अध्याय १: ओव्या ८५ ते १५०


अध्याय 1: अर्जुनविषादयोग(गीता श्लोक १ ते १६ / ज्ञानेश्वरी ओव्या ८५ ते १५० )
युद्ध भूमी आणि वीरांचे वर्णन 
धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥ १॥
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५ ॥
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥ ८६ ॥
तरी तेचि येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं ।ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७ ॥
संजय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २॥
तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचललें ।जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥ ८८ ॥
तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट ।जैसें उसळलें काळकूट । धरी कवण ॥ ८९ ॥
नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवातें पोखला ।सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९० ॥
तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परीकर ।अवगमलें भयासुर । तिये काळीं ॥ ९१ ॥
तें देखोनियां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें ।जैसे न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥ ९२ ॥

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३॥
मग द्रोणापासीं आला । तयांतें म्हणे हा देखिला ।कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥ ९३ ॥
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते ।रचिले आथी बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥
जो हा तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला ।तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥ ९५ ॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ ४॥
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥ ९६ ॥
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।ते सांगेन कौतुकें । प्रसंगेची ॥ ९७ ॥
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु ।महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥ ५॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ ६॥
चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु ।उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥
हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे ।आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख ॥ १०० ॥
हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु ।तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥ १०१ ॥
आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर ।मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥ १०२ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ ७॥भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः ।अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ ८॥
आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढवीर सैनिक ।ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥ १०३ ॥
उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जें ॥ १०४ ॥
हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु ।रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥ १०५ ॥
या एकेकाचेनी मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे ।हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥ १०६ ॥
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें ।याचा आडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७ ॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ ९॥
समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती ।जयांचिया बळा मिती । धाताही नेणें ॥ १०८ ॥
जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।हो कां जें अस्त्रजात । एथूनि रूढ ॥ १०९ ॥
हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं ।परी सर्व प्राणें मजलागीं । आरायिले असती ॥ ११० ॥
पतिव्रतेचें हृदय जैसें । पतिवांचूनि न स्पर्शे ।मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥ १११ ॥
आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।ऐसे निरवधि चोखडें । स्वामिभक्त ॥ ११२ ॥
झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती ।हे बहु असो क्षात्रनीति । एथोनियां ॥ ११३ ॥
ऐसे सर्वांपरि पुरते । वीर दळीं आमुते ।आतं काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४ ॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु ।तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पैं ॥ ११५ ॥
आतां याचेनि बळें गवसलें । हे दुग जैसे पन्नासिलें ।येणें पाडें थेकुलें । लोकत्रय ॥ ११६ ॥
आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥ ११७ ॥
ना तरीं प्रळयवन्ही महावातु । या दोघां जैसा सांधातु ।तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८ ॥
आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोकडें ।परि वरचिलेनि पाडें । दिसत असे ॥ ११९ ॥
वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।ऐसें बोलोनियां मातु । सांडिली तेणें ॥ १२० ॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११॥
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें ।आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१ ॥
जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी ।वरगण कवणकवणी । महारथीया ॥ १२२ ॥
तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे ।द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥ १२३ ॥
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥ १२४ ॥
तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२॥
या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला ।मग तेणें केला । सिंहनादु ॥ १२५ ॥
तो गाजत असे अद्‍भुतु । दोन्ही सैन्याआंतु ।प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ १२६ ॥
तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें ।दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ १२७ ॥
ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें ।जैसें आकाश कां पडिलें । तुटोनिया ॥ १२८ ॥
घडघडीत अंबर । उचंबळत सागर ।क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ १२९ ॥
तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें ।तव दळामाजीं रणतुरें । आस्फुरिलीं ॥ १३० ॥

ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३॥
उदंड सैंघ वाजतें । भयानखें खाखातें ।महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥ १३१ ॥
भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ ।आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥ १३२ ॥
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणेले हांका देती ।जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥ १३३ ॥
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ १३४ ॥
एकां उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले ।बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥ १३५ ॥
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥ १३६ ॥
ततः श्वेतैहयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६॥
ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु ।तव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥ १३७ ॥
हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें ।जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥ १३८ ॥
कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा ।तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥ १३९ ॥
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण ।तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥ १४० ॥
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु ।सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसीं ॥ १४१ ॥
देखा नवल तया प्रभूचें । अद्‍भुत प्रेम भक्ताचें ।जें सारथ्यपण पार्थाचें । करितु असे ॥ १४२ ॥
पाइकु पाठींसी घातला । आपण पुढां राहिला ।तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥ १४३ ॥
परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु ।जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥ १४४ ॥
तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते ।ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥ १४५ ॥
तैसाचि देखे येरे । निनादें अति गहिरे ।देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥ १४६ ॥
ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट ।तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ १४७ ॥
तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला ।तेणें पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥ १४८ ॥
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु ।तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥ १४९ ॥
नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु ।जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥ १५० ॥

 सारांश - अध्याय 1(श्लोक ८५ ते १५० )
मागच्या आठवड्यात आपण पाहिले, कौरव -पांडव यांच्यात होणार असलेल्या धर्मयुद्धासाठी दोन्ही कडील सेना सज्ज झाल्या आहेत. पुत्रप्रेमाने व सत्तेच्या लालसेने आंधळा झालेला अंध धृतराष्ट्र रणांगणावर जाऊ न शकल्याने रणभूमीवर काय सुरु आहे हे जाणून घेण्यास अतिशय उत्सुक झाला आहे. व्यासऋषींकडून दिव्यदृष्टी प्राप्त झालेला संजय त्याला रणांगणावरील प्रसंगाचे वर्णन सांगतो आहे. युद्धासाठी पांडवांकडून भीम, अर्जुन, द्रौपदीचे वीर पुत्र, प्रति अर्जुन असणारा अभिमन्यू असे अनेक असाधारण योध्ये आहेत. त्यामुळे पांडवांची सेना म्हणजे जणू महाप्रलंय काली उसळलेल्या काळाकुट् विषाप्रमाणे भासते आहे. कौरवसेनेचे वर्णन करताना दुर्योधन म्हणतो आहे की सुर्याप्रमाणे तेजस्वी असणारे भीष्म, गुरु द्रोण, कृपाचार्य,काळालाही भीती वाटेल असा अश्वथामावावर उदार झालेले अनेक वीरयोध्ये आहेत. जे समुद्रात उसळलेल्या प्रलयंकारी अग्नी आणि त्याला प्रचंड वाऱ्याची जोड मिळून उसळलेल्या ज्वाळांसारखे भासते आहे. भीष्मांनी केलेला सिंहनाद व दिव्यशंखानादाने सर्व आसमंत, चराचर कंपित झाले आहे. त्याच प्रमाणे रणवाद्यांच्या गजराने अनेक धैर्यवान वीर सुद्धा दचकले आहे. ब्रह्मदिदेव तर प्रलयकाल आल्यासारखे वाटून व्याकुळ झाले आहे. त्यानंतर पांडवाकडून तेजपूर्ण, वेगवान, पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे दिसणाऱ्या, ज्याच्या ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष मारुती बसला आहे असा दिव्यरथ आहे, ज्याचे सारथ्य प्रत्यक्ष भगवंत करीत आहे. त्या प्रभुंनी आपल्या प्रिय भक्ताला म्हणजेच अर्जुनाला पाठीशी घालून पुढे होऊन आपला दिव्य पांचजन्य शंख फुंकला. त्यानंतर अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड्र, धर्मराजने अनंतविजय, नकुलाने सुघोष, सहदेवांने मणीपुष्पक नावाचे आपआपले शंख फुंकले. त्या गजराने काळ ही गडबडला, घाबरला आहे.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099