१५ ऑगस्ट २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे । साण्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥ १३॥
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें । जें शास्त्रें उभऊनी बाहे । बोलती तयांते ॥ २७८ ॥
वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताच्या भुवनीं । निरूपणाच्या निशाणध्वनीं । गर्जती जियें ॥ २७९ ॥
जें सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ॥ २८० ॥
ह्या बोलाचि डांगुरटी । तियें प्रसिद्धीचि आली किरीटी । म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटीं । वसों हें काज ॥ २८१ ॥
आणि मुखांतरीं आइकिजे । तैसें कायसें हें ओझें । मी चिद्रत्न तुझें । असतां हातीं ॥ २८२ ॥
दर्पणु पुढां मांडलेया । कां लोकांचियां डोळयां । मानु द्यावा पहावया । आपुलें निकें ॥ २८३ ॥
भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये । तो मी तुझें जाहालों आहें । खेळणें आजी ॥ २८४ ॥
ऐसें हें प्रीतीचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे । तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु ॥ २८५ ॥
चांदिणियाचा पडिभरु । होतां सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा ॥ २८६ ॥
तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतलें अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥ २८७ ॥
तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धांवा । जीवें केला ॥ २८८ ॥
अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञा पसरेंसीं बुडे । आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ॥ २८९ ॥
देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा । तंव श्वासूनि येरें माथा । तुकियेला ॥ २९० ॥
म्हणे जाणसी दातारा । मी तुजशीं व्यक्तिशेजारा । उबगला आजी एकाहारा । येवों पाहें ॥ २९१ ॥
तयाही हा ऐसा । लोभें देतसां जरी लालसा । तरी कां जी घालीतसां । आड आड जीवा ? ॥ २९२ ॥
तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाऊकें । वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे ?॥ २९३ ॥
आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों । जे रुसतां बांधे थांवो । तें प्रेम गा हें ॥ २९४ ॥
एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें । म्हणौनि असो हें बोलणें । इयेविषयींचें ॥ २९५ ॥
मग कैशी कैशी ते आतां । बोलत होतों पंडुसुता । सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसीं ॥ २९६ ॥
तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें । प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी ॥ २९७ ॥
जें सकळ कर्माचें बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली कां ॥ २९८ ॥
आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं । हें पुढारलासि ते देईं । लाहाणें माझें ॥ २९९ ॥
यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसे । इयेविषयीं धरणें बैसे। ऐसें कें जोडे ? ॥ ३०० ॥
तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥ ३०१ ॥
तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? । इये गोंठीस कीं राखत आहों । मीतूंपण जी ? ॥ ३०२ ॥
एथ श्रीकृष्ण म्हणती हो कां । आतां अवधानाचा पसरु निका । करूनियां आइका । पुढारलों तें ॥ ३०३ ॥
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होतसे बहिरबाहिरा । करणीं पांचें ॥ ३०४ ॥
आणि पांच कारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे । ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥ ३०५ ॥
येर आत्मतत्त्व उदासीन । तें ना हेतु ना उपादान । ना ते अंगें करी संवाहन । कर्मसिद्धीचें ॥ ३०६ ॥
तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं । राती दिवो आकाशीं । जियापरी ॥ ३०७ ॥
तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणें ॥ ३०८ ॥
नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळें । उदक तें साक्षी ॥ ३०९ ॥
कां कवणे एकें पिंडे । वेंचितां अवतरे भांडें । मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र ॥ ३१० ॥
आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें । आधारावांचूनि वेंचे । विचारीं पां । ॥ ३११ ॥
हेंहि असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया । कोण काम सवितया । आंगा आलें ? ॥ ३१२ ॥
तैसें पांचहेतुमिळणीं । पांचेंचि इहीं कारणीं । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥ ३१३ ॥
आतां तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं । तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं ॥ ३१४ ॥
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥ १४॥
तैसीं यथा लक्षणें । आइकें कर्म\-कारणें । तरी देह हें मी म्हणें । पहिलें एथ ॥ ३१५ ॥
ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें । जे स्वभोग्येंसीं वसे । भोक्ता येथ ॥ ३१६ ॥
इंद्रियांच्या दाहें हातीं । जाचोनियां दिवोराती । सुखदुःखें प्रकृती । जोडीजती जियें ॥ ३१७ ॥
तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा । म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥ ३१८ ॥
हें चोविसांही तत्वांचें । कुटुंबघर वस्तीचें । तुटे बंधमोक्षाचें । गुंथाडे एथ ॥ ३१९ ॥
किंबहुना अवस्थात्रया । हें अधिष्ठान धनंजया । म्हणौनि देहा यया । हेंचि नाम ॥ ३२० ॥
आणि कर्ता हें दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१ ॥
आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२ ॥
कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे । मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं ॥ ३२३ ॥
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनि आविष्करें । देहपणें जें ॥ ३२४ ॥
जया विसराच्या देशीं । प्रसिद्धि गा जीवु ऐसी । जेणें भाष केली देहेंसी । आघवाविषयीं ॥ ३२५ ॥
प्रकृति करी कर्में । तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें । येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ॥ ३२६ ॥
मग पातेयांच्या केशीं । एकीच उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥ ३२७ ॥
कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं ॥ ३२८ ॥
कां एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवां रसां । नवविधु ऐसा । आवडों लागे ॥ ३२९ ॥
तेवीं बुद्धीचें एक जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें । बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ॥ ३३० ॥
तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण । तिसरें गा जाण । नृपनंदना ॥ ३३१ ॥
आणि पूर्वपश्चिमवाहणीं । निघालिया वोघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेवीं ॥ ३३२ ॥
तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानीं । नाना होय ॥ ३३३ ॥
जैं वाचे करी येणें । तैं तेंचि होय बोलणें । हाता आली तरी घेणें । देणें होय ॥ ३३४ ॥
अगा चरणाच्या ठायीं । तरी गति तेचि पाहीं । अधोद्वारीं दोहीं । क्षरणें तेचि ॥ ३३५ ॥
कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिजे ॥ ३३६ ॥
मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥ ३३७ ॥
अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे । व्यापकपणें होये । व्यानु तेचि ॥ ३३८ ॥
आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसें । आणि न सांडितां असे । सर्वसंधीं ॥ ३३९ ॥
ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं । समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥ ३४० ॥
आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥ ३४१ ॥
एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥ ३४२ ॥
तें भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ति गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ॥ ३४३ ॥
आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥ ३४४ ॥
कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ॥ ३४५ ॥
नाना कमळीं पांडवा । विकासु जैसा बरवा । विकासींही यावा । परागाचा ॥ ३४६ ॥
वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वीं परतत्व । स्पर्शु जैसा ॥ ३४७ ॥
तैसी सर्ववृत्तिवैभवीं । बुद्धिचि एकली बरवी । बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥ ३४८ ॥
इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा । जैं अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो ॥ ३४९ ॥
म्हणौनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें । सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद ॥ ३५० ॥
तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें । अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ॥ ३५१ ॥
एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णीं । निरूपिली ॥ ३५२ ॥
आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे । जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै ॥ ३५३ ॥
No comments:
Post a Comment