अध्याय १३ : ओव्या ५९३-८६४

 ९ ऑगस्ट २०२० निरुपण 

अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ९-११   / ज्ञानेश्वरी ओव्या ५९३-८६४ )


असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु । नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९॥


तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी । उखिता जैसा बिढारीं । बैसला आहे ॥ ५९४ ॥
कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाहीं ॥ ५९५ ॥
साउली सरिसीच असे । परी असे हें नेणिजे जैसें । स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं ॥ ५९६ ॥
आणि प्रजा जे जाली । तियें वस्ती कीर आलीं । कां गोरुवें बैसलीं । रुखातळीं ॥ ५९७ ॥
जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पंडुसुता । जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥ ५९८ ॥
किंबहुना पुंसा । पांजरियामाजीं जैसा । वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥ ५९९ ॥
एऱ्हवीं दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री । तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा ॥ ६०० ॥
महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसें । जयाच्या ठायीं ॥ ६०१ ॥
कां तिन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं ॥ ६०२ ॥
जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे । तेथ ज्ञान रोकडें । वोळख तूं ॥ ६०३ ॥


मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १०॥


आणि मीवांचूनि कांहीं । आणिक गोमटें नाहीं । ऐसा निश्चयोचि तिहीं । जयाचा केला ॥ ६०४ ॥
शरीर वाचा मानस । पियालीं कृतनिश्चयाचा कोश । एक मीवांचूनि वास । न पाहती आन ॥ ६०५ ॥
किंबहुना निकट निज । जयाचें जाहलें मज । तेणें आपणयां आम्हां सेज । एकी केली ॥ ६०६ ॥
रिगतां वल्लभापुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें । तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो ॥ ६०७ ॥
मिळोनि मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसें । मी होऊनि मज तैसें । सर्वस्वें भजती ॥ ६०८ ॥
सूर्याच्या होण्यां होईजे । कां सूर्यासवेंचि जाइजे । हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं ॥ ६०९ ॥
पैं पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुकें । ते लहरी म्हणती लौकिकें । एऱ्हवीं तें पाणी ॥ ६१० ॥
जो अनन्यु यापरी । मी जाहलाहि मातें वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा ॥ ६११ ॥
आणि तीर्थें धौतें तटें । तपोवनें चोखटें । आवडती कपाटें । वसवूं जया ॥ ६१२ ॥
शैलकक्षांचीं कुहरें । जळाशय परिसरें । अधिष्ठी जो आदरें । नगरा न ये ॥ ६१३ ॥
बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदाची खंती । जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो ॥ ६१४ ॥
आणिकहि पुढती । चिन्हें गा सुमती । ज्ञानाचिये निरुती- । लागीं सांगों ॥ ६१५ ॥


अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् । एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥ ११॥

तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे । तें जया दिसें । ज्ञानास्तव ॥ ६१६ ॥
तें एकवांचूनि आनें । जियें भवस्वर्गादि ज्ञानें । तें अज्ञान ऐसा मनें । निश्चयो केला ॥ ६१७ ॥
स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी । दे अध्यात्मज्ञानीं बुडी । सद्भावाची ॥ ६१८ ॥
भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे । निघिजे जेवीं नीटें । राजपंथें ॥ ६१९ ॥
तैसें ज्ञानजातां करी । आघवेंचि एकीकडे सारी । मग मन बुद्धि मोहरी । अध्यात्मज्ञानीं ॥ ६२० ॥
म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती । ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय ॥ ६२१ ॥
