मंजिरी सबनीस स्वाध्याय

मंजिरी सबनीस यांनी २० श्लोकांचे सदर चालवले -  भक्तियोग  आणि निसर्ग 

२१ जुलै, मंगळवार

श्रावणात १२ व्या अध्यायाचा अभ्यास करायचा आपला उपक्रम ठरला. त्याच्या अनुषंगाने विचार करता भक्ती म्हणजे काय? सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती? ह्याचा उहापोह महिनाभर होईलच पण त्यासाठी ज्याची भक्ती करायची त्याचे स्वरूप माहीत करून घेणे जरुरीचे आहे. त्यादृष्टीने विचार करता लहानपणापासून ते आतापर्यंत माझ्या दृष्टिकोनात होत गेलेला बदल आणि मी त्या परमेश्वराला कोठे पाहिले? वयाच्या प्रत्येक टप्यावर जेवढी कुवत होती तेवढा तो समजला आणि उमगला. ही आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे.

 देव( परमेश्वर) कुठे आहे?

अगदी लहानपणी आईंनी सांगितले - देव सगळ पहात असतो, तो देवघरात असतो

 अगदी लहानपणी वडिलांनी सांगितले - पुस्तक म्हणजेच विद्या म्हणजेच देव असतो 

 अगदी लहानपणी आजीआजोबांनी सांगितले - आईवडील  तुझ्यासाठी प्रेमाने करतात तो देव असतो 

 लहानपणी आईवडीलांनी सांगितले - ताटातले काही टाकायचे नाही कारण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणजे देव असतो 

 अजून थोडे मोठे झाल्यावर घरच्यांनी सांगितले की - मी चांगले वागले की देव खुश होतो 

वाईट वागले की रागावतो आणि शिक्षा करतो

 जसजसे शाळेत गेले तसे आईवडीलांनी सांगितले -विद्या देणारे शिक्षक म्हणजेच देव असतो 

 जसजसे मोठे होत गेले तसे कळले की - देव वरती स्वर्गात बसून सगळे बघत असतो 

 अजून थोडे मोठे झाल्यावर कळले की देव म्हणजे राम, कृष्ण, विठ्ठल आणि हरी असतो, देव देऊळात असतो 

 शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले की - काशी, रामेश्वर, पंढरपूर, कोल्हापूर इथे देव असतो 

 पंढरपूरला गेल्यावर कळले की सर्व माउली सर्वांना नमस्कार करायचा, देव सगळ्या माणसांच्यात असतो 

 अजून थोडे मोठे झाल्यावर कळले की  देव आजूबाजूच्या प्रेमाच्या माणसात असतो 

 वडाला पूजताना वडात, गाईला पूजताना गाईत, बैलाला पूजताना बैलात, नदीला पूजताना नदीत, नागात, समुद्रात, अन्नात, शाळेत, शिक्षकात, मदतीला धावून येणाऱ्या प्रत्येकात असतो 

अजून मोठे झाल्यावर कळले की  प्रत्येक सहृदयी व्यक्तीत, प्राण्यात, पक्षात, झाडात देव असतो 

 अजून मोठे झाल्यावर जेंव्हा गीतामाऊलीची गाठ पडली  तेंव्हा कळले की निर्गुण निराकार परमेश्वर देवरूपाने वेगवेगळ्या रूपात असतो .

 मीच तो संकुचित केला होता इतके वर्ष. जन्मल्यापासून आत्तापर्यन्त भेटलेल्या प्रत्येकाच्या रूपात तो बरोबर होता. माळेतल्या धाग्याप्रमाणे अदृश्य होता. माझे आतापर्यंत मण्यांकडे लक्ष होते, धाग्याकडे नव्हते म्हणून मला तो दिसला नाही आणि कळला नाही.

 विचार करायला लागल्यावर असे कळले आणि पटू लागले की परमेश्वर म्हणजेच देव माझ्यातच बुद्धीरूपाने, प्राणरूपाने, जाणीवरूपाने, चैतन्यरूपाने वास करतोय कारण मी तोच आहे.

 देव ( परमेश्वर ) कणाकणात, रोमारोमात भरला आहे. मला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या प्रत्येक ठिकाणी तो आहे. मला कळणाऱ्या आणि न कळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तो आहे. मला अनुभवता येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तो आहे. तो  सर्वत्र आहे हे एकच सत्य आहे. 

हेच सत्य अनुभवता येण्यासाठी मला उपासना करायची आहे, अभ्यास करायचा आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा माझ्या प्रवासात तोच मला हाताला धरून घेऊन जाणार आहे. माझं काम इतकंच की मी त्याच बोट  अजिबात सोडायचं नाही.

____________________________________________________________________

श्रीभगवान उवाच

मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।

श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः || १२. २ ||

श्रीभगवान म्हणाले

माझ्या ठिकाणी मन एकाग्र करुन निरंतर माझ्या भजन-ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरुप परमेश्र्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अति उत्तम योगी वाटतात.

मन एकाग्र का होत नाही?

आयुष्यभर जितका हा प्रश्न भेडसावत नाही तितका तीव्रतेने परमार्थ मार्गात आल्यावर हा प्रश्न भेडसावतो. जप करायचा आहे, ग्रंथ वाचायचे आहेत, ध्यान करायचे आहे असे खूप वाटते आणि करायला बसलो की मन काही लागत नाही. थोडा वेळ लागते आणि परत विषयाकडे धाव घेते. खरंतर ह्या गोष्टीचं आपल्यालाही खूप वाईट वाटत असतं आणि आपण विचार करतो सुद्धा की काय चुकतंय आपलं?? व्हावं वाटत आणि होत नाही मग खूप restless व्हायला होतं, आपलाच राग येतो. कोणाशी बोलताना किंवा वाचलेलं असत ते आपण implement करण्याचा प्रयत्न करतो, वेळ बदल, जागा बदल, posture बदल, method बदल अगदी देवता बदलण्यापर्यत मजल जाते.

पुढच्या वेळी जितका जोमाने प्रयत्न करू तितकं मन rebel होतं आणि जास्त भरकटायला लागत. जितकं दाबायचा किंवा divert करायचा प्रयत्न करू तितके ते उसळून उठते. हा सर्व साधारण अनुभव आहे.

 हे खूप natural transition आहे. भगवंतालाही माहीत आहे, कलियुगातील लोकांचे प्रश्न, म्हणून त्यांनी आधीच ह्याचे उत्तर देऊन ठेवलंय

मनाला जे आवडत तिकडे ते धाव घेत.  मनाला ज्याचे प्रेम वाटते ते तेच करते. ज्याच्यावर प्रेम असते त्याचेच ते चिंतन करते. मन हे उत्तम leader आहे किंवा उत्तम follower आहे.

आपल्याला उत्तर मिळाले असेल की मन एकाग्र का होत नाही. कारण आत्ता आपण follower झालोय मनाचे, त्यामुळे ते मनमानी करते. आपण असहाय होतो. It takes you on ride. जी गोष्ट मला दिवसभर करायची सवय आहे आणि जी मी आयुष्यभर करत आलेय, ध्यानाला बसल्यावर तेच होणार. मन विषयाकडे धाव घेते. माझी माझ्या माणसात, प्रसंगात, भूतकाळात, भविष्यकाळात जिथे जिथे आसक्ती आहे, तिथे तिथे ते फिरत बसते. जिथे आपण वर्तमानात असतो मन मात्र नेमके तिथे नसते. वर्तमानात सोडून ते सगळीकडे  फिरत असते. जे झाले नाही त्याची चिंता आणि जे होऊन गेलेय त्याची मीमांसा करत रहाते.

 ह्यावर उपाय काय?

मनाला जर वर्तमानात राहण्याची सवय लावली आणि मनमानी करू दिली नाही तर जे काम करू त्यात आनंद मिळेल, समाधान मिळेल. जर क्षणस्थ होण्याची सवय लावली तर काम कुठलंही असो की साधना, उपासना कुठलीही असो, त्या प्रत्येक गोष्टीत मन पूर्णपणे सहभागी असेल. मन एकदा गुंतले की त्याच्यासारखा उत्तम follower नाही. फक्त जप करतानाच नाही तर दिवसभरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग असेल.

