अध्याय ८ : ओव्या १७८-२१९

१० मार्च  २०१९ निरुपण 
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोगः (गीता श्लोक २१-२३ / ज्ञानेश्वरी ओव्या  १७८-२१९)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २०॥

तेथ समविषम न दिसे कांहीं । म्हणौनि भूतें हे भाष नाहीं । जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ॥ १७० ॥
तेविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । परि जेथें जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥ १७१ ॥
तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारावेळीं तेंचि व्यक्त । हें एकास्तव एक सूचित । एर्‍हवीं दोनी नाहीं ॥ १७२ ॥
जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अलंकार होती ॥ १७३ ॥
हीं दोहीं जैशीं होणीं । एकीं साक्षिभूत सुवर्णीं । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायीं ॥ १७४ ॥
तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत । अनादिसिद्ध ॥ १७५ ॥
जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥ १७६ ॥
पाहें पां तरंग तरी होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूताभावीं न नाशत । अविनाश जें ॥ १७७ ॥
नातरी आटतिये अळंकारीं । नाटतें कनक असे जयापरी । तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ॥ १७८ ॥

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् । यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया । यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२॥
जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे । जें मनाबुद्धी न सांपडे । म्हणौनियां ॥ १७९ ॥
आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे । आकार लोपें न विसंचे । नित्यता गा ॥ १८० ॥
म्हणौनि अक्षर जें म्हणिजे । तेवींचि म्हणतां बोधुहि उपजे । जयापरौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ॥ १८१ ॥
परि आघवा इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारु करवी ना करी । म्हणौनियां ॥ १८२ ॥
एर्‍हवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा । दाहीं इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाती ॥ १८३ ॥
उकलूनि विषयांचा पेटा । होत मनाचा चोहटा । तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे ॥ १८४ ॥
परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारु न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥ १८५ ॥
तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणें देणें । इंद्रियांचें करणें । स्फुरण वायूचें ॥ १८६ ॥
हे देहक्रिया आघवी । न करवितां होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ॥ १८७ ॥
अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरीं । म्हणौनि पुरुषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ॥ १८८ ॥
आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्‍नीव्रतें । येणेंहि कारणें जयातें । पुरुषु म्हणों ये ॥ १८९ ॥
पैं वेदाचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण । हें गगनाचें पांघरूण । होय देखा ॥ १९० ॥
ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परात्पर । जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥ १९१ ॥
जे तनू वाचा चित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें । तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥ १९२ ॥
हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साच जयाचा मनोधर्मु । तया आस्तिकाचा आश्रमु । पांडवा गा ॥ १९३ ॥
जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणिव । जें सुखाची राणिव । निराशांसी ॥ १९४ ॥
जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंता अनाथांचें मायपोट । भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥ १९५ ॥
हें एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया । पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होईजे ॥ १९६ ॥
हिंवाचिया झुळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका । कां समोर जालिया अर्का । तमचि प्रकाशु होय ॥ १९७ ॥
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा । होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाची ॥ १९८ ॥
तरी अग्नीमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नि जहालें । पाठीं न निवडेचि कांहीं केलें । काष्ठपण ॥ १९९ ॥
नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां । परि ऊंस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥ २०० ॥
लोहाचें कनक जाहलें । हें एकें परिसेंचि केलें । आतां आणिक कैचें तें गेलें । लोहत्व आणी ॥ २०१ ॥
म्हणौनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें । तेवीं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२ ॥
तें माझें परम । साचोकारें निजधाम । हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥ २०३ ॥

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्ति चैव योगिनः । प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३॥
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें । हें जाणतां आहे सोपारें । तरी देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥ २०४ ॥
अथवा अवचटें ऐसें घडे । जे अवसरें देह सांडे । तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥ २०५ ॥
म्हणौनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेंवी ब्रह्मचि होती । एर्‍हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥ २०६ ॥
तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती । या दोन्ही अवसराआधीन आहाती । तोचि अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥ २०७ ॥
तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा । निघती अंतीं ॥ २०८ ॥
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळीं । बुद्धीतें भ्रमु न गिळी ।स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥ २०९ ॥
हा चेतना वर्गु आघवा । मरणीं दिसे टवटवा । परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ॥ २१० ॥
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेर्‍हीं निर्वाहो । हें तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥ २११ ॥
पाहां पां वारेनें कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके । तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ? ॥ २१२ ॥
तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरी श्लेष्माआंते । तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें तें ॥ २१३ ॥
ते वेळीं प्राणासि प्राणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणौनि अग्नीविण देहीं । चेतना न थारे ॥ २१४ ॥
अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला । वायां आयुष्यवेळु आपला । आंधारें गिंवसी ॥ २१५ ॥
आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें । मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ॥ २१६ ॥
तंव तया श्लेष्माचे चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ॥ २१७ ॥
म्हणौनि आधीं अभ्यासु जो केला । तो मरण न येतांचि निमोनि गेला । जैसें ठेवणें न दिसतां मालवला । दीपु हातींचा ॥ २१८ ॥
आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ । तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥ २१९ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099