२१ मार्च २०२१ निरुपण
तया तूतें मी सेवकपणें । लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें । हें उपसाहावेंही म्हणतां उणें । अद्वयानंदा ॥ २१ ॥
परी रंकें अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु । मग करूं धांवे पाहुणेरु । शाकांचा तया ॥ २२ ॥
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा । उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ॥ २३ ॥
बाळा उचित जाणणें होये । तरी बाळपणचि कें आहे ? । परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे ॥ २४ ॥
हां गा गांवरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें । तें गंगा काय म्हणितलें । परतें सर ? ॥ २५ ॥
जी भृगूचा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासीं ? ॥ २६ ॥
कीं आंधारें खतेलें अंबर । झालेया दिवसनाथासमोर । तेणें तयातें पर्हा सर । म्हणितलें काई ? ॥ २७ ॥
तेवीं भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे । तुकिलासि तें येकी वेळे । उपसाहिजो जी ॥ २८ ॥
जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी । जें उपसाहिलें तयासी । तें आम्हांही करीं ॥ २९ ॥
परी मी आजि तुझ्या गुणीं । लांचावलों अपराधु न गणीं । भलतें करीं परी अर्धधणीं । नुठी कदा ॥ ३० ॥
मियां गीता येणें नांवें । तुझें पसायामृत सुहावें । वानूं लाधलों तें दुणेन थावें । दैवलों दैवें ॥ ३१ ॥
माझिया सत्यवादाचें तप । वाचा केलें बहुत कल्प । तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु ॥ ३२ ॥
पुण्यें पोशिलीं असाधरणें । तियें तुझें गुण वानणें । देऊनि मज उत्तीर्णें । जालीं आजी ॥ ३३ ॥
जी जीवित्वाच्या आडवीं । आतुडलों होतों मरणगांवीं । ते अवदसाची आघवी । फेडिली आजी ॥ ३४ ॥
जे गीता येणें नांवें नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी । ते कीर्ती तुझी आम्हांजोगी । वानावया जाली ॥ ३५ ॥
पैं निर्धना घरीं वानिवसें । महालक्ष्मी येऊनि बैसे । तयातें निर्धन ऐसें । म्हणों ये काई ? ॥ ३६ ॥
कां अंधकाराचिया ठाया । दैवें सुर्यु आलिया । तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ? ॥ ३७ ॥
जया देवाची पाहतां थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी । तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ? ॥ ३८ ॥
तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी । परी समर्थें तुवां शिरयाणी । फेडिली ते ॥ ३९ ॥
म्हणौनि तुझेनि प्रसादें । मी गीतापद्यें अगाधें । निरूपीन जी विशदें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४० ॥
तरी अध्यायीं पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा । शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥ ४१ ॥
जे वृक्षरूपक परीभाषा । केलें उपाधि रूप अशेषा । सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ॥ ४२ ॥
आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु । तेणें उपहिताही आकारु । चैतन्या केला ॥ ४३ ॥
पाठीं उत्तम पुरुष । शब्दाचें करूनि मिष । दाविलें चोख । आत्मतत्त्व ॥ ४४ ॥
आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट । ज्ञान हेंही स्पष्ट । चावळला ॥ ४५ ॥
म्हणौनि इये अध्यायीं । निरूप्य नुरेचि कांहीं । आतां गुरुशिष्यां दोहीं । स्नेहो लाहणा ॥ ४६ ॥
एवं इयेविषयीं कीर । जाणते बुझावले अपार । परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥ ४७ ॥
त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञानें भेटे जो सुवर्मा । तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ॥ ४८ ॥
ऐसें हें त्रैलोक्यनायकें । बोलिलें अध्यायांत श्लोकें । तेथें ज्ञानचि बहुतेकें । वानिलें तोषें ॥ ४९ ॥
भरूनि प्रपंचाचा घोंटु । कीजे देखतांचि देखतया द्रष्टु । आनंदसाम्राज्यीं पाटु । बांधिजे जीवा ॥ ५० ॥
येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहींचि म्हणे देवो । हा सम्यक्ज्ञानाचा रावो । उपायांमाजीं ॥ ५१ ॥
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिहीं तोषलेनि चित्तें । आदरें तया ज्ञानातें । वोंवाळिलें जीवें ॥ ५२ ॥
आतां आवडी जेथ पडे । तयाचि अवसरीं पुढें पुढें । रिगों लागें हें घडे । प्रेम ऐसें ॥ ५३ ॥
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं । ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी । तंव योग क्षेमु ज्ञानविखीं । स्फुरेलचि कीं ॥ ५४ ॥
म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन । जालिया वृद्धियत्न । घडेल केवीं ॥ ५५ ॥
कां उपजोंचि जें न लाहे । जें उपजलेंही अव्हांटा सूये । तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे । हें जाणावें कीं ॥ ५६ ॥
मग जाणतयां जें विरू । तयाचीं वाट वाहती करूं । ज्ञाना हित तेंचि विचारूं । सर्वभावें ॥ ५७ ॥
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं । भावो जो धरिला असे चित्तीं । तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ॥ ५८ ॥
ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे । ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥ ५९ ॥
आणि ज्ञानाचेनि कामाकारें । जे रागद्वेषांसि दे थारे । तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥ ६० ॥
सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी । हे नवमाध्यायीं उभारणी । केली होती ॥ ६१ ॥
तेथ साउमा घेयावया उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो । तरी तयां प्रसंगें आतां देवो । निरूपीत असे ॥ ६२ ॥
तया निरूपणाचेनि नांवें । अध्याय पद सोळावें । लावणी पाहतां जाणावें । मागिलावरी ॥ ६३ ॥
परी हें असो आतां प्रस्तुतीं । ज्ञानाच्या हिताहितीं । समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ॥ ६४ ॥
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।ते आधीं तंव दैवी । संपत्ती ऐका ॥ ६५ ॥
जेथ एक एकातें पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकीं । संपादिजती ते लोकीं । संपत्ति म्हणिजे ॥ ६६ ॥
ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणें येकोपजीवीं । जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे ॥ ६७ ॥
श्री भगवानुवाच ।
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितः । दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवं ॥ १॥
आतां तयाचि दैवगुणां- । माजीं धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसें ॥ ६८ ॥
तरी न घालूनि महापुरीं । न घेपे बुडणयाची शियारी । कां रोगु न गणिजे घरीं । पथ्याचिया ॥ ६९ ॥
तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठूं नेदूनि अहंकारा । संसाराचा दरारा । सांडणें येणें ॥ ७० ॥
अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजे मानूनि आत्मा ऐसें । भयवार्ता देशें । दवडणें जें ॥ ७१ ॥
पाणी बुड{ऊं} ये मिठातें । तंव मीठचि पाणी आतें । तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशे भय ॥ ७२ ॥
अगा अभय येणें नांवें । बोलिजे तें हें जाणावें । सम्यक्ज्ञानाचें आघवें । धांवणें हें ॥ ७३ ॥
No comments:
Post a Comment