एवं निश्चयो जयाचा । द्वारीं आध्यात्मज्ञानाचा । ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥ ६२२ ॥
तयाच्या ठायीं ज्ञान । या बोला नाहीं आन । जे ज्ञानीं बैसलें मन । तेव्हांचि तें तो मी ॥ ६२३ ॥
तरी बैसलेपणें जें होये । बैसतांचि बोलें न होये । तरी ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥ ६२४ ॥
आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जें एक फळ । तें ज्ञेयही वरी सरळ । दिठी जया ॥ ६२५ ॥
एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें । तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥ ६२६ ॥
आंधळेनि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ? । तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायांचि जाय ॥ ६२७ ॥
जरि ज्ञानाचेनि प्रकाशें । परतत्त्वीं दिठी न पैसे । ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनी ॥ ६२८ ॥
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं । तेतुली वस्तुचि आघवी । तें देखे ऐशी व्हावी । बुद्धि चोख ॥ ६२९ ॥
यालागीं ज्ञानें निर्दोखें । दाविलें ज्ञेय देखे । तैसेनि उन्मेखें । आथिला जो ॥ ६३० ॥
जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी । तो ज्ञान हे शब्दीं । करणें न लगे ॥ ६३१ ॥
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मती ज्ञेयीं पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें ॥ ६३२ ॥
तोचि ज्ञान हें बोलतां । विस्मो कवण पंडुसुता ? । काय सवितयातें सविता । म्हणावें असें ? ॥ ६३३ ॥
तंव श्रोतें म्हणती असो । न सांगें तयाचा अतिसो । ग्रंथोक्ती तेथ आडसो । घालितोसी कां ? ॥ ६३४ ॥
तुझा हाचि आम्हां थोरु । वक्तृत्वाचा पाहुणेरु । जे ज्ञानविषो फारु । निरोपिला ॥ ६३५ ॥
रसु होआवा अतिमात्रु । हा घेतासि कविमंत्रु । तरी अवंतूनि शत्रु । करितोसि कां गा ? ॥ ६३६ ॥
ठायीं बैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे । तियेचा येरु वोडव मिळे । कोणा अर्था ? ॥ ६३७ ॥
आघवाचि विषयीं भादी । परी सांजवणीं टेंकों नेदी । ते खुरतोडी नुसधी । पोषी कवण ? ॥ ६३८ ॥
तैसी ज्ञानीं मती न फांके । येर जल्पती नेणों केतुकें । परि तें असो निकें । केलें तुवां ॥ ६३९ ॥
जया ज्ञानलेशोद्देशें । कीजती योगादि सायासें । तें धणीचें आथी तुझिया ऐसें । निरूपण ॥ ६४० ॥
अमृताची सातवांकुडी । लागो कां अनुघडी । सुखाच्या दिवसकोडी । गणिजतु कां ॥ ६४१ ॥
पूर्णचंद्रेंसीं राती । युग एक असोनि पहाती । तरी काय पाहात आहाती । चकोर ते ? ॥ ६४२ ॥
तैसें ज्ञानाचें बोलणें । आणि येणें रसाळपणें । आतां पुरे कोण म्हणे ? । आकर्णितां ॥ ६४३ ॥
आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये । तैं सरों नेणें रससोये । ऐसें आथी ॥ ६४४ ॥
तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानीं आम्हांसि लागु । आणि तुजही अनुरागु । आथि तेथ ॥ ६४५ ॥
म्हणौनि यया वाखाणा- । पासीं से आली चौगुणा । ना म्हणों नयेसि देखणा ? । होसी ज्ञानी ॥ ६४६ ॥
तरी आतां ययावरी । प्रज्ञेच्या माजघरीं । पदें साच करीं । निरूपणीं ॥ ६४७ ॥
या संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । माझेंही जी ऐसें । मनोगत ॥ ६४८ ॥
यावरी आतां तुम्हीं । आज्ञापिला स्वामी । तरी वायां वागू मी । वाढों नेदी ॥ ६४९ ॥
एवं इयें अवधारा । ज्ञानलक्षणें अठरा । श्रीकृष्णें धनुर्धरा । निरूपिली ॥ ६५० ॥
मग म्हणें या नांवें । ज्ञान एथ जाणावें । हे स्वमत आणि आघवें । ज्ञानियेही म्हणती ॥ ६५१ ॥
करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसें ज्ञान आम्हीं डोळां । दाविलें तुज ॥ ६५२ ॥
आतां धनंजया महामती । अज्ञान ऐसी वदंती । तेंही सांगों व्यक्ती । लक्षणेंसीं ॥ ६५३ ॥
एऱ्हवीं ज्ञान फुडें जालिया । अज्ञान जाणवे धनंजया । जें ज्ञान नव्हे तें अपैसया । अज्ञानचि ॥ ६५४ ॥
पाहें पां दिवसु आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे । वांचूनि कांहीं तिसरें । नाहीं जेवीं ॥ ६५५ ॥
