२७ जुलै २०२०
श्री महाराजांच्या कृपेने आणि विवेक दादांच्यामुळे थोडं फार वाचनाचा आणि लिहिण्याचा हा एक छोटा प्रयत्न. अमित दादांनी
सांगितल्या प्रमाणे परमार्थ हा दोन मार्गानी करता येतो . "भक्ती मार्ग " आणि " ज्ञान मार्ग ". भक्ती मार्ग हा "भावनेशी "संबंधित आहे आणि ज्ञान
मार्ग हा
"बुद्धीशी ". आपण अनेक संत आणि
त्यांच्ये भक्त पहिले .त्यांची भक्ती पाहिली .तसेच प.पु जीजीमाय यांची श्री रामा
बद्दल ,श्री गोंदवलेकर ,श्री रामानंद व त्यांचे
पती श्री प्रल्हाद महाराजांनबद्दल असलेली निष्ठा ,प्रेम ,भक्ती या बद्दल बोलणार आहोत .
प .पु सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज रामदासी
(साखरखेर्डा )नामाचा महिमा गाण्यासाठी आणि अध्यात्मदृष्ट्या अज्ञानी असण्याऱ्या
लोकांचा भवसागर पार करण्यासाठी विदर्भ प्रांतात अवतरले . त्यांच्या सारख्या विरक्त
,सत्वशील , परोपकारी , समाधानी आणि भोळी भक्तच
होऊ शकते . आणि पू .जीजी मायीनकडे पाहिले कि याची खात्री पटते . सद्गुणांची कास
धरून गुरु भक्ती , ममत्व , विरहित साधना ,अखंड नामस्मरण आणि खडतर वैराग्य अश्या गुणांमुळे माय बाईंना
अंतर्दृष्टी व वाचासिद्धी प्राप्त झालेली होती . आयुष्यभर रामनाम आणि खेर्डा ,जालना ,गोंदवले येथील उत्सव हे
मायबाईंनी कधीही चुकवले नाही .सद्गुरु श्री प्रल्हाद महाराजांच्या देह
त्यागानंतरही हे राम कार्य अविरत सुरूच होते
भक्ती लक्षण -अद्वेष्टा
- अद्वेष्टा म्हणजे कोणाचाही द्वेष न करणे ,सर्वांवर सारखे प्रेम करणे
,स्वार्थ रहित ,ज्याला सुख दुःख एकसमान
असतात , क्षमावान .
काही व्यक्ती एखाद्या कुळाच भुषण होतात,काही व्यक्ती एखाद्या
गावाचे भुषण ठरतात परंतु सर्व जगाचे कल्याण हे श्री सद्गुरुच करु शकतात .हे
विश्वची,माझे घर मानणारी,सत्कर्मी रती वाढवणारी,ही आदिशक्ती २० व्या शतकात
विदर्भातील सुलतानपूर येथे अवतरली.जे कार्य करण्यासाठी श्री प्रल्हाद महाराज
अवतरले होते तेच कार्य करण्यासाठी जिजीमाय ईश्वरी इच्छेनुसार वैराग्यशाली अंतःकरण
घेऊन अवतरल्या.
श्री रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराज व
जिजामाई यांचे लग्न ठरवले .ही गोष्ट श्री प्रल्हाद महाराजांना समजल्यावर ते
अंतःकरणातुन दुखीःत झाले कारण साक्षात मारुतीचेच अंशरुप अवतार असल्यामुळे जन्मतःच
विरक्त वृत्ती होती परंतु गुरुआज्ञा असल्यामुळे ते लग्नाला तयार झाले .लग्नाच्या
वेळी श्री प्रल्हाद महाराज १३ वर्षाचे होते व जिजीमाईंचे ९ वर्ष.
कुणी मागता वस्तू भारी कितीही !
नसे मोह त्याचा दिले सर्व काही !
आपल्या परी मानिले याचकाला !
नमस्कार माझा जिजीमाऊलीला !
वरील श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणेच जिजीमाय
प्रत्यक्ष किती निस्पृह, निरासक्त,निस्वार्थी, परोपकारी होत्या हे आता आपण सर्वजण पाहणार आहोत.
