अध्याय १७ : ओव्या २२४-३२७

४ जुलै  २०२१ निरुपण 

अध्याय १७ ।  श्रद्धात्रयविभागयोगः । ( श्लोक १६-२२ / ज्ञानेश्वरी ओव्या २२५-३२७ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.  

मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः । भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६॥

तरी सरोवर तरंगीं । सांडिलें आकाश मेघीं । का चंदनाचें उरगीं । उद्यान जैसें ॥ २२५ ॥
नाना कळावैषम्यें चंद्रु । कां सांडिला आधीं नरेंद्रु । नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळें ॥ २२६ ॥
तैसीं नाना विकल्पजाळें । सांडुनि गेलिया सकळें । मन राहे का केवळें । स्वरूपें जें ॥ २२७ ॥
तपनेंवीण प्रकाशु । जाड्येंवीण रसीं रसु । पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ॥ २२८ ॥
तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके । हिंवली जैसी आंगिकें । हिवों नेदी निजांग ॥ २२९ ॥
तैसें न चलतें कळंकेंवीण । शशिबिंब जैसें परीपूर्ण । तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें ॥ २३० ॥
बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥ २३१ ॥
म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावें जें वक्त्र । तें वाचेचेंही सूत्र । हातीं न धरी ॥ २३२ ॥
तें स्वलाभ लाभलेपणें । मन मनपणाही धरूं नेणें । शिवतलें जैसें लवणें । आपुलें निज ॥ २३३ ॥
तेथ कें उठिती ते भाव । जिहीं इंद्रियमार्गीं धांव । घेऊनि ठाकावे गांव । विषयांचे ते ॥ २३४ ॥
म्हणौनि तिये मानसीं । भावशुद्धिचि असे अपैसी । रोमशुचि जैसी । तळहातासी ॥ २३५ ॥
काय बहु बोलों अर्जुना । जैं हे दशा ये मना । तैं मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥ २३६ ॥
परी ते असो हें जाण । मानस तपाचें लक्षण । देवो म्हणे संपूर्ण । सांगितलें ॥ २३७ ॥
एवं देहवाचाचित्तें । जें पातलें त्रिविधत्वातें । तें सामान्य तप तूतें । परीसविलें गा ॥ २३८ ॥
आतां गुणत्रयसंगें । हेंचि विशेषीं त्रिविधीं रिगे । तेंही आइक चांगें । प्रज्ञाबळें ॥ २३९ ॥

श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः । अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७॥

तरी हेंचि तप त्रिविधा । जें दाविलें तुज प्रबुद्धा । तेंचि करीं पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ॥ २४० ॥
जैं पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी । तैं तयातेंचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ॥ २४१ ॥

सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत् । क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं ॥ १८॥

नातरी तपस्थापनेलागीं । दुजेपण मांडूनि जगीं । महत्त्वाच्या शृंगीं । बैसावया ॥ २४२ ॥
त्रिभुवनींचिया सन्माना । न वचावें ठाया आना । धुरेचिया आसना । भोजनालागीं ॥ २४३ ॥
विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा । विश्वें आपलिया यात्रा । कराविया यावें ॥ २४४ ॥
लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा । भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ॥ २४५ ॥
अंग बोल माखूनि तपें । विकावया आपणपें । अंगहीन पडपे । जियापरी ॥ २४६ ॥
हें असो धनमानीं आस । वाढौनी तप कीजे सायास । तैं तेंचि तप राजस । बोलिजे गा ॥ २४७ ॥
परी पहुरणी जें दुहिलें । तैं तें गुरूं न दुभेचि व्यालें । का उभें शेत चारिलें । पिकावया नुरे ॥ २४८ ॥
तैसें फोकारितां तप । कीजे जें साक्षेप । तें फळीं तंव सोप । निःशेष जाय ॥ २४९ ॥
ऐसें निर्फळ देखोनि करितां । माझारीं सांडी पंडुसुता । म्हणौनि नाहीं स्थिरता । तपा तया ॥ २५० ॥
एर्‍हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ? ॥ २५१ ॥
तैसें राजस तप जें होये । तें फळीं कीर वांझ जाये । परी आचरणींही नोहे । निर्वाहतें गा ॥ २५२ ॥
आतां तेंचि तप पुढती । तामसाचिये रीती । पैं परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे ॥ २५३ ॥

मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः । परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९॥

