डॉ. सुनील देशपांडे स्वाध्याय

डॉ. सुनील  देशपांडे यांनी २० श्लोकांचे सदर चालवले -  भक्तियोग - काव्यरूपात 

आपली आई ज्याप्रमाणे आपल्याला संस्कारित करते, आपले लाड करते, आपल्या मनाची आणि एकंदर आयुष्याची सकारात्मक बांधणी करते, तशीच श्रीमद्भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आधारवड म्हणून आपल्या पिढ्यानपिढ्यांची मनोबांधणी करत आलेली आहे. शेकडो वर्ष भक्तांची आई बनून राहिलेल्या या " भक्ताई " चे मला उमगलेले अर्थ माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत मांडायचा प्रयत्न करणार आहे. "बोलू जाता बरळ, करिसी ते नीट " असे संतकवी तुकोबांनी म्हणल्याप्रमाणे ती आई हे शब्द नीट करून घेईल, अशी आशा करून ही सेवा भक्ताई चरणी सविनय सादर समर्पित करतो .

भजू कोणत्या रूपासि?


परंतप कौंतेय पुसतसे

अजिजीने मधूसूदनासि 

जावू शरण मी कोणासि

भजू कोणत्या रुपासि

 भजू कोणत्या रूपासि मी भजू कोणत्या रूपासि ?

विश्र्वरुप दाखविलेत आणि

अनुरक्त मजसि केलेसि

उचित भक्तिमार्ग कोणता

सांगावे तुम्ही मजसि 

भजू कोणत्या रूपासि मी भजू कोणत्या रूपासि? 

कोणी भक्तियोगे भजति

लाघवी ही श्रीकृष्णमूर्ती

कोणी योगमार्गे भजति

निर्विशेष ब्रम्हज्योति

भजू कोणत्या रूपासि मी भजू कोणत्या रूपासि  

रूप सगुण दिसे हो व्यक्त

निर्गुणावरी कसे व्हावे अनुरक्त 

मार्ग दोन, लक्ष्य एकच फक्त

घ्यावे कोणत्या मार्गासि 

भजू कोणत्या रूपासि मी भजू कोणत्या रूपासि  

वाटे भजावे तव विश्वरूप

म्हणता तुम्ही जाण स्वस्वरूप !

इंद्रियातीत, अव्यक्तही भावे !

साकार कि निराकारासी

भजू कोणत्या रूपासि मी भजू कोणत्या रूपासि  

सोपे सविशेषवादी

अवघड ते निर्विशेषवादी

दोघेही करती भक्ती, कोणते

योग्य सांगा आम्हासि

भजू कोणत्या रूपासि मी भजू कोणत्या रूपासि ?

तो उत्तम योगी जाण (अध्याय १२, श्लोक २ )

 भगवन् वदति तेव्हा तत्क्षण

ऐक पार्था देऊनी कान

उत्तर माझे अन् तुझे प्रश्न

युक्त असे तुझे मार्मिकपण

 तो उत्तम योगी जाण, पार्था, तो उत्तम योगी जाण !

 निरंतर लावतो भजन ध्यान

ममप्रती करुनी एकाग्र मन

तो उत्तम योगी जाण, भक्त जो

श्रद्धावान पूजतो सगुण

तो उत्तम योगी जाण, पार्था, तो उत्तम योगी जाण !

 साकार रुपावर माझ्या पार्था

स्थिर करि जो अपुले तनमन

गुंतवि जो दृढ, दिव्य श्रद्धाधन

बरसवि तो मम कृपेचा घन

 तो उत्तम योगी जाण, पार्था, तो उत्तम योगी जाण !

भजि जो माझे रुप सगुण

मिळवी सद्गुणांची खाण

सदा करी समाधिस्थ कर्म अन्

करि वाचन, श्रवण, मनन !

तो उत्तम योगी जाण, पार्था, तो उत्तम योगी जाण !

ते भेटती मजलाच पुन्हा - (अध्याय १२, श्लोक ३ व ४ )

कथतो तुजला , ऐक अर्जुना

जे भजती ना कधी सगुणा

करती निर्गुण ब्रम्ह उपासना

शोधती सच्चिदानंद घना

ते भेटती मजलाच पुन्हा रे ते भेटती मजलाच पुन्हा

शोधती  सृष्टी पलीकडले

जन्ममृत्युसि लांघलेले

परिवर्तनाच्या पल्याडले

अणु रेणूत सामावलेले

ते भेटती मजलाच पुन्हा रे ते भेटती मजलाच पुन्हा

शोधती इंद्रियाच्या जे पार

मर्यादा नाही ज्यास, अपार !

