डॉ. प्राजक्ता पाठकने ज्ञानेश्वरीचा हा अध्याय जणू काही समओवी करावा याप्रमाणे काव्य रूपाने आपल्यापुढे मांडण्याचा सुंदर प्रयोग केला. अतिशय सोपी भाषा वापरून सहजपणे या अध्यायाची उजळणी करून दिली.
गुणत्रय विभाग : पंचिकरण/ सृष्टी निर्मिती
पुन्हा पुन्हा तेचि, ज्ञानातील उत्तम ते ज्ञान,
सांगती भगवंत श्रीमान, जाणिता दूर झाले बंधन.
ज्ञान जरी स्वरूप आपुले, संसारात सारे किती रमले,
स्वप्न स्वर्गाचे पाहिले, आपलेच आपल्याला परके झाले.
असे तेजस्वी ते ज्ञान, इतर सारे या पुढे तृण,
मृत्युलोक स्वर्गलोक भेदा कारण, होय केवळ द्वैताची ओळखण.
जे स्वप्ना सारखे वाटे, ज्ञान इतर असे मिथ्या,
वाऱ्याच्या लाटा जशा, गगनात जाए लया.
सूर्य उगवता नभी, चंद्राचे तेज लोपते,
प्रलयाची वेळ येताच, नद्यांचे अस्तित्व नसते.
मुळची ती मुक्तस्थिती, जिला सारे मोक्ष म्हणती,
ज्ञान हेचि अवगत होता, होय तिची प्राप्ती.
विचारशूर असे जो पुरुष, मनानेच मनाचा निग्रह करून,
सहजस्वरूप विश्रांती प्राप्त करून न होती देहाच्या स्वाधीन
सांगे भगवान पुन्हा तेचि, असे सारे माझ्या परि,
पुरुष ते विचारशूर, असले तरी देहधारी…………….
ज्ञानाचा ह्या आश्रय घेऊन, जे झाले भगवंतासमान,
सृष्टी निर्मिता जन्मास न येती, प्रलयकाळी न पावती मरण.
भगवंत असे जसा हा, अमर्याद आनंदरूप,
तसेच हेचि जन,सत्यसागर सिद्ध स्वरूप.
जाई सर्व लयास असे काही जे द्वैतभाव
एकचि असे नर-नारायण हेचि वास्तव एकमेव.
एक असणाऱ्या भगवंताला अनेकांत अडकवी पारधी त्रिगुणरूपी,
बीजाने त्यांच्या संगरूपी पीके येई प्राणिरूपी………..
ऐसी असे ही माया, महद्ब्रह्म जणू योनी,
सर्व सृष्टीच्या उत्पत्तीचे बीज तिच्या ठिकाणी.
तेथून गुणविकार वाढती, म्हणूनी महद्ब्रह्म म्हणती,
अव्यक्तवादी अव्यक्त म्हणती, सांख्य म्हणे हीच प्रकृती.
माया म्हणती तिला वेदांती, आणिक सांंगावे किती,
आत्मस्वरूपाचा विसर पडती, रूप अज्ञानाचे तेचि असती.
निद्रेत जैसी नाही जागृती, स्वप्नावस्था स्वरूपस्थिती,
वायू विना शून्य आकाश भासती, तैसे ह्या अज्ञानाची स्थिती.
खांब वा पुरुष ना कळे, ना रात्र ना दिन सांजवेळे,
तैसे हे अज्ञान असे, स्वरूप वा विपरीत ना कळे.
क्षेत्र क्षेत्रज्ञाचा संबंध, स्वाभाविक धर्म आत्मतत्त्वचा,
स्वतः तद्रूप म्हणे आत्मवस्तु स्वभाव नैसर्गिक मायेचा.
जे जे काही दिसते भ्रमात, त्याला जग असे म्हणतात,
त्या साऱ्यांचे मूळ, असती एकाच आत्मतत्त्वात.
अविद्या ही भार्या भगवंताची, चिरतरुण अवर्णनीय गुणांची,
अस्तित्व नसणे स्वरूप तिचे जवळीक अज्ञानी लोकांची.
भगवंताच्या सत्तेच्या आधारे, पोटात साठवी ब्रम्हांड सारे,
महत्ब्रह्म या प्रकृतीत, जगद्रूप वाढे आठ विकारे.
पुरुष प्रकृतीचे संग झाले, बुद्धीतत्त्व जन्मास आले,
रजोगुणाने ते भरले, मन ऐसे तयार झाले.
मनाची ममता सोबती, अहंकार होई तिच्या योगे,
पंचमहाभूतांची होता निर्मिती, विषय इंद्रिय आले तया लागे.
विषयापाठी त्रिगुणी उभे, प्रवेश करती वासनागर्भे,
अविद्येला फुटे अंकुर जगाचे, परब्रह्माचा जेव्हा संग लाभे.
आकार गर्भ गोलांचा, होतो कैसा व्यक्त,
अंडज स्वेदज उद्भिज जारज, अवयव निरनिराळे होतात प्राप्त.
गर्भरस वाढला व्योम वायुचा, उत्पन्न झाला अवयव मणिज,
ज्यात तम-रज, जल-तेज, त्याचे रूप होई स्वेदज.
उद्भिज ऐसा असे तो, आप पृथ्वी ज्यात उत्कट,
परि गुण त्याचे असे, तमाने भरलेली निकृष्ट.
सत्वा पासून पाच ज्ञानेंद्रिय, रजो पासून पाच कर्मेन्द्रिय,
ज्यांना मन बुद्धीचे साह्य, जारज ते जीव होय.
ज्याचे दोन हात दोन पाय, मस्तक ज्याचे अष्टधाप्रकृती,
प्रवृत्ती ज्याचे पोट सुटलेले, पाठ सरळ सोट निवृत्ती.
ऊर्ध्वा ठाई देव सर्ग, कंठ ज्याचा असे स्वर्गलोक,
मृत्युलोक कंबर, नितंब पाताळलोक, असे विलक्षण मूळमायेचे बालक.
तीन ही लोकांचा होता विस्तार, बाळसे चढे लेकरास प्रतिदिनी,
त्याच्या हाडापोटाचे सांधे असे, ह्या चौऱ्यांशी लक्ष योनी.