तैसें ज्ञान जेथ नाहीं । तेंचि अज्ञान पाहीं । तरी सांगों कांहीं कांहीं । चिन्हें तियें ॥ ६५६ ॥
तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे । सत्कारें होये । तोषु जया ॥ ६५७ ॥
गर्वें पर्वताचीं शिखरें । तैसा महत्त्वावरूनि नुतरे । तयाचिया ठायीं पुरे । अज्ञान आहे ॥ ६५८ ॥
आणि स्वधर्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळीं । उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ॥ ६५९ ॥
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा । करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया ॥ ६६० ॥
आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची । तो जाण पां अज्ञानाची । खाणी एथ ॥ ६६१ ॥
आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें । तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख ॥ ६६२ ॥
कौतुकें जें जें जल्पे । तें साबळाहूनि तीख रुपे । विषाहूनि संकल्पें । मारकु जो ॥ ६६३ ॥
तयातें बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचें निधान । हिंसेसि आयतन । जयाचें जिणें ॥ ६६४ ॥
आणि फुंकें भाता फुगे । रेचिलिया सवेंचि उफगे । तैसा संयोगवियोगें । चढे वोहटे ॥ ६६५ ॥
पडली वारयाचिया वळसा । धुळी चढे आकाशा । हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे ॥ ६६६ ॥
निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके । थेंबें विरे वारोनि शोखे । चिखलु जैसा ॥ ६६७ ॥
तैसा मानापमानीं होये । जो कोण्हीचि उर्मी न साहे । तयाच्या ठायीं आहे । अज्ञान पुरें ॥ ६६८ ॥
आणि जयाचिया मनीं गांठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी । आंगें मिळे जीवें पाठीं । भलतया दे ॥ ६६९ ॥
व्याधाचे चारा घालणें । तैसें प्रांजळ जोगावणें । चांगाचीं अंतःकरणें । विरु करी ॥ ६७० ॥
गार शेवाळें गुंडाळली । कां निंबोळी जैसी पिकली । तैसी जयाची भली । बाह्य क्रिया ॥ ६७१ ॥
अज्ञान तयाचिया ठायीं । ठेविलें असे पाहीं । याबोला आन नाहीं । सत्य मानीं ॥ ६७२ ॥
आणि गुरुकुळीं लाजे । जो गुरुभक्ती उभजे । विद्या घेऊनि माजे । गुरूसींचि जो ॥ ६७३ ॥
तयाचें नाम घेणें । तें वाचे शूद्रान्न होणें । परी घडलें लक्षणें । बोलतां इयें ॥ ६७४ ॥
आता गुरुभक्तांचें नांव घेवों । तेणें वाचेसि प्रायश्चित देवों । गुरुसेवका नांव पावों । सूर्यु जैसा ॥ ६७५ ॥
येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा । जो गुरुतल्पगाचा । नामीं आला ॥ ६७६ ॥
हा ठायवरी । तया नामाचें भय हरी । मग म्हणे अवधारीं । आणिकें चिन्हें ॥ ६७७ ॥
तरि आंगें कर्में ढिला । जो मनें विकल्पें भरला । अडवींचा अवगळला । कुहा जैसा ॥ ६७८ ॥
तया तोंडीं कांटिवडे । आंतु नुसधीं हाडें । अशुचि तेणें पाडें । सबाह्य जो ॥ ६७९ ॥
जैसें पोटालागीं सुणें । उघडें झांकलें न म्हणे । तैसें आपलें परावें नेणे । द्रव्यालागीं ॥ ६८० ॥
इया ग्रामसिंहाचिया ठायीं । जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं । तैसा स्त्रीविषयीं कांहीं । विचारीना ॥ ६८१ ॥
कर्माचा वेळु चुके । कां नित्य नैमित्तिक ठाके । तें जया न दुखे । जीवामाजीं ॥ ६८२ ॥
पापी जो निसुगु । पुण्याविषयीं अतिनिलागु । जयाचिया मनीं वेगु । विकल्पाचा ॥ ६८३ ॥
तो जाण निखिळा । अज्ञानाचा पुतळा । जो बांधोनि असे डोळां । वित्ताशेतें ॥ ६८४ ॥
आणि स्वार्थें अळुमाळें । जो धैर्यापासोनि चळे । जैसें तृणबीज ढळे । मुंगियेचेनी ॥ ६८५ ॥
पावो सूदलिया सवें । जैसें थिल्लर कालवे । तैसा भयाचेनि नांवें । गजबजे जो ॥ ६८६ ॥
मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा । पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ॥ ६८७ ॥
वायूचेनि सावायें । धू दिगंतरा जाये । दुःखवार्ता होये । तसें जया ॥ ६८८ ॥
वाउधणाचिया परी । जो आश्रो कहींचि न धरी । क्षेत्रीं तीर्थीं पुरीं । थारों नेणे ॥ ६८९ ॥