जिजीमाईना कुठल्याही प्रकारच्या वस्तुंची संग्रह
करण्याची आसक्ती नसे. त्यांना भक्तांनी दिलेल्या सर्व वस्तु त्या प्रसाद म्हणून
भक्तांमध्ये वाटून टाकत असत. आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत या माऊलीने अंगावर
नेसण्याच्या दोन लुगड्याशिवाय काही ठेवले नाही.महिला भगिनी मायबाईंसाठी भरपूर नविन
लुगडी आणत असत.जर कुणी म्हणाले की मायबाई मी आणलेले पातळ नेसा ना तेव्हा जिजीमाय
म्हणत तु मला दिलेस ना मग मला ज्याला वाटेल त्याला मी ते देईन. या माऊलीने
आयुष्यभर रामनामाच्या संग्रहाशिवाय दुसरा संग्रह केला नाही.एकदा श्री प्रल्हाद
महाराज देवघरात जप करत बसले होते.तो दारात एक भिकारीण आली व महाराजांना एखादे वस्ञ
मला द्या म्हणू लागली.तीच्या अंगावर फक्त एक साडी होती,त्या साडीलाही ठिगळे
लावलेली होती.तिला पाहून महाराजांचे अंतःकरण हेलावले,आणी दोरीवर वाळत घातलेले
जिजीमाईंचे चांगले पातळ काढून त्यांनी त्या भिकारीणीला दिले.ती आनंदाने निघून
गेली.नंतर महाराजांनी जिजीमाईंना सांगितले.तेव्हा तिचा द्वेश न करता त्याही हा
प्रसंग ऐकून आनंदी झाल्या .
एक प्रसंग असा आहे की श्री प्रल्हाद महाराजांंच्या निर्याणानंतर सिंधुबाई अमरावतीहुन मायबाईंना भेटण्यासाठी आल्या.येताना त्यांनी मायबाईंना पांढरे पातळ आणले.मायबाईंनी हे पहाताच त्यांना म्हणाल्या की "महाराज आपल्यातून गेले असे तुला वाटते का? म्हणून तु मला पांढरे पातळ आणलेस,परंतु महाराज साखरखेर्डा येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत हे लक्षात ठेव." आणि जिजीमाईंचा या पांढऱ्या पातळामागे बोलण्याचा दुसराही दृष्टिकोन होता तो म्हणजे पांढरे पातळ दुसऱ्या महिलेला देता येत नाही जर रंगीत पातळ असेल तर दुसऱ्या कोणत्याही स्ञीला प्रसाद म्हणून देता येते. धन्य ती माऊली !! करी कृपेची साऊली !!
२८ जुलै
२०२०
भक्ति लक्षण—करुणा
जिजीमाऊलीचे जिवन म्हणजे शारदामातेप्रमाणेच होते. शारदा देवीच्या आईवडीलांनी एकदा रामकृष्ण परमहंसांना म्हटले की शारदेला आपण मातृत्व प्रदान करावं तेव्हा रामकृष्ण म्हणाले योग्य वेळ आल्यानंतर इतकी मुले तीला एकदम आई म्हणून हाक मारतील की कुणा च्या हाकेला ओ द्यावी हे तिलाही समजणार नाही आणि झालेही तसेच परमहंसांनंतर शारदादेवीने त्यांच्या हजारो शिष्यांना आईप्रमाणे सांभाळले. त्याप्रमाणेच श्री प्रल्हाद महाराजांंच्या सर्व शिष्यांना जिजी माईंनी सांभाळले. महाराजांनंतर जिजीमाईंनी मातृपद व गुरुपद या दोन्ही भुमिका अगदी निरपेक्षपणे सांभाळल्या.एकदा जिजीमाईंच्या घशामध्ये सुपारीचा तुकडा अडकल्यामुळे घशाला जखम झाली.त्यावर अॉपरेशन हा एकच इलाज स्थानिक डॉक्टरांनी सांगितला. अॉपरेशनही मुंबईला करावे लागणार होते.परंतु प.पू.प्रल्हाद महाराजांनी घरासहीत सर्व दान केल्यामुळे आणि रामाला आलेला पैसा स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी वापरायचा नाही असा महाराजांचा नियम असल्यामुळे पैशाची अडचण होती.तेव्हा सर्व शिष्यसंप्रदायाने वर्गणी जमा करुन जिजीमाईंना मुंबईला नेले.मुंबईत तेव्हा तात्यासाहेब केतकर होते.