवें बैसोनि नारी । गोतांबील करी ॥ १६० ॥
ऐसेनि कश्मळें जैं खाय । तैं तया सुखभोजन ऐसें होय । परी येणेंही न धाय । पापिया तो ॥ १६१ ॥
मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा । जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥ १६२ ॥
तया अपेयांच्या पानीं । अखाद्यांच्या भोजनीं । वाढविजे उतान्ही । तामसें तेणें ॥ १६३ ॥
एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा । तयाचें फल दुसरां । क्षणीं नाहीं ॥ १६४ ॥
जे जेव्हांचि हें अपवित्र । शिवे तयाचें वक्त्र । तेव्हांचि पापा पात्र । जाला तो कीं ॥ १६५ ॥
यावरतें जें जेवीं । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ॥ १६६ ॥
शिरच्छेदें काय होये । का आगीं रिघतां कैसें आहे । हें जाणावें काई पाहें । परी साहातुचि असे ॥ १६७ ॥
म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना । न सांगोंचि गा अर्जुना । देवो म्हणे ॥ १६८ ॥
आतां ययावरी । आहाराचिया परी । यज्ञुही अवधारीं । त्रिधा असे ॥ १६९ ॥
परी तिहींमाजीं प्रथम । सात्त्विक यज्ञाचें वर्म । आईक पां सुमहिम -। शिरोमणी ॥ १७० ॥
No comments:
Post a Comment