 क्षणस्थ कसे व्हायचे?

सर्वसाधारणपणे कुणालातरी खुश करण्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. आता प्रत्येक गोष्ट भगवंताला खुश करण्यासाठी करायची. आज श्रावणी शुक्रवार, आज भगवंतासाठी सगळ्या भगिनींनी किती मन लावून स्वयंपाक केला. नैवैद्य उत्तम व्हावा म्हणून किती मन लावून भगिनी करत असतात. त्या दिवशी त्यांचं लक्ष असतं का कुठे? पूर्ण एकाग्रतेने स्वयंपाक चालू असतो आणि त्यामुळेच चव न बघता सुद्धा त्या दिवशीचा स्वयंपाक उत्तम होतो आणि खाणाऱ्या प्रत्येकाला सात्विक समाधान नक्की मिळते, प्रसादाची गोडी काही और असते.

ह्याचा अर्थ ठरवलं तर प्रत्येक गोष्ट भगवंतासाठी करता येणं शक्य आहे.

मनाला विषयाची गोडी कमी आणि भगवंताची गोडी कशी वाढेल हे आपण नंतर पाहू.

२७ जुलै २०२०

अर्जुनाने सगुण साकाराची उपासना करणारे की निर्गुण निराकाराची उपासना करणारे यापैकी उत्तम योगवेत्ता कोण? असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देण्यासाठी भगवंतांनी दुसऱ्या श्लोकापासून ते 14 व्या अध्यायाच्या 20 व्या श्लोकापर्यंत दिलेले आहे. प्रश्न सोपा आणि सरळ वाटला तरी उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. संपुर्ण विषय समजावून घेऊन साधकाने सारासार विचार करावा असे भगवंतांनाही वाटते. सगुण आणि निर्गुण एकच आहेत हे ultimately पटावे आणि ते साध्य होण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा उहापोह भगवंतानी ह्या अध्यायात केला आहे. *

अर्जुन उवाच - एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १२.१ ॥* 

सगुण निर्गुण सगुण परमेश्वर म्हणजे गुणांसाहित, ज्याला नाम, रूप, आकार आहे असा, जसे राम, कृष्ण, पांडुरंग अशा सगुण देवतांची उपासना करणारे सगुण उपासक सगुणाचे बोट धरून उद्धरून जाणारे नामदेव महाराज हे भक्तश्रेष्ठ हे सगुण भक्ताचे उदाहरण म्हणता येईल 

निर्गुण परमेश्वर म्हणजे गुणरहित, ज्याला नाम, रूप, आकार नाही असा, थोडक्यात जो दिसत नाही असा त्यामुळे तो दाखवता येत नाही पण अनुभवास येतो. निर्गुण परमेश्वराची उपासना करणारे निर्गुण उपासक मी म्हणजे देह नाही तर आत्मा आहे हाच दृढ विश्वास ठेवून त्या स्तिथीस पोहोचणारे रमण महर्षी हे अगदी अलीकडचे उदाहरण निर्गुण भक्ताचे म्हणता येईल. 

परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे एकमेव सत्य आहे तो दिसला नाही तरी अनुभवाला नक्की येतो. त्याला क्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या उपाधीतून प्रकट व्हावे लागते. तो अनंत रूपे आणि अनंत वेशातून प्रकट होतो. चैतन्य उपाधीमध्ये गुप्त असते आणि चैतन्य आहे म्हणूनच माणूस, पशु, पक्षी, झाडे काम करताना दिसतात. तसेच आनंद, शक्ती, ज्ञान हे दाखवता येत नाही पण अनुभवता येते. आनंदाला प्रकट होण्यासाठी चेहऱ्याची गरज असते. तसेच निर्गुणाला प्रकट होण्यासाठी माध्यम लागते. 

हे कळण्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे वीज. वीज दिसत नाही पण तिच्या शक्तीला प्रकट होण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणंची गरज असते. ती दिसत नाही पण अनुभवास येते. ती जेंव्हा बल्ब मधून प्रकट होते तेव्हा प्रकाश देते, हिटर मधून प्रकट होते तेंव्हा उष्णता देते, फ्रीज मधून प्रकट होते तेंव्हा थंडावा देते. म्हणजे जसे उपकरण तसा आविष्कार, मात्र वीज सगळीकडे सारखी असते. अगदी तसे निर्गुण- चैतन्य सगळ्या उपाधीमध्ये गुप्त , सगळीकडे सारखे पण जशी उपाधी तसा अविष्कार. 

अर्जुनाने सगुण साकाराची उपासना करणारे की निर्गुण निराकाराची उपासना करणारे यापैकी उत्तम योगवेत्ता कोण? असा प्रश्न विचारला असला तरी तुम्ही कुणाची उपासना करू शकता हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. दोन्ही मार्ग भगवंतापाशी पोचणार आहेत. माझ्या प्रकृतीला कोणता मार्ग चांगला ह्याचे मार्गदर्शन सद्गुरू करतात. निर्गुण उपासना खडतर आहे, सगळ्यांना जमण्यासारखी नाही म्हणून सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असा दृढ विश्वास संत देतात. 

माउली तर म्हणतात: तुज सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ! 

 

२८ जुलै २०२०

 

अध्याय १२, श्लोक २

अर्जुन जेंव्हा भगवंतांना विचारतो की सगुण साकाराची उपासना करणारे की निर्गुण निराकाराची उपासना करणारे यापैकी उत्तम योगवेत्ता कोण?

नकळत आपणही स्वतःचा विचार करायला लागतो आणि ठरवतो की मी सगुण भक्त आहे. भगवंताचे उत्तर ऐकून एकदा स्वतःला पडताळून पहावे की खरच आपण असे आहोत का?

श्रीभगवानुवाच

मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते।श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः|

ह्या श्लोकातून 3 मुद्दे सांगितले

जो भक्त

१  मन परमेश्वरात ठेवतो

२ नित्यनिरंतन उपासना करतो

३ नितांत श्रद्धेचा भाव त्याच्यात असतो

नवव्या अध्यायात भगवंतांनी अनन्य भक्ताची जी लक्षणे सांगितली असा अनन्य- न अन्य भक्त त्याला प्रिय असतो. संत मीराबाई, संत नामदेव, रामकृष्ण परमहंस अशी अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. अभ्यास वर्गातील साधक सुद्धा अशा भक्तांच्या कथा आपल्याला सांगणार आहेतच.

भक्त आपले कर्म परमेश्वराला अर्पण करतात, सर्वत्र त्यालाच पहातात,, कधीही कोणत्याही क्षणी विसरत नाहीत, त्यांचे जीवन परमेश्वरमय झालेले असते, त्यांच्या भक्तीमध्ये खंड पडत नाही, परमेश्वरचिंतनात जीवन व्यतीत करतात.

एकच ध्यास परमेश्वराचा - न अन्य

 निसर्गातही अनन्यतेची अनेक उदाहरणे आहेत. आज 2 फुले आणि 2 पक्षांची उदाहरणे पाहूया.

 सूर्यफूल आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सुर्याबरोबर उमलते आणि सुर्याबरोबर मिटते. एकटक सूर्याकडे पहात असते.

एकच ध्यास सूर्याचा- न अन्य

 तसेच ब्रह्मकमळ एका रात्रीचे आयुष्य फक्त पण चंद्र उगवल्यानंतर उगवते, चंद्राकडे पहाते आणि सकाळी कोमजते.

एकच ध्यास चंद्राचा - न अन्य

 आपल्या सर्वांना माहीत आहे चातक पक्षी, फक्त पावसाचे पाणी पितो, बाकी कुठलेही नाही. पाऊस जमिनीवर पडायचा आत तो पावसाचे थेंब प्राशन करतो. चातकासारखी वाट पाहणे हा वाक्प्रचार म्हणूनच पडला असावा.