तेथे तात्यासाहेबांनी स्वतः जिजीमाईंना मुंबईत चांगल्या डॉक्टरकडे नेऊन सर्व उपचार करवुन घेतले.अॉपरेशन झाल्यानंतर जिजीमाय साखरखेर्ड्याला परत आल्या,त्यादिवसापासुन जिजीमाय सर्वांना सांगत की माझी मरणाची देखील तयारी होती पण माझ्या पोरांनी म्हणजे शिष्यांनी मला मरु दिले नाही.प.पू.प्रल्हाद महाराज व जिजीमाईंचा गृहस्थाश्रम कसा होता हे थोडक्यात बघुया.श्री प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांंच्या प्रवचनात एकदा आसक्ती बद्दल ऐकलं होत त्यातुन विरक्तपणा मनात तयार होऊन व रामकार्यामध्ये साधने मध्ये मोह नको म्हणून प्रल्हाद महारा जांनी साखरखेर्डा येथील आपले रहाते घर,त्यातील वस्तु,दागिने,पैसे सर्व गोरगरीबांना दान केले व एका वस्त्रानीशी जिजीमाईंसहीत महाराज बालनाथ मंदिरात रहायला आले होते.त्याचप्रमाणे जमीन जुमला आपल्या सद्गुरुंच्या नावावर केला होता.अशी दानवृत्ती, विरक्ती, करूणासागर,निस्पृहपणा या कलीयुगात हे आश्चर्यच होते.सर्व काही रामाचे व रामच आपले सर्वस्व या भावनेतुनच या दोन्ही उभयतांचा गृहस्थाश्रम शिखरावर पोहोचला.
२९जुलै 2020
भक्तिलक्षण- संगवर्जित: (आसक्ति विरहित)
गुरुमाय प्रल्हाद माझी कृपाळू ! तया लाभली ज्ञानपत्नी दयाळू !
जिजीमाय संबोधीती भक्त तीला ! नमस्कार माझा जिजीमाऊलीला !
साधेपणा,भोळेपणा,स्थायी भाव, सोशिकपणा,सहनशिलता,निस्पृहवृत्तीपरोपकार,पतीआज्ञा, इत्यादी सर्व गुणाचे भांडार म्हणजे प.पू.जिजीमाय गुरुसेवा,अतिथीसेवा,प्रपंच नेटका कसा करावा हे आजकालच्या महिलांनी जिजीमाईंकडून शिकण्या सारखे आहे.या मायबाईंना नटणे, मुरडणे, दागिने,वेशभुषा,इ.आवड नव्हतीच.त्यांना आवड होती फक्त रामनामाची.महाराजांंच्या निर्याणा नंतर एकाने मायबाईला प्रश्न विचारला की मायबाईं तुम्ही सती का बरे गेला नाहीत?यावर मायबाईंनी समर्पक उत्तर दिले की "आयुष्यभर मी महाराजांंच्या अंगाला स्पर्श केला नाही आणि आता सती जाऊन त्यांना का विटाळ करु? आणि अशाने आम्हा दोघांचिही तपश्चर्या फळाला असती का?" यावरून एकच अर्थ निघतो तो म्हणजे महाराज व जिजीमाय फक्त रामनाम प्रचारासाठीच या भुतलावर अवतरले होते.त्यामूले त्या अगदी आसक्ति विरहित होत्या। मागे वर्णन केल्या प्रमाणे जपाच्या व ब्रम्हचर्य प्रभावाने जिजीमाईंना वाचासिद्धी आली होती आणि त्यातुनच ज्या भक्तांचा भाव शुद्ध त्यांच्या अडचणी,समस्या थोड्या फार प्रमाणात दुर होऊ लागल्या. रमेश शुक्ल म्हणून महाराजांंचे अनुग्रहित.त्यांचे घर परभणीला होते परंतु नोकरीत बदली कळमनुरीला झाली होती.त्यांनी परभणीला घराचे बांधकाम सुरु केले परभणीला मुले पत्नी रहात होते.पण शुक्लांना नोकरी करुन बांधकाम पहाणे अवघड जाऊ लागले.त्यासाठी त्यांनी वरीष्ठांना अर्ज केला की माझी बदली परभणी किंवा आसपास करावी.बदलीसाठी भरपूर प्रयत्न केले परंतु यश आले नाही.मग त्यांनी साखरखेर्ड्याला जिजीमाईंना ही समस्या सांगितली तेव्हा जिजीमाई नी त्यांना सांगितले की नित्य नियमाने तुम्ही शनिवार करा,नामात रहा.कार्य सिद्धीस जाईल.एक शनिवार झाल्या नंतरच रमेशराव शुक्लना अनुभव आला.
