अध्याय १५ : ओव्या ५२५-५९९

 २८ फेब्रुवारी  २०२१  निरुपण 

अध्याय १५ । पुरुषोत्तमयोगः । ज्ञानेश्वरी  श्लोक  १७-२०  / ओव्या ५२६-५९९ )


उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ॥ यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १७॥

आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं । तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ॥ ५२६ ॥
तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां । स्वयें जळे ॥ ५२७ ॥
तैसें अज्ञान ज्ञानें नेलें । आपण वस्तु देऊनि गेलें । ऐसें जाणणेंनिवीण उरलें । जाणतें जें ॥ ५२८ ॥
तें तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय कां निष्कर्षु । दोहींहून आणिकु । मागिला जो ॥ ५२९ ॥
सुषुप्तीं आणि स्वप्ना- । पासूनि बहुवें अर्जुना । जागणें जैसें आना । बोधाचेंचि ॥ ५३० ॥
कां रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा । अफाटु तेवीं वेगळा । उत्तमु गा ॥ ५३१ ॥
हें ना काष्ठींचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही । तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो ॥ ५३२ ॥
पैं ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां । उठी कल्पांतीं उदावादा । एकार्णवाचा ॥ ५३३ ॥
तैसें स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी । जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजें ॥ ५३४ ॥
मग एकपण ना दुजें । असें नाहीं हें नेणिजे । अनुभव निर्बुजे । बुडाला जेथें ॥ ५३५ ॥
ऐसें आथि जें कांहीं । तें तो उत्तम पुरुषु पाहीं । जें परमात्मा इहीं । बोलिजे नामीं ॥ ५३६ ॥
तेंही एथ न मिसळतां । बोलणें जीवत्वें पंडुसुता । जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ॥ ५३७ ॥
तैसें विवेकाचिये कांठीं । उभें ठाकलिया किरीटी । परावराचिया गोठी । करणें वेदां ॥ ५३८ ॥
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवरु । यातें म्हणती परु । आत्मरूप ॥ ५३९ ॥
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी । सूचिजे गा अवधारीं । पुरुषोत्तमु ॥ ५४० ॥
एर्‍हवीं न बोलणेंचि बोलणें । जेथिंचें सर्व नेणिवा जाणणें । कांहींच न होनि होणें । जे वस्तु गा ॥ ५४१ ॥
सोऽहं तेंही अस्तवलें । जेथ सांगतेंचि सांगणें जालें । द्रष्टत्वेंसी गेलें । दृश्य जेथ ॥ ५४२ ॥
आतां बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजीं कैंची हें म्हणों नये प्रभा ? । जर्‍ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ॥ ५४३ ॥
कां घ्राणा फुला दोहीं । द्रुती असे जे माझारिलां ठायीं । ते न दिसे तरी नाहीं । ऐसें बोलों नये ॥ ५४४ ॥
तैसें द्रष्टा दृश्य हें जाये । मग कोण म्हणे काय आहे । चि अनुभवें तेंचि पाहें । रूप तया ॥ ५४५ ॥
जो प्रकाश्येंवीण प्रकाशु । ईशितव्येंवीण ईशु । आपणेंनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥ ५४६ ॥
जो नादें ऐकिजता नादु । स्वादें चाखिजता स्वादु । जो भोगिजतसे आनंदु । आनंदेंचि ॥ ५४७ ॥
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु । विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथें ॥ ५४८ ॥
सुखासि सुख जोडिलें । जें तेज तेजासि सांपडलें । शून्यही बुडालें । महाशून्यीं जिये ॥ ५४९ ॥
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेंही ग्रासूनि पुरता । जो बहुतें पाडें बहुतां- । पासूनि बहु ॥ ५५० ॥
पैं नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती । रुपें न होनि शुक्ती । दावी जेवीं ॥ ५५१ ॥
कां नाना अलंकारदशे । सोनें न लपत लपालें असे । विश्व न होनियां तैसें । विश्व जो धरी ॥ ५५२ ॥
हें असो जलतरंगा । नाहीं सिनानेपण जेवीं गा । तेवीं दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥ ५५३ ॥
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा । हा जळीं चंद्र हन जैसा । समग्र गा ॥ ५५४ ॥
तैसा विश्वपणें कांहीं होये । विश्वलोपीं कहीं न जाये । जैसा रात्रीं दिवसें नोहे । द्विधा रवि ॥ ५५५ ॥
तैसा कांहींचि कोणीकडे । कायिसेनिहि वेंचीं न पडे । जयाचें सांगडें । जयासीचि ॥ ५५६ ॥

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः । अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८॥

जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया । काय बहु बोलों जया । नाहीं दुजें ॥ ५५७ ॥
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥ ५५८ ॥

यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् । स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १९॥

