अध्याय १८ : ओव्या १७१०-१८११

 ३० जानेवारी २०२२ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ज्ञानेश्वरी ओव्या १७१०-१८११ ) 

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा । तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे कीं ॥ १७११ ॥
आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा । तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ? ॥ १७१२ ॥
पांख फुटे पांखिरूं । नुडे तरी नभींच स्थिरू । गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥ १७१३ ॥
राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शाहाणें । आणिकें काय कोणें । चालावेचिना ? ॥ १७१४ ॥
जी आपुलेनि अवकाशें । अगाध जळ घेपे कलशें । चुळीं चूळपण ऐसें । भरूनि न निघे ? ॥ १७१५ ॥
दिवटीच्या आंगीं थोरी । तरी ते बहु तेज धरी । वाती आपुलिया परी । आणीच कीं ना ? ॥ १७१६ ॥
जी समुद्राचेनि पैसें । समुद्रीं आकाश आभासे । थिल्लरीं थिल्लरा{ऐ}सें । बिंबेचि पैं ॥ १७१७ ॥
तेवीं व्यासादिक महामती । वावरों येती इये ग्रंथीं । मा आम्ही ठाकों हे युक्ति । न मिळे कीर ? ॥ १७१८ ॥
जिये सागरीं जळचरें । संचरती मंदराकारें । तेथ देखोनि शफरें येरें । पोहों न लाहती ? ॥ १७१९ ॥
अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्यातें देखें । मा भूतळींची न देखे । मुंगी काई ? ॥ १७२० ॥
यालागीं आम्हां प्राकृतां । देशिकारें बंधें गीता । म्हणणें हें अनुचिता । कारण नोहे ॥ १७२१ ॥
आणि बापु पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये । बाळ ये तरी न लाहे । पावों कायी ? ॥ १७२२ ॥
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारातें वाट पुसतु । अयोग्यही मी न पवतु । कें जाईन ? ॥ १७२३ ॥
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा । जयाचेनि अमृतें चंद्रमा । निववी जग ॥ १७२४ ॥
जयाचें आंगिक असिकें । तेज लाहोनि अर्कें । आंधाराचें सावाइकें । लोटिजत आहे ॥ १७२५ ॥
समुद्रा जयाचें तोय । तोया जयाचें माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥ १७२६ ॥
पवना जयाचें बळ । आकाश जेणें पघळ । ज्ञान जेणें उज्वळ । चक्रवर्ती ॥ १७२७ ॥
वेद जेणें सुभाष । सुख जेणें सोल्लास । हें असो रूपस । विश्व जेणें ॥ १७२८ ॥
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु । राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां ॥ १७२९ ॥
आतां आयती गीता जगीं । मी सांगें मऱ्हाठिया भंगीं । येथ कें विस्मयालागीं । ठावो आहे ॥ १७३० ॥
श्रीगुरुचेनि नांवें माती । डोंगरीं जयापासीं होती । तेणें कोळियें त्रिजगतीं । येकवद केली ॥ १७३१ ॥
चंदनें वेधलीं झाडें । जालीं चंदनाचेनि पाडें । वसिष्ठें मांनिली कीं भांडे । भानूसीं शाटी ॥ १७३२ ॥
मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला । जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदीं ॥ १७३३ ॥
आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे ? ॥ १७३४ ॥
म्हणौनि माझें नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे । श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ १७३५ ॥
याकारणें मियां । श्रीगीतार्थु मऱ्हाठिया । केला लोकां यया । दिठीचा विषो ॥ १७३६ ॥
परी मऱ्हाठे बोलरंगें । कवळितां पैं गीतांगें । तैं गातयाचेनि पांगें । येकाढतां नोहे ॥ १७३७ ॥
म्हणौनि गीता गावों म्हणे । तें गाणिवें होती लेणें । ना मोकळे तरी उणें । गीताही आणित ॥ १७३८ ॥
सुंदर आंगीं लेणें न सूये । तैं तो मोकळा शृंगारु होये । ना लेइलें तरी आहे । तैसें कें उचित ? ॥ १७३९ ॥
कां मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती । नातरी मानविती । अंगेंचि सडीं ॥ १७४० ॥
नाना गुंफिलीं कां मोकळीं । उणीं न होती परीमळीं । वसंतागमींचीं वाटोळीं । मोगरीं जैसीं ॥ १७४१ ॥
तैसा गाणिवेतें मिरवी । गीतेवीणही रंगु दावीं । तो लाभाचा प्रबंधु ओंवी । केला मियां ॥ १७४२ ॥
तेणें आबालसुबोधें । ओवीयेचेनि प्रबंधें । ब्रह्मरससुस्वादें । अक्षरें गुंथिलीं ॥ १७४३ ॥
आतां चंदनाच्या तरुवरीं । परीमळालागीं फुलवरीं । पारुखणें जियापरी । लागेना कीं ॥ १७४४ ॥
तैसा प्रबंधु हा श्रवणीं । लागतखेंवो समाधि आणी । ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ? ॥ १७४५ ॥
पाठ करितां व्याजें । पांडित्यें येती वेषजे । तैं अमृतातें नेणिजे । फावलिया ॥ १७४६ ॥