बालकाचे त्या अलंकार, नाना नामे, देह, अवयवे,
देऊनि मोह स्तन्य नित्य नवे, माया त्याला असे वाढवे.
सृष्टी साऱ्या वेगवेगळ्या, बालकाच्या बोटे आणि करंगळ्या,
अज्ञानी बालक हे विश्वरूपी, प्रसवून झाली धन्य माया.
ब्रह्म प्रातःकाळी त्या बालकाचा, विष्णू त्याचा मध्यान्ह काळी,
असा क्रम चाले त्याचा, सदाशिव त्याच्या सायंकाळी.
करून विश्वाचे अनेक व्यवहार, घेई विश्रांती महाप्रलयाची या शय्येवर,
जागे होईल विपरीत ज्ञानाने, पुन्हा उत्पत्तीच्या सीमेवर.
अहंकार त्याची शोभा असे संकल्प विकल्प मित्र इष्ट,
होता आत्मबोध सत्यज्ञान, होई ह्या बालकाचा शेवट.
विश्वाची अशी करून रचना, प्रसवूनी प्रकृती झाली माता,
तिये जे ही कार्य केले, साह्य झाली परब्रह्माची सत्ता……….
अनंत प्रकारची शरीरे पहावे परि बुद्धी भेद न आणावे,
एकचि सारे आठ तत्त्वे, जैसे एका देहाची भिन्न अवयवे.
माती पासुन बने जसा घट, कापसाच्या तंतूचा होई पट,
सागराच्या पोटी जशी लाट, परब्रह्म चराचर संबंध थेट.
अग्नी म्हणा वा ज्वाळा, दोन्ही अग्नीच केवळ,
तसाच हा संबंध, परब्रह्म आणि सकळ.
अलंकार घडले जरी, सोनेपण नाही गेले,
कमळ फुलले तरी, कमळपण तसेच राहिले.
जगाची होता उत्पत्ती, परब्रह्म जरी झाकिले,
व्यवहार सारे जगाचे, त्याच्या आधारे चालले.
जोंधळ्याचे बी पेरले, त्यास अंकुर फुटले,
कणीस तया बहरले, बी हरवले का वाढले.
सारून जग एका बाजूला, न दिसे परमात्म्याचे स्वरूप,
ऐका सांगे भगवंत, विश्व सारे असे मद्रूप.
कावीळाने डोळे झाले पिवळे, पिवळेच दिसे मग सगळे,
सूर्यप्रकाशानेच ढग दिसे, जरी झाकला सूर्य ढगांमुळे.
आपल्याच सावलीला भ्यायला, परि सावली पासून का वेगळा झाला,
परब्रह्म नाना देही सर्वत्र असता, परि गुणांनी तो बद्ध झाला.
असा तो बद्ध का मुक्त, हा पडला असे प्रश्न,
यथार्थ स्वरूपाचे अज्ञान, करित असे तया उत्पन्न.
गुणत्रय विभाग योग :त्रिगुण बंधन
त्रिगुण हे सत्व, रज, तम, प्रकृती देई त्यांना जन्म,
सत्त्व उत्तम, रज मध्यम, तमोगुण असे अधम.
बाल्य, तारुण्य, वार्धक्य, एकाच देहात दिसतात,
तैसे त्रिगुण ही भासे, जैसे एका मनोवृत्तीत.
हिणकस मिसळता सुवर्णाचे, मूल्य कमी ते झाले,
आळसपणाने झोप दृढ होता, सावधपण नाहीसे झाले.
वृत्ती पसरे चोहीकडे, अज्ञानाचा केलिया स्वीकार,
सत्त्व, रज, तम अशा गुणांचा ही होई विस्तार.
विशुद्ध अशा आत्म्याने, जीवदशेत प्रवेश केला,
हा देह म्हणजेच मी, ऐसेच म्हणू लागला.
जन्मापासून आमरण, देहाविषयी मीपण,
हे सर्व माझेच, करी अभिमान धारण.
अमिषाला मासा पडता बळी, धीवर तत्क्षण गळ आवळी,
जीवदशेत आत्मा येता, खेळ गुणमायेची खेळी……
निर्मल जरी सत्वगुण, आमिष दाखवी सुख आणि ज्ञान,
अडकून बसला जीवात्मा, जैसा असे कोणी हरिण.
ज्ञानाने झाला अहंकार, आत्मसुखाचा पडला विसर,
माझ्यासारखा सुखी मीच, ऐसा चढला गर्व फार.
पडला मूळ स्वरूपाचा विसर, झाला विद्वत्तेच्या भुताचा संचार,
यत्किंचितही न झाले दुःख, विषयांनी झाला नभ सम आकार.
आत्मा जरी असे देहातीत, परी झाला तो देहवंत,
अभिमानाने तो ग्रासला, बाह्य ज्ञानाने होता ज्ञानवंत.
अवगत त्याला व्यवहार ज्ञान, यज्ञ विद्या आणि स्वर्गाची जाण,
म्हणी मज सम न कोणी ज्ञानवान, चातुर्यचंद्राचे मी योग्य स्थान.
अहंकाराने ग्रासले ज्याचे ज्ञान, त्यास ऐसा फिरवे सत्वगुण,
घालून सुख आणि ज्ञानाचे वेसण, डोले तो ज्ञानी बैलासमान…….
जीवाचे करी नित्य रंजन, म्हणून म्हणती रजोगुण,
अभिलाषा ठेवी चिरतरुण, परी मध्यम असे हा गुण.
रजोगुण जीवात्म्यात प्रवेशिला, काम तृष्णा जागविल्या,
स्वैराचार वासनेचा पसरला, विषयइच्छा आणिक बळावल्या.
अत्यंत प्रदिप्त होईल अग्नी, अग्निकुंडात जेव्हा तूप ओतले,
लहान असो वा मोठे, सारेच त्याने भस्मसात केले.
वाढता विषयाची आवड, दुःखही वाटे गोड,
मिळाले जरी इंद्राचे ऐश्वर्य, परि ते ही वाटते थोडं.
तृष्णा एसे वाढली असता, मिळाला मेरू पर्वत जरी,
ओढ लागे आणिक जीवाला, मिळवावे अधिकाधिक काहीतरी.
