३ जानेवारी २०२१ निरुपण
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी । भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥ २ ॥
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥ ३ ॥
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें । लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥ ४ ॥
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥ ५ ॥
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ । तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥ ६ ॥
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं । सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥ ७ ॥
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण । करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥ ८ ॥
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥ ९ ॥
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥ १० ॥
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥ ११ ॥
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ १२ ॥
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ॥ १३ ॥
श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं । तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥ १४ ॥
ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥ १५ ॥
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे । तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥ १६ ॥
येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां ॥ १७ ॥
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं । मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥ १८ ॥
जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें । म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ॥ १९ ॥
पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी । मजलागीं गोसावी । तैसें केलें ॥ २० ॥
म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड ।कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥ २१ ॥
होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्नें परते । उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ॥ २२ ॥
आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥ २३ ॥
तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु । तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥ २४ ॥
पाहा पां श्रीनारायणें । तया पांडवांचें उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ? ॥ २५ ॥
तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें । आणिलें वोजें । ज्ञानाचिया ॥ २६ ॥
परी हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां । कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ? ॥ २७ ॥
आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें । वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ॥ २८ ॥
No comments:
Post a Comment