परी हें असो ऐसिया । मज पुरुषोत्तमातें धनंजया । जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रें ॥ ५५९ ॥
चेइलिया आपुलें ज्ञान । जैसें नाहींचि होय स्वप्न । तैसें स्फुरतें त्रिभुवन । वावों जालें ॥ ५६० ॥
कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कांटाळा । तैसा माझेनि बोधें टवाळा । नागवे तो ॥ ५६१ ॥
लेणें सोनेंचि जो जाणें । तो लेणेंपण तें वावो म्हणे । तेवीं मी जाणोनि जेणें । वाळिला भेदु ॥ ५६२ ॥
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु । जो आपणेनसीं भेदु । नेणोनियां जाणे ॥ ५६३ ॥
तेणेंचि सर्व जाणितलें । हेंही म्हणणें थेंकुलें । जे तया सर्व उरलें । द्वैत नाहीं ॥ ५६४ ॥
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना । गगन जैसें आलिंगना । गगनाचिया ॥ ५६५ ॥
क्षीरसागरा परगुणें । कीजे क्षीरसागरचिपणें । अमृतचि होऊनि मिळणें । अमृतीं जेवीं ॥ ५६६ ॥
साडेपंधरा मिसळावें । तैं साडेपंधरेंचि होआवें । तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥ ५६७ ॥
हां गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? । म्हणौनि मी न होतां भक्ती । अन्वयो आहे ? ॥ ५६८ ॥
ऐसियालागीं सर्व प्रकारीं । जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं । तैसा मातें अवधारीं । भजिन्नला जो ॥ ५६९ ॥
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणें लोभें । तो पाडु मानूं लाभे । भजना तया ॥ ५७० ॥

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥ एतद्‍बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात् कृतकृत्यश्च भारत ॥ २०॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तम योगोनाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥

एवं कथिलयादारभ्य । हें जें सर्व शास्त्रैकलभ्य । उपनिषदां सौरभ्य । कमळदळां जेवीं ॥ ५७१ ॥
हें शब्दब्रह्माचें मथितें । श्रीव्यासप्रज्ञेचेंनि हातें । मथुनि काढिलें आयितें । सार आम्हीं ॥ ५७२ ॥
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥ ५७३ ॥
म्हणौनि आपुलेनि पदें वर्णें । अर्थाचेनि जीवेंप्राणें ।मीवांचोनि हों नेणें । आन कांहीं ॥ ५७४ ॥
क्षराक्षरत्वें समोर जालें । तयांचें पुरुषत्व वाळिलें । मग सर्वस्व मज दिधलें । पुरुषोत्तमीं ॥ ५७५ ॥
म्हणौनि जगीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्णिली ॥ ५७६ ॥
साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं संसारु जिणतें हें शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें ॥ ५७७ ॥
परी तुजपुढां सांगितलें । तें अर्जुना ऐसें जालें । जें गौप्यधन काढिलें । माझें आजि ॥ ५७८ ॥
मज चैतन्यशंभूचा माथां । जो निक्षेपु होता पार्था । तया गौतमु जालासि आस्था- । निधी तूं गा ॥ ५७९ ॥
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां ॥ ५८० ॥
कां भरलें चंद्रतारांगणीं । नभ सिंधू आपणयामाजीं आणी ।तैसा गीतेसीं मी अंतःकरणीं । सूदला तुवां ॥ ५८१ ॥
जे त्रिविधमळिकटा । तूं सांडिलासि सुभटा । म्हणौनि गीतेसीं मज वसौटा । जालासि गा ॥ ५८२ ॥
परी हें बोलों काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । जाणे तो समस्ता । मोहा मुके ॥ ५८३ ॥
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता । अमरपण उचितां । देऊनि घाली ॥ ५८४ ॥
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया । परी आत्मज्ञानें आपणापयां । मिळिजे येथ ॥ ५८५ ॥
जया आत्मज्ञानाच्या ठायीं । कर्म आपुलेया जीविता पाहीं ।होऊनियां उतराई । लया जाय ॥ ५८६ ॥
हरपलें दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥ ५८७ ॥
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करूं सरलें देखा । ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥ ५८८ ॥
तें श्रीकृष्णवचनामृत । पार्थीं भरोनि असे वोसंडत । मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥ ५८९ ॥
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया । म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी ॥ ५९० ॥
एर्‍हवीं गीताश्रवण अवसरीं । आवडों लागतां अनधिकारी । परि सेखीं तेचि उजरी । पातला भली ॥ ५९१ ॥
जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हां वायां गेलें गमलें । परी फळपाकीं दुणावलें । देखिजे जेवीं ॥ ५९२ ॥
तैसी श्रीहरीवक्त्रींचीं अक्षरें । संजयें सांगितलीं आदरें । तिहीं अंधु तोही अवसरें । सुखिया जाला ॥ ५९३ ॥
तेंचि मर्‍हाटेनि विन्यासें । मियां उन्मेषें ठसेंठोंबसें । जी जाणें नेणें तैसें । निरोपिलें ॥ ५९४ ॥
सेवंतीये अरिसि कांहीं । आंग पाहतां विशेषु नाहीं । परी सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणिजे ॥ ५९५ ॥
तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें तें मज देइजे । जें नेणणें हेंचि सहजें । रूप कीं बाळा ॥ ५९६ ॥
तरी नेणतें जर्‍ही होये । तर्‍ही देखोनि बाप कीं माये । हर्ष केंहि न समाये । चोज करिती ॥ ५९७ ॥
तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजें । तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ॥ ५९८ ॥
आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वा{क्} पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥ ५९९ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पंचदशोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099