२७ डिसेंबर २०२० निरुपण
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥ २६॥
तरी व्यभिचाररहित चित्तें । भक्तियोगें मातें । सेवी तो गुणातें । जाकळूं शके ॥ ३७१ ॥
तरी कोण मी कैसी भक्ती । अव्यभिचारा काय व्यक्ती । हे आघवीचि निरुती । होआवी लागे ॥ ३७२ ॥
तरी पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा । रत्नीं किळावो जैसा । रत्नचि कीं तो ॥ ३७३ ॥
कां द्रवपणचि नीर । अवकाशचि अंबर । गोडी तेचि साखर । आन नाहीं ॥ ३७४ ॥
वन्हि तेचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ । रूख तेंचि डाळ- । फळादिक ॥ ३७५ ॥
अगा हिम जें आकर्षलें । तेंचि हिमवंत जेवीं जालें । नाना दूध मुरालें । तेंचि दहीं ॥ ३७६ ॥
तैसें विश्व येणें नांवें । हें मीचि पैं आघवें । घेईं चंद्रबिंब सोलावें । न लगे जेवीं ॥ ३७७ ॥
घृताचें थिजलेंपण । न मोडितां घृतचि जाण । कां नाटितां कांकण । सोनेंचि तें ॥ ३७८ ॥
न उकलितां पटु । तंतुचि असे स्पष्टु । न विरवितां घटु । मृत्तिका जेवीं ॥ ३७९ ॥
म्हणौनि विश्वपण जावें । मग तैं मातें घेयावें । तैसा नव्हे आघवें । सकटचि मी ॥ ३८० ॥
ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो ॥ ३८१ ॥
याकारणें भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें । आपण सकट मातें । जाणावें गा ॥ ३८२ ॥
पार्था सोनयाची टिका । सोनयासी लागली देखा । तैसें आपणपें आणिका । मानावें ना ॥ ३८३ ॥
तेजाचा तेजौनि निघाला । परी तेजींचि असे लागला । तया रश्मी ऐसा भला । बोधु होआवा ॥ ३८४ ॥
पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं । मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें ॥ ३८५ ॥
हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु । तैसा ईश्वरीं मी आनु । नोहेचि गा ॥ ३८६ ॥
ऐसेनि बा समरसें । दृष्टि जे उल्हासे । ते भक्ति पैं ऐसे । आम्ही म्हणों ॥ ३८७ ॥
आणि ज्ञानाचें चांगावें । इयेचि दृष्टि नांवें । योगाचेंही आघवें । सर्वस्व हें ॥ ३८८ ॥
सिंधू आणि जळधरा- । माजीं लागली अखंड धारा । तैसी वृत्ति वीरा । प्रवर्ते ते ॥ ३८९ ॥
कां कुहेसीं आकाशा । तोंडीं सांदा नाहीं तैसा । तो परमपुरुषीं तैसा । एकवटे गा ॥ ३९० ॥
प्रतिबिंबौनि बिंबवरी । प्रभेची जैसी उजरी । ते सोऽहंवृत्ती अवधारीं । तैसी होय ॥ ३९१ ॥
ऐसेनि मग परस्परें । ते सोऽहंवृत्ति जैं अवतरे । तैं तियेहि सकट सरे । अपैसया ॥ ३९२ ॥
जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पांडवा । विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥ ३९३ ॥
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण । तैसें भेदु नाशूनि जाण । ज्ञानही नुरे ॥ ३९४ ॥
माझें पैलपण जाये । भक्त हें ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जें आहे । तेंचि निवडे ॥ ३९५ ॥
आतां गुणातें तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी । जे एकपणाही मिठी । पडों सरली ॥ ३९६ ॥
किंबहुना ऐसी दशा । तें ब्रह्मत्व गा सुदंशा । हें तो पावें जो ऐसा । मातें भजे ॥ ३९७ ॥
पुढतीं इहीं लिंगीं । भक्तु जो माझा जगीं । हे ब्रह्मता तयालागीं । पतिव्रता ॥ ३९८ ॥
जैसें गंगेचेनि वोघें । डळमळित जळ जें निघे । सिंधुपद तयाजोगें । आन नाहीं ॥ ३९९ ॥
तैसा ज्ञानाचिया दिठी । जो मातें सेवी किरीटी । तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं । चूडारत्न ॥ ४०० ॥
यया ब्रह्मत्वासीचि पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था । याचि नांवें चौथा । पुरुषार्थ गा ॥ ४०१ ॥
परी माझें आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान । एथ मी हन साधन । गमेन हो ॥ ४०२ ॥
तरी झणीं ऐसें । तुझ्या चित्तीं पैसें । पैं ब्रह्म आन नसे । मीवांचूनि ॥ ४०३ ॥
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च । शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ २७॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगोनाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
अगा ब्रह्म या नांवा । अभिप्रायो मी पांडवा । मीचि बोलिजे आघवा । शब्दीं इहीं ॥ ४०४ ॥
पैं मंडळ आणि चंद्रमा । दोन्ही नव्हती सुवर्मा । तैसा मज आणि ब्रह्मा । भेदु नाहीं ॥ ४०५ ॥
अगा नित्य जें निष्कंप । अनावृत धर्मरूप । सुख जें उमप । अद्वितीय ॥ ४०६ ॥
विवेकु आपलें काम । सारूनि ठाकी जें धाम । निष्कर्षाचें निःसीम । किंबहुना मी ॥ ४०७ ॥
ऐसेसें हो अवधारा । तो अनन्याचा सोयरा । सांगतसे वीरा । पार्थासी ॥ ४०८ ॥
येथ धृतराष्ट्र म्हणे । संजया हें तूतें कोणें । पुसलेनिविण वायाणें । कां बोलसी ? ॥ ४०९ ॥
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥
संजयो विस्मयो मानसीं । आहा करूनि रसरसी । म्हणे कैसें पां देवेंसी । द्वंद्व यया ? ॥ ४११ ॥
तरी तो कृपाळु तुष्टो । यया विवेकु हा घोंटो । मोहाचा फिटो । महारोगु ॥ ४१२ ॥
संजयो ऐसें चिंतितां । संवादु तो सांभाळितां । हरिखाचा येतु चित्ता । महापूरु ॥ ४१३ ॥
म्हणौनि आतां येणें । उत्साहाचेनि अवतरणें । श्रीकृष्णाचें बोलणें । सांगिजैल ॥ ४१४ ॥
तया अक्षराआंतील भावो । पाववीन मी तुमचा ठावो । आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ४१५ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां गुणत्रयविभागयोगोनाम चतुर्दशोऽध्यायः ॥
No comments:
Post a Comment