अध्याय १८ : ओव्या १०५०-११२९

 २१  नोव्हेंबर २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक ५३ -५४ / ज्ञानेश्वरी ओव्या १०५०-११२९ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   


अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् । विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३॥


तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले । तयांमाजीं पहिलें । देहाहंकारु ॥ १०५० ॥
जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि । विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया ॥ १०५१ ॥
तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा । आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥ १०५२ ॥
जो विषयाचेनि नांवें । चौगुणेंही वरी थांवे । जेणें मृतावस्था धांवे । सर्वत्र जगा ॥ १०५३ ॥
तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो । परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैंचा ? ॥ १०५४ ॥
आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती । तेचि घालूनि बुंथी । आंगीं जो वाजे ॥ १०५५ ॥
जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवीं । सूनि वाघां सांपडवी । नरकादिकां ॥ १०५६ ॥
तो विश्वासें मारितां रिपु । निवटूनि घातला दर्पु । आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥ १०५७ ॥
क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु । भरिजे तंव अधिकु । रिता होय जो ॥ १०५८ ॥
तो कामु कोणेच ठायीं । नसे ऐसें केलें पाहीं । कीं तेंचि क्रोधाही । सहजें आलें ॥ १०५९ ॥
मुळाचें तोडणें जैसें । होय कां शाखोद्देशें । कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥ १०६० ॥
म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी । तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥ १०६१ ॥
आणि समर्थु आपुला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा । तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥ १०६२ ॥
जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी । जीवें दांडी घेववी । ममत्वाची ॥ १०६३ ॥
शिष्यशास्त्रादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें । घातले आहाती फांसे । निःसंगा जेणें ॥ १०६४ ॥
घरीं कुटुंबपणें सरे । तरी वनीं वन्य होऊनि अवतरे । नागवीयाही शरीरें । लागला आहे ॥ १०६५ ॥
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो । भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥ १०६६ ॥
तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे । ते कैवल्यदेशींचे आघवे । रावो जैसे आले ॥ १०६७ ॥
तेव्हां सम्यक्‌ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया । परिवारु होऊनियां । राहत आंगें ॥ १०६८ ॥
प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं । कीजत आहे प्रतिपदीं । सुखाचें लोण ॥ १०६९ ॥
पुढां बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी । योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥ १०७० ॥
तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें । वृंदें मिळती प्रसंगें । तिये पुष्पवर्षीं आंगें । नाहातसे तो ॥ १०७१ ॥
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें । झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक ॥ १०७२ ॥
तेव्हां वैरियां कां मैत्रियां । तयासि माझें म्हणावया । समानता धनंजया । उरेचिही ना ॥ १०७३ ॥
हें ना भलतेणें व्याजें । तो जयातें म्हणे माझें । तें नोडवेचि कां दुजें । अद्वितीय जाला ॥ १०७४ ॥
पैं आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता । कहीं न लगती ममता । धाडिली तेणें ॥ १०७५ ॥
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु । अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥ १०७६ ॥
वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें । तेंही नावेक ढिलें । तेव्हां करी ॥ १०७७ ॥
आणि निवटी ध्यानाचें खांडें । तें दुजें नाहींचि पुढें । म्हणौनि हातु आसुडें । वृत्तीचाही ॥ १०७८ ॥
जैसें रसौषध खरें । आपुलें काज करोनि पुरें । आपणही नुरे । तैसें होतसे ॥ १०७९ ॥
देखोनि ठाकिता ठावो । धांवता थिरावे पावो । तैसा ब्रह्मसामीप्यें थावो । अभ्यासु सांडी ॥ १०८० ॥
घडतां महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी । कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय ॥ १०८१ ॥
नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे । कां गांवापुढें वळे । मार्गु जैसा ॥ १०८२ ॥
तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु ।ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥ १०८३ ॥
म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया । होतसे तैं उपाया । वोहटु पडे ॥ १०८४ ॥
मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य । योगफळाचाही परिपाक । दशा जे कां ॥ १०८५ ॥
ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा । तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥ १०८६ ॥
पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुलें उणेपण शशी । कां सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥ १०८७ ॥
सागरींही पाणी वेगें । संचरे तें रूप गंगे । येर निश्चळ जें उगें । तें समुद्रु जैसा ॥ १०८८ ॥
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे । तेंचि शांतीचेनि लवलाहें । होय तो गा ॥ १०८९ ॥
पैं तेंचि होणेंनवीण । प्रतीती आलें जें ब्रह्मपण । ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥ १०९० ॥

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काण्‌क्षति । समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥ ५४॥
 
ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता । आत्मबोधप्रसन्नता\- । पदीं बैसे ॥ १०९१ ॥
जेणें निपजे रससोय । तो तापुही जैं जाय । तैं ते कां होय । प्रसन्न जैसी ॥ १०९२ ॥
नाना भरतिया लगबगा । शरत्काळीं सांडिजे गंगा । कां गीत रहातां उपांगा । वोहटु पडे ॥ १०९३ ॥
तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु । तोही जेथें समु । होऊनि जाय ॥ १०९४ ॥
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती । ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥ १०९५ ॥
तेव्हां आत्मत्वें शोचावें । कांहीं पावावया कामावें । हें सरलें समभावें । भरितें तया ॥ १०९६ ॥
उदया येतां गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती । हारवीजती दीप्ती । आंगिका जेवीं ॥ १०९७ ॥
तेवीं उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था । मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥ १०९८ ॥
पाटियेवरील अक्षरें । जैसीं पुसतां येती करें । तैसीं हारपती भेदांतरें । तयाचिये दृष्टी ॥ १०९९ ॥
तैसेनि अन्यथा ज्ञानें । जियें घेपती जागरस्वप्नें । तियें दोन्ही केलीं लीनें । अव्यक्तामाजीं ॥ ११०० ॥
मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत । पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय ॥ ११०१ ॥
जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं । मग तृप्तीच्या अवसरीं । नाहींच होय ॥ ११०२ ॥
नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी । मग पातला ठायीं बुडी । देऊनि निमे ॥ ११०३ ॥
कां जागृति जंव जंव उद्दीपे । तंव तंव निद्रा हारपे । मग जागीनलिया स्वरूपें । नाहींच होय ॥ ११०४ ॥
हें ना आपुलें पूर्णत्व भेटें । जेथ चंद्रासीं वाढी खुंटे । तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥ ११०५ ॥
तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥ ११०६ ॥
तेव्हां कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचें पेंडवळें । मोडूनि भरलें जळें । आब्रह्म जैसें ॥ ११०७ ॥
नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट । कां जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय ॥ ११०८ ॥
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे । नामरूप भेदें जैसें । सांडिजे सोनें ॥ ११०९ ॥
हेंही असो चेइलया । तें स्वप्न नाहीं जालया । मग आपणचि आपणयां । उरिजे जैसें ॥ १११० ॥
तैसी मी एकवांचूनि कांहीं । तया तयाहीसकट नाहीं । हे चौथी भक्ति पाहीं । माझी तो लाहे ॥ ११११ ॥
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं । ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥ १११२ ॥
येऱ्हवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती । पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥ १११३ ॥
जें नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि । सर्वही सर्वीं भजौनि । बुझावीतसे जे ॥ १११४ ॥
जो जेथ जैसें पाहों बैसे । तया तेथ तैसेंचि असे । हें उजियेडें कां दिसे । अखंडें जेणें ॥ १११५ ॥
स्वप्नाचें दिसणें न दिसणें । जैसें आपलेनि असलेपणें । विश्वाचें आहे नाहीं जेणें । प्रकाशें तैसें ॥ १११६ ॥
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा । तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥ १११७ ॥
म्हणौनि आर्ताच्या ठायीं । हे आर्ति होऊनि पाहीं । अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला ॥ १११८ ॥
जिज्ञासुपुढां वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा । मी कां जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥ १११९ ॥
हेंचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थीं अर्जुना । करूनि अर्थाभिधाना । आणी मातें ॥ ११२० ॥
एवं घेऊनि अज्ञानातें । माझी भक्ति जे हे वर्ते । ते दावी मज द्रष्टयातें । दृश्य करूनि ॥ ११२१ ॥
येथें मुखचि दिसे मुखें । या बोला कांहीं न चुके । तरी दुजेपण हें लटिकें । आरिसा करी ॥ ११२२ ॥
दिठी चंद्रचि घे साचें । परी येतुलें हें तिमिराचें । जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥ ११२३ ॥
तैसा सर्वत्र मीचि मियां । घेपतसें भक्ति इया । परी दृश्यत्व हें वायां । अज्ञानवशें ॥ ११२४ ॥
तें अज्ञान आतां फिटलें । माझें दृष्टृत्व मज भेटलें । निजबिंबीं एकवटलें । प्रतिबिंब जैसें ॥ ११२५ ॥
पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ । परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें ॥ ११२६ ॥
हां गा पूर्णिमे आधीं कायी । चंद्रु सावयवु नाहीं ? । परी तिये दिवशीं भेटे पाहीं । पूर्णता तया ॥ ११२७ ॥
तैसा मीचि ज्ञानद्वारें । दिसें परी हस्तांतरें । मग दृष्टृत्व तें सरे । मियांचि मी लाभें ॥ ११२८ ॥
म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था । भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥ ११२९ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099