२९ एप्रिल २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक 22 / ज्ञानेश्वरी ओव्या १४४ )
सारांश:-
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २२॥
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
भगवंत आत्मा कसा शाश्वत आहे हे अर्जुनाला समजावीत आहेत. आत्मा हा सर्वव्यापी आहे आणि शरीर नाशिवंत आहे. स्थूल शरीर म्हणजेच पंचमहाभूतांनी बनलेले शरीर व सूक्ष्म शरीर म्हणजेच अंतःकरण आणि आत्मा यांचे ज्यावेळेस मिलन होते त्यावेळी जन्म होतो. आत्मा हा आपल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्म घेतो. जसे त्याचे कर्म, त्यानुसार त्याचा जन्म होणार. प्रारब्ध कर्माचे पहिले फळं जन्म आहे आणि शेवटचे फळं मृत्यू. जो पर्यन्त पूर्व कर्म पूर्ण होणार नाही तो पर्यंत जन्म-मृत्यू चे चक्र सुरूच राहणार. मोक्ष मिळविणे हे प्रत्येक जीवाचे अंतिम ध्येय. मृत्यूचे वेळी ज्ञानेंद्रिय,कर्मेंद्रिये यांच्या सगळ्या शक्ती मनात एकवटल्या जातात. त्यावेळी उदान वायू कार्यरत होऊन ह्या सगळ्या शक्ती आणि मन, बुद्धी, चित्त , अहंकाराला घेऊन जीवात्मा शरीराबाहेर पडतो, चैतन्य शरीर सोडून निघून जाते. जीवात्मा ह्या सगळ्या शक्ती घेऊन पुढील प्रवासाला निघतो आणि नवीन शरीर धारण करतो. चांगल्या वाईट कर्मांनी गढूळ झालेले, चंचल आणि अज्ञानाचे आवरण असणारे मन, विकारांनी भरलेले , मलिन झालेले म्हणजेच जीर्ण ,खराब झालेले शरीर सोडून जीवात्मा बाहेर पडतो. ज्याप्रमाणे नवीन वस्त्र हळूहळू धूळ मा तीने वापरल्याने जीर्ण होत जाते त्याचप्रमाणे रोज केल्या जाणाऱ्या कर्मांमुळे मनाला मलिनता येते.
एखादे कर्म करताना आपण त्याच्या मागे चांगल्या वाईटच विचार करतो त्याची छाप मनात उमटते आणि ती छाप मनाला गढूळ करते. जसे एखादा चोर परिस्थिती मुळे चोरी करण्याचा मनात संकल्प करतो, पण ती केली तर ती आपले पोट कशी भरू शकते आणि ती करणे कसे चूक आहे ह्याचा एकाच वेळी मनात गोंधळ उडालेला असतो. पण तो ती करतो , त्याने त्याचे कर्म केले. त्यावेळी केलेल्या चूक -बरोबर च्या विचारांची छाप मनात उमटते, आणि अश्याच विचारांनी चंचल मन मलिन ,जीर्ण होते. हे जीर्ण वस्त्ररूपी शरीर सोडून जीवात्मा पिंडातून ब्रह्मांडात विलीन होतो, आणि पुन्हा आपल्या प्रारब्धानुसार आणि संचित कर्मानुसार नवीन शरीर धारण करतो.
हे मनाचे विकार -दोष दूर करण्यासाठी ज्ञान,उपासना मार्गांचा अवलंब करून मनाला निर्मल करता येईल आणि मोक्ष प्राप्ती करून आत्म्याला जन्म -मृत्यू च्या चक्रातून मुक्त करता येईल.
No comments:
Post a Comment