अध्याय १६ : ओव्या ३३७-३८८

 ९ मे  २०२१ निरुपण 

अध्याय १६ । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ( श्लोक  १२-१७ / ज्ञानेश्वरी ओव्या ३३७-३८८ )


आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायाणाः । ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १२॥

आमिषकवळु थोरी आशा । न विचारितां गिळी मासा । तैसें कीजे विषयाशा । तयांसि गा ॥ ३३७ ॥
वांछित तंव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती । वाढऊं वाढऊं होती । कोशकिडे ॥ ३३८ ॥
आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु । एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाहीं ॥ ३३९ ॥
दिहा खोलणें रात्रीं जागोवा । ठाणांतरीयां जैसा पांडवा । अहोरात्रींही विसांवा । भेटेचिना ॥ ३४० ॥
तैसें उंचौनि लोटिलें कामें । नेहटती क्रोधाचिये ढेमे । तरी रागद्वेष प्रेमें । न माती केंही ॥ ३४१ ॥
तेवींचि जीवींचिया हांवा । विषयवासनांचा मेळावा । केला तरी भोगावा । अर्थें कीं ना ? ॥ ३४२ ॥
म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पैं गा । आणावया जगा । झोंबती सैरा ॥ ३४३ ॥
एकातें साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वें हरिती ।  एकालागीं उभारिती । अपाययंत्रें ॥ ३४४ ॥
पाशिकें पोतीं वागुरा । सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसें ॥ ३४५ ॥
ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट । आणिती ऐसें निकृष्ट । तेंही करिती ॥ ३४६ ॥
परप्राणघातें । मेळविती वित्तें । मिळाल्या चित्तें । तोषणें कैसें ॥ ३४७ ॥

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् । इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १३॥

म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया । आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी ? ॥ ३४८ ॥
ऐसा श्लाघों जंव जाये । तंव मन आणीकही वाहे । सवेंचि म्हणे पाहे । आणिकांचेंही आणूं ॥ ३४९ ॥
हें जेतुलें असे जोडिलें । तयाचेनि भांडवलें । लाभा घेईन उरलें । चराचर हें ॥ ३५० ॥
ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरों नेदी ॥ ३५१ ॥

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि । ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी ॥ १४॥

हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे । मग नांदेन पवाडें । येकलाचि मी ॥ ३५२ ॥
मग माझी होतील कामारीं । तियेंवांचूनि येरें मारीं । किंबहुना चराचरीं । ईश्वरु तो मी ॥ ३५३ ॥
मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो । म्हणौनि इंद्रुही वावो । मातें पाहुनि ॥ ३५४ ॥
मी मनें वाचा देहें । करीं ते कैसें नोहे । कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥ ३५५ ॥
तंवचि बळिया काळु । जंव न दिसें मी अतुर्बळु । सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ॥ ३५६ ॥

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया । यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५॥

कुबेरु आथिला होये । परी तो नेणें माझी सोये । संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ॥ ३५७ ॥
माझिया कुळाचा उजाळू । कां जातिगोतांचा मेळू । पाहतां ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ॥ ३५८ ॥
म्हणौनि मिरविती नांवें । वायां ईश्वरादि आघवे । नाहीं मजसीं सरी पावे । ऐसें कोण्ही ॥ ३५९ ॥
आतां लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु । प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥ ३६० ॥
मातें गाती वानिती । नटनाचें रिझविती । तयां देईन मागती । ते ते वस्तु ॥ ३६१ ॥
माजिरा अन्नपानीं । प्रमदांच्या आलिंगनीं । मी होईन त्रिभुवनीं । आनंदाकारु ॥ ३६२ ॥
काय बहु सांगों ऐसें । ते आसुरीप्रकृती पिसें । तुरंबिती असोसें । गगनौळें तियें ॥ ३६३ ॥

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः । प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६॥

ज्वराचेनि आटोपें । रोगी भलतैसें जल्पे । चावळती संकल्पें । जाण ते तैसें ॥ ३६४ ॥
अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळीं । मनोरथांच्या ॥ ३६५ ॥
अनियम आषाढ मेघ । कां समुद्रोर्मी अभंग । तैसे कामिती अनेग । अखंड काम ॥ ३६६ ॥
मग पैं कामनाचि तया । जीवीं जाल्या वेलरिया । वोरपिली कांटिया । कमळें जैसीं ॥ ३६७ ॥
कां पाषाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था । जीवीं तैसें सर्वथा । कुटके जाले ॥ ३६८ ॥
तेव्हां चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी । तैसा मोहो अंतःकरणीं । वाढोंचि लागे ॥ ३६९ ॥
आणि वाढे जंव जंव मोहो । तंव तंव विषयीं रोहो । विषय तेथ ठावो । पातकासी ॥ ३७० ॥
पापें आपलेनि थांवें । जंव करिती मेळावे । तंव जितांचि आघवे । येती नरकां ॥ ३७१ ॥
म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथां पाळिती । ते आसुर येती वस्ती । तया ठाया ॥ ३७२ ॥
जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर । तातला तेलीं सागर । उतताती ॥ ३७३ ॥
जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणीं । नरकलोकीं ॥ ३७४ ॥
ऐसे नरकाचिये शेले । भागीं जे जे जन्मले । तेही देखों भुलले । यजिती यागीं ॥ ३७५ ॥
एर्‍हवीं यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया । परी विफळती आचरोनियां । नाटकी जैसी ॥ ३७६ ॥
वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसियां । अहेवपणें ॥ ३७७ ॥

आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः । यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १७॥

तैसें आपणयां आपण । मानितां महंतपण । फुगती असाधारण । गर्वें तेणें ॥ ३७८ ॥
मग लवों नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे । कां उधवले आकाशें । शिळाराशी ॥ ३७९ ॥
तैसें आपुलिये बरवे । आपणचि रिझतां जीवें । तृणाहीहूनि आघवें । मानिती नीच ॥ ३८० ॥
वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा । कृत्याकृत्यविचारा । सवतें केलें ॥ ३८१ ॥
जया आंगीं आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी । तरी काय काय पिसीं । न करिती गा ? ॥ ३८२ ॥
म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळें । यागाचींही टवाळें । आदरिती ॥ ३८३ ॥
ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी । आणि तयांसी तंव विधी । द्वंद्वचि सदा ॥ ३८४ ॥
देवां ब्राह्मणांचेनि नांवें । आडवारेनहि नोहावें । ऐसें आथी तेथ यावें । लागे कवणा ? ॥ ३८५ ॥
पैं वासरुवाचा भोकसा । गाईपुढें ठेवूनि जैसा । उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ॥ ३८६ ॥
तैसें यागाचेनि नांवें । जग वाऊनि हांवें । नागविती आघवें । अहेरावारी ॥ ३८७ ॥
ऐशा कांहीं आपुलिया । होमिती जे उजरिया । तेणें कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥ ३८८ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099