आजचे सर्व खर्च केले, उद्या जर काही न उरले,
काय करावे प्रश्न पडले, म्हणूनी भव्य धाट मांडले.
जीवास लागली एकच गोडी, कशी मिळवावी रे कवडी,
क्षुद्र लाभ ही आवडी, जरी असे गवताची काडी.
देह त्यागूनि स्वर्गात जावेत, परी तेथे काय खावे,
करावया मग त्याची सोय, यज्ञयागाच्या मागे धावे.
एकानंतर एक एक, व्रते केले किती अनेक,
आचारले कर्म परोपकारी, निष्काम नसे कोणी एक.
ऋतू असता ग्रीष्मांती, वारा क्षणभर न घे विश्रांती,
व्यवहार तसा रज करती, ना रात्र ना दिन पाहती.
ऐसा चंचल रजोगुणी, तया सम नाही कोणी,
जैसे मासा वा कामिनी, वा कडकडणारी वीज गगनी.
अति तीव्र अशा वेगाने, साऱ्या सुखाचा लोभाने,
कर्मकांडाच्या जळत्या अग्नीमध्ये, मारे उडी निर्भयपणे.
देहाहून वेगळा जरी, परि गुंतला देहात,
करी व्यापाराचा खटाटोप, अडकला तृष्णेचा पाश गळ्यात…..
व्यवहार सारे मंदावले, रात्री काळे मेघ दाटले,
ऐसा मोहरूपी तमोगुण, त्याने बुद्धी झाकले.
तमाने जीवास लागे भ्रांत, जणू मूर्तिमंत मोहनास्त्र,
अथवा अविवेकाचा महामंत्र, वा अज्ञानरूपी मद्याचे पात्र.
देह आत्मा एकचि मानी, तमोगुण त्याला ठेवी बांधूनि,
दुसरे मग काही न उरले, तमोगुण पसरला सर्व ठिकाणी.
साऱ्या इंद्रियांमध्ये येई जडत्व, मूढत्व भरले मनामध्ये,
आळसाचा वास असे सदैव, कंटाळा सगळ्या कामांमध्ये.
डोळे उघडे परी दिसत नाही, ओ देती जरी हाक मारली नाही,
धोंड्या सम सुस्त पडला, कड बदलणे ही जमत नाही.
पृथ्वी पाताळात गेली काय, आकाश कोसळून पडलं काय,
आळस एवढा वाढलाय, न कळे काय योग्य अन् अयोग्य काय.
झोपच असे तया अतिप्रिय, स्वर्ग सुखही वाटे न्यून,
लाभले तरी ब्रह्मदेवाचे आयुष्य, तरी वाटे राहावे झोपून.
रागात चाललेल्या आंधळ्या प्रमाणे, तमोगुणी पुरुषाचे वागणे,
निघे व्यापाराला आवेशाने, काय बोलावे कोणाशी न जाणे.
रानात पेटलेल्या वणव्याला, विजवण्याची हाव धरावी पतंगाने,
अकार्याचीच हौस असे तया, आवडे चालायला अविचाराच्या मार्गाने.
निद्रा, आळस, आणि प्रमाद, तमोगुणाच्या तीन असे दोऱ्या,
आत्मा शुद्ध निरुपाधिक जरी, जखडून ठेवी त्याला साऱ्या.
अग्नी घेई आकार लाकडाचा, आकाश घेई आकार घटाचा,
तळ्यात प्रतिबिंब चंद्राचे, आभास आत्मत्त्व बद्ध झाल्याचा…
गुणत्रय विभाग योग :मनुष्य- स्वभाव आणि विभाव
त्रिगुण ही असती जीवात, वसती देहात उपजत,
कोण सत्व, कोण रज, कोण तम, कसं ठरत….
देहाच्या तीन प्रकृती, कफ, वात आणि पित्त,
कफ, वात कमी होता, पित्त करी देह संतप्त….
ऊन, पाऊस, गारवा, ऋतू हे असे तीन,
जोर एकाचा वाढतो, बाकी होता क्षीण….
दूर होता स्वप्न न् जागृती, झोप गाढ मग येती,
तैसेच त्रिगुण देहात राहती, वेळ तैसा गुण बळावती….
सत्व, रज, तम, त्रिगुण कैसे येईल न कोणाला ठाव,
जो बळावेल तैसा वागेल, ज्याचा त्याचा जैसा स्वभाव….
दुसऱ्यांचे कैसे का वागणे, त्यांच्या स्वभावा प्रमाणे,
परि नसे शक्य तया बदलणे, वा स्वतः मुखवटा चढवणे….
प्रसंग घडला बाहेरी, पडसाद उमटले अंतरी,
गुण उठला तया परि, मन करे त्याची चाकरी….
मन, बुद्धी, चित्त, अहंकार, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, आणि पंचप्राण,
स्वभाव जीवाचा ह्यांचे मिश्रण, त्रिगुणांची असे खाण….
सात्विक असला स्वभाव जरी, प्रसंग बिकट येता परि,
न कळत होई संतप्त, तमोगुणाची चढे स्वारी….
जीवाचे जैसे वागणे, त्रिगुणाच्या असे प्रभावे,
प्रसंग जैसे येता, जीवाला तैसे नाचवे….
सत्त्व रज कमी होता, तमोगुण झाले प्रबळ,
तारतम्य न राहिले वागण्यात, प्रमादाचा चाले खेळ….
तमाची येता सत्ता, वाढे निद्रा आणि आळस,
विसरून आपले स्थान, उद्धटपणाचा करी कळस….
मागे टाकून सत्त्व आणि तमाला, रजोगुण वाढू लागे,
नाही सुंदर कर्मावाचून काही, देही ऐसे मानू लागे….
जीव जन्माला रजाने युक्त, कामना, इच्छा, वासना मनात,
एका जागी बसेना स्वस्थ, नित्य गुंतला नव्या संकल्पात….
कर्म करीत फळाच्या अपेक्षेने, नित्य त्याकरिता धावत राहणे,
ऐसे जीवाचे वागणे, सवयी जडल्या रजोगुणे….
रज तमाला दाबून, सत्त्वगुण आला उफाळून,
मीच सर्व सुखी, जीवाकडून घेई वदवून….
प्रबळ होता सत्त्वगुण, नाम उपासनेत रमले मन,
परि एकचि असे कामना, मिळावे सुख आणि ज्ञान….
