अध्याय १८ : ओव्या ८८५-९२२

३१  ऑक्टोबर २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक  ४५-४६ / ज्ञानेश्वरी ओव्या ८८५-९२२ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः । स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ ४५॥

आतां इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा । उचित जैसें करणां । शब्दादिक ॥ ८८५ ॥
नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता । सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु ॥ ८८६ ॥
तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे । गोरेया आंगा जैसें । गोरेपण ॥ ८८७ ॥
तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा । प्रवर्तावयालागीं प्रमा । अढळ कीजे ॥ ८८८ ॥
पैं आपुलेंचि रत्न थितें । घेपे पारखियाचेनि हातें । तैसें स्वकर्म आपैतें । शास्त्रें करावीं ॥ ८८९ ॥
जैसी दिठी असे आपुलिया ठायीं । परी दीपेंवीण भोग नाहीं । मार्गु न लाहतां काई । पाय असतां होय ? ॥ ८९० ॥
म्हणौनि ज्ञातिवशें साचारु । सहज असे जो अधिकारु । तो आपुलिया शास्त्रें गोचरु । आपण कीजे ॥ ८९१ ॥
मग घरींचाचि ठेवा । जेवीं डोळ्यां दावी दिवा । तरी घेतां काय पांडवा । आडळु असे ? ॥ ८९२ ॥
तैसें स्वभावें भागा आलें । वरी शास्त्रें खरें केलें । तें विहित जो आपुलें । आचरे गा ॥ ८९३ ॥
परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी । आंगें जीवें मांडुनी । तेथेंचि भरु ॥ ८९४ ॥
वोघीं पडिलें पाणी । नेणें आनानी वाहणी । तैसा जाय आचरणीं । व्यवस्थौनी ॥ ८९५ ॥
अर्जुना जो यापरी । तें विहित कर्म स्वयें करी । तो मोक्षाच्या ऐलद्वारीं । पैठा होय ॥ ८९६ ॥
जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि कांहीं संबंधा । म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ॥ ८९७ ॥
आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडें । तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ॥ ८९८ ॥
येर नित्य कर्म तंव । फळत्यागें वेंचिलें सर्व । म्हणौनि मोक्षाची शींव । ठाकूं लाहे ॥ ८९९ ॥
ऐसेनि शुभाशुभीं संसारीं । सांडिला तो अवधारीं । वौराग्यमोक्षद्वारीं । उभा ठाके ॥ ९०० ॥
जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा । नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥ ९०१ ॥
मोक्षफळें दिधली वोल । जें सुकृततरूचें फूल । तयें वैराग्यीं ठेवी पाऊल । भंवरु जैसा ॥ ९०२ ॥
पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा । उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ॥ ९०३ ॥
किंबहुना आत्मज्ञान । जेणें हाता ये निधान । तें वैराग्य दिव्यांजन । जीवें ले तो ॥ ९०४ ॥
ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता । अनुसरोनि विहिता । कर्मा यया ॥ ९०५ ॥
हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥ ९०६ ॥
पैं आघवाचि भोगेंसीं । पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं । कीं तयाचीं नामें जैसीं । तपें तियां केलीं ॥ ९०७ ॥
कां बाळका एकी माये । वांचोनि जिणें काय आहे । म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु ॥ ९०८ ॥
नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडितां जैसा । सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला ॥ ९०९ ॥
तैसें आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबितां । ऐसा कीजे कीं जगन्नाथा । आभारु पडे ॥ ९१० ॥
अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ॥ ९११ ॥
पैं जीवाचे कसीं उतरली । ते दासी कीं गोसावीण जाली । सिसे वेंचि तया मविली । वही जेवीं ॥ ९१२ ॥
तैसें स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ॥ ९१३ ॥


यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् । स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ ४६॥

म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली । जयापसूनि कां आलीं । आकारा भूतें ॥ ९१४ ॥
जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ॥ ९१५ ॥
जेणें जग हें समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित । जालें आहे दीपजात । तेजें जैसें ॥ ९१६ ॥
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥ ९१७ ॥
म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजें । वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया ॥ ९१८ ॥
जिये वैराग्यदशें । ईश्वराचेनि वेधवशें । हें सर्वही नावडे जैसें । वांत होय ॥ ९१९ ॥
प्राणनाथाचिया आधी । विरहिणीतें जिणेंही बाधी । तैसें सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे ॥ ९२० ॥
सम्यक्‌ज्ञान नुदैजतां । वेधेंचि तन्मयता । उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥ ९२१ ॥
म्हणौनि मोक्षलाभालागीं । जो व्रतें वाहातसें आंगीं । तेणें स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ॥ ९२२ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099