अध्याय १५ : ओव्या ४२१ - ५२५

 २१  फेब्रुवारी  २०२१  निरुपण 

अध्याय १५ । पुरुषोत्तमयोगः । ज्ञानेश्वरी  श्लोक  १५-१६ / ओव्या ४२१ - ५२५ )


सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । 
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ॥ १५॥

एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ ४२१ ॥
परी संतासवें वसतां । योगज्ञानीं पैसतां । गुरुचरण उपासितां । वैराग्येंसीं ॥ ४२२ ॥
येणेंचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे ।जयांचें अहं विश्रामे । आत्मरूपीं ॥ ४२३ ॥
ते आपेआप देखोनि देखीं । मियां आत्मेनि सदा सुखी ।येथें मीवांचून अवलोकीं । आन हेतु असे ? ॥ ४२४ ॥
अगा सूर्योदयो जालिया । सूर्यें सूर्यचि पहावा धनंजया ।तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु ॥ ४२५ ॥
ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥ ४२६ ॥
ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं । दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती ॥ ४२७ ॥
परी हेंही होणें अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेतें होय ॥ ४२८ ॥
पैं अभ्रें दिवसु हरपला । तोहि दिवसेंचि जाणों आला । तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूतीं ॥ ४२९ ॥
एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां । मीचि मूळ ॥ ४३० ॥
जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु ॥ ४३१ म्हणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया । वेदु जाणों गेला तंव तया । जालिया शाखा ॥ ४३२ ॥

तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥ ४३३ ॥

आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपतीं शब्देंसीं । जैसिया सगंधा आकाशीं । वातलहरी ॥ ४३४ ॥
तैसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसें निवांत । तें मीचि करीं यथावत । प्रकटोनियां ॥ ४३५ ॥
पाठीं श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष । तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥ ४३६ ॥
जैसें निदेलिया जागिजे । तेव्हां स्वप्नींचे कीर नाहीं दुजें । परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि ॥ ४३७ ॥
तैसें आपलें अद्वयपण । मी जाणतसें दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥ ४३८ ॥
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणें नाहीं वीरा । जयापरी ॥ ४३९ ॥
तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये । तर्‍ही नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेंही ॥ ४४० ॥
पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं । तया चोरातें कवण कें गिंवसी ? । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥ ४४१ ॥
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करितां कैवल्यपती । ठी केली निरुपहितीं । आपुल्या रूपीं ॥ ४४२ ॥
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवीं ॥ ४४३ ॥
कां प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुनें आणि वैकुंठें । नांदतसे बोधु ॥ ४४४ ॥
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥ ४४५ ॥
जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥ ४४६ ॥
ते एक वेळ अव्यंगवाणें । कीजो कां मजकारणें । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भलें केलें ॥ ४४७ ॥
पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें । अखंडा बोलों आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसतें ऐसें ॥ ४४८ ॥
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसों ॥ ४४९ ॥
जें अद्वैताहीवरी भोगिजे । तें अनुभवींच तूं विरजे । पुसोनि मज माझें । देतासि सुख ॥ ४५० ॥
जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥ ४५१ ॥
तुवां नेणोनि पुसावें । मग आम्ही परिसऊं बैसावें । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥ ४५२ ॥
ऐसें म्हणौनि आलिंगिलें । कृपादृष्टी अवलोकिलें । मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं ॥ ४५३ ॥
पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें । तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ॥ ४५४ ॥
एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातें । सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक ॥ ४५५ ॥
ऐसा बोलत देवो भुलला मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहें । आवडी हे ॥ ४५६ ॥
जाले इक्षुरसाचें ढाळ । तरी लवण देणें किडाळ । जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें ॥ ४५७ ॥
आधींच आम्हां यया कांहीं । नरनारायणासी भिन्न नाहीं । परी आतां जिरो माझ्या ठाईं । वेगु हा माझा ॥ ४५८ ॥
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पैं गा तो तुवां कैसा । प्रश्नु केला ? ॥ ४५९ ॥
जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनि मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐकों आला ॥ ४६० ॥
तेथ सद्गदें बोलें । अर्जुनें जी जी म्हणितलें । निरुपाधिक आपुलें । रूप सांगा ॥ ४६१ ॥
यया बोला तो शारङ्गी । तेंचि सांगावयालागीं । उपाधी दोहीं भागीं । निरूपीत असे ॥ ४६२ ॥
पुसिलिया निरुपहित । उपाधि कां सांगे येथ । हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥ ४६३ ॥
तरी ताकाचें अंश फेडणें । याचि नांव लोणी काढणें । चोखाचिये शुद्धी तोडणें । कीडचि जेवीं ॥ ४६४ ॥
बाबुळीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें । अभ्रचि जावें गगन तें । सिद्धचि कीं ॥ ४६५ ॥
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा ।  कणु घेतां विरंगोळा । असे काई ? ॥ ४६६ ॥
तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां । तें कोणातेंही न पुसतां । निरुपाधिक ॥ ४६७ ॥
जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें ॥ ४६८ ॥
पैं सांगणेया जोगें नव्हे । तेथींचें सांगणें ऐसें आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदीं ॥ ४६९ ॥
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥ ४७० ॥

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च । क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १६॥

मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणींची । वस्ती साविया टांची । दुपुरुषीं ॥ ४७१ ॥
जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिवोरात्री दोन्ही । तैसे संसार राजधानीं । दोन्हीचि हे ॥ ४७२ ॥
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहींचें नांव न साहे । जो उदेला गांवेंसीं खाये । दोहींतें ययां ॥ ४७३ ॥
परी ते तंव गोठी असो । आधीं दोन्हींची हे परियेसों । जें संसारग्रामा वसों । आले असती ॥ ४७४ ॥
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु । परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां ॥ ४७५ ॥
तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ ४७६ ॥
आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु । हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचूं गा ॥ ४७७ ॥
तरी महदहंकारा- । लागुनियां धनुर्धरा । तृणांतींचा पांगोरा- । वरी पैं गा ॥ ४७८ ॥
जें कांहीं सानें थोर । चालतें अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धींसि जें ॥ ४७९ ॥
जेतुलें पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें । गुणत्रयाच्या पडतें । कामठां जें ॥ ४८० ॥
भूताकृतीचें नाणें । घडत भांगारें जेणें । काळासि जूं खेळणें । जिहीं कवडां ॥ ४८१ ॥
जाणणेंचि विपरीतें । जें जें कांहीं जाणिजेतें । जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां ॥ ४८२ ॥
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचें आंग । हें असो बहु जग । जया नाम ॥ ४८३ ॥
पैं अष्टधा भिन्न ऐसें । जें दाविलें प्रकृतिमिसें । जें क्षेत्रद्वारां छत्तिसें । भागी केलें ॥ ४८४ ॥
हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं । वृक्षाकार रूपाकृती । निरूपिलें ॥ ४८५ ॥
तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरे । जालें असें तदनुसारें । चैतन्यचि ॥ ४८६ ॥
जैसा कुहां आपणचि बिंबें । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे । मग क्षोभला समारंभें । घाली तेथ ॥ ४८७ ॥
कां सलिलीं असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसें । अद्वैत होऊनि तैसें । द्वैत घेपे ॥ ४८८ ॥
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं । आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥ ४८९ ॥
पैं स्वप्नीं सेजार देखिजे । मग पहुडणें जैसें तेथ कीजे । तैसें पुरीं शयन देखिजे । आत्मयासी ॥ ४९० ॥
पाठीं तिये निद्रेचेनि भरें । मी सुखी दुःखी म्हणत घोरें । अहंममतेचेनि थोरें । वोसणायें सादें ॥ ४९१ ॥
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझें हें ना ॥ ४९२ ॥
ऐसिया वेंघोनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥ ४९३ ॥
आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें । नामें जयातें बोलणें । जग जीवु कां म्हणे । जिये दशेतें ॥ ४९४ ॥
जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरें । तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुष नामें ॥ ४९५ ॥
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता । वरी देहपुरीं निदैजतां । पुरुषनामें ॥ ४९६ ॥
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधींचि आतला । म्हणौनियां ॥ ४९७ ॥
जैसी खळाळीचिया उदका- । सरसीं आंदोळे चंद्रिका । तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे ॥ ४९८ ॥
कां खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे । तैसा उपाधिनाशीं न दिसे । उपाधिकु ॥ ४९९ ॥
ऐसें उपाधीचेनि पाडें । क्षणिकत्व यातें जोडे । तेणें खोंकरपणें घडे । क्षर हें नाम ॥ ५०० ॥
एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें । आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥ ५०१ ॥
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा । तो मध्यस्थु गा गिरिवरां । मेरु जैसा ॥ ५०२ ॥
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गीं । इहीं न भेदे तिहीं भागीं । तैसा दोहीं ज्ञानाज्ञानांगीं । पडेना जो ॥ ५०३ ॥
ना यथार्थज्ञानें एक होणें । ना अन्यथात्वें दुजें घेणें । ऐसें निखिळ जें नेणणें । तेंचि तें रूप ॥ ५०४ ॥
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये । तया मृत्पिंडा ऐसें आहे । मध्यस्थ जें ॥ ५०५ ॥
पैं आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ॥ ५०६ ॥
पार्था जागणें तरी बुडे । परी स्वप्नाचें कांहीं न मांडे । तैसिये निद्रे सांगडें । न्याहाळणें जें ॥ ५०७ ॥
विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे । तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥ ५०८ ॥
सर्वां कळीं सांडिलें जैसें । चंद्रपण उरे अंवसे। रूप जाणावें तैसें । अक्षराचें ॥ ५०९ ॥
पैं सर्वोपाधिविनाशें। हे जीवदशा जेथ पैसे । फळपाकांत जैसें । झाड बीजीं ॥ ५१० ॥
तैसें उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ । तयातें अव्यक्त । बोलती गा ॥ ५११ ॥
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥ ५१२ ॥
जयासी कां बीजभावो । वेदांतीं केला ऐसा आवो । तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥ ५१३ ॥
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न । नानाबुद्धीचें रान । रिगालें असे ॥ ५१४ ॥
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी । ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥ ५१५ ॥
येरु क्षर पुरुषु कां जनीं । जिहीं खेळे जागृतीं स्वप्नीं । तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥ ५१६ ॥
पैं अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे कां ख्याती । या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥ ५१७ ॥
साचचि पुढती वीरा । जरी न येतां स्वप्न जागरा । तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणों येता ॥ ५१८ ॥
परी प्रकृतिपुरुषें दोनी । अभ्रें जालीं जियें गगनीं । क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नीं । देखिला जियें ॥ ५१९ ॥
हें असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा । मूळ तें रूप पुरुषा । अक्षराचें ॥ ५२० ॥
हा पुरुषु कां म्हणिजे । जे पूर्णपणेंचि निजें । पैं मायापुरीं पहुडिजे । तेणेंही बोलें ॥ ५२१ ॥
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे जिये माझारीं । ते सुषुप्ती गा हा ॥ ५२२ ॥
म्हणौनि यया आपैसें । क्षरणें या नसे । आणिकेंही हा न नाशे । ज्ञानाउणें ॥ ५२३ ॥
यालागीं हा अक्षरु । ऐसा वेदांतीं डगरु । केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥ ५२४ ॥
ऐसें जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण । अक्षर पुरुषु जाण । चैतन्य तें ॥ ५२५ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099