धन्य ती मायबाईं ! धन्य ते रामनाम !
३० जुलै 2020
भक्तिलक्षण——भक्तिमान
(भक्तियुक्त अंत:करणाचा )
साखरखेर्डा येथील काळे घराणे तसे देवभोळे, परोपकारी,दिनदुबळ्यांना आधार वाटणारे,आणि रामावर अतिशय भक्ति.अशा या काळे घराण्यात जिजीमाय संसाराची सारी जबाबदारी सांभाळून सद्गुरुंनी दिलेली साधना करु लागल्या.आदर्श भारतीय नारीचे उत्तम उदाहरण म्हणजे प.पू.जिजीमाय.जिजीमाईंचा रोजचा दिनक्रम असा होता,सकाळी ४ वा उठणे,मानसपूजा,जप करुन,५ वा सडासारवण,रांगोळी,करणे. साखरखेर्डा येथे नेहमीच पाण्याची समस्या असे त्यामुळे धुणे धुवायला भोगावती नदीवर जावे लागे.जिजीमाय देखील जात असत.नंतर स्वयंपाक वगैरे करुन आलेल्या भक्तांना भोजनप्रसाद वाढणे,दुपारी महाराजांचे भोजन झाल्यानंतर जप करुन आपण स्वतः जेवत असत.चार वाजता महाराज दासबोध वाचन करायचे.हे ऐकून लगेच जिजीमाय उपासनेची तयारी करुन उपासना करत असत.रात्रीची शेजारती असे.अशा प्रकारचा दिनक्रम या माऊलीने आयुष्यभर तसाच ठेवला. कालांतराने रामवरचीं त्यांचि निष्ठा आनी भक्ति खूप वाढत गेली जिजीमाईंची साधना एवढी बळकट झाली की महाराजांबरोबरची त्यांची योग्यता झाली.येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जिजीमाय प्रसाद घेऊन जाण्याचा आग्रह करीत.कुणी काही प्रापंचिक अडचण घेऊन आला म्हणजे त्याला मायबाई सांगत की" सद्गुरु रामानंद महाराज व रामराय आहेत.त्यांनी दिलेले नाम तेवढे आपण निष्ठेने घ्यावे.म्हणजे आपली संकटे रामनामाने दुर होतील" जिजीमाईंच्या या साधनेचा प्रभाव फार जबरदस्त झाला.नामस्मरण आणि भक्ति काय करु शकते याचा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला.एकदा शेण सारवण करण्याच्या बकेटमध्ये एक साप जाऊन बसला.आणि ती बकेट तशीच जिजीमाईंनी घर सारवायला घेतली.शेणाने माखल्यामुळे साप दिसला नाही.आणि त्या सापानेच पूर्ण घर मायबाईने सारवुन घेतले.घर सारवताना अखंड नाम घेणे सुरूच होते.थोड्या वेळाने महाराजांनी ते बघितले व मायबाईंना विचारले की आज घर कोणत्या पोते-याने सारवले? तो पहातात तो साप होता.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे नामस्मरणाच्या धुंदीमध्ये जिजीमाऊलीला समजले पण नाही की बकेटमध्ये साप आहे आणि तो सापही कदाचित् त्या नामात त्या भक्तित एवढा गूंग झाला की या माऊलीचा आपल्याला स्पर्श होऊन आपला उद्धार व्हावा या उद्देशाने तो शांत पडून होता.धन्य ती माऊली.धन्य तो जीव ! नामस्मरणाची आणि भक्तिचि ताकद अशी आहे.