 एकच ध्यास पावसाचा - न अन्य

 तसेच चकोराचे असते. असे म्हणतात की

सर्व जग जेव्हा गाढ झोपी जातं तेव्हा डोंगर-पहाडांमध्ये चंद्राची शीतल किरणं डोकावून पाहत असतात. चंद्राच्या याच उपलब्धीचा फायदा भूतलावर सर्वाधिक कोणी घेत असेल तर भारतीय तत्वचिंतक आणि कवींच्या दृष्टीनो तो भाग्यवान जीव म्हणजे चकोर. या चकोर पक्ष्याविषयी एक वदंता आहे. मध्यरात्री सारं जग निद्रीस्त असताना हा चकोर नामक इवलासा पक्षी झाडावर बसून उभी रात्र चंद्राकडे बघत त्याच्या किरणांचं अमृतपान करतो. चंद्राची शीतल किरण म्हणजे त्याचं खाद्य. पृथ्वीवर बसून हा चकोर चंद्राकडे डोळ्यात प्राण आणून रात्रभर बघत बसतो. चंद्रावर तो एकतर्फी प्रेम करतो , असं त्याचं वर्णन भारतीय साहित्य करत. विशेषकरून माऊलींनी ते केले आहे.

ह्या चकोरचा एकच ध्यास चंद्राचे चांदणे - न अन्य

 ह्याच उदाहरणांप्रमाणे सगुण भक्त असतात, ज्यांना एकच ध्यास असतो - कैवल्याचा- अनंताच्या भेटीचा आणि म्हणूनच भगवंताला ते अतिशय प्रिय असतात.

‘‘कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर ,

चंद्र व्हा हो पांडुरंगा ,मन करा थोर…

…पांडुरंग पांडुरंग मन करा थोर’’

२९जुलै, श्रावण बुधवार

अध्याय १२, श्लोक ३ आणि ४

अर्जुन जेंव्हा भगवंतांना विचारतो की सगुण साकाराची उपासना करणारे की निर्गुण निराकाराची उपासना करणारे यापैकी उत्तम योगवेता कोण? तेंव्हा भगवंत दोन्ही साधनांबद्दल आणि त्यांच्या फळामध्येही भेद आहेत त्याबद्दल सांगतात. आज निर्गुण ब्रह्म उपासकाबद्दल सांगणार आहेत.

श्रीभगवानुवाच

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तंपर्युपासते ।सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ ३ ॥

सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः |

ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः || ||

निर्गुण उपासकाबद्दल 3 गोष्टी सांगितल्या आहेत

१ इंद्रियनिग्रह

२ विषय भोगापासून निवृत्ती त्यामुळे मन शांत

३ सर्व भूतमात्रांचे हितात रत आणि समबुद्धी

ही उपासना ज्ञानजन्य आहे कारण उपासक आणि उपास्य भिन्न रहात नाहीत. सगुण उपासनेमध्ये भक्त हा वेगळा आणि भगवंत वेगळा असतो. पण निर्गुण उपासनेमध्ये भक्ताला परमेश्वर व्हायचे असते म्हणून हा मार्ग कठीण आहे. अनेक जन्मांच्या खडतर तपस्येनंतर तो हे साध्य करतो.

जसे दुधात तूप आहे असे कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही कारण ते दिसत नाही पण जो जाणकार आहे, माहितगार आहे त्याला नक्की माहीत असते की दुधावर अनेक प्रक्रिया केल्यावर तूप मिळणे शक्य आहे आणि मंथन करून दूध तापवून, दही लावून, घूसळून, लोणी काढून ते काढवून तूप नक्की मिळते तसेच हा ज्ञानी स्वतःवर अनेक प्रयोग करून, जन्मोजन्माची तपस्या करून, इंद्रिय आणि मनोनिग्रह करून फक्त आणि फक्त परमेश्वराचा ध्यास नित्य निरंतर केल्यामुळे त्याच्या सारखाच होतो.

अशी समजूत आहे की कुंभारीण माशी पिल्लांसाठी खायला अळी आणून ठेवते. पण ती अळी माशीला बघून बघून तशीच होते तसे भक्त देवाला बघून बघून शेवटी देव होतो , वेगळा रहात नाही.

एकदा गोविंदाचा छंद किंवा ध्यास लागला की मग सगळेच गोविंदमय होऊन जाते- देह, मन आणि अस्तित्व. ज्या वस्तूचा तुम्हाला ध्यास लागतो तसे तुम्ही होता, आम्हाला विषयाचा ध्यास असल्यामुळे आम्ही विषयासक्त आहोत । संतांना पांडुरंगाचा ध्यास होता म्हणून ते पांडुरंग झाले. निर्गुण उपासना करणाऱ्या भक्ताला परमेश्वराचा ध्यास लागतो त्यामुळे अनेक प्रयत्नांती तो परमेश्वर होऊन जातो असे इथे भगवंत सांगतात.


३० जुलै, श्रावण गुरुवार

|| श्रीसद्गुरु महाराज की जय ||

अध्याय १२, श्लोक ५

निर्गुणब्रह्मउपासनेमुळे मोक्षप्राप्ती होते असे कळल्यावर अर्जुनाच्या मनात विचार येतील म्हणून लगेच भगवंतांनी सांगितले की अरे बाबा तुला वाटते तितके हे सोपे नाही.

 

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥

सगुण उपसनेमध्ये रूपाचे अलंबन आहे, विविधप्रकारे भाव  उत्कट होतो परंतु निर्गुण उपसनेमध्ये  स्वरूप डोळ्याला दिसत नाही, बुद्धीला आकलन होत नाही म्हणून ही साधना अवघड आहे, ह्यात क्लेश आहेत. सद्गुणांची, दृढ श्रद्धेची आवश्यकता आहे म्हणून ही कठोर तपश्चर्याच आहे. अनेक प्रतिबंध आहेत, अवघड आहे पण ती अशक्य नाही. ती साधना करण्यासाठी प्रथम त्याचे साधन सगुणब्रह्मउपासना आहे ती कर असे भगवंत आता सांगणार आहेत.

तुकोबा म्हणतात जर कोणाला येथे श्री हरीला प्राप्त करून घ्यायचे असेल, त्यासाठी त्याला देहावर उदार व्हावेच लागते. देशाभिमान सोडावा लागतो.

बासरी हे भगवान श्रीकृष्णाच्या हातात शोभलेलं एक लोभस वाद्य. कान्ह्याच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया. अर्थात् ती बासरीची किमया की कान्ह्याची हे सांगणं अवघडच. ह्या बासरीविषयी एक कथा वाचण्यात आली ती अशी की कृष्णाचं बासरीवरच सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीला विचारलंच की आम्ही असताना कान्ह्याचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासरीने उत्तर दिलं की मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू केव्हाच बाहेर गेलेले आहेत. सातवे छिद्र म्हणजेच बासरीचे मुखरंध्र, तिथून केवळ कान्ह्याने फुंकर मारली तरच आवाज येतो म्हणजे मला स्वतःचा आवाज नाही म्हणूनच मला अहंकारही नाहीच. म्हणूनच कान्ह्याला मी जास्त जवळची आहे

जर भगवंत प्रिय होण्यासाठी प्रत्येक वस्तूला परीक्षा द्यावी लागत असेल तर प्रिय भक्त - निर्गुणब्रह्मउपासक होण्यासाठी क्लेश तर होणारच.

ज्यला देहाभिमान नसतो, अहंकार नसतो, जो स्व विसरून फक्त त्याचा होऊन जातो असा उपासक भगवंताला प्रिय असतो असे भगवंत इथे सांगतात.

करा

___________________________________________________--

३१ जुलै, श्रावण शुक्रवार

अध्याय १२, श्लोक ६ आणि ७

 भगवंत सगुणरूपाचे कथन करून आपल्या भक्तांचा शीघ्र उद्धार करण्यासाठी प्रतिज्ञा करतात.

ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्ये नैव योगेन मां ध्यायन्त उपासते ||

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ||

इथे पहिल्या श्लोकात भक्त कसा हवा हे भगवंत सांगतात आणि दुसऱ्या श्लोकात जर भक्त तसा असेल तर भगवंत त्याच्यासाठी काय करतात  हेही सांगतात.

सर्व कर्मांचा त्याग करून मतपरायण होऊन, भक्ताचे मन आणि चित्त फक्त परमेश्वरात तल्लीन झाले असेल तर आणि तो फक्त परमेश्वराचे ध्यान करत असेल तर परमेश्वर भक्तांचा उद्धार करतो.

जसे मांजराचे पिल्लू फक्त आईवर विश्वास ठेवून शांत रहाते.सारा भार आईवर टाकते. पण मांजर पिल्लाची काळजी रात्रंदिन  करते. अगदी इकडून तिकडे उचलून ठेवते त्याप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताची काळजी घेत असतो.

आपल्याला अनेक संतांची उदाहरणे माहीत आहेत, संतांनी जीवापाड भक्ती केली आणि परमेश्वरानीही त्यांचा लौकिक आणि पारलौकिक सांभाळले. भक्तांसाठी पाणी भरले, मडकी घडवली, जात्यावर दळले अशी अनंत उदाहरणे आहेत.

नदी आणि समुद्राचे नाते असेच म्हणता येईल. नदी अगदी थेंबापासून चालू होते आणि वाट काढत काढत मार्गक्रमणा करत असते. ध्यास एकच असतो समुद्र भेटीचा. मार्गक्रमणा इतकी सोपी नसते, अनेक खाचखळग्यातून जावे लागते. कधीकधी तर समोर डोंगर येतो पण त्यामुळे न खचता ती त्याला वळसा घालून पुढे जाते. नदी कधीही मागे गेलेली ऐकिवात नाही. ती फक्त पुढे आणि पुढेच जात रहाते जोपर्यंत ध्येय गाठत नाही. एकदा समुद्राला मिळाल्यावर तिचे नदी हे अस्तित्व संपते, नदीपण संपते. ती समुद्रच होऊन जाते. समुद्रही तिचे दोन्ही हातांनी स्वागत करतो आणि तिला सामावून घेतो.

१ ऑगस्ट, श्रावण शनिवार

अध्याय १२, श्लोक ८

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥

शब्दार्थ: मन आणि बुद्धी माझ्यात प्रविष्ट कर, त्यानंतर तू माझ्यातच निवास करशील ह्यात काही संशय नाही.*

मन आणि बुद्धी भगवंतामध्ये कसे लावायचे?

कोणत्याही विषयात प्रथम बुद्धी निश्चय करते आणि मग मन स्वीकार करते. "मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत" असा संबंध झाल्यावर मी पण भगवंतांत लागल्याने मन आणि बुद्धी दोन्ही भगवंतात लागतात. मनाच्या अंतर्गत चित्ताचा आणि बुद्धीच्या अंतर्गत अहंकाराचा अंतर्भाव आहे. मन बुद्धी भगवंतांत लागल्याने अहंकाराचा आधार स्वयं भगवंतांत लागेल म्हणून " मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत" असा भाव उत्पन्न होईल. या भावात स्थित झाल्यावर मी पणा लीन होऊन जाईल.

साधारणपणे समज असतो की अनेक साधना केल्यावर भगवंत प्राप्ती होईल हा गैरसमज भगवान दूर करतात. मन बुद्धी माझ्यात लावणे जितके महत्वाचे, तितक्या साधना हे ध्येय नाहीत हेच सांगायचे आहे.

जीवाचा स्वभाव असा आहे की जिकडे मन बुद्धी तिकडे स्वयं जातो. संसाराला महत्व दिल्यामुळे मन बुद्धी तिकडेच लागते म्हणून जीवाला संसारातून हटवण्यासाठी भगवंत मन बुद्धी भगवंतांत लावण्याची आज्ञा देतात.

भगवंतात प्रथम मन लागते मग बुद्धी मग स्वयं लागतो आणि मग अहं संपतो.

प्रेमात मन लागते आणि श्रद्धेमध्ये बुद्धी लागते. भगवंतांत प्रेम आणि श्रद्धा म्हणजे संसाराची प्रियता आणि महत्व न राहता भगवंतांत लागते. बुद्धीचा निश्चय महत्त्वाचा आणि मनाचे रमणे महत्वाचे त्यामुळे एकदा बुद्धीने ठरवले आणि त्याचे महत्व पटले की मन त्यात रमते. जे मन बुद्धी आत्ता संसारात आहेत ते भगवंताकडे लागते. मनाचे आणि बुद्धीचे जेंव्हा ऐक्य होते तेंव्हाच आनंदाची प्राप्ती होते

आपल्या सर्वांना माहीत आहे की मुलं जन्माला यायचा आधीपासूनच सर्वार्थाने आईशी जोडलेले असते. जन्मल्यानंतर सुद्धा सर्वार्थाने आईवरच अवलंबून असते. आई जे म्हणेल ते करत असते, अजून मन बुद्धी ही आईमध्ये स्थित असते त्यामुळे ते आनंदी असते, निवांत असते, शांत असते.

जसजसे मोठे होऊ लागते तसतसे त्यांच्या मन आणि बुद्धीवर अनेक संस्कार होतात आणि मन बुद्धी अभ्यासात, मित्रांमध्ये, बाहेर वळते आणि आईशी असलेले अनुसंधान कमी कमी होत जाते. संसार रहाट गाडग्यात गुंतत जात ते अनुसंधान संपते आणि आनंद आणि शांतीही संपते.

तसेच आनंदस्वरूप असणाऱ्या माझे झाले आहे म्हणून भगवंत पहिली आज्ञा करतात की मन आणि बुद्धी माझ्यात प्रविष्ट कर, त्यानंतर तू माझ्यातच निवास करशील ह्यात काही संशय नाही.

२  ऑगस्ट २०२० 

अध्याय १२, श्लोक ९

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥

जर मन बुद्धी माझ्यात स्थित करण्यास असमर्थ असशील तर अभ्यासयोगाने स्थिर करण्याचा प्रयत्न कर.

मन बुद्धी स्थिर कर हे वाचायला आणि ऐकायला सोपे वाटले तरी करायला अवघड आहे याची भगवंताला ही कल्पना आहे म्हणून अभ्यासयोगाबद्दल ते इथे सांगतात.अभ्यासबद्दल भगवंतांनी सहाव्या अध्यायात सांगितले पण इथे ते अभ्यासयोगाबद्दल सांगत आहेत. 

आपल्या सर्वांना अभ्यासाची सवय आहे. कुठलेली काम वारंवार करणे म्हणजे अभ्यास. अभ्यास केला असता कोणतीही वस्तु प्राप्त होतेच. शाळेतला अभ्यास असेल, कुठलीही कला असेल, संसारात लागणाऱ्या कुठल्याही गोष्टी असतील जसे driving, कुकींग असेल, ऑफिस मधल्या गोष्टी असतील किंवा अगदी सिद्धी प्राप्त करणे असेल ह्या सगळ्या अभ्यासाने प्राप्त होतात. पण ह्या सर्व संसारासाठी उपयोगी असतात. त्या आपण आपल्यासाठी करतो.

पण जेव्हा अभ्यास भगवंताशी जोडला जातो किंवा भगवंतप्राप्तीकरता केला जातो तेंव्हा त्याला अभ्यासयोग म्हणतात.

भगवंत म्हणतात जर जर मन बुद्धी माझ्यात स्थित करण्यास असमर्थ असशील तर अभ्यासयोगाने दिवसातले काही प्रहर, काही क्षण माझ्यात लाव आणि त्या आनंदाचा अनुभव घे. जसे शरद ऋतू सुरू झाला की नद्यांचे पाणी आटते तसे हळूहळू माझ्यात मन गुंतेल आणि प्रपंचातुन बाहेर पडेल.