ब्राह्ममुहुर्ताला बहरला सत्त्वगुण, करावे ध्यानधारणा, नामस्मरण
मनाची पळे सारी मरगळ, प्रफुल्लित होई अंतःकरण….
दिवस जैसा पुढे सरकला, रजोगुण वाढू लागला,
प्रपंचाचे चक्र फिरू लागता, जीव धावू लागला….
रात्रीचा समय येता, जीवाला लागे विश्रांती,
परि त्याने येता जडत्व नित्य राही भ्रांती….
गुणत्रय विभाग योग : त्रिगुण लक्षणे
वृद्धिंगत होता सत्त्वगुण, सर्वांगी होई ज्ञान उत्पन्न,
कर्माभिलाषा लोभ लालसा, ह्यांची वृद्धी करे रजोगुण….
अविवेकाने जीवाचे वागणे, प्रमाद आणि मोहाचे वाढणे,
तमोगुण वाढला असता, त्याची असे ही लक्षणे….
वसंतात फूलता कमळ, दरवळे त्याचा परिमळ,
ज्ञान अंतरंगात दरवळता, इंद्रिये झाली उज्वळ….
विवेकाची असे वस्ती, सर्व इंद्रियांच्या ठिकाणी,
करचरणांना जणू डोळे असावे, ऐसी कोमल त्यांची करणी….
राजहंसापुढे ठेवता मिसळूनी, वेगळे करी दुध आणि पाणी,
योग्य-अयोग्य, सदोष-निर्दोष, इंद्रिये घेई पारखूनी….
कान टाळी जे ऐकू नये, डोळे टाळी जे बघू नये,
जीभ टाळी जे बोलू नये, आपणहून सेवा करी इंद्रिये….
दिव्याचा प्रकाश पसरता, दूर झाला जसा अंधःकार,
इंद्रियांपुढे न येती, अयोग्य असा व्यवहार….
भरून वाहते नदी पावसाळ्यात, तैसी त्याची बुद्धी पारंगत शास्त्रात,
चंद्रप्रभा फाके पूनवेला आकाशात, चित्तवृत्ती तैसी उजळे ज्ञानमार्गात….
वासना साऱ्या एकत्र येती, मन प्रपंचामध्ये न धावती,
मन विषयातून विटून जाती, सत्त्वाची लक्षणे ऐसी दिसती….
रजोगुणाच्या कार्याचा धुमाकूळ,गुंतला शरीररूपी हा गांव,
वाटोळं फिरवी सारं जसं वावटळ, विषयभोगाकडे इंद्रिये घेई धाव….
न वाटे रजोगुणीला, परस्त्रीची अभिलाषा निषिद्ध,
इंद्रियांना चरू देती इथे तिथे, शेळीच्या तोंडाप्रमाणे अनिर्बंध….
लोभ वाढवितो स्वैरपणे, दुसऱ्याच्या वस्तू लुबाडणे,
अशक्य तेवढ्याचं शिल्लक ठेवणे, असती ही रजोगुणाची लक्षणे….
कोणताही धंदा का असेना, रजोगुणी माघार कधी घेईना,
अचाट कार्य करीत जाई, मंदिर बांधणे वा अश्वमेध का असेना….
वसवावे नाना शहरे, धावे मोठे सरोवरे, वा मोठमोठे बगिचे,
इह-पराच्या सुखांना म्हणे ना पुरे….
असती जरी दुर्भर, अग्नी आणि सागर,
कवडीमोल रजेच्या वासनेपुढे, अग्नीच्या दाह, सागराचा विस्तार….
शा इच्छेपुढे धावे, च्छा मनापुढे धावे,
लालसा रजोगुणी अशी, भटकंतीला अपूरे पडती विश्वे….
सत्त्वगुण अन् रजोगुण, दोघांना या दाबून, तेव्हा हा तमोगुण,
येतो मग उफाळून….
रवि आणि शशि विरहीत, अंधःकारमय अवसेची रात,
तैसे तमोगुणीचे मन, अज्ञानाच्या अंधाराने व्याप्त….
अवसेच्या रात्री समान शून्य, निरुत्साही, स्फूर्तीहीन,
सद्विचारास जेथे नाही स्थान,
ऐसे तमोगुणी पुरुषाचे अंतःकरण….
बुद्धीची कोमलता लोपली, दगडापेक्षा कठीण झाली,
संस्कार तिजवर न दिसती, स्मरणशक्ती ही नष्ट झाली….
नित्य तया सबाह्यांतरी, अविवेकचि असे शरिरी,
मूढपणे लागे व्यवहारी, होता तमोगुणाची स्वारी….
भ्रष्टाचरणाची हाडे किती, तमोगुणी इंद्रियांना रूतती,
तरी ही मरणा पर्यंत, पापकर्मे करत राहती….
क्षण येता दुष्कृत्यांचा उल्हास भरला चित्तात,
दाट काळोखात रात्रीच्या, घुबडाचे डोळे सर्व बघतात….
ज्याचे असावे निषिद्ध नाव, त्याची भलतीच असे हाव,
घेई नित्य तिकडेच धाव, विसरून सारे शुद्ध भाव….
झिंगतो मद्य न पिता, बरळतो सन्निपात नसता,
जैसे कोणी वेडा असता, भुलतो जरी प्रेम नसता….
चित्त नसते थाऱ्यावर, अथवा नसे ते उन्मनी,
दिवा मालवावा तैसा, मोहाला वश झाला तमोगुणी….
ऐसा ही सारी लक्षणे, उत्पन्न झाली तमोगुणे,
होता त्याची पुष्टी, दिसु लागे ठळकपणे….
गुणत्रय विभाग योग : त्रिगुण- गति किंवा फळ
सत्त्वगुण वाढू लागला,
आसक्ती न राहिली जीवाला,
अशातच जर मृत्यू आला,
कैसी मिळे गती जीवाला.
घरात विपुलता अन् संपत्ती,
तयाचि धैर्यशिल अन् उदार वृत्ती,
मग का नाही तया मिळणार
इहालोकी सुख, परलोकी सद्गती.
सुबत्ता घरात सणासुदीच्या दिनी,
थाटावी जणू काही मेजवानी,
यावा आवडता मित्र कोणी,
पाहुणा म्हणून स्वर्गातूनी.
