अध्याय १८ : ओव्या १६६-२७७

 ८ ऑगस्ट २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक ६-१२ / ज्ञानेश्वरी ओव्या  १६६-२७७ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

एतान्यपि तु कर्माणि सण्‌गं त्यक्त्वा फलानि च । कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ ६॥


तरी महायागप्रमुखें । कर्मे निफजतांही अचुकें । कर्तेपणाचें न ठाके । फुंजणें आंगीं ॥ १६६ ॥
जो मोलें तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे । ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवीं ॥ १६७ ॥
कां मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया ।तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥ १६८ ॥
जो कासें लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणें ॥ १६९ ॥
तैसें कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथा अवसरें । कृत्यजातांचें मोहरें । सारीजती ॥ १७० ॥
केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हों नेदावा । मनोरथु ॥ १७१ ॥
आधींचि फळीं आस तुटिया । कर्मे आरंभावीं धनंजया । परावें बाळ धाया । पाहिजे जैसें ॥ १७२ ॥
पिंपरुवांचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्में ॥ १७३ ॥
सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ॥ १७४ ॥
ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपणा आपुलिया गांठी । लाहेची तो ॥ १७५ ॥
म्हणौनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु ।कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा ॥ १७६ ॥
जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला । तेणें पुढतपुढतीं या बोला । आन न कीजे ॥ १७७ ॥


नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते । मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७॥


नातरी आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोंविजती नखें । तैसा कर्मद्वेषें अशेखें । कर्मेंचि सांडी ॥ १७८ ॥
तयाचें जें कर्म सांडणें । तें तामस पैं मी म्हणें । शिसाराचे रागें लोटणें । शिरचि जैसें ॥ १७९ ॥
हां गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । कीं तेचि खांडणें आहे । मार्गापराधें ॥ १८० ॥
भुकेलियापुढें अन्न । हो कां भलतैसें उन्ह । तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हल्या ॥ १८१ ॥
तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरीजे करितेनि वर्में । हे तामसु नेणें भ्रमें । माजविला ॥ १८२ ॥
कीं स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वोसंडी पैं गा । तरी झणें आतळा त्यागा । तामसा तया ॥ १८३ ॥


दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ ८॥


अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करितया उमजे । निबरपणा ॥ १८४ ॥
जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड । जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ॥ १८५ ॥
जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिलें तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ॥ १८६ ॥
कां धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । पाकु करितां ॥ १८७ ॥
तैसें पुढतपुढती कर्म । आरंभींच अति विषम । म्हणौनि तो तें श्रम । करितां मानी ॥ १८८ ॥
येऱ्हवीं विहितत्वें मांडी । परी घालितां असुरवाडीं । तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेंही ॥ १८९ ॥
म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुतीं भाग्यविशेखीं । मा जाचूं कां कर्मादिकीं । पापिया जैसा ? ॥ १९० ॥
केलें कर्मीं जे द्यावें । तें झणें मज होआवें । आजि भोगूं ना कां बरवे । हातींचे भोग ? ॥ १९१ ॥
ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणें कर्में वीरेशा । सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥ १९२ ॥
येऱ्हवीं तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे । जैसें उतलें आगीं पडे । तें नलगेचि होमा ॥ १९३ ॥
कां बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकीं निमाले । हें म्हणों नये जाहलें । दुर्मरणचि ॥ १९४ ॥
तैसें देहाचेनि लोभें । जेणें कर्मा पाणी सुभे । तेणें साच न लभे । त्यागाचें फळ ॥ १९५ ॥
किंबहुना आपुलें । जैं ज्ञान होय उदया आलें । तैं नक्षत्रातें पाहलें । गिळी जैसें ॥ १९६ ॥
तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ॥ १९७ ॥
तें मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाहीं अर्जुना । म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो ॥ १९८ ॥
तरी कोणे पां एथ त्यागें । तें मोक्षफळ घर रिघे । हेंही आइक प्रसंगे । बोलिजेल ॥ १९९ ॥


कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । सण्‌गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९॥