पक्षांचे उडायला शिकणे, एकेक कडी गोळा करून घरटी बांधणे, बगळ्याचे भक्ष्य पकडण्यासाठी एका पायावर उभे रहाणे, प्राण्यांचे जन्मल्यावर  स्वतः च्या पायावर उभा रहाणे, मुंग्यांचे कितीही अडथळे आले तर लक्षापर्यंत पोचणे ही अभ्यासाची उदाहरणे निसर्गातही पाहायला मिळतात. पण प्राणी आणि पक्षांमध्ये बुद्धी किंवा intelligencia नसल्यामुळे ते अभ्यासयोग करू शकत नाहीत.

तो पुरुषार्थ फक्त मानवाला दिलेला आहे म्हणून भगवंत म्हणतात की अभ्यासयोगाने तुला मनाला वळण  नक्की लावता येईल.

३ ऑगस्ट २०२०

अध्याय १२, श्लोक १०

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ 

जर अभ्यास करण्यास असमर्थ असशील तर प्रत्येक कर्म ईश्वरासाठी कर, हेच मुख्य कर्तव्य समज कारण माझ्यासाठी कर्म केल्याने सिद्धी-चित्तशुद्धी-योग-ज्ञानप्राप्ती या क्रमाने मोक्षास प्राप्त होशील.

मला वाटत, सर्व साधनांमध्ये प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाला शक्य असलेला हा मध्यवर्ती मार्ग आहे. प्रत्येक सुख उपभोगण्याची तुला मोकळीक आहे पण कायावाचामनाने ते मी करतो असे म्हणू नको. माउलींनी अत्यंत सुंदर उदाहरण दिले आहे की माळी जिकडे नेईल तिकडे पाणी निवांतपणे जाते, त्याप्रमाणे मनातील कर्तृत्वाभिमान टाकून आपणही व्हावे. प्रत्येक कर्म कमी किंवा जास्त न म्हणता एकनिष्ठेने  भगवंताला अर्पण करावे.

कर्म अर्पण करणे यासाठी निसर्गासारखा गुरू नाही.

सूर्य प्रकाश आणि उष्णता देतो आणि कित्येक जीवांना जगवतो,  चंद्र शीतलता देतो आणि रात्री वनस्पतीमध्ये अन्न तयार करतो, झाडे छाया देतात, फुले, फळे देतात, नदी स्वतः मार्गक्रमणा करता करता अनेक गावांना जीवन आणि पाणी देते. आकाश छत्र देते तर वायू सर्वांना हवा देतो. निसर्गातील प्रत्येक घटक (माणूस सोडून) निस्वार्थीपणे स्वधर्म पाळत असतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक घटक आपले कर्म करत असतो  तेही नित्य निरंतर न थकता आणि महत्वाचे न कुरकुर करता. माणसांच्या अनेक पिढया येतात आणि जातात पण निसर्गातील प्रत्येक घटक अविरत कर्मात मग्न असतात.

ह्यातून कुणाला वाटेल निसर्गातील घटकात आमच्यासारखी मन बुद्धी नाही म्हणून ते उत्कृष्ट वागू शकतात, आम्ही तसे वागू शकत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी सृष्टीची निर्मिती अशी केली आहे की माणसानी त्यातून बोध घ्यावा. अवधूत गुरूदेव दत्तांनीही २४ गुरू केले त्यातील २० हे निसर्गातील घटक होते.

४ ऑगस्ट २०२० 

अध्याय १२, श्लोक ११

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ 

अर्जुनाला निमित्त करून भगवंतांनी समस्त मानव जातीला ४ साधने सांगितली

समर्पणयोग, अभ्यासयोग, भगवतकर्म-अनुष्ठान आणि सर्वकर्मफलत्याग

चारही साधने भगवत प्राप्तीची असली तरी साधकांची आवड, श्रध्दा, विश्वास आणि योग्यता वेगवेगळी त्यामुळे साधना वेगळ्या सांगितल्या आहेत. इथे कर्मफळाचा त्याग सांगितलेला नाही तर कर्मफळाच्या इच्छेचा त्याग सांगितला आहे.

सर्वकर्मफलत्याग सांगितला म्हटल्यावर कर्मच करावे की नाही अशी काही जणांची धारणा होईल. पण कर्म तर उत्तम करायचं आणि फळाची अपेक्षा नाही म्हणजे काही कर्म केल्यावर ते कसे मिळेल, कधी मिळेल, जास्त-कमी मिळेल ह्या बद्दलच्या आपल्या अपेक्षा असतात त्या ठेऊ नये असे भगवंत सांगतात. कर्म केले म्हटल्यावर फळ नक्कीच मिळणार तुम्हाला पाहिजे असो वा नको. आपलं चुकतं कुठे की कर्म केले ना केले तोवर फळाची अपेक्षा करतो, अती चिंतन करतो, अपेक्षा करतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हटल्यावर दुःखी होतो, हीच cycle असते.

म्हणून भगवंत म्हणतात कर्म मनापासून कर, भगवंतासाठी कर. कर्माचा उद्देश ठरवण्याचा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचा अधिकार तुला आहे, कर्माची पद्धत आणि वेग ठरवणं तुझ्या हातात आहे पण फळ कसं मिळेल, किती वेळात मिळेल, केव्हा मिळेल हे ठरवू नको. निरुद्देश कर्म कर असं गीता सांगत नाही. कर्माला उद्देश हवा--}दिशा फलाकडे नेणारी हवी --} योग्य प्रयत्न त्यादिशेने हवा --} पण फळाच्या बाबतीत अपेक्षा नको. उत्कृष्ट काम केल्यावर लौकिक फळ मिळणारच आहे पण त्याहीपेक्षा तन्मयतेचा आनंद आणि समाधान हे मोठे फळ मिळणार आहे. जसे व्यवहारात हे applicable आहे त्यापेक्षा जास्त उपासनेच्या बाबतीत आहे, भगवंताना आपल्याला हात धरून सकाम उपासकाकडून निष्काम उपासक कसा असतो हे सांगायचे आहे.

इथेही निसर्गाचेच उदाहरण देता येईल. वृक्ष आणि वेली ज्याप्रमाणे फळे आली असता त्यावर स्वतःचा अधिकार गाजवत नाहीत, आशा न धरता ती ज्याला हवी असेल त्याला देऊन टाकतात, नद्या पाणी देतात,  आकाश छत्र देते, वायू सगळ्यांना जगण्यासाठी oxygen देतो. झाड कापायला जरी माणूस गेला असला तरी झाडे त्याला सावली देतात. ही सर्वकर्मफलत्यागाचीच उदाहरणे आहेत.

५ ऑगस्ट २०२० 

अध्याय १२, श्लोक १२

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥ 

अभ्यास कठीण, त्यापेक्षा ज्ञान कठीण, त्याहीपेक्षा ध्यान कठीण पण कर्मांचा फळाची इच्छा सोडणे हे सर्वांपेक्षा उत्तम आणि याच टप्प्याने तो शांतीची प्राप्ती करून घेतो. सर्वकर्मफळत्यागाचे महत्व सर्वसामान्य साधकांना पटावे ह्यासाठी मागच्या आणि ह्या श्लोकात भगवंतांनी हे सांगितले. ह्याचा अर्थ बाकीच्या साधनांनी शांती मिळत नाही असे त्यांना म्हणायचे नाही. सर्व साधने उत्तमच आहेत पण वर सांगितली साधने कठीण आहेत ती उत्तम साधकांसाठी आहेत. प्रत्येकाला ती जमणार नाहीत म्हणून भगवंतांनी सर्वकर्मफलत्याग ह्या साधनावर भर दिला आहे. ह्याचे अनुष्ठान केल्याने शांती प्राप्त होते हे सांगितले आहे.

