४ एप्रिल २०२१ निरुपण
तरी दानें सर्वस्व देणें । वेंचणें तें व्यर्थ करणें । जैसे फळोनि स्वयें सुकणें । इंद्रावणी जेवीं ॥ १०६ ॥
नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकीं तुकाचा नाशु । पितृपक्षु पोषिता र्हासु । चंद्राचा जैसा ॥ १०७ ॥
तैसा स्वरूपाचिया प्रसरा -। लागीं प्राणेंद्रियशरीरां । आटणी करणें जें वीरा । तेंचि तप ॥ १०८ ॥
अथवा अनारिसें । तपाचें रूप जरी असे ।तरी जाण जेवीं दुधीं हंसें । सूदली चांचू ॥ १०९ ॥
तैसें देहजीवाचिये मिळणीं । जो उदयजत सूये पाणी । तो विवेक अंतःकरणीं । जागवीजे ॥ ११० ॥
पाहतां आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडें । सनिद्र स्वप्न बुडे । जागणीं जैसें ॥ १११ ॥
तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु । तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ॥ ११२ ॥
आतां बाळाच्या हितीं स्तन्य । जैसें नानाभूतीं चैतन्य । तैसें प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें ॥ ११३ ॥
अहिंसा सत्यमक्रोध्स्त्यागः शान्तिरपैशुनम् । दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ २॥
आणि जगाचिया सुखोद्देशें । शरीरवाचामानसें । राहाटणें तें अहिंसे । रूप जाण ॥ ११४ ॥
आतां तीख होऊनि मवाळ । जैसें जातीचें मुकुळ । कां तेज परी शीतळ । शशांकाचें ॥ ११५ ॥
शके दावितांचि रोग फेडूं । आणि जिभे तरी नव्हे कडु ।ते वोखदु नाहीं मा घडू । उपमा कैंची ॥ ११६ ॥
तरी मऊपणें बुबुळे । झगडतांही परी नाडळे । एर्हवीं फोडी कोंराळें । पाणी जैसें ॥ ११७ ॥
तैसें तोडावया संदेह । तीख जैसें कां लोह । श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घालीं ॥ ११८ ॥
ऐकों ठातां कौतुकें । कानातें निघती मुखें । जें साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी ॥ ११९ ॥
किंबहुना प्रियपणे । कोणातेंही झक{ऊं} नेणे । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ॥ १२० ॥
एर्हवीं गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळीं कीड । आगीचें करणें उघड । परी जळों तें साच ॥ १२१ ॥
कानीं लागतां महूर । अर्थें विभांडी जिव्हार । तें वाचा नव्हे सुंदर । लांवचि पां ॥ १२२ ॥
परी अहितीं कोपोनि सोप । लालनीं मऊ जैसें पुष्प । तिये मातेचें स्वरूप । जैसें कां होय ॥ १२३ ॥
तैसें श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार । बोलणें जें अविकार । तें सत्य येथें ॥ १२४ ॥
आतां घालितांही पाणी । पाषाणीं न निघे आणी । कां मथिलिया लोणी । कांजी नेदी ॥ १२५ ॥
त्वचा पायें शिरीं । हालेयाही फडे न करी । वसंतींही अंबरीं । न होती फुलें ॥ १२६ ॥
नाना रंभेचेनिही रूपें । शुकीं नुठिजेचि कंदर्पें । कां भस्मीं वन्हि न उद्दीपे । घृतेंही जेवीं ॥ १२७ ॥
तेवींचि कुमारु क्रोधें भरे । तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें । तियें निमित्तेंही अपारें । मीनलिया ॥ १२८ ॥
परी धातयाही पायां पडतां । नुठी गतायु पंडुसुता । तैसी नुपजे उपजवितां । क्रोधोर्मी गा ॥ १२९ ॥
अक्रोधत्व ऐसें । नांव तें ये दशे । जाण ऐसें श्रीनिवासें । म्हणितलें तया ॥ १३० ॥
आतां मृत्तिकात्यागें घटु । तंतुत्यागें पटु । त्यजिजे जेवीं वटु । बीजत्यागें ॥ १३१ ॥
कां त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेंचि चित्र । कां निद्रात्यागें विचित्र । स्वप्नजाळ ॥ १३२ ॥
नाना जळत्यागें तरंग । वर्षात्यागें मेघ । त्यजिजती जैसे भोग । धनत्यागें ॥ १३३ ॥
तेवीं बुद्धिमंतीं देहीं । अहंता सांडूनि पाहीं । सांडिजे अशेषही । संसारजात ॥ १३४ ॥
तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे ॥ १३५ ॥
आतां शांतीचें लिंग । तें व्यक्त मज सांग । देवो म्हणती चांग । अवधान देईं ॥ १३६ ॥
तरी गिळोनि ज्ञेयातें । ज्ञाता ज्ञानही माघौतें । हारपें निरुतें । ते शांति पैं गा ॥ १३७ ॥
जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु । होय आपणपें निबिडु । आपणचि ॥ १३८ ॥
मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु । परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ? ॥ १३९ ॥
तैसी ज्ञेया देतां मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटीं । मग उरे तेंचि किरीटी । शांतीचें रूप ॥ १४० ॥
No comments:
Post a Comment