अध्याय ९ : ओव्या ९८-१९६

२८ एप्रिल २०१९ निरुपण 
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक ७-१३/ ज्ञानेश्वरी ओव्या ९८-१९६)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७॥
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविधा सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥ ९८ ॥
हा प्रकृतीविखो आघवा । तुवां मागां परिसिलासी पांडवा । म्हणौनि असो काई सांगावा । पुढतपुढती ॥ ९९ ॥
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाच्या अंतीं । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासि येती ॥ १०० ॥
ग्रीष्माच्या अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होतीं ॥ १०१ ॥
कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचे गगनीं ॥ १०२ ॥
नातरी आकाशाचे खोंपे । वायु निवांतुचि लोपे । कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥ १०३ ॥
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे । तैसें प्राकृत प्रकृतीं मिळे । कल्पक्षयीं ॥ १०४ ॥
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती । तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ती आइक ॥ १०५ ॥
प्रकृतिं स्वामवष्टाभ्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्‍नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८॥
तरी हेचि प्रकृती किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं । तेथ तंतूसमवाय पटी । जेंवि विणावणी दिसे ॥ १०६ ॥
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहाना चौकडिया पटत्व भरे । तैसीं पंचात्मकें आकारें । प्रकृतीचि होय ॥ १०७ ॥
जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे । तैशी प्रकृती आंगा रिगे । सृष्टीपणाचिया ॥ १०८ ॥
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये । तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ॥ १०९ ॥
अगा नगर हें रायें केंलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय सिणलें । रायाचे हात ? ॥ ११० ॥
आणि मी प्रकृती अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥ १११ ॥
तरी स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता । कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ? ॥ ११२ ॥
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥
जैसी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारें आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु हा माझा । येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥
पाहे पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्रीं अपार भरतें दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ? ॥ ११५ ॥
जड परि जवळिका । लोह चळे तरी चळो कां । तरि कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ? ॥ ११६ ॥
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगिकारीं । आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतीआधीन पांडवा । जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमी ॥ ११८ ॥
नातरी बाळादिकां वयसा । गोसावी देहसंगु जैसा । अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवीं ॥ ११९ ॥
कां स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृती हे नरेंद्रा । या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥ १२० ॥
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥
म्हणौनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं । इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥ १२२ ॥
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली । तेविं मातें पावोनि ठेलीं । दूरी कर्में ॥ १२३ ॥
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय । उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९॥
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरूं सैंधवाचा घाटु । तेविं सकळ कर्मा मीचि शेवटु । तीं काय बांधती मातें ? ॥ १२४ ॥
धूम्ररजांची पिंजरीं । वाजतिया वायूतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारें शिरे ? ॥ १२५ ॥
हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचें । तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥ १२६ ॥
एर्‍हवीं इये प्रकृतिविकारीं । एकु मीचि असे अवधारीं । परि उदासीनाचिया परी । करीं ना करवीं ॥ १२७ ॥
जैसा दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणें ॥ १२८ ॥
तो जैसा कां साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥ १२९ ॥
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगों बहुतां उपपत्ती । येथ एकहेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥ १३० ॥
मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १०॥
जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता । तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥ १३१ ॥
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणौनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥ १३२ ॥
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझ्या ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥
अथवा भूतें ना माझ्या ठायीं । आणि भूतांमाजीं मी नाहीं । या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥ १३४ ॥
हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥
हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं तुषीं कणु ॥ १३६ ॥
एर्‍हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ? ॥ १३७ ॥
जें जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें । परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगैं ? ॥ १३८ ॥
तैसें बोलवरी वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचें डोळे । मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होइजे ॥ १३९ ॥

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११॥
किंबहुना भवा बिहाया । आणि साचें चाड आथि जरी मियां । तरि तूं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥ १४० ॥
एर्‍हवीं दिठी वेधली कवळें । तैं चांदणियातें म्हणे पिंवळें । तेंविं माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखती दोष ॥ १४१ ॥
नातरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख । तेविं अमानुषा मानुष । मानिती मातें ॥ १४२ ॥
म्हणौनि पुढतपुढती धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥ १४३ ॥
पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥ १४४ ॥