व्यापक सर्वत्र , सर्वदूर !

बदल जिथे मानती हार !

ते भेटती मजलाच पुन्हा रे ते भेटती मजलाच पुन्हा

ना करती  सगुण ध्याना

ना म्हणती गुरु , संप्रदायाना

ना मानती व्यक्ती,वस्तू, ईश्र्वराना

करती निरालंब, निश्चिंत मना

ते भेटती मजलाच पुन्हा रे ते भेटती मजलाच पुन्हा

क्रमती मार्ग स्वरूप-प्रलयाचा

खडतर परब्रम्ह उपासनेचा

अजपाजप श्वासाचा

सोहम सोहम ध्यासाचा

ते भेटती मजलाच पुन्हा रे ते भेटती मजलाच पुन्हा

इंद्रियांचे संयमन करून

चराचरी समबुद्धी ठेवून

साऱ्या जीवांच्या हितात रमून

निर्गुण ब्रम्ह उपासून

ते भेटती मजलाच पुन्हा रे ते भेटती मजलाच पुन्हा

निर्गुण निराकार भेटे !

अहंभाव साराच मिटे !

सोहम भाव ठायी प्रकटे !

सारे माझ्यातच मिटे !

ते भेटती मजलाच पुन्हा रे ते भेटती मजलाच पुन्हा

निर्गुणाचे जेव्हा होता तुम्ही भक्त - (अध्याय १२, श्र्लोक ५)

आहे क्लेशदायी  शोधणे अव्यक्त

निर्विशेष रुपी व्हावे ना आसक्त

अव्यक्त आसेमधे होऊन आरक्त

आधार, चिंतन करुनिया त्यक्त

निर्गुणाचे जेव्हा, होता तुम्ही भक्त 

देहधारी सांग पार्था, कसा त्यागे भाव ?

धर्म, देव, मूर्ती !  कसा त्यागे जीव ?

सगुण साकाराचा त्यागता प्रभाव

योगाने शोधती  परब्रम्हाचा  ठाव

निर्गुणाचे जेव्हा, होता तुम्ही भक्त 

भक्तीयोगी शोधे कृष्णभावनेत ईश

भगवदभक्तिमध्ये प्राप्त करी जोश

ज्ञानयोगी घेती बहुविध क्लेश

प्राप्तीसाठी अचिंत्य, अव्यक्त, निर्विशेष !

निर्गुणाचे जेव्हा, होता तुम्ही भक्त 

नेति नेति म्हणुनी शोधती ब्रम्ह

अंती मज शरण येती सोडूनी भ्रम

निर्विशेष वादाचा कलेशदायी क्रम

साक्षात्कारासाठी आयुष्यभर श्रम

निर्गुणाचे जेव्हा, होता तुम्ही भक्त  

उपनिषदांचे जाणावे लागे मर्म

त्यागावे लागते नित्य पूजा कर्म

इंद्रिया जाणावे लागे अगम्य वर्म

निराकाराचा असे आगळाच  धर्म

निर्गुणाचे जेव्हा, होता तुम्ही भक्त 

अर्चाविग्रह माझा अवतार व्यक्त

धनंजया तू जाण हे फक्त

सगुण साकाराचे  व्हावे तुम्ही भक्त

सच्चिदानंदे बद्ध होती मुक्त

सगुणाचे जेव्हा, होता तुम्ही भक्त  !

सगुणाचे जेव्हा, होता तुम्ही भक्त  !!!

मी नेतो भवसागर लांघून - (अध्याय १२, श्र्लोक ६-७ )

ऐक पार्था जे भक्तजन

कर्मे करती मनापासून

मत्पर होऊन, मलाच स्मरून

आणि करती मजसीच अर्पण

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (१)

शास्त्रसंमत करिती पालन

निषिद्ध ते देती टाळून

कर्मफळाते मजसी अर्पून

चोखपणाने स्वधर्म पाळून

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (२)

ज्या भक्तांची शरीरे

आणि वाचा तसेच मनही

माझ्यापरते विचार नाही

प्रवृत्ती माझ्यातच राही

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून(३)

मीच ज्यांचे विचार , ठिकाण

माझ्याविण ना कोठे ध्यान !