कां मातलिया सरडा । पुढती बुडुख पुढती शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥ ६९० ॥
जैसा रोविल्याविणें । रांजणु थारों नेणे । तैसा पडे तैं राहणें । एऱ्हवीं हिंडे ॥ ६९१ ॥
तयाच्या ठायीं उदंड । अज्ञान असे वितंड । जो चांचल्यें भावंड । मर्कटाचें ॥ ६९२ ॥
आणि पैं गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा । नाहीं वोढावारा । संयमाचा ॥ ६९३ ॥
लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरवंडा । तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो ॥ ६९४ ॥
व्रतातें आड मोडी । स्वधर्मु पायें वोलांडी । नियमाची आस तोडी । जयाची क्रिया ॥ ६९५ ॥
नाहीं पापाचा कंटाळा । नेणें पुण्याचा जिव्हाळा । लाजेचा पेंडवळा । खाणोनि घाली ॥ ६९६ ॥
कुळेंसीं जो पाठमोरा । वेदाज्ञेसीं दुऱ्हा । कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे ॥ ६९७ ॥
वसू जैसा मोकाटु । वारा जैसा अफाटु । फुटला जैसा पाटु । निर्जनीं ॥ ६९८ ॥
आंधळें हातिरूं मातलें । कां डोंगरीं जैसें पेटलें । तैसें विषयीं सुटलें । चित्त जयाचें ॥ ६९९ ॥
पैं उबधडां काय न पडे । मोकाटु कोणां नातुडे । ग्रामद्वारींचे आडें । नोलांडी कोण ॥ ७०० ॥
जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । वाणसियेचें उभलें । कोण न रिगे ? ॥ ७०१ ॥
तैसें जयाचें अंतःकरण । तयाच्या ठायीं संपूर्ण । अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥ ७०२ ॥
आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी । स्वर्गींही खावया जोडी । येथूनिची ॥ ७०३ ॥
जो अखंड भोगा जचे । जया व्यसन काम्यक्रियेचें । मुख देखोनि विरक्ताचें । सचैल करी ॥ ७०४ ॥
विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे । कुहीला हातीं खाये । कोढी जैसा ॥ ७०५ ॥
खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें । तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥ ७०६ ॥
तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं । व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥
फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव । परी न म्हणे ते माव । रोहिणीची ॥ ७०८ ॥
तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विषयीं त्रासितां बहुतीं परीं । तऱ्ही त्रासु नेघे धरी । अधिक प्रेम ॥ ७०९ ॥
पहिलिये बाळदशे । आई बा हेंचि पिसें । तें सरे मग स्त्रीमांसें । भुलोनि ठाके ॥ ७१० ॥
मग स्त्री भोगितां थावों । वृद्धाप्य लागे येवों । तेव्हां तोचि प्रेमभावो । बाळकांसि आणी ॥ ७११ ॥
आंधळें व्यालें जैसें । तैसा बाळें परिवसे । परि जीवें मरे तों न त्रासे । विषयांसि जो ॥ ७१२ ॥
जाण तयाच्या ठायीं । अज्ञानासि पारु नाहीं । आतां आणीक कांहीं । चिन्हें सांगों ॥ ७१३ ॥
तरि देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनियां कर्मा । आरंभु करी ॥ ७१४ ॥
आणि उणें कां पुरें । जें जें कांहीं आचरे । तयाचेनि आविष्करें । कुंथों लागे ॥ ७१५ ॥
डोईये ठेविलेनि भोजें । देवलविसें जेवीं फुंजे । तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥ ७१६ ॥
म्हणे मीचि एकु आथी । माझ्यांचि घरीं संपत्ती । माझी आचरती रीती । कोणा आहे ॥ ७१७ ॥
नाहीं माझेनि पाडें वाडु । मी सर्वज्ञ एकचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ॥ ७१८ ॥
व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाऊं जैसा । निकें न साहे जो तैसा । पुढिलांचें ॥ ७१९ ॥
पैं गुण तेतुला खाय । स्नेह कीं जाळितु जाय । जेथ ठेविजे तेथ होय । मसी{ऐ}सें ॥ ७२० ॥
जीवनें शिंपिला तिडपिडी । विजिला प्राण सांडीं । लागला तरी काडी । उरों नेदी ॥ ७२१ ॥
आळुमाळ प्रकाशु करी । तेतुलेनीच उबारा धरी । तैसिया दीपाचि परी । सुविद्यु जो ॥ ७२२ ॥
औषधाचेनि नांवें अमृतें । जैसा नवज्वरु आंबुथे । कां विषचि होऊनि परतें । सर्पा दूध ॥ ७२३ ॥
