अध्याय १५ : ओव्या ३६१ -४०६

७ फेब्रुवारी  २०२१  निरुपण 

अध्याय १५ । पुरुषोत्तमयोगः । ज्ञानेश्वरी  श्लोक  ८- १३  / ओव्या  ३६१ -४०६ )


शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः । गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥ ८॥

परी कर्ता भोक्ता ऐसें । हें जीवाचे तैंचि दिसे । जैं शरीरीं कां पैसे । एकाधिये ॥ ३६१ ॥
जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया । जैं राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥ ३६२ ॥
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । कां विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तैं निवाडु । जैं देह पाविजे ॥ ३६३ ॥
अथवा शरीरातें सांडी । तर्‍ही इंद्रियांची तांडी । हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय ॥ ३६४ ॥
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति । कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥ ३६५ ॥
नाना मावळतेनि तपनें । नेइजेती लोकांचीं दर्शनें । हें असो द्रुती पवनें । नेईजे जैसी ॥ ३६६ ॥
तेवीं मनःषष्ठां ययां । इंद्रियांतें धनंजया ।देहराजु ने देहा- । पासूनि गेला ॥ ३६७ ॥

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च । अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ ९॥

मग येथ अथवा स्वर्गीं । जेथ जें देह आपंगी । तेथ तैसेंचि पुढती पांगी । मनादिक ॥ ३६८ ॥
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवां । तैसाचि फांके ॥ ३६९ ॥
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी । येतुलें हें किरीटी । गमेचि गा ॥ ३७० ॥
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेंचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हें साचचि मानिती ॥ ३७१ ॥
एर्‍हवीं येणें आणि जाणें । कां करणें हा भोगणें । हें प्रकृतीचें तेणें । मानियेलें ॥ ३७२ ॥

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं । विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १०॥

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं । यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११॥

परी देहाचे मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभें । आला म्हणती ॥ ३७३ ॥
तैसेंचि तयां संगती । इंद्रियें आपुलाल्या अर्थीं वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणें जया ॥ ३७४ ॥
पाठीं भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे । तेथें गेला गेला ऐसें । बोभाती गा ॥ ३७५ ॥
पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा ? ॥ ३७६ ॥
कां आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपें तेथ देखिजे । तरी तेधवांचि जालें मानिजे । काय आधीं नाहीं ? ॥ ३७७ ॥
कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपें नाहीं ऐसा । निश्चयो करावा ? ॥ ३७८ ॥
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळीं पिटे मेघाचा ।कां चंद्रीं वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥ ३७९ ॥
तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहें । आंधळे ते ॥ ३८० ॥
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं । ऐसें देखणें तें पाहीं । आन आहाती ॥ ३८१ ॥
ज्ञानें कां जयाचे डोळे । देखोनि न राहती देहींचे खोळे ।सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसें ॥ ३८२ ॥
तैसे विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ॥ ३८३ ॥
जैसें तारांगणीं भरलें । गगन समुद्रीं बिंबलें । परी तें तुटोनि नाहीं पडिलें । ऐसें निवडे ॥ ३८४ ॥
गगन गगनींचि आहे । हें आभासे तें वाये । तैसा आत्मा देखती देहें । गंवसिलाही ॥ ३८५ ॥
खळाळाच्या लगबगीं । फेडूनि खळाळाच्या भागीं । देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्रीं जेवीं ॥ ३८६ ॥
कां नाडरचि भरे शोषें । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होतां जातां तैसें । देखती मातें ॥ ३८७ ॥
घटु मठु घडले । तेचि पाठीं मोडले । परी आकाश तें संचलें । असतचि असे ॥ ३८८ ॥
तैसें अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पितें । हें देहचि होतें जातें । जाणती फुडें ॥ ३८९ ॥
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसें आत्मज्ञानें चोखटें । जाणती ते ॥ ३९० ॥
आणि ज्ञानही आपैतें होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल । सकळ शास्त्रांचें येईल । सर्वस्व हातां ॥ ३९१ ॥
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसीं । तरी सर्वात्मका मजसीं । नव्हेचि भेटी ॥ ३९२ ॥
पैं तोंड भरो कां विचारा । आणि अंतःकरणीं विषयांसि थारा । तरी नातुडें धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥ ३९३ ॥
हां गा वोसणतयाच्या ग्रंथीं । काई तुटती संसारगुंती ? । कीं परिवसिलिया पोथी । वाचिली होय ? ॥ ३९४ ॥
नाना बांधोनियां डोळे । घ्राणीं लाविजती मुक्ताफळें । तरी तयांचें काय कळे । मोल मान ? ॥ ३९५ ॥
तैसा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे मातें ॥ ३९६ ॥
जो एक मी कां समस्तीं । व्यापकु असें भूतजातीं । ऐक तिये व्याप्ती । रूप करूं ॥ ३९७ ॥

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् । यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १२॥

तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंतीं आहे ॥ ३९८ ॥
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्रीं पंडुसुता । ज्यो{त्}स्ना माझी ॥ ३९९ ॥
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जें निरवधी । ते हुताशीं तेजोवृद्धी । माझीचि गा ॥ ४०० ॥

गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा । पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १३॥

मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं ।हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥ ४०१ ॥
आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें । तियें मीचि धरी धरे । रिगोनियां ॥ ४०२ ॥
गगनीं मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता । भरला जालों चालता । सरोवरु ॥ ४०३ ॥
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरित असें मी ॥ ४०४ ॥
ऐसेनि सस्यादिकां सकळां । करी धान्यजाती सुकाळा । दें अन्नद्वारां जिव्हाळा । भूतजातां ॥ ४०५ ॥
आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैचें दीपन । जेणें जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥ ४०६ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099