योग मार्गे पूर्ण समर्पण

व्यतिती आनंदाने जीवन

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (४)

प्रेमाची देवाणघेवाण

करती माझ्याशीच हे जाण

मीच वसे , जरी त्यांचे प्राण

मनसागरी अद्वैत  उधाण

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (५)

ज्यांनी काया,वाचा, मन

निष्ठेने मजला विकून

एेहिक, पारत्रिक समजून दीन

दिले भोग अन मोक्षही त्यागून

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (६)

माझ्या ठिकाणी सदा गढून

मलाच रे निरंतर उपासून

माझे सतत ध्यान लावून

माझ्याविण सर्व देती त्यागून

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (७)

सगुण स्वरूपी चित्त राही

सुचेना मजविण अन्य काही

चित्त माझे तयांवर राही

मी बनतो तयांची आई

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (८)

माझा पार्था भक्त जो होई

तयासी संसार चिंता नाही

मी कळिकाळास हरवून जाई

पण त्यास पदरात घेई

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (९)

चित्तवृत्ती मजप्रति राही

छंद मजविण दुसरा नाही

मृत्यू सागरी जरी भयभीत होई

मी सदा त्यांची चिंता वाही

जीवन नाव तयांची मीच, नेतो रे भवसागर  लांघून (१०)

मन बुद्धी माझ्यात गुंतवी - (अध्याय १२, श्र्लोक ८)

पार्था, स्थिर कर माझ्या ठायी -

तुझे मन ; मग माझे होई !

आणि गुंतवी माझ्या पायी -

बुद्धी तुझी ; मज अर्पण होई !


गोंधळवती संकल्प,विकल्प

मन अस्वस्थ, बुद्धी अल्प

दिशा त्यांना दे रे तू स्वल्प

मजप्रति रमण्याचा करी संकल्प

 

प्रवेशती माझ्यात रे जेंव्हा

नुरतो द्वैताचा प्रश्नच तेंव्हा

पवित्र नाम घेता तव जिंव्हा

नुरतो प्रश्न, किंतु वा किंवा

 

दोघां मजप्रती करता स्थिर

माझ्यातच निःशंक तुझे घर

दोघे एक, नाही विलग - दूर

दोघांचा एकच सोहं सूर

 

ऐसे होता , ऐक अर्जुना रे

अस्थिरता मग समीप ना उरे

मोह, किंतू तव ठायी ना ठरे

आनंदा जागाच ना पुरे !

 

मन बुध्दी माझ्यात मिसळे

कल्याणाचा मार्ग तव मिळे

भक्ती - ज्ञानाची ऊर्जा सळसळे

आनंदाचा सागर रे उसळे ! ! 

अभ्यासा करी साध्य,पार्था, अभ्यास हेच साधन - अध्याय १२, श्र्लोक ९

असेल स्थित करणे, घेऊनही कष्ट

माझ्यामध्ये तुझे,अंतरंग चतुष्ट

विषयांमागे धावून, झालेले उष्ट 

सोडी त्यास, अभ्यासाने करी मज तुष्ट

अभ्यासा करी साध्य,पार्था, अभ्यास हेच साधन

दिव्य प्रेमाद्वारे आसक्त करून

वा विधिविधाने पालन करून

भक्तीयोग विधी हे अवलंबून

अनुराग मजप्रती होई उत्पन्न

अभ्यासा करी साध्य,पार्था, अभ्यास हेच साधन

भगवतभक्ती हरेक हृदयी असती

भौतिकासंगे प्रदूषित होती 

बद्ध जीवनी तृप्तीसाठी धावती

भक्तियोगे इंद्रिये ती, शुद्ध होती

अभ्यासा करी साध्य,पार्था, अभ्यास हेच साधन

हा अभ्यास कसा करावा  जाण

शुद्ध मने करी - वाचन,मनन, श्रवण

भगवद्भक्तीचे करून अभिसरण 

साक्षीभाव करी, अर्चाविग्रहाला अर्पण 

अभ्यासा करी साध्य,पार्था, अभ्यास हेच साधन

जरी न करू शकसि , मन - बुद्धी संलग्न

' पुन्हा ' '  पुन्हा ' करणे सत्कर्म पुण्य

हाच अभ्यास योग जाण

त्यायोगे  साधशील ज्ञान !