तैसा सद्गुणीं मत्सरु । व्युत्पत्ती अहंकारु । तपोज्ञानें अपारु । ताठा चढे ॥ ७२४ ॥
अंत्यु राणिवे बैसविला । आरें धारणु गिळिला । तैसा गर्वें फुगला । देखसी जो ॥ ७२५ ॥
जो लाटणें ऐसा न लवे । पाथरु तेवीं न द्रवे । गुणियासि नागवे । फोडसें जैसें ॥ ७२६ ॥
किंबहुना तयापाशी । अज्ञान आहे वाढीसीं । हें निकरें गा तुजसीं । बोलत असों ॥ ७२७ ॥
आणीकही धनंजया । जो गृहदेह सामग्रिया । न देखे कालचेया । जन्मातें गा ॥ ७२८ ॥
कृतघ्ना उपकारु केला । कां चोरा व्यवहारु दिधला । निसुगु स्तविला । विसरे जैसा ॥ ७२९ ॥
वोढाळितां लाविलें । तें तैसेंच कान पूंस वोलें । कीं पुढती वोढाळुं आलें । सुणें जैसें ॥ ७३० ॥
बेडूक सापाचिया तोंडीं । जातसे सबुडबुडीं । तो मक्षिकांचिया कोडीं । स्मरेना कांहीं ? ॥ ७३१ ॥
तैसीं नवही द्वारें स्रवती । आंगीं देहाची लुती जिती । जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया ॥ ७३२ ॥
मातेच्या उदरकुहरीं । पचूनि विष्ठेच्या दाथरीं । जठरीं नवमासवरी । उकडला जो ॥ ७३३ ॥
तें गर्भींची जे व्यथा । कां जें जालें उपजतां । तें कांहींचि सर्वथा । नाठवी जो ॥ ७३४ ॥
मलमूत्रपंकीं । जे लोळतें बाळ अंकीं । तें देखोनि जो न थुंकीं । त्रासु नेघे ॥ ७३५ ॥
कालचि ना जन्म गेलें । पाहेचि पुढती आलें । ऐसें हें कांहीं वाटलें । नाहीं जया ॥ ७३६ ॥
आणि पैं तयाची परी । जीविताची फरारी । देखोनि जो न करी । मृत्युचिंता ॥ ७३७ ॥
जिणेयाचेनि विश्वासें । मृत्यु एक एथ असे । हें जयाचेनि मानसें । मानिजेना ॥ ७३८ ॥
अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा । न वचेचि कां जैसा । अगाध डोहां ॥ ७३९ ॥
कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दृष्टी न घाली । गळु न पाहतां गिळिली । उंडी मीनें ॥ ७४० ॥
दीपाचिया झगमगा । जाळील हें पतंगा । नेणवेचि पैं गा । जयापरी ॥ ७४१ ॥
गव्हारु निद्रासुखें । घर जळत असे तें न देखे । नेणतां जेंवी विखें । रांधिलें अन्न ॥ ७४२ ॥
तैसा जीविताचेनि मिषें । हा मृत्युचि आला असे । हें नेणेचि राजसें । सुखें जो गा ॥ ७४३ ॥
शरीरींचीं वाढी । अहोरात्रांची जोडी । विषयसुखप्रौढी । साचचि मानी ॥ ७४४ ॥
परी बापुडा ऐसें नेणे । जें वेश्येचें सर्वस्व देणें । तेंचि तें नागवणें । रूप एथ ॥ ७४५ ॥
संवचोराचें साजणें । तेंचि तें प्राण घेणें । लेपा स्नपन करणें । तोचि नाशु ॥ ७४६ ॥
पांडुरोगें आंग सुटलें । तें तयाचि नांवे खुंटलें । तैसें नेणें भुललें । आहारनिद्रा ॥ ७४७ ॥
सन्मुख शूला । धांवतया पायें चपळा । प्रतिपदीं ये जवळा । मृत्यु जेवीं ॥ ७४८ ॥
तेवीं देहा जंव जंव वाढु । जंव जंव दिवसांचा पवाडु । जंव जंव सुरवाडु । भोगांचा या ॥ ७४९ ॥
तंव तंव अधिकाधिकें । मरण आयुष्यातें जिंके । मीठ जेवीं उदकें । घांसिजत असे ॥ ७५० ॥
तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥ ७५१ ॥
किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नीच नवा । न देखे जो मावा। विषयांचिया ॥ ७५२ ॥
तो अज्ञानदेशींचा रावो । या बोला महाबाहो। न पडे गा ठावो । आणिकांचा ॥ ७५३ ॥
पैं जीविताचेनि तोखें । जैसा कां मृत्यु न देखे । तैसाचि तारुण्ये पोखें । जरा न गणी ॥ ७५४ ॥
कडाडीं लोटला गाडा । कां शिखरौनि सुटला धोंडा । तैसा न देखे जो पुढां । वार्धक्य आहे ॥ ७५५ ॥
कां आडवोहळा पाणी आलें । कां जैसे म्हैसयाचें झुंज मातलें । तैसें तारुण्याचे चढलें । भुररें जया ॥ ७५६ ॥
पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों । मस्तक आदरीं शिरों- । भागीं कंप ॥ ७५७ ॥
दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी । तरी जो करी । मायेचा पैसु ॥ ७५८ ॥
पुढील उरीं आदळे । तंव न देखे जेवीं आंधळें । कां डोळ्यावरलें निगळे । आळशी तोषें ॥ ७५९ ॥
तैसें तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पाहेचें । न देखे तोचि साचें । अज्ञानु गा ॥ ७६० ॥