सर्वकर्मफलत्याग म्हणजे फळाचा त्याग नाही, ते कसे, कुठे,कधी मिळावे ह्या इच्छेचा त्याग

ज्यावेळी आपण कर्माचे फळ कसे मिळावे ही अपेक्षा करतो, चिंतन करतो त्यावेळी कर्म करताना सुध्दा आपले लक्ष तिकडे असते त्यामुळे कर्मावर आपण फोकस करू शकत नाही. दुसरी गोष्ट 99% वेळा अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही त्यामुळे दुःख, निराशा, चिडचिड पदरात पडते आणि आनंद, समाधान सोडाच शांतीही निघून जाते. त्यामुळे प्रत्येक कर्म मग ती उपासना का असेना आनंद नाही stress जास्त असे होते.

लहान मुले खेळतात तेंव्हा exercise करायचा म्हणून खेळत नाहीत. मजा म्हणून खेळतात पण त्याचा side effect म्हणून ultimately exercise होतोच. पण खेळातून मला काय मिळणार हा विचार न केल्याने ती खूप enjoy करतात आणि खुश असतात. Process महत्वाची असते त्यामुळे आनंदही मिळतोच.

ही विचारशैली उपासनेसाठी महत्वाची आहे त्यापेक्षा ती व्यवहारात जास्त उपयोगी आहे. लहान मुले, sports आणि सर्व क्षेत्रात ती उपयोगी आहे. ही जीवनशैली व्हावी.

Zentangle Art आणि ZiA ह्यासाठी हीच philosophy implement केली आहे.  चित्र काढताना चित्र कसे होईल हा विचार न करता चित्र सुरू करायचे. एका वेळी चित्रातल्या एका भागावर लक्ष द्यायचे. असे करत करत चित्र पूर्ण करायचे. इतक्या focus नी चित्र काढल्यामुळे ते सुंदरच होते आणि चित्र कसे होईल हा विचार नसल्याने ते आवडतेही. ही human सायकॉलॉजी आहे. गुगली आहे. भगवंतांनी सांगितलेली ही गुरुकिल्ली आहे

६ ऑगस्ट २०२० 

अध्याय १२, श्लोक १३-१४

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र: करुण एव च । निर्ममो निरहंकार: समदु:खसुख: क्षमी ॥

संतुष्ट: सततं योगी यतात्मा दृढनिश्चय: । मय्यार्पितमनोबुद्धियों मद्भक्त: स मे प्रिय: ॥

ह्या श्लोकामध्ये सांगितलेले १० गुण असणारा भक्त मला प्रिय आहे असे भगवंत सांगतात.

कोणत्याही प्राण्यांचा द्वेष न करणारा, सर्वांशी मित्रत्वाने रहणारा, दया करणारा, निर्मम आणि निरहंकार सुख-दुःख सारखी वाटणारा, क्षमा करणारा, सदा संतुष्ट, यतात्मा योगी, दृढनिश्चयी, माझ्यामध्ये मन आणि बुद्धी स्थिर करून राहिलेला असा भक्त मला प्रिय आहे.

वाचताना असे लक्षात आले, I have long way to go. ह्यापैकी एकेक गुणावर कित्येक वर्ष अभ्यास करावा लागणार आहे. सगळ्या नाही पण काही गोष्टी मी आत्ताही करते, माझे मैत्र काही जणांवर आहे, करुणा काही जणांची वाटते, माझ्या मनासारखे झाले की मी संतुष्ट असते, काही बाबतीत दृढ निश्चय असतो, कधी कधी शांतही असते, ही जणांना क्षमा करते, काही गोष्टीचा मोह नाही. पण ह्या सगळ्यात काही आहे, सेलेक्टिव्ह पणा आहे, आवड निवड आहे, मी आणि माझे आहे. 

पण भक्तांच्या लक्षणात विश्वची माझे घर असल्यामुळे संकुचितपणा नाही, selective पणा नाही, आवड निवड नाही, हे भाव सदा सर्वकाळ आहेत. मुख्य मी आणि माझे नाही त्यामुळे हा सर्वसमावेश भाव सहज आला आहे. मला जर भगवंताचा प्रिय भक्त व्हायचे असेल सगळ्यात पहिल्यांदा मी आणि माझे वर काम करावे लागेल त्यानंतर बाकी गुण येतील.

निज प्रभुमय देखहिं जगत केहि सन करहिं बिरोध’ असा भक्त असल्यामुळे भगवंताशिवाय दुसरा विषयच नाही. मैत्र आणि करुणा हे दोन गुण भक्तांची खासियत आहे. भगवंत फक्त प्रेमाचा भुकेला आहे म्हणून भक्त त्याला खूप प्रिय असतात.

भक्त लक्षणांचा विचार केला असता, सर्वप्रथम डोळयांसमोर मूर्ती येते ती माउलींची. आपल्या सर्वांना त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर आहेच. ह्यातील प्रत्येक लक्षण जणूकाही माउलीकडे बघून लिहावे असे त्यांचे चरित्र आहे. संपूर्ण समाजाने इतका त्रास दिला तरी द्वेष नाही उलट प्रेम आणि करुणाभाव. इतकं ज्ञान असूनही अहंकार नाही- प्रत्येकवेळी श्रेय सद्गुरूंना, इतका समाजानी त्रास देऊनसुद्धा क्षमा केली आहे, इतकं दुःख वाट्याला येऊनसुद्धा त्याच समाजाच्या उद्धारासाठी ग्रंथनिर्मिती आणि प्रबोधन केले आहे. भगवंताशी तर इतकी एकरूपता की भगवंत कोण आणि भक्त कोण हा प्रश्न पडावा. म्हणूनच ह्या दयाघनाला माउली म्हटले नसते तर नवल!!

७ ऑगस्ट २०२० 

अध्याय १२, श्लोक १५-१६

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ 

ज्याच्यापासून कोणी उद्विग्न, क्षोभीत होत नाही आणि जो कुणामुळे उद्विग्न, क्षोभीत होत नाही. हर्ष, भय, क्रोध, खेद यापासून मुक्त असतो. तो मला प्रिय आहे.

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ 

अनपेक्ष, शुचि, दक्ष, उदासीन, निर्भय, ह्या लोकी आणि परलोकीच्या फलासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्माचा त्याग करणारा भक्त मला प्रिय आहे.

ह्या दोन श्लोकात मिळून दहा लक्षणे भगवंतांनी सांगितली. ह्या दोन्ही श्लोकासाठी माउलींनी अनेक सुंदर दृष्टांत दिले आहेत.

१. 

जसे समुद्र रागावला असता जलचरांना भीती वाटत नाही व जलचरांचा समुदाय वाढला असता समुद्र कंटाळा करीत नाही. त्याप्रमाणे उन्मत्त जगाचा त्याला आणि त्याचा जगाला त्रास होत नाही.

२.

शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे जग हे शरीर बनल्यामुळे त्याला आवड नावड भेद रहात नाही. द्वैतभाव नाहीसा झाल्यामुळे हर्ष, भय, क्रोध, खेद यापासून मुक्त असतो.

३.

आकाश जसे सर्वव्यापक असून अलिप्त असते त्याप्रमाणे त्याचे मन असते.

४.

सुर्याप्रमाणे तो अंतर्बाह्य निर्मळ असतो.

५. 

पारध्यापासून सुटलेल्या पक्षासारखा निर्भय असतो. त्याप्रमाणे संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरिच्छ झालेला असतो.


ज्ञानेश्वरीमध्ये माउलींनी फार सुंदर ओव्या लिहिल्या आहेत. जरूर वाचा.

वरील सर्व लक्षणावरून एक मूर्ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे शांतिब्रह्म एकनाथ महाराज.

थुंकणाऱ्या माणसाची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, तसेच अनेक गोष्टीत अनेक लोकांनी त्यांची परीक्षा घेतली पण कोणत्याही गोष्टींनी ते उद्विग्न झाले नाहीत. इतके करुणामय अंतःकरण की त्यांनी कोणाला दुखावल्याचे ऐकिवात नाही. समाजातील अनेक वाईट रूढीविरुद्ध त्यांनी जनजागृती केली कोणालाही न घाबरता. क्रोधाने कधी त्यांची भेट घेतलीच नाही. त्यांना राग येईल म्हणून एक माणूस त्यांच्या पत्नीच्या पाठीवर बसला हा प्रसंग सर्वांना माहीत आहेच. प्रत्येक गोष्ट परमेश्वरासाठी त्यामुळे भय आणि खेद कधीच नाही. 