तरी स्वाधिकाराचेनि नांवें । जें वांटिया आलें स्वभावें । तें आचरे विधिगौरवें । शृंगारोनि ॥ २०० ॥
परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें । तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥ २०१ ॥
पैं अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायीं अर्जुना । केलिया दोनी पतना । कारण होती ॥ २०२ ॥
तरी दोनीं यें त्यजावीं । मग माताची ते भजावी । वांचूनि मुखालागीं वाळावी । गायचि सगळी ? ॥ २०३ ॥
आवडतियेही फळीं । असारें साली आंठोळीं । त्यासाठीं अवगळी । फळातें कोण्ही ? ॥ २०४ ॥
तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥ २०५ ॥
तरी या दोहींच्या विखीं । जैसा बापु नातळे लेंकीं । तैसा हों न शके दुःखी । विहिता क्रिया ॥ २०६ ॥
हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळें ये थोरु । सात्विक ऐसा डगरु । यासींच जगीं ॥ २०७ ॥
आतां जाळूनि बीज जैसें । झाडा कीजे निर्वंशें । फळ त्यागूनि कर्म तैसें । त्यजिलें जेणें ॥ २०८ ॥
लोह लागतखेंवो परीसीं । धातूची गंधिकाळिमा जैसी । जाती रजतमें तैसीं । तुटलीं दोन्ही ॥ २०९ ॥
मग सत्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसें ॥ २१० ॥
तैसा बुद्ध्यादिकांपुढां । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडां । आकाश जैसें ॥ २११ ॥


न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते । त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १०॥


म्हणौनि प्राचिनाचेनि बळें । अलंकृतें कुशलाकुशलें । तियें व्योमाआंगीं आभाळें । जिरालीं जैसीं ॥ २१२ ॥
तैसीं तयाचिये दिठी । कर्में चोखाळलीं किरीटी । म्हणौनि सुखदुःखीं उठी । पडेना तो ॥ २१३ ॥
तेणें शुभकर्म जाणावें । मग तें हर्षें करावें । कां अशुभालागीं होआवें । द्वेषिया ना ॥ २१४ ॥
तरी इयाविषयींचा कांहीं । तया एकुही संदेहो नाहीं । जैसा स्वप्नाच्या ठायीं । जागिन्नलिया ॥ २१५ ॥
म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता । नेणें तो पंडुसुता । सात्विक त्यागु ॥ २१६ ॥
ऐसेनि कर्में पार्था । त्यजिलीं त्यजिती सर्वथा । अधिकें बांधिती अन्यथा । सांडिलीं तरी ॥ २१७ ॥


न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः । यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ ११॥


आणि हां गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ २१८ ॥
मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु ? । केउता ताथु पटु । सांडील तो ? ॥ २१९ ॥
तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी । कीं तो दीपु प्रभेलागीं । द्वेषु करील काई ? ॥ २२० ॥
हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचें सुगंधत्व आणी ? । द्रवपण सांडूनि पाणी । कें राहे तें ? ॥ २२१ ॥
तैसा शरीराचेनि आभासें । नांदतु जंव असे । तंव कर्मत्यागाचें पिसें । काइसें तरी ? ॥ २२२ ॥
आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसों ये वेळोवेळा । मा घाली फेडी निडळा । कां करूं ये गा ? ॥ २२३ ॥
तैसें विहित स्वयें आदरिलें । म्हणौनि त्यजूं ये त्यजिलें । परी कर्मचि देह आतलें । तें कां सांडील गा ? ॥ २२४ ॥
जें श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी । कांहीं न करणेंयाचि परी । होती जयाची ॥ २२५ ॥
या शरीराचेनि मिसकें । कर्मची लागलें असिकें । जितां मेलया न ठाके । इया रीती ॥ २२६ ॥
यया कर्मातें सांडिती परी । एकीचि ते अवधारीं । जे करितां न जाइजे हारीं । फळशेचिये ॥ २२७ ॥
कर्मफळ ईश्वरीं अर्पे । तत्प्रसादें बोधु उद्दीपें । तेथ रज्जुज्ञानें लोपे । व्याळशंका ॥ २२८ ॥
तेणें आत्मबोधें तैसें । अविद्येसीं कर्म नाशे । पार्था त्यजिजे जैं ऐसें । तैं त्यजिलें होय ॥ २२९ ॥
म्हणौनि इयापरी जगीं । कर्में करितां मानूं त्यागी । येर मुर्छने नांव रोगी । विसांवा जैसा ॥ २३० ॥
तैसा कर्मीं शिणे एकीं । तो विसांवो पाहे आणिकीं । दांडेयाचे घाय बुकी । धाडणें जैसें ॥ २३१ ॥
परी हें असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगतीं । जेणें फळत्यागें निष्कृती । नेलें कर्म ॥ २३२ ॥


अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् । भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥ १२॥