अभ्यासा करी साध्य,पार्था, अभ्यास हेच साधन -अध्याय १२, श्र्लोक १० 

मजसाठी कर्म करी, पार्था, मजसिच  अर्पण करी

अभ्यासयोग तुजला पार्था, जमला नाही जरी

इंद्रिय आणि विषय भोग, तुवा न त्यागी तरी 

जात्याभिमान, कुळाचार नीट आचरण करी

परंतु सारे मी केले, येऊ न दे वैखरी

मजसाठी कर्म करी, पार्था, मजसिच  अर्पण करी

पाणी नीरभिमाने जाई, कृषिवल जैसे दारे धरी

घर-कुटुंब त्यागून सैनिक, देशासाठी मारी अरि

हनुमान लक्ष्मण रामासाठी, जीवने अर्पिती सारी

मत्कर्मपरायण होई तूही, हीच दिशा रे खरी

मजसाठी कर्म करी, पार्था, मजसिच  अर्पण करी

कर्म करण्याची प्रवृत्ती नको खरी

आणि न करण्याची, निवृत्तीही नाही बरी;

चित्तवृत्तीने सदा निरंतर, मलाच रे तू स्मरी;

समर्पण वृत्ती आणि निष्ठेने, सदा कर्म करी!

मजसाठी कर्म करी, पार्था, मजसिच  अर्पण करी

इंद्रिये तृप्त होती, सांसारिक कर्मे जर करी;

शरणागत भाव येती, आध्यात्मिक कर्मे जर करी;

यज्ञ दान तपादि कर्मे, काया वाचा मने करी;

अंती येशील सायुज्यमुक्तीरूपी, माझ्या तू रे घरी !

मजसाठी कर्म करी, पार्था, मजसिच  अर्पण करी

सर्व कर्मी समाधी, घेशील पार्था जरी;

कर्मातून निभ्रांत शांती, मिळवशील तू खरी ;

संसारी राहूनही मुक्त होशील, सांगे तुज मुरारी;

निष्कामभावे जेव्हा कर्मे तू , मज अर्पिशिल सारी !

मजसाठी कर्म करी, पार्था, मजसिच  अर्पण करी

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि - अध्याय १२, श्र्लोक ११

अर्पण जरी ना करू शकसि

पार्था, तुझी कर्मे तू मजसी

फलद्रुप झालेले जे ते , ने तू शून्यासि

आणि अवलंबि निष्काम कर्मयोगासि

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि


कलावंत जसा, रमतो कलेपाशी

नर्तिका तद्रुप होते, जशी नृत्याशी

फळ, अर्थार्जन स्पर्शे ना, त्यांचे मनासी

कर्मातच शोधती रे ते, निखळ आनंदासि

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि


निष्काम कर्म हे, निगडित जयांसी

उसळती घेऊन ते, अंतरानंदासी

आनंद क्रीडा नामाभिधान, आहे जयासी

भगवंताची लीलाही, म्हणती तयासी 

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि


न जोडावे कर्म ,फक्त व्यवसायासि

 निगडित करावे त्यासि, जीवन-कलेसि

निरहंकारी, निरासक्त , बनवी कर्मासि

सहजच पार करी , मृत्यू संसार सागरासि

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि


कर्मे कालाशी बद्ध , कला मात्र मुक्तसि

कमलपत्राचे नाते, जैसे वरच्या पाण्याशी

पक्वफळाचे नाते जैसे,  नुरते वृक्षाशी   

धनुर्धारीचे नाते, सुटलेल्या बाणाशी

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि


कर्मे करी अन्  मोकळे होसि

अग्निज्वाला जशी, जाते रे आकाशी

खडकाचे नाते जसे, असे पावसाशी

वेळूच्या झाडाचे नाते, जसे अंकुराशी

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि


कर्मफलांचा त्याग अग्रेसर, साऱ्या योगांसि

होणारी कर्मे जर तू, जिरविशि  शून्याशी

मुक्त होईल बंध, सुखदुःखाच्या फेऱ्याशी

शांती बरसेल भेटशील, सच्चिदानंदघनासि

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि


कर्मफळाचे भोग, जेव्हा तू त्यागसि

राग द्वेष हर्ष इर्षा, होती रे नाहीशी

कर्मफळांचा लाभ जोडसि, प्रसाद बुद्धीशी

चित्तशुद्धी अन् ज्ञानप्राप्ती, नेई मोक्षप्राप्तीपाशी

त्यागी कर्मफलाची इच्छा , पार्था , तर तू माझा होसि

वापरी भिन्न साधनाला, परी अनुसरी मजला - अध्याय १२, श्र्लोक १२

'अभ्यासा'चे श्रेष्ठ-उणेपण, सांगितले तुजला 

कर्मसंन्यास करी, वापरी यम-नियमाला

कष्टे जोडी, शमदमादि साधनसंपत्तीला

जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा करी, श्रवण मननाला

वापरी भिन्न साधनाला, परी अनुसरी मजला


'अभ्यासा'हून श्रेष्ठ 'ज्ञान' हे सांगतो तुजला

परमेश्वरी परोक्षज्ञाने, मिळवी जीव-ब्रम्हैक्याला 

अद्वैत ज्ञान हेच साधन ,  मोक्षाप्रती नेण्याला !

