अध्याय ९ : ओव्या ४७५-५३५

२३ जून २०१९ निरुपण 
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक ३३-३४ / ज्ञानेश्वरी ओव्या  ४७५-५३५)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा । अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३॥
मग वर्णांमाजीं छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार । मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥
जे पृथ्वीतळींचें देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जें ॥ ४७६ ॥
जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी । जयांचेनि दिठीचिया उत्संगीं । मंगळ वाढे ॥ ४७७॥
जयांचिये आस्थेचेनि वोलें । सत्कर्म पाल्हाळीं गेलें । संकल्पें सत्य जियालें । जियांचेनि ॥ ४७८ ॥
जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें । म्हणौनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं । मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥ ४८० ॥
आझुनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा । जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥ ४८१ ॥
जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा । जयांचे प्रसादीं फुकटा । जोडती सिद्धी ॥ ४८२ ॥
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझ्या ठायीं अतिनिपुण । आतां मातें पावती हे कवण । समर्थावें ? ॥ ४८३ ॥
पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळें । तिहीं निर्जिवींही देवांचीं निडळें । बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥
मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें । अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायी साच ? ॥ ४८५ ॥
जेथ निववील ऐशिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥ ४८६ ॥
तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा । तो चंदनु केवीं अवलीळा । सर्वांगीं न बैसे ? ॥ ४८७ ॥
कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें । तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ? ॥ ४८८ ॥
म्हणौनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गति मति मीचि शरण्य । तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितीही मीचि ॥ ४८९ ॥
यालागीं शतजर्जर नावें । रिगोनि केवीं निश्चिंत होआवें । कैसेनि उघडिया असावें । शस्त्रवर्षीं ॥ ४९० ॥
आंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केवीं वोडण । रोगें दाटला आणि उदासपण । वोखदेंसी ? ॥ ४९१ ॥
जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केवीं पांडवा । तेवीं लोकां येऊनि सोपद्रवां । केवीं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥
अगा मातें न भजावयालागीं । कवण बळ पां आपुलिया आंगीं । काई घरीं कीं भोगी । निश्चिंती केलीं ? ॥ ४९३ ॥
नातरी विद्या कीं वयसा । ययां प्राणियांसि हा ऐसा । मज न भजतां भरंवसा । सुखाचा कोण ? ॥ ४९४ ॥
तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें । आणि एथ देह तंव असे पडिलें । काळाचिये तोंडीं ॥ ४९५ ॥
बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकींचिये शेवटिलें । येणें जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥
आंता सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी किजेल पंडुसुता । काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ? ॥ ४९७ ॥
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेईजे पिळुनी । तया नाम अमृत ठेवुनी । जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥
तेवीं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥
कां शीस खांडूनि आपुलें । पायींच्या खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥ ५०० ॥
म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं । कैंची सुखनिद्रा अंथरुणीं । इंगळांच्या ॥ ५०१ ॥
जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं । दुःख लेऊनि सुखाची आंगीं । सळित जगातें ॥ ५०२ ॥
जेथ मंगळाचिया अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोहरी । मृत्यु उदराचिया परिवरी । गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥
जें नाहीं तयातें चिंतवी । तंव तेंचि नेइजे गंधर्वीं । गेलियाची कवणें गांवीं । शुद्धी न लगे ॥ ५०४ ॥
अगा गिंवसितां आघविया वाटी । परतलें पाऊलचि नाहीं किरीटी । सैंघ निमालियांचिया गोठी । तियें पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥
जेथिंचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी । कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां ॥ ५०६ ॥
ऐसी लोकींची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक । तयांचिये निश्चिंतीचें कौतुक । दिसत असे ॥ ५०७ ॥
पैं दृष्टादृष्टाचिये जोडी- । लागीं भांडवल न सुटे कवडी । जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥ ५०८ ॥
जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवाईं पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥
जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडील म्हणुनी ॥ ५१० ॥
जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजे नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥
जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचेंचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ ५१२ ॥
अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥ ५१३ ॥
दर्दूर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेंटाळी जिभा । तैसें प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥
अहा कटकटा हें वोखटें । इये मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥
तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ ५१६ ॥
मन्मना भव मद्‍भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि युक्‍त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‍भ्गवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
तूं मन हें मीचि करीं । माझिया भजनीं प्रेम धरीं । सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥ ५१७ ॥
माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८ ॥
ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी । हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असें ॥ ५१९ ॥
अगा अवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असें ठेविलें । तें पावोनि सुख संचलें । होऊनि ठासी ॥ ५२० ॥
ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पद्रुमें । बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥ ५२१ ॥
अहो ऐकिजत असें कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥
तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला । कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ ५२३ ॥
तर्‍ही दातारु हा आमुचा । म्हणौनि हें बोलतां मैळेल वाचा । काय कीजे ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥
परि बाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें । कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥
येतुलें हें वाड सायासें । जंव बोलत असे दृढमानसें । तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्त्विकें केलें ॥ ५२६ ॥
चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ । आपाद कंचुकित । रोमांच आले ॥ ५२७ ॥
अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळें । आंतुलिया सुखोर्मींचेनि बळें । बाहेरी कांपे ॥ ५२८ ॥
पैं आघवाचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी । लेइला मोतियांची कडियाळीं । आवडे तैसा ॥ ५२९ ॥
ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हों पाहे जीवदशे । तेथ निरोपिलें व्यासें । तें नेदीच हों ॥ ५३० ॥
आणिक श्रीकृष्णाचें बोलणें । घोकरी आलें श्रवणें । कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥ ५३१ ॥
तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जीं । तेवींचि अवधारा म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ ५३२ ॥
आतां श्रीकृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा बिवडु । म्हणौनि श्रोतयां होईल सुरवाडु । प्रमेय पिकाचा ॥ ५३३ ॥
अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावें । बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ ५३४ ॥
म्हणौनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ५३५ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां नवमोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099