ह्याहून वेगळे काय कल्याण,
ज्याचा बळकट नित्य सत्त्वगुण,
निश्चित सद्गती प्राप्त होणं,
सत्त्व वृद्धि येता मरण.
ज्याच्या ठायी असे सद्गुण,
नित्य करी सदाचरण,
भोगी हा देह टाकून,
घेऊन जाई शुद्ध सत्त्वगुण.
जसा मृत्यु येता अकस्मात,
पुन्हा देह मिळे सत्त्वाने युक्त,
तेव्हा पुढील तया जन्मात,
घेई जन्म ज्ञानींच्या सानिध्यात.
राजा महाली असो वा डोंगरावरी,
भरलेलीच राही त्याची तिजोरी,
प्रकाश पसरवत राही दिवा,
नेला जरी दुसऱ्या गावा.
दिव्याच्या प्रकाशा समान,
पसरली तेव्हा सत्त्वशुद्धी,
होई ज्ञानाची विशेष वृद्धी,
विवेकावरी तरंगू लागे बुद्धी.
महत् तत्त्वादि विकार,
तयाचा ज्याने केला विचार,
तो जीव विचारसह साचार,
आत्मस्वरूपी साक्षात्कार.
छत्तीस तत्त्वापुढचे सदतिसावे,
चौवीसाव्या सांख्यमतनंतर पंचविसावे,
त्रिगुणा पलिकडले चौथे जे,
शुद्ध सत्त्व ते स्वभावे.
ऐसे सर्वोत्तम ते सत्त्वगुण,
जयाने जोडिले हे ज्ञान,
देह लाभला निरूपम,
परब्रह्माचे तया आकलन…………...
रजोगुण झाला असता उन्नत,
मृत्यू आला मग जर अशात,
पुन्हा रजोगुणाने पूर्ण व्याप्त,
जन्म घेई मनुष्य योनीत.
राजवाड्यात बसला भिकारी सुखाने,
राजा होईल का तो तेवढ्याने,
जोडला जरी वरातीच्या गाडीला,
बैलांच्या नशिबात कडबा खाणे.
रात्रंदिवस विश्रांती नाही मिळत,
व्यस्त तो अशा त्या व्यापारात,
देहांत रजोगुणाच्या डोहात,
जन्म घेई कर्मजडाच्या कुळात………
तमोगुण असता उन्नत,
तेव्हा झाला जर देहांत,
फिरूनी घेई मग जन्म,
तमोगुणाच्या सानिध्यात.
मोहरीचे मोहरीपण असते
तिच्या बीजात साठून,
तेचि पेरले असता मग
काय उगवेल मोहरी वाचून.
असो दिव्याची ज्योत,
विझलेली वा असो तेवत,
परि दिवा तो अग्निरूप,
जेथे लावला होई व्यक्त.
तमोगुण जातो जेव्हा वाढत,
त्यातच जर झाला देहांत,
पशु वा पक्षी, झाडं वाट कृमी,
होतो तो पुढिल जन्मात………….
सत्त्वापासून जे उत्पन्न होती,
तया पुण्य कर्म म्हणती,
सुख आणि ज्ञान सात्त्विक,
अपूर्व ते सहज लाभती.
क्रिया ज्या राजसाच्या,
वेली जणू कडू फळाच्या,
सुंदर सुखात्मक बाहेरूनी,
आत चवी कडू दु:खाच्या.
निंबोळ्या कडूलिंबचे फळं,
बाहेरून रसरशीत पिवळं,
आत गोड, बाहेर गरळं
ऐसे रजोचे क्रिया फळ.
विषाचे बी जर पेरले,
विषचि तया अंकुरले,
अज्ञान हेचि फळ मिळे,
तामसी कर्म जर केले……...
सत्त्वगुणापासून ज्ञान,
लोभ रजोगुणापासून,
प्रमाद, मोह आणि अज्ञान,
उत्पन्न होई तमापासून.
नभी उगवला नारायण,
रात्र सरून आला दिन,
तैसे ज्ञानाचे जे कारण,
तेचि केवळ सत्त्वगुण.
आत्मस्वरूपाचे विस्मरण,
द्वैताचे असे ते कारण,
तैसाचि असे रजोगुण,
साऱ्या लोभाचे कारण.
प्रमाद, मोह, अज्ञान,
दोष सारे ते मलिन,
तयाचे जे मूळ कारण,
वारंवार हा तमोगुण.
रज आणि तम हे दोन,
घडवून आणती पतन,
परि सत्त्वागुणा वाचून,
प्राप्त होणार नाही ज्ञान.
त्यागून अन्य भक्ती,
ज्ञान भक्ती आचरती,
ऐसे ज्ञानी भक्त जन्मव्रती,
स्विकारे सात्विकवृत्ती………
जयाचे जगणे मरणे,
सत्त्वाच्या उत्कर्षा मध्ये,
देह त्यागानंतर ते ,
झाले राजे स्वर्गा मध्ये.
रजोगुणात जे जगती,
त्यातच ते देहांती
मनुष्य रूपाने मृत्युलोकी
पुन्हा जन्म घेती.
सुखदुःखाची खिचडी
देहाच्या एकाच ताटात मिळे,
ह्याचि देही भोगावे सारे,
मरण तेथे न टळे.
तमोगुणाचा उत्कर्ष शरीरात,
नित्य रमले ते भोगात,
मृत्यू येता ये समयी,
जाऊनी पडले नरकात.
सत्त्व, रज, तम त्रिगुण,
उर्ध्व मध्य अधोगतिचे कारण,
ब्रह्म स्वरूप परि निर्विकार,
कार्य करे गुणाला अनुसरून.
उत्तम मध्यम अधोगति,
भेद दाखवी गुणवृत्ती,
त्यागली जर गुण दृष्टी,
ब्रह्म वस्तु शुद्धच दिसती…….
गुणत्रय विभाग योग : मी-त्रिगुणांचा साक्षी (आ.१४, श्लो. १९-२०)
ऐसे घ्यावे जाणून,
सत्त्व रज तम त्रिगुण,
देहाचा आश्रय घेऊन,
दाखवी आपापले समर्थपण….
