अध्याय १८ : ओव्या १६१३-१७१०

 २३ जानेवारी २०२२ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक ७६-७८ / ज्ञानेश्वरी ओव्या १६१३-१७१०) 

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ ७६॥

राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये । रत्नीं कीं रत्नकिळा ये । झांकोळित जैसी ॥ १६१४ ॥
हिमवंतींचीं सरोवरें । चंद्रोदयीं होती काश्मीरें । मग सूर्यागमीं माघारें । द्रवत्व ये ॥ १६१५ ॥
तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्तीं । धरी आणि पुढती । तेंचि होय ॥ १६१६ ॥

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः । विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥ ७७॥
मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा । देखिलया उगा कां पां । असों लाहसी ? ॥ १६१७ ॥
न देखणेनि जें दिसे । नाहींपणेंचि जें असे । विसरें आठवे तें कैसें । चुकऊं आतां । ॥ १६१८ ॥
देखोनि चमत्कारु । कीजे तो नाहीं पैसारु । मजहीसकट महापूरु । नेत आहे ॥ १६१९ ॥
ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमीं स्नान । करूनि देतसे तिळदान । अहंतेचें ॥ १६२० ॥
तेथ असंवरें आनंदें । अलौकिकही कांहीं स्फुंदे । श्रीकृष्ण म्हणे सद्गदें । वेळोवेळां ॥ १६२१ ॥
या अवस्थांची कांहीं । कौरवांतें परी नाहीं । म्हणौनि रायें तें कांहीं । कल्पावें जंव ॥ १६२२ ॥
तंव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु । बुझाविला अवष्टंभु । संजयें तेणें ॥ १६२३ ॥
तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी । रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा ? ॥ १६२४ ॥
तेणें तूंतें येथें व्यासें । बैसविलें कासया उद्देशें । अप्रसंगामाजीं ऐसें । बोलसी काई ? ॥ १६२५ ॥
रानींचें राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया । कां रात्री होय पाहलया । निशाचरां ॥ १६२६ ॥
जो जेथिंचें गौरव नेणें । तयासि तें भिंगुळवाणें । म्हणौनि अप्रसंगु तेणें । म्हणावा कीं तो ॥ १६२७ ॥
मग म्हणे सांगें प्रस्तुत । उदयलेंसे जें उत्कळित । तें कोणासि बा रे जैत । देईल शेखीं ? ॥ १६२८ ॥
येऱ्हवीं विशेषें बहुतेक । आमुचें ऐसें मानसिक । जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥ १६२९ ॥
आणि येरांचेनि पाडें । दळही याचें देव्हडें । म्हणौनि जैत फुडें । आणील ना तें ? ॥ १६३० ॥
आम्हां तंव गमे ऐसें । मा तुझें ज्योतिष कैसें । तें नेणों संजया असे । तैसें सांग पां ॥ १६३१ ॥

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ७८॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥

यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचें मी नेणें । परी आयुष्य तेथें जिणें । हें फुडें कीं गा ॥ १६३२ ॥
चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका । संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥ १६३३ ॥
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक । वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥ १६३४ ॥
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु । सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥ १६३५ ॥
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें । सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥ १६३६ ॥
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥ १६३७ ॥
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥ १६३८ ॥
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ १६३९ ॥
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं । अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ? ॥ १६४० ॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें । तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४१ ॥
विजयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४२ ॥
तयाचिये देशींच्या झाडीं । कल्पतरूतें होडी । न जिणावें कां येवढीं । मायबापें असतां ? ॥ १६४३ ॥
ते पाषाणही आघवें । चिंतारत्‌नें कां नोहावे ? । तिये भूमिके कां न यावें । सुवर्णत्व ? ॥ १६४४ ॥
तयाचिया गांवींचिया । नदी अमृतें वाहाविया । नवल कायि राया । विचारीं पां ॥ १६४५ ॥
तयाचे बिसाट शब्द । सुखें म्हणों येती वेद । सदेह सच्चिदानंद । कां न व्हावे ते ? ॥ १६४६ ॥
पैं स्वर्गापवर्ग दोन्ही । इयें पदें जया अधीनीं । तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥ १६४७ ॥
म्हणौनि जिया बाहीं उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा । तेथें सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणें ॥ १६४८ ॥
आणि समुद्राचा मेघु । उपयोगें तयाहूनि चांगु । तैसा पार्थीं आजि लागु । आहे तये ॥ १६४९ ॥
कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू । परी जगा पोसिता व्यवहारु । तेंचि जाणें ॥ १६५० ॥
येथ गुरुत्वा येतसे उणें । ऐसें झणें कोण्ही म्हणे । वन्हि प्रकाश दीपपणें । प्रकाशी आपुला ॥ १६५१ ॥
तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती । परी माने इये स्तुती । गौरव असे ॥ १६५२ ॥
आणि पुत्रें मी सर्व गुणीं । जिणावा हे बापा शिराणी । तरी ते शारङ्गपाणी । फळा आली ॥ १६५३ ॥
किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा । तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे ॥ १६५४ ॥
तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो ? । तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय ॥ १६५५ ॥
म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु । तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ॥ १६५६ ॥
जरी व्यासाचेनि साचें । धिरे मन तुमचें । तरी या बोलाचें । ध्रुवचि माना ॥ १६५७ ॥
जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु । तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा ॥ १६५८ ॥
या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे । ऐसें गाजोनि बाहें । उभिली तेणें ॥ १६५९ ॥
एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका । संजयें कुरुनायका । दिधला हातीं ॥ १६६० ॥
जैसा नेणों केवढा वन्ही । परी गुणाग्रीं ठेऊनी । आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया ॥ १६६१ ॥
तैसें शब्दब्रह्म अनंत । जालें सवालक्ष भारत । भारताचें शतें सात । सर्वस्व गीता ॥ १६६२ ॥
तयांही सातां शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा । व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥ १६६३ ॥
येणें येकेंचि श्लोकें । राहे तेणें असकें । अविद्याजाताचें निकें । जिंतलें होय ॥ १६६४ ॥
ऐसें श्लोक शतें सात । गीतेचीं पदें आंगें वाहत । पदें म्हणों कीं परमामृत । गीताकाशींचें ॥ १६६५ ॥
कीं आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे । मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत ॥ १६६६ ॥
कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती । मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥ १६६७ ॥
म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥ १६६८ ॥
कीं अविद्यातिमिररोंखें । श्लोक सूर्यातें पैजा जिंकें । ऐसे प्रकाशिले गीतामिषें । रायें श्रीकृष्णें ॥ १६६९ ॥
कीं श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता । संसारपथश्रांता । विसंवावया ॥ १६७० ॥
कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं । केले ते श्लोककल्हारीं । श्रीकृष्णाख्यसरोवरीं । सासिन्नली हे ॥ १६७१ ॥
कीं श्लोक नव्हती आन । गमे गीतेचें महिमान । वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे ॥ १६७२ ॥
कीं श्लोकांचिया आवारा । सात शतें करूनि सुंदरा । सर्वागम गीतापुरा । वसों आले ॥ १६७३ ॥
कीं निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया । श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो ॥ १६७४ ॥
कीं गीताकमळींचे भृंग । कीं हे गीतासागरतरंग । कीं हरीचे हे तुरंग । गीतारथींचे ॥ १६७५ ॥
कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु । जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥ १६७६ ॥
कीं नोहे हे श्लोकश्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी । कीं निर्विकल्पां लावणी । कल्पतरूंची ॥ १६७७ ॥
ऐसिया शतें सात श्लोकां । परी आगळा येकयेका । आतां कोण वेगळिका । वानावां पां । ॥ १६७८ ॥
तान्ही आणि पारठी । इया कामधेनूतें दिठी । सूनि जैसिया गोठी । कीजती ना ॥ १६७९ ॥
दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु । अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा । ॥ १६८० ॥
तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते । जुनीं नवीं पारिजातें । आहाती काई ? ॥ १६८१ ॥
आणि श्लोका पाडु नाहीं । हें कीर समर्थु काई । येथ वाच्य वाचकही । भागु न धरी ॥ १६८२ ॥
जे इये शास्त्रीं येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु । हें प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही ॥ १६८३ ॥
येथें अर्थें तेंचि पाठें । जोडे येवढेनि धटें । वाच्यवाचक येकवटें । साधितें शास्त्र ॥ १६८४ ॥
म्हणौनि मज कांहीं । समर्थनीं आतां विषय नाहीं । गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥ १६८५ ॥
शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे । तैसें नव्हें हें सगळें । परब्रह्मचि ॥ १६८६ ॥
कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा । अर्जुनव्याजें रूपा । आणिला देवें ॥ १६८७ ॥
चकोराचेनि निमित्तें । तिन्ही भुवनें संतप्तें । निवविलीं कळांवतें । चंद्रें जेवीं ॥ १६८८ ॥
कां गौतमाचेनि मिषें । कळिकाळज्वरीतोद्देशें । पाणिढाळु गिरीशें । गंगेंचा केला ॥ १६८९ ॥
तैसें गीतेचें हें दुभतें । वत्स करूनि पार्थातें । दुभिन्नली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय ॥ १६९० ॥
येथे जीवें जरी नाहाल । तरी हेंचि कीर होआल । नातरी पाठमिषें तिंबाल । जीभचि जरी ॥ १६९१ ॥
तरी लोह एकें अंशें । झगटलिया परीसें । येरीकडे अपैसें । सुवर्ण होय ॥ १६९२ ॥
तैसी पाठाची ते वाटी । श्लोकपाद लावा ना जंव वोठीं । तंव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ॥ १६९३ ॥
ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कानवडें । तरी कानींही घेतां पडे । तेचि लेख ॥ १६९४ ॥
जे हे श्रवणें पाठें अर्थें । गीता नेदी मोक्षाआरौतें । जैसा समर्थु दाता कोण्हातें । नास्ति न म्हणे ॥ १६९५ ॥
म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा । काय कराल आघवां । शास्त्रीं येरीं ॥ १६९६ ॥
आणि कृष्णार्जुनीं मोकळी । गोठी चावळिली जे निराळी । ते श्रीव्यासें केली करतळीं । घेवों ये ऐसी ॥ १६९७ ॥
बाळकातें वोरसें । माय जैं जेवऊं बैसे । तैं तया ठाकती तैसे । घांस करी ॥ १६९८ ॥
कां अफाटा समीरणा । आपैतेंपण शाहाणा । केलें जैसें विंजणा । निर्मूनियां ॥ १६९९ ॥
तैसें शब्दें जें न लभे । तें घडूनिया अनुष्टुभें । स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविलें ॥ १७०० ॥
स्वातीचेनि पाणियें । न होती जरी मोतियें । तरी अंगीं सुंदरांचिये । कां शोभिती तियें ? ॥ १७०१ ॥
नादु वाद्या न येतां । तरी कां गोचरु होता । फुलें न होतां घेपता । आमोदु केवीं ? ॥ १७०२ ॥
गोडीं न होती पक्वान्नें । तरी कां फावती रसनें ? । दर्पणावीण नयनें । नयनु कां दिसे ? ॥ १७०३ ॥
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथीं । तरी कां ह्या उपास्ती । आकळता तो ? ॥ १७०४ ॥
तैसें वस्तु जें असंख्यात । तया संख्या शतें सात । न होती तरी कोणा येथ । फावों शकतें ? ॥ १७०५ ॥
मेघ सिंधूचें पाणी वाहे । तरी जग तयातेंचि पाहे । कां जे उमप ते नोहें । ठाकतें कोण्हा ॥ १७०६ ॥
आणि वाचा जें न पवे । तें हे श्लोक न होते बरवे । तरी कानें मुखें फावे । ऐसें कां होतें ? ॥ १७०७ ॥
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु । जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥ १७०८ ॥
आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां । आणिला श्रवणपथा । मऱ्हाठिया ॥ १७०९ ॥
व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक । तेथ मीही रंक येक । चावळी करीं ॥ १७१० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099