सर्वांचा आत्मा एकच असतो, त्याचा आदर केला पाहिजे. केवळ माणसांपुरता हा नियम नसून पशुपक्ष्यादिकांच्या संदर्भातही हे जाणले पाहिजे. "आत्म्याच्या एकत्वाचे रहस्य जाणून जाणत्या पुरुषाने आपले वर्तन सर्वांसाठी समदृष्टी या न्यायाने ठेवावे", हा विचार एकनाथांनी केवळ सांगितला नाही तर कृतीतून दाखविला.

बाकी संतांच्या मानाने सांपत्तिक स्थिती उत्तम पण अनपेक्ष. त्यांच्यासारखा अंतर्बाह्य शुद्ध, पवित्र दुसरे कोण? गृहस्थाश्रमी असल्याने सर्व कर्तव्ये  व्यवस्थित पार पाडली. त्यांचे संपूर्ण जीवन पहाता आदर्श जीवनाचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. वर सांगितलेली सर्व लक्षणे त्यांना तंतोतंत लागू पडतात. म्हणून भगवंत म्हणतात त्याच्यावरून मी पंचप्राण ओवाळून टाकतो इतका तो मला प्रिय आहे. एकनाथ महाराजांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. नाथांच्या जीवनात प्रवृत्ती आणि निवृत्ती हातात हात घालून जात.  ब्रह्मसाक्षात्कार व्हावयाचा असेल तर शांतिब्रह्म आधी आत्मसात होणे आवश्यक कसे आहे, जीवनात तोल न ढळू देता शांतीच्या पायघड्यांवरून जाणे कसे योग्य आहे, हे नाथांच्या व्यक्तिमत्त्वातून जाणवत राहते. त्यातूनच त्यांचे वेगळेपण लक्षात येते. असा भक्त मला आवडतो असे भगवंत सांगतात.

८ ऑगस्ट २०२० 

अध्याय १२, श्लोक १७

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ 

भगवंतांनी ह्या श्लोकात त्यांच्या परमभक्ताबद्दल सांगितले आहे जो त्याचे मन बुद्धी ह्या अनात्म उपाधीच्या तादात्म्याचा किंवा जगाशी तदात्मचा त्याग करून आनंदरूप अशा माझ्यात दृढ झाला आहे.

त्यामुळे स्वाभाविकच अनात्म जगतापासून होणारे सुखदुःखाचे अनुभव त्याला आकर्षित करत नाहीत किंवा विचलितही करत नाहीत.

सामान्य माणूस जगाला ते जसे आहे तसे बघत नाही. त्याला काही गोष्टी प्रिय असतात तर काही अप्रिय. प्रत्येक गोष्टीकडे तो स्वतःच्या गॉगलनी पहात असतो. प्रिय गोष्टीची आकांक्षा आणि अप्रिय गोष्टीचा द्वेष असा त्याचा स्वभाव असतो. आवडती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड आणि नको त्याचा त्याग असे करतो. त्यामुळे पाहिजे ते मिळाले की हर्ष आणि नाही मिळाले की शोक करतो.

परंतु जो ज्ञानी भक्त असतो तो ह्या समस्त विकारांपासून, प्रतिक्रियांपासून अलिप्त असतो कारण तो आपल्या आनंदस्वरूप अवस्थेत स्थित असतो. त्यामुळे सुख-दुःख, राग-द्वेष ही द्वंद्व त्याच्याकरता नसतात. त्यामुळे हर्ष आणि शोक त्याला कधी होत नाहीत. हा भक्त जगाकडे यथार्थ दृष्टीने पहातो. तसेच ह्या भक्ताच्या मनात राग- द्वेष (आवड-निवड) नसल्याने शुभ अशुभ यापासून मुक्त असतो.

 हा श्लोक वाचल्यावर समोर मूर्ती येते जगतगुरु तुकाराम महाराजांची.

श्लोक वाचल्यावर-( वाच्यार्थ) असे वाटेल की कुठल्याही भावना नसलेला हा भक्त पाषाण किंवा कोरडा असतो का? तर ह्याचा लक्षार्थ समजून घेतला पाहिजे की भावना सगळ्या असतात पण तो त्यात वाहून जात नाही. बुद्धीने तो भावनांना आवर घालू शकतो म्हणून त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात प्रज्ञा स्थिर झालेली असते. म्हणून असा भक्त भगवंतांना आवडतो.

आजच्या काळात आपल्याला प्रभू श्रीरामांप्रमाणे अचाट साहस करायचे नसले तरी केवळ स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करायचा असेल तर एखादी कृती आपल्याकडून वा दुसऱयांकडून झाली तर इतकंच करायचं, "आपण जर त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं?" किंवा एखादी कृती कितपत चूक वा बरोबर हे ठरविण्यापेक्षा "काय केल्याने समोरच्यास व्यवस्थित परिस्थितीचे आकलन होईल?"  याचा विचार एकदा तरी अवश्य करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधी त्या व्यक्तीची पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायची किंवा घडत असलेल्या घटनांची, हार न मानता, पूर्णपणे शहनिशा करायची. हे सारं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपलं मन, बुद्धी स्थिर असेल, आपणांस मनुष्याची, त्याच्या भावनांची जाणीव असेल, आपल्यात अहंभावाची कमी असेल आणि मीही  चुकू शकतो/ते ही जाणीव असेल. तसेच जर कोणी याच भावनेने आपल्या पुढे नमत घेत असेल, तर तो आपल्या अहंभावाचा विजय न मानता त्या नम्रतेचे तितक्याच नम्रतेने स्वागत करून आपल्याही मनाचा मोठेपणा दाखवून द्यायचा.

स्थितप्रज्ञ होणे एक व्रत आहे. जमण्यास कठीण असे, पण जमल्यास अध्यात्मिक चैतन्य देणारे...!!! मनुष्यातील बुद्धीचा, विचार करण्याच्या शक्तीचा वापर करून अहंभाव लयास नेणारे आणि भौतिक (सत्ता, संपत्ती, खानदान) सौख्य नसून आंतरिक चैतन्य, आनंद देणारे...!!! 

९ ऑगस्टश्रावण शनिवार

अध्याय १२, श्लोक १८-१९

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥

शत्रु- मित्र यांच्याशी समान व्यवहार करणारा, मान-अपमान एकसारखे मानणारा, शित-उष्ण, सुख-दुःख यात एकसारखी भावना ठेवणारा, कोठेही आसक्ती न ठेवणारा

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥

निंदा-स्तुती समान मानणारा, वाणी नियमन करणारा, संतुष्ट, स्थिर बुद्धी असा भक्त मला प्रिय आहे.

माउलींनी निसर्गातील अनेक उदाहरणे देऊन हे खूपच छान समजावले आहे. आकाश, सूर्य, नदी, झाडे, चांदणे, मेरू पर्वत, वारा अशी उदाहरणे सांगितली आहेत. तुम्ही जरूर वाचा.

वरती विरोधाभास असणारे बरेच शब्द आले आहेत. शत्रु- मित्र, मान-अपमान , शित-उष्ण, सुख-दुःख, निंदा-स्तुती ह्या सगळ्याचा जो समत्व साधतो, आपल्या भाषेत golden mean साधतो तो भक्त मला आवडतो असे ह्या दोन श्लोकात भगवंत सांगतात.

आपल्याला सगळयांना BMI index माहीत आहे. तुम्ही विचार करत असाल त्याचा इथे काय संबंध? 

BMI index परमार्थामधला

Body, Mind, Intelligence ह्याच्या पुढे जाऊन , हे तिन्ही ज्याच्या ताब्यात असतात असा तो, जो आत्मस्वरूपात मग्न असतो तो भगवंताला आवडतो, प्रिय असतो.