जैसे इंधनाच्या आकारात,
अग्नी मग होतो व्यक्त,
अथवा भूमीतील रस,
जो प्रकटती वृक्षारुपात….
दूध परिणाम पावे,
दह्याच्या आकाराने,
अथवा गोडी प्रकटे,
जैसे उसाच्या रूपाने….
तैसे होती त्रिगुण,
तया सह अंतःकरण,
देहचि होती म्हणून,
जीवाच्या बंधनाचे कारण….
आश्चर्य हे विशेष जाण,
देहास त्रिगुणाचे बंधन,
परि कमी न होती,
जीवाचे सहज मुक्तपण….
त्रिगुणांचा चले व्यवहार,
आपापल्या धर्मानुसार,
गुणातीतपणा नित्य स्थिर,
न येई त्यात काही अंतर….
आत्मतत्त्व कळू लागते,
जीवाला होता ज्ञानाची प्रचिती,
स्वप्न जैसे वाटे मिथ्या,
येते जेव्हा जागृती….
पाण्यातले प्रतिबिंब न्याहाळले,
लाटांनी परि पाणी हालले,
तयाचे तुकडे तुकडे झाले,
तुकडे नव्हे हे जाणले….
नट घेई नाना सोंग,
परि न चढे तयाचे रंग,
तैसे त्रिगुणास पहावे,
न चढू देता तयाचा व्यंग....
ऋतुंचे येणे जाणे आकाशात,
परि बदल नसे तयाच्या स्वरूपात,
तैसे आत्मस्वरूपी स्थिर आत्मतत्त्व,
गुणातीत ते राहुनी त्रिगुणात….
पाहता मुळस्थानावरून,
आत्मा म्हणे घ्यावे जाणून,
मी साक्षी मी अकर्ता,
कर्म सारे करती त्रिगुण….
कर्माचा जो विस्तार,
त्रिगुणांचा असे विकार,
उणे अधिक तयाचा भार,
भिन्न भिन्न कर्मे तदनुसार….
वनसंपदेचे कारण जरी वसंत,
परि असे तयापासून अलिप्त,
कर्माचा मी अवेळी निमित्त,
नित्य तयापासून अलिप्त....
अथवा लोपवे तारांगण,
सूर्यकांताने करावा अग्नी उत्पन्न,
अथवा कमळाचे उमलणं,
वाह अंधाराचं नाहीस होणं….
हे घडेल सुर्योदया सोबत,
परि सूर्य मात्र क्लिप्त
तैसे मी अकर्ता ह्या देहात
केवळ सत्तारूप सर्व कर्मात
मी दाखवी गुण,
वाढवी मी गुण,
गुणांचा निरास होता
उरतो केवळ मी….
जसा विवेक झाला जागृत,
जयाच्या मग हृदयात,
श्रेष्ठ तत्त्व ते गुणातीत,
तया होई मग प्राप्त
ज्याला अचूक असे जाण
परब्रह्म असे हे निर्गुण
गुणातीत तो पुरुष
तोचि ज्ञानाचे भूषण स्थान
सागरात मिसळून नदी,
होते मग सागररूप,
मिसळून ब्रह्म स्वरूपात,
गुणातीत पुरुष होई मद्रुप….
राघु पिंजऱ्याचे बंधन सोडून,
मोकळेपणाने बसला फांदीवर,
तैसे ज्ञानी देह अहंता सोडून,
बैसे असं ब्रह्मास्मि जाणून….
जो अज्ञानरूपी निद्रेने
घोरत होता मोठमोठ्याने,
जागा झाला आता तो,
आत्मस्वरूपाच्या बोधाने…..
हातातून पडून फुटला,
बुद्धीभेदी मोहाचा आरसा,
प्रतिबिंबाच्या भ्रमातून सुटला,
द्वैत ही झाला नाहिसा….
देहाभिमानाचा वारा,
थांबला असता सारा,
जीव ब्रह्म एकच दिसे,
जैसे तरंग सागरा….
पाऊस गेल्यावर ढग
जैसे आकाशरूप होती
गुणातीत पुरुष तैसे,
तत्काळ मद्रूप होती….
ऐसा ज्ञानी मद्रूप झाला,
मग देहात जरी असला,
त्रिगुणांच्या तावडीत तो,
परि कधी न सापडला….
दिव्याचा प्रकाश न आवरे
जैसा काचेच्या घरात,
वडवाग्नी कधी न विझे,
जैसा अथांग सागरात….
त्रिगुण ते येती जाती,
परि त्याचा बोध न ढळती,
चंद्र पाण्यात प्रतिबिंब रूपी,
तैसे ज्ञानी देहात राहती….
ऐसे सामर्थ्य त्रिगुणे
देहात घाली धिंगाणे,
अहं ब्रह्मास्मि भाव ठेवी
राही नित्य अलिप्त भावाने,
न जाणे काय क्रिया,
चालली असे शरीरी,
स्वस्वरूपाचा दृढनिश्चय,
नित्य तया अंतरी….
साप आपली कात टाकून,
बिळात जाता जाए विसरून,
तैसा गुणातीत पुरूष निश्चींत
देहास जाए सहज विसरून…..
सुगंध जो भरला कमळात,
पसरूनी मिसळला आकाशात,
फिरूनी न माघारी येत
तैसाचि राही तो दरवळत….
स्वस्वरूपाशी तो समरस,
देहधर्मात नाही तया रस,
देहाशीच त्यांचे काम,
गुणातीत नसे तया वश….
घट फुटूता घटाकाश,
महदाकाशात जाती मिसळून,
देहबुद्धी होता नष्ट,
आत्मस्वरूपात होई विलीन….
ऐसा तो आत्मज्ञानवंत,
राही जरी तो देहात,
तो त्रिगुण बंधन मुक्त,
म्हणून म्हणतात गुणातीत….
गुणत्रय विभाग योग: गुणातीत लक्षणे (अ.१४, श्लोक २२-२५)
रजोगुण होता उन्नत,
प्रकृतीने वेढला गुणातीत,
नाना कर्माचे अंकुर,
फुटले तयाच्या देहात….
न तया काही कर्तेपण,
न चढे कुठला अभिमान,
न घडले कुठले कार्य जरी
न होई तयाची बुद्धी खिन्न….