३१ जुलै 2020
भक्तिलक्षण — संतुष्ट:
श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील माहिती प.पू.प्रल्हाद महाराजांंनी गृहदान केल्यानंतर जिजीमाय वते संतुष्ट होते परीवारा सहीत ते काहीकाळ राममंदिरात राहु लागले ज्या रामाची स्थापना श्री रामानंद महाराजांंच्या हस्ते झाली होती.साखरखेर्डा येथे देसाई देशपांडे नावाचे घराणे आहे,या घरांचे बालनाथ हे मुख्य दैवत.तथा रामानंद महाराजांचे अनुग्रहित. या देशपांडेच्या आग्रहावरुन महाराज बालनाथ मंदिरात वास्तव्यास आले.आपले घरदार गेलयाचे त्याना थोड़े पण दुःख झाले नाहीं .याच बालनाथ मंदिरात सद्गुरु रामानंद महाराजांची मुर्ती,पादुका तथा महाराजांचा प्राण असलेले श्रीरामपंचायतन विराजमान आहे.या स्थापनेच्या सोहळ्याला खुद्द प्रकट ब्रह्मचैतन्य असलेले श्री तात्यासाहेब केतकर जातीने हजर होते. या संस्थानची विश्वस्त व्यवस्था महाराजांंनीच स्वतः तयार करुन संस्थानचा कारभार भक्तांमार्फत सुरु केला परंतु स्वतः कडे कुठलेच पद घेतले नाही.येथील रामपंचायतनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पंचायतन सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांंनी रामानंद महाराजांंना प्रसाद रुपात दिले व रामानंद महाराजांंनी श्री प्रल्हाद महाराजांंना जालना राममंदिरात प्रसाद म्हणून दिले. व त्यासोबतच काही नियमही दिले दररोज पंचायतनाला अभिषेक करुन तिर्थ घेतल्याशिवाय पाणी, अन्न ग्रहण करायचं नाही, एकादशीला पवमानाचा अभिषेक करावा.हे नियम आयुष्यभर प्रल्हाद महाराजांंनी पाळले. जिजीमाय देखील दररोज पंचायतनाचे तिर्थ घेत असत.आजही संस्थानमध्ये हे नियम तंतोतंत पाळले जातात. साखरखेर्डा संस्थानमध्ये आजही अखंड अन्नदान व रामनाम या महाराजांंनी सांगितलेल्या गोष्टी अगदी नियमानुसार पाळल्या जातात.कुणीही भक्त कोणत्याही वेळेला येवो तो प्रसाद घेतल्याशिवाय तेथुन जाऊच शकत नाही. महाराजांंच्या महानिर्याणानंतर जिजीमाईंनी संपूर्ण संस्थानची धुरा सांभाळली.महाराजांंच्या स्वभाव व कार्याला अनुरुप अशी
सहधर्मचारीणी जिजीमाईंच्या
रुपाने महाराजांंना मिळाली होती. महाराजांचा जिजीमाईंना आदरयुक्त धाक होता परंतु
त्याप्रमाणेच महाराजांवर जिजीमाईंची निष्ठा देखील तेवढीच होती.महाराज जर आजारी
पडले तर मायबाईं उपास तापास करीत,
रामरायाला साकडे घालीत. महाराजांचा प्रत्येक शब्द जिजीमाईंना बीजमंत्रच
वाटे.त्यांनी केलेल्या सुचना या माऊलीने आयुष्यभर पाळल्या. परगावी जाताना महाराज
मायबाईंना सोबत नेत पण जर एकटेच जायचं असेल तर ते मायबाईंना सांगत की आज तु येथेच
मंदिरात मौनव्रत पाळून जप कर.
