अध्याय ११ : ओव्या ६४०-७०८

५ जानेवारी २०२० निरुपण 
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक ५०-५५ / ज्ञानेश्वरी ओव्या ६४०-७०८)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


संजय उवाच ।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः  । आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५०॥
ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥ ६४० ॥
श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥ ६४१ ॥
वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्‍नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥ ६४२ ॥
तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा । सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसिं देवें ॥ ६४३ ॥
मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥
तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें । तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥
हा ठाववरी शिष्याची निकसी । सहातें गुरु आहाती कवणे देशीं ? । परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥ ६४६ ॥
मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें । तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये ॥ ६४७ ॥
जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदीं सामावे । अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णें योगु हा तैसा । संहारिला तो ॥ ६४९ ॥
जैसी प्रभा हारपली बिंबीं । कीं जळदसंपत्ती नभीं । नाना भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥ ६५० ॥
हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥
तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥
तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥ ६५३ ॥
किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥ ६५४ ॥
जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥ ६५५ ॥
नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें । स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥
तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥
काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला । आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥ ६५८ ॥
ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें । विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥ ६५९ ॥
मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित ॥ ६६० ॥
पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र । तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥ ६६१ ॥
तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥ ६६२ ॥
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन । इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः ॥ ५१॥
एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥ ६६३ ॥
बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान । अहंकारेंसी मन । देशोधडी जाहलें ॥ ६६४ ॥
इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली । ऐसें आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥
तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती । आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें मियां ॥ ६६६ ॥
ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें । मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ॥ ६६७ ॥
हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥
जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी । तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां ॥ ६६९ ॥
आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥ ६७० ॥
जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज ॥ ६७१ ॥
माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥ ६७२ ॥
श्रीभगवानुवाच ।
सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम । देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः ॥ ५२॥
यया पार्थाचिया बोलासवें । हें काय म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ॥ ६७३ ॥
मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥ ६७४ ॥
अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥ ६७५ ॥
तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥ ६७६ ॥
आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥ ६७७ ॥
तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ । ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥ ६७८ ॥
आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळीं । चातक निराळीं । लागले जैसे ॥ ६७९ ॥
तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥ ६८० ॥
परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे । तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥ ६८१ ॥
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया । शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३॥
पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥ ६८२ ॥
मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥ ६८३ ॥
आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें । जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥ ६८४ ॥
तैसा मी एकीचि परि । आंतुडें गा अवधारीं । जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥ ६८५ ॥
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४॥
परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणें ॥ ६८६ ॥
कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥ ६८७ ॥
तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥ ६८८ ॥
आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥ ६८९ ॥
तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं । भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं ॥ ६९० ॥
तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें । जाणितला तरी स्वभावें । दृष्टही होय ॥ ६९१ ॥
मग इंधनीं अग्नि उद्दीपें । आणि इंधन हें भाष हारपे । तें अग्निचि होऊनि आरोपें । मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥
कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें । मग उदईलिया एकसरें । प्रकाशु होय ॥ ६९३ ॥
तैसें माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ६९४ ॥
मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें । किंबहुना सामावे । समरसें तो ॥ ६९५ ॥

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः । निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५॥
ॐ इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगोनाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं । जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥
दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥
मग भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहें सूदला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥
ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये । तैं मीचि हौनि ठायें । पांडवा गा ॥ ६९९ ॥
ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥
ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ ७०१ ॥
तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं । तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥ ७०२ ॥
परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें । जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥ ७०३ ॥
हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥ ७०४ ॥
तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु । तरि होय बरवें दोन्हीं आंतु । तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥
ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढें कथा ॥ ७०६ ॥
प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें । तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥
भरोनि सद्‍भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं । अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ॥ ७०८ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां एकादशोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099