सत्त्वात वाढले ज्ञान,
सर्वेंद्रिय झाली प्रकाशमान,
सुविद्येचा ना माने संतोष,
न म्हणे मी ज्ञानी, विद्वान….
तमोगुण जेव्हा वाढला,
मोहभ्रमाने न ग्रासला,
अज्ञानाने कष्टी न झाला,
त्याचा स्वीकार ही न केला….
न इच्छती ज्ञान मोहाच्या क्षणी ,
न मिरवी कर्म ज्ञानाच्या क्षणी,
सहज जरी घडले कर्म,
तयाचा परि खेद ना मानी….
असो प्रातः, मध्यान्ह, संध्याकाळ,
सूर्य त्रिकाळ पासून अलिप्त,
तैसाचि असे पुरुष गुणातीत,
त्रिगुणापासून तो अलिप्त….
ऐसी मूर्ती गुणातीताची,
असे मूळतः ती ज्ञानाची,
काय गरज सत्त्व शास्त्राची,
समुद्राला गरज काय पावसाची….
कर्म करीत असतांना तया,
अभिमान काय होईल,
थंडीने कुडकुडत हिमालय,
कंपयमान काय होईल….
तयाचे ज्ञान नष्ट
होईल काय मोहामुळे,
अग्नी कधी जळला
जाईल काय उन्हामुळे….
गुणांचे कार्य आणि गुण,
अवघेचि आहे आपण,
गुणांच्या उत्कर्षाने म्हणून,
चित्त तयाचे असे उदासीन….
वाटसरू जात असता वाटेने,
थांबला सांयकाळ झाल्याने,
तैसा गुणातीत पुरूष दैवयोगाने,
आला देहात वस्तीस उदासीनतेने…..
जय-पराजयापासून तो अलिप्त
खेद-हर्ष नाही रणांगणात,
ना काही करीत ना करवित,
गुणांविषयी उदासीन असे गुणातीत….
देहातील प्राण देहाविषयी,
अतिथी ब्राह्मण घराविषयी,
चौकातील खांब रस्त्याविषयी,
तैसा तो उदासीन गुणांविषयी….
लाटांनी भरला मृगजळ,
करी किती कल्लोळ,
परि मेरुपर्वत राही अढळ,
तैसा असे गुणातीत निश्चळ….
वाऱ्याने आकाश हालेना,
अंधाराने सूर्य लपेना,
स्वप्नाने जागृत भ्रमेना,
गुणाने गुणातीत बंधेना….
जैसे पाहे कोणी सभ्य
बाहुल्यांचा खेळ दुरून,
गुणबद्ध न होता गुणातीत,
पाही तया दुरून….
सत्त्वाने सत्कर्म करवला
रजाने विषय वाढवला,
तमाने मोहात बुडविला,
प्रभाव गुणांचा आपापला….
दिनचर्या चाले अविरत,
परि सूर्य राहे अलिप्त,
गुणातीत जाणे निश्चित,
आत्मसत्तेने घडे समस्त….
सागरास येई भरती,
चंद्रकांताला पाझर फुटती,
चंद्रविकासी कमळ फुलती,
चंद्र परि अलिप्त असती….
वाहे न वाहे वारा,
आभाळ निश्चल सारा,
परि गुणातीत अविचल,
जरी असे गुणांचा पसारा….
सुतावाचून नसे काही,
वस्त्राच्या आत बाहेर,
तैसे केवळ मत्स्वरूप,
असे विश्व सर्व चराचर….
भक्तांना असो वा अभक्तांना,
देव समान देतो सर्वांना,
तैसे गुणातीत समतोल,
मानतो तो सुखदुःखांना….
जेव्हा देहरूपी जळी,
होऊनी रहावे मासोळी,
भोगावी लागेल तेवीचि
सुखदुःखचि सगळी…..
बीज पेरून धान्य आले,
पिकातून बीजचि वेचले,
तैसे देशाभिमान सोडूनी,
आत्मस्वरूपी स्थिर झाले….
गंगेचे आपले पात्र,
विलीन झाली समुद्रात,
खळखळ वाहण्याची लगबग,
आपोआप झाली शांत….
आत्मस्वरूपाच्या ठायी,
जो बैसला निश्चयी,
तयाच्या देहाच्या ठिकाणी,
सुखदुःख समान होई….
रात्र असो वा दिन,
खांबास दोन्ही समान,
तया द्वंदे सारी सारखीच,
जो आत्म्या ठायी रममाण….
जो असे निद्राधीन,
सर्प उर्वशी स्पर्श समान,
आत्मनिष्ठासि तैसे असे,
सुखदुःख वाटे समान….
शेण असो वा सुवर्ण
रत्न असो वा पाषाण,
न वाटे त्या काही भिन्न,
जया स्वस्वरूपाची जाण….
घरी स्वर्गाचे सुख का येईना,
वाघ अंगावर का उडी घालीना,
परि आत्मबुद्धीत तयाच्या,
भंग केव्हा ही होईना….
मेलेला मनुष्य उठेना,
जळलेला बीज अंकुरेना,
तैसे साम्यबुद्धी तयाचि
कधीही परि ढासळेना….
ब्रह्म म्हणून स्तुती करती,
वा नीच म्हणून निंदा करती,
राखुंडीस जळणे, विझणे
तैसे ते ही समान वाटती….
निंदा असो स्तुतीचा काही,
परिणाम त्यावर होत नाही,
सूर्याच्या घरी नसे ओळख,
अंधार वा दिव्याची काही….
ईश्वर समजूनि पूजले
वा चोर समजूनि छळले,
अथवा राजा केले तया,
देऊनि हत्ती घोडे बैले….
सूर्यास जैसे रात्र न् दिन,
दोन्ही असे एकसमान,
मित्र वा शत्रुचं आगमन,
गुणातीतास असे समप्रमाण….
सहा ऋतु आकाशात,
परि आकाश असे अलिप्त,
तैसे वैषम्यापासून मुक्त,
असे गुणातीताचे चित्त….
आणिक तयाचे विशेष लक्षण,
न करी उद्योग काही आपणहून,
करून कर्मारंभाचे उच्चाटन,
त्या ठायी कर्मफळाचे दहन….