देखे अक्षमें कुब्जें । कीं विटावूं लागे फुंजें । परी न म्हणे पाहे माझें । ऐसेंचि भवे ॥ ७६१ ॥
आणि आंगीं वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची । परी जया तारुण्याची । भुली न फिटे ॥ ७६२ ॥
तो अज्ञानाचें घर । हें साचचि घे उत्तर । तेवींचि परियेसीं थोर । चिन्हें आणिक ॥ ७६३ ॥
तरि वाघाचिये अडवे । एक वेळ आला चरोनि दैवें । तेणें विश्वासें पुढती धांवे । वसू जैसा ॥ ७६४ ॥
कां सर्पघराआंतु । अवचटें ठेवा आणिला स्वस्थु । येतुलियासाठीं निश्चितु । नास्तिकु होय ॥ ७६५ ॥
तैसेनि अवचटें हें । एकदोनी वेळां लाहे । एथ रोग एक आहे । हें मानीना जो ॥ ७६६ ॥
वैरिया नीद आली । आतां द्वंद्वें माझीं सरलीं । हें मानी तो सपिली । मुकला जेवीं ॥ ७६७ ॥
तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोंवरी । तंव जो न करी । व्याधी चिंता ॥ ७६८ ॥
आणि स्त्रीपुत्रादिमेळें । संपत्ति जंव जंव फळे । तेणें रजें डोळे । जाती जयाचे ॥ ७६९ ॥
सवेंचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल । हें दुःख पुढील । देखेना जो ॥ ७७० ॥
तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा । जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ ॥ ७७१ ॥
वयसेचेनि उवायें । संपत्तीचेनि सावायें । सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥ ७७२ ॥
न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी । चिंतू नये तें विचारी । जयाची मती ॥ ७७३ ॥
रिघे जेथ न रिघावें । मागे जें न घ्यावें । स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन ॥ ७७४ ॥
न जावें तेथ जाये । न पाहावें तें जो पाहे । न खावें तें खाये । तेवींचि तोषे ॥ ७७५ ॥
न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥ ७७६ ॥
नायकावें तें आइके । न बोलावें तें बके । परी दोष होतील हें न देखे । प्रवर्ततां ॥ ७७७ ॥
आंगा मनासि रुचावें । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें । जो करणेयाचेनि नांवें । भलतेंचि करी ॥ ७७८ ॥
परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल । हें कांहींचि पुढील । देखेना जो ॥ ७७९ ॥
तयाचेनि आंगलगें । अज्ञान जगीं दाटुगें । जें सज्ञानाही संगें । झोंबों सके ॥ ७८० ॥
परी असो हें आइक । अज्ञान चिन्हें आणिक । जेणें तुज सम्यक् । जाणवे तें ॥ ७८१ ॥
तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं । नवगंधकेसरीं । भ्रमरी जैशी ॥ ७८२ ॥
साकरेचिया राशी । बैसली नुठे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं । जयाचें मन ॥ ७८३ ॥
ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं । जैसा ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं ॥ ७८४ ॥
तैसें घरींहूनि निघणें । नाहीं जीवें मनें प्राणें । जया साप होऊनि असणें । भाटीं तियें ॥ ७८५ ॥
प्रियोत्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी । तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥ ७८६ ॥
मधुरसोद्देशें । मधुकर जचे जैसें । गृहसंगोपन तैसें । करी जो गा ॥ ७८७ ॥ 
म्हातारपणीं जालें । मा आणिक एक विपाईलें । तयाचें कां जेतुलें । मातापितरां ॥ ७८८ ॥
तेतुलेनि पाडें पार्था । घरीं जया प्रेम आस्था । आणि स्त्रीवांचूनि सर्वथा । जाणेना जो ॥ ७८९ ॥
तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें । कोण मी काय करावें । कांहीं नेणे ॥ ७९० ॥
महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहारजात । जयापरी ॥ ७९१ ॥
हानि लाज न देखे । परापवादु नाइके । जयाचीं इंद्रियें एकमुखें । स्त्रिया केलीं ॥ ७९२ ॥
चित्त आराधी स्त्रीयेचें । आणि तियेचेनि छंदें नाचे । माकड गारुडियाचें । जैसें होय ॥ ७९३ ॥
आपणपेंही शिणवी । इष्टमित्र दुखवी । मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ॥ ७९४ ॥
तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ॥ ७९५ ॥