शत्रु- मित्र हा मनाचा विषय, मान-अपमान हा बुद्धीचा विषय , शित-उष्ण हा शरीराचा(इंद्रियांचा) विषय, सुख-दुःख आणि निंदा-स्तुती मनाचा विषय ह्या सगळ्यात तो मध्यम मार्ग काढतो कारण देहबुद्धीची आत्मबुद्धी झालेली असते. सर्व भाव भावना असताना हा ज्ञानी भक्त कमलपत्राप्रमाणे अलिप्त, अपरिणामी स्वरूपाने राहतो म्हणून तो असंग राहतो. समदृष्टीमुळे त्याला भेद दिसत नाहीत. द्वंद्वातीत झालेला असतो. अहंकाराचा ध्वंस झाल्यामुळे अहंकारातून निर्माण झालेल्या मान-अपमान, सुख-दुःख ह्याचाही निरास होतो.

सामान्य माणसे शरीर(इंद्रिय), मन, बुद्धीच्या हिंदोळ्यावर कधी एक extreme तर कधी दुसरे असे झुलत असतात पण ह्या भक्ताची extreme कुठलीच भावना नसते. समत्व योग उच्चते असा तो असतो.

कठोपनिषदमध्ये एक सुंदर रूपक वापरले आहे. इंद्रिय-मन-बुद्धी-आत्मा यांना रथाची उपमा दिली आहे. इंद्रियरुपी घोडे, मनरुपी लगाम, बुद्धिरूपी सारथी आणि आत्मारूपी रथी. 

ह्या भक्ताचा रथ आत्मारूपी रथीच्या सांगण्यावरून चालतो त्यामुळे बुद्धिरूपी सारथी त्याचे सगळे ऐकतो. बुद्धिरूपी सारथीच्या हातात मनरुपी लगाम असतो त्यामुळे इंद्रियरुपी घोडे कधीही उधळत नाहीत.

सामान्य लोकांचे ह्याचा बरोबर उलटे असते. लगाम नसल्याने इंद्रियरुपी घोडे नेहमीच उधळलेले असतात त्यामुळे सारथी आणि रथी असहायय असतात आणि रथ कधीच सरळ जात नाही.

वरील दोन श्लोक वाचल्यावर भगवान बुद्धांची मूर्ती समोर येते


१० ऑगस्ट 2020

अध्याय १२, श्लोक २०

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ 

जे नितांत श्रद्धेने युक्त होऊन, मत्परायण होऊन अमृतरुप धर्माचे अनुष्ठान करतात ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत.

धर्म्यामृतमिदं म्हणजे काय?

जे सर्व गुण भगवंतांनी आतापर्यंत सांगितले ते गुण स्वप्रयत्नाने जाणीवपूर्वक जो प्राप्त करतो आणि सातत्याने अनुष्ठान करतो तो श्रद्दधाना मत्परमा भक्त मला अतीव प्रिय आहे असे भगवंत म्हणतात. ह्या एक श्लोकात अतीव प्रिय म्हटले आहे.

अतीव प्रिय असणारा भक्त कसा हवा?

भक्ताचे मुख्य लक्षण म्हणजे - भगवंताशी एकरुप झालेला तो भक्त. असा भक्त देहाने जरी या जगात वावरत असला तरी मनाने तो भगवंताशी एकरुपच झालेला असतो.  देह-मन-बुद्धी त्याने परमेश्वराला पूर्णपणे अर्पण केलेली असतात आणि आपल्या आयुष्यात जे काही होते ते भगवंताच्याच इच्छेने घडते असा त्याचा ठाम निश्चय असतो - मग ती गोष्ट इतरांच्या दृष्टीने चांगली असो किंवा वाईट असो, सुख असो वा दु:ख असो.

भक्ति ही सुळावरील पोळी असं तुकोबांनी जे म्हटलंय ते थोडेसे तरी आपल्या लक्षात यावे .... जरा कुठे आपले डोके दुखले किंवा ताप आला तर - हे भगवंता, वाचव रे मला !! , कुठे आहेस तू ? असे म्हणणारे आपण कुठे आणि "फुटो हे मस्तक तुटो हे शरीर | नामाचा गजर सोडू नये" म्हणणारे तुकोबा कुठे? भक्त ऐसे जाणा जे देही उदास - हे भक्ताचे मुख्य लक्षण.भक्ताला काळजी असते उपासनेची, साधनेची. संसारातल्या सुखाने तो हुरळून जात नाही वा दु:खाने खचून जात नाही. तो म्हणतो - संसार म्हटला कि सुख-दु:ख आलेच - पण हे भगवंता, मला तुझा विसर पडू देऊ नकोस... या सुख-दु:खातही मला तुझाच आठव असू दे . भक्ताचे चित्त भगवंताच्या ठिकाणी अतिशय स्थिर झालेले असल्याने भौतिक मान-अपमान, सुख-दु:खे याने तो भक्त अजिबात विचलित होत नाही. याचा अर्थ असा नाही की सर्व संवेदना हरवून बसलेला तो एक उदास मानव-प्राणी होऊन रहातो. तर आपण जेवढा मान-अपमान, सुख-दु:खाचा बाऊ करतो तेवढा तो अज्जिबात करत नाही.

असा भक्त जेंव्हा मिळतो तेंव्हा भगवंताच्याही आनंदाला पारावार राहत नाही.

तो पहावा हे डोहळे | म्हणौनि अचक्षूसी मज डोळे | हातींचेनि लीलाकमळें | पुजूं तयातें ||

दोंवरी दोनी | भुजा आलों घेउनि | आलिंगावयालागुनी | तयाचें आंग ||

माऊली म्हणतात - वस्तुतः ब्रह्म / परब्रह्म हे मुळात निर्गुण, निराकार - पण भक्ताबाबत मात्र हे परब्रह्म इतके हळवे (?) होते की विचारायची सोय नाही !!

त्या निर्गुण, निराकारालाही त्या भक्ताचा इतका मोह होतो की अगदी साकार रुप धारण करावेसे वाटते - अचक्षु (डोळे विरहित) असूनही त्याला डोळे प्राप्त व्हावे असे डोहळे लागतात - का तर तो भक्त पाहता यावा म्हणून..त्या साकाराच्या हातात कमळ का असते तर ते जणू त्या भक्ताची पूजा करण्यासाठी....

त्या साकाराला असे वाटते की या आपल्या प्रिय भक्ताला आलिंगन द्यायला दोन हात कमीच पडतील म्हणूनच की काय "चार हातांचे" (दोंवरी दोनी) असे ते (चतुर्भुज) रुपडे सज्ज होऊन येते.....

माऊलींची प्रतिभा इतकी अफाट आहे की त्या निर्गुण निराकाराला ब्रह्माला सगुण साकार का व्हावेसे वाटते याचे या दोनच ओव्यात त्यांनी असे काही प्रत्ययकारी वर्णन केले आहे. भगवंतांनी भक्त कसा असतो हे अर्जुनाला सांगितले पण त्याच भगवंतांनी माउली रुपात येऊन असा भक्त मिळाला की त्याला कसे वाटले हे सांगितले आहे.

आणि असे जर भगवंताला वाटते तर हे गुण  आत्मसात करायला आम्हालाही दहा हत्तींचे बळ यायला काय हरकत आहे? मी माझ्या परीने प्रयत्न करणार. ह्या भक्तीमध्ये किती शक्ती आहे आपण संतांच्या चरित्रातून ऐकले.  ही निष्ठा काय काय करू शकते हे पाहिले. तर ह्या श्रावण साधनेमुळे ही  माझी निष्ठा दृढ व्हावी आणि त्यादृष्टीने माझ्याकडून प्रयत्न व्हावेत ही त्याच्याच चरणी प्रार्थना. 

ज्या सद्गुरूकृपेमुळे हे सांगण्याची बुद्धी झाली आणि त्यांनीच ते करवून घेतले त्या सद्गुरूचरणी ही सेवा अर्पण.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099