केवळ मूर्खपणाचा वारा । जीवीं घेऊनि धनुर्धरा । नाम ठेविजे शरीरा । वैरियाचें ॥ २५४ ॥
पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागीं । का इंधन कीजे हें आगी । आंतु लावी ॥ २५५ ॥
माथां जाळिजती गुगुळु । पाठीं घालिजती गळु । आंग जाळिती इंगळु । जळतभीतां ॥ २५६ ॥
दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायांचि उपवास । कां घेपती धूमाचें घांस । अधोमुखें ॥ २५७ ॥
हिमोदकें आकंठें । खडकें सेविजती तटें । जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥ २५८ ॥
ऐसी नानापरी हे काया । घाय सूतां पैं धनंजया । तप कीजे नाशावया । पुढिलातें ॥ २५९ ॥
आंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । कां आड जालियातें रगडा । करी जैसा ॥ २६० ॥
तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया । जिणावया शिराणिया । कीजती गा ॥ २६१ ॥
किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी । तप निफजे तें किरीटी । तामस होय ॥ २६२ ॥
एवं सत्त्वादिकांच्या आंगीं । पाडिलें तप तिहीं भागीं । जालें तेंही तुज चांगी । दाविलें व्यक्ती ॥ २६३ ॥
आतां बोलतां प्रसंगा । आलें म्हणौनि पैं गा । करूं रूप दानलिंगा । त्रिविधा तया ॥ २६४ ॥
येथ गुणाचेनि बोलें । दानही त्रिविध असे जालें । तेंचि आइक पहिलें । सात्त्विक ऐसें ॥ २६५ ॥

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे  | देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ २०॥

तरी स्वधर्मा आंतौतें । जें जें मिळे आपणयातें । तें तें दीजे बहुतें । सन्मानयोगें ॥ २६६ ॥
जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । तैसाचि दानाचा हा लागु । देखतसें ॥ २६७ ॥
अनर्घ्य रत्‍न हातां चढे । तैं भांगाराची वोढी पडे । दोनी जालीं तरी न जोडे । लेतें आंग ॥ २६८ ॥
परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकीं मिळती । जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयीं ॥ २६९ ॥
तैसें निफजावया दान । जैं सत्त्वासि ये संवाहन । तैं देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ॥ २७० ॥
तरी आधीं तंव प्रयत्‍नेंसीं । होआवें कुरुक्षेत्र का काशी । नातरी तुके जो इहींसीं । तो देशुही हो ॥ २७१ ॥
तेथ रविचंद्रराहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु । का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला ॥ २७२ ॥
तैशा काळीं तिये देशीं । होआवी पात्र संपत्ती ऐसी । मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेंचि कां ॥ २७३ ॥
आचाराचें मूळपीळ । वेदांची उतारपेठ । तैसें द्विजरत्‍न चोखट । पावोनियां ॥ २७४ ॥
मग तयाच्या ठाईं वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता । परी प्रियापुढें कांता । रिगे जैसी ॥ २७५ ॥
का जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपें विडा राया । दिधला जैसा ॥ २७६ ॥
तैसेनि निष्कामें जीवें । भूम्यादिक अर्पावें । किंबहुना हांवे । नेदावें उठों ॥ २७७ ॥
आणि दान जया द्यावें । तयातें ऐसेया पाहावें । जया घेतलें नुमचवे । कायसेंनही ॥ २७८ ॥
साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा । का पाहिला आरसा । येरीकडे ॥ २७९ ॥
नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुकें । उधळौनि कवतिकें । न येईजे हाता ॥ २८० ॥
नाना वसो घातला चारू । माथां तुरंबिला बुरू । न करी प्रत्युपकारू । जियापरी ॥ २८१ ॥
तैसें दिधलें दातयाचें । जो कोणेही आंगें नुमचे । अर्पिलया साम्य तयाचें । कीजे पैं गा ॥ २८२ ॥
ऐसिया जें सामग्रिया । दान निफजे वीरराया । तें सात्त्विक दानवर्या । सर्वांही जाण ॥ २८३ ॥
आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु । दानभागुही निर्मळु । न्यायगतु ॥ २८४ ॥

यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः । दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ २१॥

परी मनीं धरूनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें । का पेंव करूनि आइतें । पेरूं जाइजे ॥ २८५ ॥
नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतुं जाइजे सोयिरा । का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥ २८६ ॥
पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचें काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ॥ २८७ ॥
तैसें जया जें दान देणें । तो तेणेंचि गा जीवनें । पुढती भुंजावा भावें येणें । दीजे जें का ॥ २८८ ॥
अथवा कोणी वाटे जातां । घेतलें उमचों न शकता । मिळे जैं पंडुसुता । द्विजोत्तमु ॥ २८९ ॥
तरी कवड्या एकासाठीं । अशेषां गोत्रांचींच किरीटी । सर्व प्रायश्चित्तें सुयें मुठीं । तयाचिये ॥ २९० ॥
तेवींचि पारलौकिकें । फळें वांछिजती अनेकें । आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ॥ २९१ ॥
तेंही ब्राह्मणु नेवो सरे । कीं हाणिचेनि शिणें झांसुरें । सर्वस्व जैसें चोरें । नागऊनि नेलें ॥ २९२ ॥
बहु काय सांगों सुमती । जें दीजे या मनोवृत्ती । तें दान गा त्रिजगतीं । राजस पैं ॥ २९३ ॥

अदेशकाले यद्दनमपात्रेभ्यश्च दीयते । असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ २२॥