पूजिती दैवतें जोगावी । गुरूतें बोलें झकवी । मायबापां दावी । निदारपण ॥ ७९६ ॥
स्त्रियेच्या तरी विखीं । भोगुसंपत्ती अनेकीं । आणी वस्तु निकी । जे जे देखे ॥ ७९७ ॥
प्रेमाथिलेनि भक्तें । जैसेनि भजिजे कुळदैवतें । तैसा एकाग्रचित्तें । स्त्री जो उपासी ॥ ७९८ ॥
साच आणि चोख । तें स्त्रियेसीचि अशेख । येरांविषयीं जोगावणूक । तेही नाहीं ॥ ७९९ ॥
इयेतें हन कोणी देखैल । इयेसी वेखासें जाईल । तरी युगचि बुडैल । ऐसें जया ॥ ८०० ॥
नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥ ८०१ ॥
किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम ॥ ८०२ ॥
आणिकही जें समस्त । तियेचें संपत्तिजात । तें जीवाहूनि आप्त । मानी जो कां ॥ ८०३ ॥
तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना त्याचेनि बळ । हें असो केवळ । तेंचि रूप ॥ ८०४ ॥
आणि मातलिया सागरीं । मोकललिया तरी । लाटांच्या येरझारीं । आंदोळे जेवीं ॥ ८०५ ॥
तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे । तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे ॥ ८०६ ॥
ऐसेनि जयाचे चित्तीं । वैषम्यसाम्याची वोखती । वाहे तो महामती । अज्ञान गा ॥ ८०७ ॥ 
आणि माझ्या ठायीं भक्ती । फळालागीं जया आर्ती । धनोद्देशें विरक्ती । नटणें जेवीं ॥ ८०८ ॥
नातरी कांताच्या मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी ।राहाटे जारेंसीं । जावयालागीं ॥ ८०९ ॥
तैसा मातें किरीटी । भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विषो सूये ॥ ८१० ॥
आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पावे । तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें ॥ ८११ ॥
कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥ ८१२ ॥
तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥ ८१३ ॥
प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया ॥ ८१४ ॥
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥ ८१५ ॥
नित्य आराधन माझें । काजीं कुळदैवता भजे । पर्वविशेषें कीजे । पूजा आना ॥ ८१६ ॥
माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥ ८१७ ॥
एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशीं ॥ ८१८ ॥
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥ ८१९ ॥
नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारीं वाढी । बहिरवां पात्रीं ॥ ८२० ॥
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥ ८२१ ॥
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी । अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥ ८२२ ॥
ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धांवतु । जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो ॥ ८२३ ॥
आणि एकांतें चोखटें । तपोवनें तीर्थे तटें । देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥ ८२४ ॥
जया जनपदीं सुख । गजबजेचें कवतिक । वानूं आवडे लौकिक । तोहि तोची ॥ ८२५ ॥
आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥ ८२६ ॥
उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥ ८२७ ॥
आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥ ८२८ ॥
कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें । ज्योतिषीं तो म्हणे । तैसेंचि होय ॥ ८२९ ॥
शिल्पीं अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण । विधि आथर्वण । हातीं आथी ॥ ८३० ॥
कोकीं नाहीं ठेलें । भारत करी म्हणितलें । आगम आफाविले । मूर्त होतीं ॥ ८३१ ॥
नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकीं दुजें । चतुर नाहीं ॥ ८३२ ॥
स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा । निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी ॥ ८३३ ॥