तैसेंनि आइतेपणें । कवित्व जालें हें उपेणें । मनन निदिध्यास श्रवणें । जिंतिलें आतां ॥ १७४७ ॥
हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल । सर्वेंद्रियां पोषवील । श्रवणाकरवीं ॥ १७४८ ॥
चंद्रातें आंगवणें । भोगूनि चकोर शाहाणे । परी फावे जैसें चांदिणें । भलतयाही ॥ १७४९ ॥
तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये । अंतरंगचि अधिकारिये । परी लोकु वाक्चातुर्यें । होईल सुखिया ॥ १७५० ॥
ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें । गौरव आहे जी साचें । ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये ॥ १७५१ ॥
क्षीरसिंधु परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं । नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें जें ॥ १७५२ ॥
तें क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरीं गुप्तु । होता तयाचा हातु । पैठें जालें ॥ १७५३ ॥
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावयवा चौरंगी । भेटला कीं तो सर्वांगीं । संपूर्ण जाला ॥ १७५४ ॥
मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया । ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं ॥ १७५५ ॥
तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥ १७५६ ॥
मग तिहीं तें शांभव । अद्वयानंदवैभव । संपादिलें सप्रभव । श्रीगहिनीनाथा ॥ १७५७ ॥
तेणें कळिकळितु भूतां । आला देखोनि निरुता । ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥ १७५८ ॥
ना आदिगुरु शंकरा\- । लागोनि शिष्यपरंपरा । बोधाचा हा संसरा । जाला जो आमुतें ॥ १७५९ ॥
तो हा तूं घेऊनि आघवा । कळीं गिळितयां जीवां । सर्व प्रकारीं धांवा । करीं पां वेगीं ॥ १७६० ॥
आधींच तंव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू । जाला जैसा वर्षाकाळू । खवळणें मेघां ॥ १७६१ ॥
मग आर्ताचेनि वोरसें । गीतार्थग्रंथनमिसें । वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु ॥ १७६२ ॥
तेथ पुढां मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया । कीं यासाठीं येवढिया । आणिलों यशा ॥ १७६३ ॥
एवं गुरुक्रमें लाधलें । समाधिधन जें आपुलें । तें ग्रंथें बोधौनि दिधलें । गोसावी मज ॥ १७६४ ॥
वांचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणें स्वामीची । ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता कें असे ? ॥ १७६५ ॥
परी साचचि गुरुनाथें । निमित्त करूनि मातें । प्रबंधव्याजें जगातें । रक्षिलें जाणा ॥ १७६६ ॥
तऱ्ही पुरोहितगुणें । मी बोलिलों पुरें उणें । तें तुम्हीं माउलीपणें । उपसाहिजो जी ॥ १७६७ ॥
शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें । अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥ १७६८ ॥
सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले । तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥
यालागीं मी गुणदोष\- । विषीं क्षमाविना विशेष । जे मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं ॥ १७७० ॥
आणि तुम्हां संतांचिये सभे । जें उणीवेंसी ठाके उभें । तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें । तुम्हांसीचि कोपें ॥ १७७१ ॥
सिवतलियाही परीसें । लोहत्वाचिये अवदसे । न मुकिजे आयसें । तैं कवणा बोलु । ॥ १७७२ ॥
वोहळें हेंचि करावें । जे गंगेचें आंग ठाकावें । मगही गंगा जरी नोहावें । तैं तो काय करी ? ॥ १७७३ ॥
म्हणौनि भाग्ययोगें बहुवें । तुम्हां संतांचें मी पाये । पातलों आतां कें लाहे । उणें जगीं । ॥ १७७४ ॥
अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्हीं । दिधलेति तेणें सर्वकामीं । परीपूर्ण जालों ॥ १७७५ ॥
पाहा पां मातें तुम्हां सांगडें । माहेर तेणें सुरवाडें । ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें ॥ १७७६ ॥
जी कनकाचें निखळ । वोतूं येईल भूमंडळ । चिंतारत्‌नीं कुळाचळ । निर्मूं येती ॥ १७७७ ॥
सातांही हो सागरांतें । सोपें भरितां अमृतें । दुवाड नोहे तारांतें । चंद्र करितां ॥ १७७८ ॥
कल्पतरूचे आराम । लावितां नाहीं विषम । परी गीतार्थाचें वर्म । निवडूं न ये ॥ १७७९ ॥
तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मऱ्हाठिया भाखा । करी डोळेवरी लोकां । घेवों ये ऐसें जें ॥ १७८० ॥
हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा । कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो कां ॥ १७८१ ॥