देहात्मबुद्धी भोगवासना, करती कधी, प्रतिबंध ज्ञानाला ! 

वापरी भिन्न साधनाला, परी अनुसरी मजला


'ज्ञाना'हूनही श्रेष्ठ मानती, जाण 'ध्याना'ला

ध्यानाच्यायोगे भेटावे, ममस्वरूपाला

काया-वाचा-मनोभाव, अालींगती ध्यानाला

आणि त्यायोगे लोटती, दूर कर्माला

वापरी भिन्न साधनाला, परी अनुसरी मजला 


ध्यानयोगे साध रे ;अविद्या, काम निरासाला

आणि भेट संकल्प-विरहित, शांत मनाला

वृत्तींचा प्रक्षोभ घाली, परी प्रतिबंध ध्यानाला

देहभावना क्लेशदायी करी, दिव्य साधनाला

वापरी भिन्न साधनाला, परी अनुसरी मजला


'ध्याना'हूनही श्रेष्ठ जाण , 'कर्मफळ त्यागाला'

वापरि ना कुठल्याच, कष्ट अन् परिश्रमाला

साधक म्हणून त्यागी, सत्वर कर्मफळ- संकल्पाला

सहजच स्वीकारी फळ, साक्षूनी प्रसाद- वृत्तीला

वापरी भिन्न साधनाला, परी अनुसरी मजला


फलत्यागे साधी, आनंदाच्या उत्कर्षाला

मन शुद्धी आणि ज्ञान घेऊन,  मिळविसी मोक्षाला

सोपा हाच मार्ग, माझ्या साधकाला

कर्मफलत्याग मिळवून देई, सात्विक शांतीला

वापरी भिन्न साधनाला, परी अनुसरी मजला

तो भक्त मजसी प्रिय असे - अध्याय १२, श्र्लोक १३ ते २०

पुससि पार्था, भक्त कोणता,  

सदा मजसि प्रिय असे? 

जाणून स्वरूप, जगतो जीवन

तो भक्त मजसि प्रिय असे || ध्रु ||

तो भक्त मजसी प्रिय असे

जो - द्वेष, स्वार्थ रहित असे

सर्वांवर करि प्रेम, दया अन् 

मन बुद्धी मज अर्पितसे ! 

तो भक्त मजसि प्रिय असे ||१||

सुख-दुःखाला मानी सारखे

क्षमाशील जो मनी असे

मन, शरीर अन् इंद्रियांवर

सतत ताबा ठेवतसे

तो भक्त मजसि प्रिय असे ||२||

प्रसन्न वाटे, समोर येता

संतुष्ट योगी भासतसे

दृढ श्रद्धा  जो धरि मजवरि

साहून दुःखा हासतसे

तो भक्त मजसि प्रिय असे ||३||

त्रास न देईन जो कोणाला

आणि कुणाचा मानतसे

थंडी-ऊन, सुख-दुःख, शत्रू

अन् मित्रा समान जाणतसे

तो भक्त मजसि प्रिय असे ||४||

भीती, मत्सर, उद्वेगापासून

तटस्थ नि अलिप्त असे 

निरपेक्ष अन् निराभिमानी, 

भक्तीमध्ये लिप्त असे

तो भक्त मजसि प्रिय असे ||५||

अति हर्ष अन् द्वेष करि ना

शोक, इच्छा त्यागतसे

मिळेल त्यातच करी निर्वाहा

आसक्ती ना जागतसे

तो भक्त मजसि प्रिय असे ||६||

शुभाशुभ कर्मा त्यागी जो

मानापमानि समभाव ठसे

ईशस्वरुपा सतत भजि जो

मत्परायण , स्थिरबुद्धी असे

तो भक्त मजसि प्रिय असे ||७||

श्रद्धाळू अन् तत्त्वज्ञानी

सदा धर्ममय वर्ततसे

निष्काम प्रेम, करी सर्वांवर

जीवन अमृत बनवतसे

तो भक्त मजसि प्रिय असे ||८||

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099