एर्‍हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ । परि तें जाणणेचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥ १४५ ॥
जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा । माजीं रत्‍नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥ १४६ ॥
सांगैं गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणौनि बाबुळ । सेविली करी ? ॥ १४७ ॥
हार निळयाचाचि दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्‍नें म्हणौनि गारा । वेंचि जेंवीं ॥ १४८ ॥
अथवा निधान हें प्रगटलें । म्हणौनि खदिरांगार खोळे भरिले । कां साउली नेणतां घातलें । कुहा सिंहें ॥ १४९ ॥
तेवीं मी म्हणौनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची । तिहीं चंद्रासाठीं जेवीं जळींची । प्रतिभा धरिली ॥ १५० ॥
तैसा कृतनिश्चयो वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला । मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥ १५१ ॥
तैसें स्थूलाकारी नाशिवंतें । भरंवसा बांधोनि चित्तें । पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसें ? ॥ १५२ ॥
आगा काई पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा । कां कोंडा कांडतां सुभटा । कणु आतुडे ? ॥ १५३ ॥
तैसें विकारलें हें स्थूळ । जाणितले या मी जाणवतसें केवळ । काई फेण पितां जळ । सेविलें होय ? ॥ १५४ ॥
म्हणौनि मोहिलेंनि मनोधर्में । हेंचि मी मानूनि संभ्रमें । मग येथिंची जियें जन्मकर्में । तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म । विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥ १५६ ॥
मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥ १५७ ॥
मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥ १५८ ॥
मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसें सेजेमाजीं वन । निदेला देखे ॥ १५९ ॥
तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥ १६० ॥
मज अव्यक्तासी व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥ १६१ ॥
मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळ कारणा कारण । देखती ते ॥ १६२ ॥
मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठिती । निरंतरातें आव्हानिती । विसर्जिती गा ॥ १६३ ॥
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु । मज एकरूपा संबंधु । जाणती ऐसे ॥ १६४ ॥
मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तयासि काजें । मी अभोक्ता कीं भुंजें । ऐसें म्हणती ॥ १६५ ॥
मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती । मज सर्वांतरातें कल्पिती । अरि मित्र गा ॥ १६६ ॥
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेक सुखांचा कामु । आघवाचि मी असे समु । कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥
मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं । आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती ॥ १६८ ॥
किंबहुना ऐसें समस्त । जे हे मानुषधर्म प्राकृत । तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती । मग तोचि विघडलिया टाकिती । नाहीं म्हणौनि ॥ १७० ॥
मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें । म्हणौनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥ १७१ ॥
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः । राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ १२॥
यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसें वार्षियेवीण मेघ । कां मृगजळाचे तरंग । दुरूनीचि पाहावें ॥ १७२ ॥
अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार । कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां ॥ १७३ ॥
साबरी वाढिन्नल्या सरळा । वरी फळ ना आंतु पोकळा । कां स्तन जाले गळां । शेळिये जैसें ॥ १७४ ॥
तैसें मूर्खाचें तया जियालें । आणि धिग् कर्म तयांचें निपजलें । जैसें साबरी फळ आलें । घेपे ना दीजे ॥ १७५ ॥
मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारळ तोडिले । कां आंधळ्या हातीं पडिलें । मोतीं जैसें ॥ १७६ ॥
किंबहुना तयांचीं शास्त्रें । जैशीं कुमारीं हातीं दिधलीं शस्त्रें । कां अशौच्या मंत्रें । बीजें कथिलीं ॥ १७७ ॥
तैसें ज्ञानजात तयां । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया । तें आघवेंचि गेलें वायां । जें चित्तहीन ॥ १७८ ॥
पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्‍बुद्धीतें ग्रासी । विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी जे ॥ १७९ ॥
तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणौनि चिंतेचेनि कपोलें गेले । वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजीं ॥ १८० ॥
जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे । तेवींचि असंतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥ १८१ ॥
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी । जे प्रमादपर्वतींची दरी । सदाचि मातली ॥ १८२ ॥
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा । जे अगस्ती गवसणी मूढां । स्थूल बुद्धि ॥ १८३ ॥
ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडीं । जे जाले गा भूतोंडीं । ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाच्या ॥ १८४ ॥
एवं तमाचिये पडिले गर्तें । न पविजतीचि विचाराचेनि हातें । हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥
म्हणौनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खांचीं बोलणीं । वायां वाढवितां वाणी । शिणेल हन ॥ १८६ ॥
ऐसें बोलिलें देवें । तेथ जी जी म्हणितलें पांडवें । आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥ १८७ ॥
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३॥
तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥ १८८ ॥
जयाचिया आस्थेचिया सद्‍भावा । आंतु धर्म करी राणिवा । जयाचें मन ओलावा । विवेकासी ॥ १८९ ॥
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसी आले । पालव नवे ॥ १९० ॥
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आनंदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥ १९२ ॥
जे आघवांचि करणीं । लेईले शांतीचीं लेणीं । जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ॥ १९३ ॥
ऐसें जे महानुभाव । दैविये प्रकृतीचें दैव । जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझें ॥ १९४ ॥
मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाहीं ॥ १९५ ॥
ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥ १९६ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099