ऐहिक पारलौकिक सुखाची
कामना नाही तया मनाची,
तेचि करती तो सेवन,
प्रारब्धाने प्राप्ती झाली जयाचि….
जैसा कोणी एक पाषाण,
सुखदुःखाची न तया जाण,
तैसे त्याग वा स्विकारातून,
निवृत्त गुणातीताचे मन….
ऐसे ज्याचे आचरण,
खरोखर असे साम्यपूर्ण,
आणिक काय करावे कथन,
तोचि गुणातीत जाण…….
गुणत्रय विभाग योग : गुणातीत साधन (अ.१४, श्लोक २६-२७)
जो अव्यभिचारी अभेद भावनेने,
उपासना करीत जो भक्तियोगाने,
तया शक्य असे सहजपणे,
त्रिगुणांचे पाश ते जाळणे….
रत्न आणि तेज एकरूप जैसे,
ब्रह्मांड जेवढे परमस्वरूप तैसे,
द्रवपण वा पाणी, अवकाश वा गगन,
गोडी वा साखर वेगळे नसे…..
अग्नी वा जाळ, पाकळ्या वा कमळ,
वृक्षा वा फांद्या फळं, वेगळे नाही,
बर्फ साठवून हिमालय तयार झाला,
दुध विरजूनी झाले तयाचे दही….
तैसे हे विश्वचि अवघे,
मत्स्वरूप ते समजावे,
चंद्राला बघावयास लागे
का चंद्रकला वेगळे करावे….
तूप जरी घट्ट झाले,
तरी तुपपण न लोपले,
सोने परि सोनेच असे,
कंकण जरी न आटवले…..
उकलला नाही जरी पट,
परि दिसे तंतूमय स्पष्ट,
मातीरूपच असे तो,
जरी न विरला घट….
विश्वपण दूर करावे,
स्वस्वरूपासि पहावे,
परि तैसा विभक्त नसे,
विश्वासह सारे मद्रूप जाणावे….
मत्स्वरूप जाणावे विश्वमूर्ती,
तिज म्हणती अव्यभिचारी भक्ती,
परि का कोणी भेद करती,
त्यांची असे व्यभिचारी वृत्ती….
भेद बुद्धी त्याग करून,
अभेद चित्ताने घ्यावे जाणून,
आपल्या सकट आपण,
वेगळे नाही मत्स्वरूपापासून….
सोन्याची टिकली सोन्यात बसवली,
भेद त्यात काही न दिसे
आपल्यापासून न वेगळे काही,
विश्व सारे मत्स्वरूप असे….
सूर्य आणि त्याची किरणं तेजोरूप,
पृथ्वी आणि सुक्ष्म कण पृथ्वीरूप,
हिमालय आणि हिमकण पर्वतरूप,
तैसे पाहावे मीपण मत्स्वरूप….
समुदाची लाट जरी लहान,
परि वेगळी नसे समुद्राहून,
तैसे मी माझेपण,
नसे भिन्न ईश्वर स्वरूपाहून….
ऐसे पहावे ईश्वराशी एकत्व,
ह्याचेच भक्ती ऐसे नाव,
आत्मज्ञानाचा मार्ग खरा,
योगाचे ही अवघे सर्वस्व….
आकाश जे विहिरीच्या तोंडाशी,
एकसंघ ते असे महाकाशाशी,
तैसेच ऐक्य असे भक्ताचे,
स्वस्वरूप परमतत्त्वशी….
प्रतिबिंब ते सूर्य,
तेजोवलय अभिन्न असे,
जीव ते ब्रह्म,
सोऽहम् वृत्ती अभिन्न असे
सोऽहम् वृत्ती अभेद,
ऐसे भक्त आणि भगवंत,
ऐसे नांदू लागता मग,
होई लीन स्वस्वरूपात….
मीठाचा खडा समुद्रात,
विरतो जसा आपोआप,
सोऽहम् वृत्ती मत्स्वरूपात,
विरते तैसी आपोआप….
अग्नी ही विझतो आपण,
गवताला पूर्ण जाळून,
लोपत ऐसे ज्ञान ही,
भेदाचा नाश करून….
विरले भगवंताचे परत्व,
तैसेचि भक्ताचे अपरत्व,
उरले मग केवळ दोघांत,
स्वयंसिद्ध ते ऐक्यत्व….
त्रिगुणांना जिंकतो ऐसा भक्त,
मग विचार ही नाही राहत,
ऐक्याचा अनुभव ही नाही उरत,
ऐसे भजता होई ब्रह्मत्व प्राप्त….
अशा गुणांनी युक्त,
तो अव्यभिचारी भक्त,
त्याची असे ब्रह्मता,
जशी कोणी स्त्री पतिव्रता….
खळखळ वाहणारं गंगेचं पाणी,
तया समुद्राविना योग्य नाही कोणी,
तैसे अभेद भक्त जो ज्ञानी,
तो ब्रह्मतेच्या मुकुटाचा मुकुटमणी….
ज्याला सायुज्य म्हणतात,
ऐसे हे असे ब्रह्मत्व,
चौथा पुरुषार्थ ऐसे,
त्याचे असे नाव….
भगवंताची भक्ती सगुण,
ब्रह्मप्राप्तीचे जरी साधन,
परि ते नसती विभिन्न,
असावी चित्ती ही जाण…….
अविकारी अद्वितीय अमृत,
धर्मरूप, सुख, शाश्वत,
तोचि असे केवळ एकच,
ज्याला ब्रह्म म्हणतात….
चंद्र आणि मंडळ जैसे,
नसती भिन्न परस्परहून,
भगवंत आणि ब्रह्म तैसे,
नसती ते कदापि भिन्न….
ऐसे हे ब्रह्म नित्य निष्कंप,
प्रकट अन् धर्मरुप,
अमर्याद अन् अद्वितीय,
सुख ते असे अमाप….
अज्ञानाचा जेथे नाश केला,
विवेक ही तेथे लय झाला,
सिद्धांताचे उत्तम स्थान जे,
ऐसे ही नाव त्याच भगवंताला….
जसा गुढ जो परमार्थ,
समजावूनि सांगितला सार्थ,
भक्तांचा कैवारी तो भगवंत,
त्याचा एकही शब्द नसे व्यर्थ….....
इति चतुर्दशोऽध्याय!!!!!
No comments:
Post a Comment