येऱ्हवीं तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते कीं भोगावया । जे न सांडितीचि आशा ॥ २३३ ॥
आपणचि विऊनि दुहिता । कीं न मम म्हणे पिता । तो सुटे कीं प्रतिग्रहीता । जांवई शिरके ॥ २३४ ॥
विषाचे आगरही वाहती । तें विकितां सुखें लाभे जिती । येर निमालें जे घेती । वेंचोनि मोलें ॥ २३५ ॥
तैसें कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू । एथ न शके आवरूं । दोहींतें कर्म ॥ २३६ ॥
वाटे पिकलिया रुखाचें । फळ अपेक्षी तयाचें । तेवीं साधारण कर्माचें । फळ घे तया ॥ २३७ ॥
परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामीं न रिघे । जे त्रिविध जग अवघें । कर्मफळ हें ॥ २३८ ॥
देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । आणि हे तंव तिन्ही प्रकार । कर्मफळांचे ॥ २३९ ॥
तेंचि एक गा अनिष्ट । एक तें केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसें ॥ २४० ॥
परी विषयमंतीं बुद्धी । आंगीं सूनि अविधी । प्रवर्तती जे निषिद्धीं । कुव्यापारीं ॥ २४१ ॥
तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम तें अनिष्ट । कर्मफळ ॥ २४२ ॥
कां स्वधर्मा मानु देतां । स्वाधिकारु पुढां सूतां । सुकृत कीजे पुसतां । आम्नायातें ॥ २४३ ॥
तैं इंद्रादिक देवांचीं । देहें लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा ॥ २४४ ॥
आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळें । उठी दोंही वेगळें । दोहीं जिणतें ॥ २४५ ॥
रेचकुचि योगवशें । होय स्तंभावयादोषें । तेवीं सत्यासत्य समरसें । सत्यासत्यचि जिणिजे ॥ २४६ ॥
म्हणौनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभें । तेणें मनुष्यत्व लाभे । तें मिश्र फळ ॥ २४७ ॥
ऐसें त्रिविध यया भागीं । कर्मफळ मांडलेसें जगीं । हें न सांडी तयां भोगीं । जें सूदले आशा ॥ २४८ ॥
जेथें जिव्हेचा हातु फांटे । तंव जेवितां वाटे गोमटें । मग परीणामीं शेवटें । अवश्य मरण ॥ २४९ ॥
संवचोरमैत्री चांग । जंव न पविजे तें दांग । सामान्या भली आंग । न शिवे तंव ॥ २५० ॥
तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी । पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ॥ २५१ ॥
तैसा समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥ २५२ ॥
मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥ २५३ ॥
तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय । चालतां पावो पाय । जिणिजे जैसा ॥ २५४ ॥
उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेवीं न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥ २५५ ॥
पैं साध्यसाधनप्रकारें । फळभोगु तो पसरे । एवं गोंविले संसारें । अत्यागी ते ॥ २५६ ॥
येऱ्हवीं जाईचियां फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें । तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं ॥ २५७ ॥
बीजचि वरोसि वेंचे । तेथ वाढती कुळवाडी खांचे । तेवीं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम ॥ २५८ ॥
ते सत्वशुद्धि साहाकारें । गुरुकृपामृततुषारें । सासिन्नलेनि बोधें वोसरे । द्वैतदैन्य ॥ २५९ ॥
तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशे । एथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें ॥ २६० ॥
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जयां वीरेशा । तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥ २६१ ॥
आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे । तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे ? ॥ २६२ ॥
पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । कां पाहालेया राती । आंधारें उरे ? ॥ २६३ ॥
जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे ? । दर्पणेवीण बिंबें । वदन कें पां ? ॥ २६४ ॥
फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? । मग साच का वावो । कोण म्हणे ? ॥ २६५ ॥
तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें । मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे ? ॥ २६६ ॥
म्हणौनि संन्यासी ये पाहीं । कर्माची गोठी कीजेल खई । परी अविद्या आपुलाम् देहीं । आहे जै कां ॥ २६७ ॥
जैं कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें । दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं ॥ २६८ ॥
तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ॥ २६९ ॥
नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥ २७० ॥
पांघरौनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक । परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥ २७१ ॥
हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये ? ॥ २७२ ॥
जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसीं नव्हे एकु । आहे दृष्टी डोळ्यां विवेकु । अपाडु जेतुला ॥ २७३ ॥
नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहातया । आरसा आरसां पाहातया । अपाडु जेतुला ॥ २७४ ॥
पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेंनिसीं कर्म सिनें । परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें ॥ २७५ ॥
विकाशें रवीतें उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरीं कां बरवी । अब्जिनी जैसी ॥ २७६ ॥
पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करूं पांचांही तयां । कारणां रूप ॥ २७७ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099