मग म्लेंच्छांचे वसौटें । दांगाणे हन कैकटे । का शिबिरें चोहटे । नगरींचे ते ॥ २९४ ॥
तेही ठाईं मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी । तेव्हां उदार होणें धनीं । चोरियेच्या ॥ २९५ ॥
पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी । जिये मूर्तिमंते भुररीं । भुले तया ॥ २९६ ॥
रूपानृत्याची पुरवणी । ते पुढां डोळेभारणी । गीत भाटीव तो श्रवणीं । कर्णजपु ॥ २९७ ॥
तयाहीवरी अळुमाळु । जैं घे फुलागंधाचा गुगुळु । तंव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ॥ २९८ ॥
तेथ विभांडूनियां जग । आणिले पदार्थ अनेग । तेणें घालूं लागे मातंग । गवादी जैसी ॥ २९९ ॥
एवं ऐसेनि जें देणें । तें तामस दान मी म्हणें । आणि घडे दैवगुणें । आणिकही ऐक ॥ ३०० ॥
विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं ॥ ३०१ ॥
तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोंही आला । तोही दर्पा चढला । भांबावें जरी ॥ ३०२ ॥
तरी श्रद्धा न धरी जिवीं । तया माथाही न खालवी । स्वयें न करी ना करवी । अर्घ्यादिक ॥ ३०३ ॥
आलिया न घली बैसों । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो । हा अप्रसंगु कीर असो । तामसीं नरीं ॥ ३०४ ॥
पैं बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तूं करणें याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥ ३०५ ॥
आणि जया जें दे किरीटी । तयातें उमाणी तयासाठीं । मग कुबोलें कां लोटी । अवज्ञेच्या ॥ ३०६ ॥
हें बहु असो यापरी । मोल वेंचणें जें अवधारीं । तया नांव चराचरीं । तामस दान ॥ ३०७ ॥
ऐशीं आपुलाला चिन्हीं । अळंकृतें तिन्हीं । दानें दाविलीं अभिधानीं । रजतमाचिया ॥ ३०८ ॥
तेथ मी जाणत असें । विपायें तूं गा ऐसें । कल्पिसील मानसें । विचक्षणा ॥ ३०९ ॥
जें भवबंधमोचक । येकलें कर्म सात्त्विक । तरी कां वेखासी सदोख । येर बोलावीं ? ॥ ३१० ॥
परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी । का धूं न साहतां जैसी । वाती न लगे ॥ ३११ ॥
तैसें शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचें कवाड । तें भेदणे यातें कीड । म्हणावें कां ? ॥ ३१२ ॥
आम्ही श्रद्धादि दानांत । जें समस्तही क्रियाजात । सांगितलें कां व्याप्त । तिहीं गुणीं ॥ ३१३ ॥
तेथ भरंवसेनि तिन्ही । न सांगोंचि ऐसें मानीं । परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलों येरें ॥ ३१४ ॥
जें दोहींमाजीं तिजें असे । तें दोन्ही सांडितांचि दिसे । अहोरात्रत्यागें जैसें । संध्यारूप ॥ ३१५ ॥
तैसें रजतमविनाशें । तिजें जें उत्तम दिसे । तें सत्त्व हें आपैसें । फावासि ये ॥ ३१६ ॥
एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिलें तम रज । तें सांडूनि सत्त्वें काज । साधीं आपुलें ॥ ३१७ ॥
सत्त्वेंचि येणें चोखाळें । करीं यज्ञादिकें सकळें । पावसी तैं करतळें । आपुलें निज ॥ ३१८ ॥
सूर्यें दाविलें सांतें । काय एक न दिसे तेथें । तेवीं सत्त्वें केलें फळातें । काय नेदी ? ॥ ३१९ ॥
हे कीर आवडतांविखीं । शक्ति सत्त्वीं आथी निकी । परी मोक्षेंसी एकीं । मिसळणें जें ॥ ३२० ॥
तें एक आनचि आहे । तयाचा सावावो जैं लाहे । तैं मोक्षाचाही होये । गांवीं सरतें ॥ ३२१ ॥
पैं भांगार जर्‍हीं पंधरें । तर्‍ही राजावळींचीं अक्षरें । लाहें तैंचि सरे । जियापरी ॥ ३२२ ॥
स्वच्छें शीतळें सुगंधें । जळें होती सुखप्रदें । परी पवित्रत्व संबंधें । तीर्थाचेनि ॥ ३२३ ॥
नयी हो कां भलतैसी थोरी । परी गंगा जैं अंगीकारी । तैंचि तिये सागरीं । प्रवेशु गा ॥ ३२४ ॥
तैसें सात्त्विका कर्मां किरीटी । येतां मोक्षाचिये भेटी । न पडे आडकाठी । तें वेगळें आहे ॥ ३२५ ॥
हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं । म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें ॥ ३२६ ॥
तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती । जेणें सात्त्विक तें मुक्ती- । रत्‍न देखे ॥ ३२७ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099