पैं व्याकरणीं चोखडा । तर्कीं अतिगाढा । परी एक आत्मज्ञानीं फुडा । जात्यंधु जो ॥ ८३४ ॥
तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं । सिद्धांत निर्माणधात्री । परी जळों तें मूळनक्षत्रीं । न पाहें गा ॥ ८३५ ॥
मोराआंगीं अशेषें । पिसें असतीं डोळसें । परी एकली दृष्टि नसे । तैसें तें गा ॥ ८३६ ॥
जरी परमाणू{ए}वढें । संजीवनीमूळ जोडे । तरी बहु काय गाडे । भरणें येरें ? ॥ ८३७ ॥ 
आयुष्येंवीण लक्षणें । सिसेंवीण अळंकरणें । वोहरेंवीण वाधावणें । तो विटंबु गा ॥ ८३८ ॥
तैसें शास्त्रजात जाण । आघवेंचि अप्रमाण । अध्यात्मज्ञानेंविण । एकलेनी ॥ ८३९ ॥
यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं । जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥ ८४० ॥
तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें । तयाचें व्युत्पन्नत्व गेलें । अज्ञानवेलीं ॥ ८४१ ॥
तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें । तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञान गा ॥ ८४२ ॥
आणि अध्यात्मज्ञान कांहीं । जेणें मानिलेंचि नाहीं । तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें ? ॥ ८४३ ॥
ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता । तया पैलद्वीपींची वार्ता । काय होय ? ॥ ८४४ ॥
कां दारवंठाचि जयाचें । शीर रोंविलें खांचे । तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे ? ॥ ८४५ ॥
तेवीं अध्यात्मज्ञानीं जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई ? ॥ ८४६ ॥
म्हणौनि आतां विशेषें । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे । हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज ॥ ८४७ ॥
जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचें धालें । तैसें मागिलें पदें बोलिलें । तेंचि होय ॥ ८४८ ॥
वांचूनियां वेगळें । रूप करणें हें न मिळे । जेवीं अवंतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये ॥ ८४९ ॥
एवं इये उपरतीं । अज्ञानचिन्हें मागुतीं । अमानित्वादि प्रभृती । वाखाणिलीं ॥ ८५० ॥
जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥ ८५१ ॥
मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें । ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ॥ ८५२ ॥
म्हणौनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी । वांचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ? ॥ ८५३ ॥
तैसें जी न बडबडीं । पदाची कोर न सांडी । परी मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जाहलों ॥ ८५४ ॥
तंव श्रोते म्हणती राहें । कें परिहारा ठावो आहे ? । बिहिसी कां वायें । कविपोषका ? ॥ ८५५ ॥
तूतें श्रीमुरारी । म्हणितलें आम्ही प्रकट करीं । जें अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं ॥ ८५६ ॥
तें देवाचें मनोगत । दावित आहासी तूं मूर्त । हेंही म्हणतां चित्त । दाटैल तुझें ॥ ८५७ ॥
म्हणौनि असो हें न बोलों । परि साविया गा तोषलों । जे ज्ञानतरिये मेळविलों । श्रवण सुखाचिये ॥ ८५८ ॥
आतां इयावरी । जे तो श्रीहरी । बोलिला तें करीं । कथन वेगां ॥ ८५९ ॥
इया संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । जी अवधारा तरी ऐसें । बोलिलें देवें ॥ ८६० ॥
म्हणती तुवां पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा । आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥ ८६१ ॥
इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पैं गा । ज्ञानविखीं चांगा । दृढा होईजे ॥ ८६२ ॥
मग निर्वाळिलेनि ज्ञानें । ज्ञेय भेटेल मनें । तें जाणावया अर्जुनें । आस केली ॥ ८६३ ॥
तंव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणौनि तयाचा भावो । परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगों आतां ॥ ८६४ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099