धन्य ती साध्वी पतिव्रता ! धन्य तिचे जीवन !!
१ ऑगस्ट 2020
भक्तिलक्षण—-अनपेक्ष
दिसे शांत मुर्ती उदरात किर्ती ! नसे वासना कामनाही कशी ती!
असे शांत भोळी नसे लोभ केला ! नमस्कार माझा जिजीमाऊलीला!
श्री प्रल्हाद महाराज व जिजीमाय यांचा विवाह म्हणजे निर्गुण निरंकार तत्वाचा मायेशी विवाह होता.लग्न मुहुर्त होता मार्गशिर्ष वद्य त्रयोदशी शके १८३२. लग्नाची सर्व तयारी झाली.व्दादशीला साखरखेर्डा हुन मेहकर साठी सगळे व-हाड निघाले.परंतु त्याचवेळी गोंदवल्याहुन पांडूरंगबुवांना म्हणजे रामानंद महाराजांना सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांचे पत्र आले त्यात अशी आज्ञा होती की "बुवा जर जेवत असाल तर हात धुवायला गोंदवल्याला येणे म्हणजे लवकरच पोहोचावे" हे पत्र रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना दाखविले आणि माझे या लग्नाला येणे होणार नाही असे सांगितले कारण गुरुआज्ञा प्रथम.रामानंद महाराज त्वरीत गोंदवल्याला पोहोचले तेथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद महाराजाँचे लग्न आनंदसागर महाराजांच्या मूलिशि ठरवले होते.या लग्नाचे विशेष म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्रयोदशीलाच हे लग्न ठरवले होते म्हणजे रामानंद महाराज व प्रल्हाद महाराज यांचा विवाह एकाच दिवशी.गुरु शिष्याचा विवाह एकाच दिवशी आणी दोघांच्याही जिवनात फक्त फक्त गुरुआज्ञा म्हणून विवाह करणे.किती योगायोग आहे हा, फारच सुंदर.एक लग्न गोंदवल्याला साक्षात रामासमोर व एक लग्न मेहकरला बालाजीसमोर.
९ वर्षांची कृष्णाबाई साखरखेर्डा येथील
काळे घराण्यात खेळू बागडू लागली,असे ६ वर्ष निघून गेल्यानंतर व योग्य वय झाल्यावर या दोघांच्याही घरच्या
मंडळीनी गर्भाधानाचा मुहुर्त ठरविला.पती-पत्नीच्या एकांताची वेळ मोठ्या कसोशीने
आली.दोघेही विरक्त. तेव्हा श्री प्रल्हाद महाराज कृष्णाबाईंना अर्थात जिजीमाईंना
म्हणाले " हा संसार शाश्वत नाही.या जगात शाश्वत फक्त रामरायाचे नाम.आपल्याला
या मनुष्य लोकामध्ये जिवनाचे सार्थक करुन घ्यायचे असेल रामाच्या नामासारखे दुसरे
साधन नाही. सद्गुरुंच्या व रामरायाच्या कार्यासाठीच आपला जन्म झाला आहे.तेव्हा
आपल्या दोघांनाही हा नरदेह सार्थ करायचा असेल तर शाश्वत असे रामनाम घे.ही माळ घेऊ
व आणि सतत रामरायाच्या चिंतनात आपले नविन आयुष्य सुरु करु" महाराजांचे हे
बोलणे ऐकून ती मायबाई देखील पतीआज्ञा प्रमाण मानुन याला लगेचच तयार झाली.केवढा हा
त्याग ! केवढी ही विरक्ती! हे सर्वसामान्य स्त्री करणे शक्यच नाही. श्री प्रल्हाद
महाराज म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि जिजीमाय म्हणजे शारदाबाई. असा या दोघांचा संसार
सुरु झाला.
२ ऑगस्ट २०२०
३ ऑगस्ट २०२०
४ ऑगस्ट २०२०
५ ऑगस्ट २०२०
६ ऑगस्ट २०२०
७ ऑगस्ट २०२०
८ ऑगस्ट २०२०
९ ऑगस्ट २०२०
१० ऑगस्ट २०२०
No comments:
Post a Comment