गीतार्थाचा आवारु । कलशेंसीं महामेरु । रचूनि माजीं श्रीगुरु\- । लिंग जें पूजीं ॥ १७८२ ॥
गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हें हिंडे जें वाय । तें मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥ १७८३ ॥
तुम्हां सज्जनांचें केलें । आकळुनी जी मी बोलें । ज्ञानदेव म्हणे थेंकुलें । तैसें नोहें ॥ १७८४ ॥
काय बहु बोलों सकळां । मेळविलों जन्मफळा । ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥ १७८५ ॥
मियां जैसजैसिया आशा । केला तुमचा भरंवसा । ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलों सुखा ॥ १७८६ ॥
मजलागीं ग्रंथाची स्वामी । दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही । तें पाहोनि हांसों आम्हीं । विश्वामित्रातेंही ॥ १७८७ ॥
जे असोनि त्रिशंकुदोषें । धातयाही आणावें वोसें । तें नासतें कीजे कीं ऐसें । निर्मावें नाहीं ॥ १७८८ ॥
शंभू उपमन्युचेनि मोहें । क्षीरसागरूही केला आहे । येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ कीं ॥ १७८९ ॥
अंधकारु निशाचरां । गिळितां सूर्यें चराचरां । धांवा केला तरी खरा । ताउनी कीं तो ॥ १७९० ॥
तातलियाही जगाकारणें । चंद्रें वेंचिलें चांदणें । तया सदोषा केवीं म्हणे । सारिखें हें ॥ १७९१ ॥
म्हणौनि तुम्हीं मज संतीं । ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं । उपयोग केला तो पुढती । निरुपम जी ॥ १७९२ ॥
किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें । येथ माझें जी उरलें । पाईकपण ॥ १७९३ ॥
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९४ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९६ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥ १७९७ ॥
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९८ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९९ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८०० ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकींयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०१ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०२ ॥
ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्रमंडळीं । श्रीगोदावरीच्या कूलीं । दक्षिणलिंगीं ॥ १८०३ ॥
त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र । जेथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥ १८०४ ॥
तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु । न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥ १८०५ ॥
तेथ महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुतें । केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें ॥ १८०६ ॥
एवं भारताच्या गांवीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं । श्रीकृष्णार्जुनीं बरवी । गोठी जे केली ॥ १८०७ ॥
जें उपनिषदांचें सार । सर्व शास्त्रांचें माहेर । परमहंसीं सरोवर । सेविजे जें ॥ १८०८ ॥
तियें गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु । म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो ॥ १८०९ ॥
पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥ १८१० ॥
शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥ १८११ ॥

इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टादशोध्यायः ॥

श्रीशके पंधराशें साहोत्तरीं । तारणनामसंवत्सरीं । एकाजनार्दनें अत्यादरीं । गीता\-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥ १ ॥
ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध । परी पाठांतरीं शुद्ध अबद्ध । तो शोधूनियां एवंविध । प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥ २ ॥
नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचितां टीका । ज्ञान होय लोकां । अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥ ३ ॥
बहुकाळपर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥ ४ ॥
ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाटी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥ ५ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥
॥ श्री परमात्मने नमः ॥
॥ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099