८ नोव्हेंबर २०२० निरुपण
इये नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप । हें निद्रितां समीप । चेतां दुरी ॥ ८८ ॥
पैं माझेनिचि आंगें । पहुढल्या हे जागे । आणि सत्तासंभोगें । गुर्विणी होय ॥ ८९ ॥
महद्ब्रह्मौदरीं । प्रकृतीं आठै विकारीं । गर्भाची करी । पेलोवेली ॥ ९० ॥
उभयसंगु पहिलें । बुद्धितत्त्वें प्रसवलें । बुद्धितत्त्व भारैलें । होय मन ॥ ९१ ॥
तरुणी ममता मनाची । ते अहंकार तत्त्व रची । तेणें महाभूतांची । अभिव्यक्ति होय ॥ ९२ ॥
आणि विषयेंद्रियां गौसी । स्वभावें तंव भूतांसी । म्हणौनि येती सरिसीं । तियेंही रूपा ॥ ९३ ॥
जालेनि विकारक्षोभें । पाठीं त्रिगुणाचें उभें । तेव्हां ये वासनागर्भें । ठायेंठावों ॥ ९४ ॥
रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका । जीवीं बांधें उदका । भेटतखेंवो ॥ ९५ ॥
तैसी माझेनि संगें । अविद्या नाना जगें । आर घेवों लागे । आणियाची ॥ ९६ ॥
मग गर्भगोळा तया । कैसें रूप तैं ये आया । तें परियेसें राया । सुजनांचिया ॥ ९७ ॥
पैं मणिज स्वेदज । उद्भिज जारज । उमटती सहज । अवयव हें ॥ ९८ ॥
व्योमवायुवशें । वाढलेनि गर्भरसें । मणिजु उससे । अवयव तो ॥ ९९ ॥
पोटीं सूनि तमरजें । आगळिकां तोय तेजें । उठितां निफजे । स्वेदजु गा ॥ १०० ॥
आपपृथ्वी उत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें । स्थावरु उमटे । उद्भिजु हा ॥ १०१ ॥
पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं । हीं हेतु जारजीं । ऐसें जाण ॥ १०२ ॥
ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । महाप्रकृति स्थूळ । तेंचि शिर ॥ १०३ ॥
प्रवृत्ति पेललें पोट । निवृत्ति ते पाठी नीट । सुर योनी आंगें आठ । ऊर्ध्वाचीं ॥ १०४ ॥
कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोकु मध्यभागु । अधोदेशु चांगु । नितंबु तो ॥ १०५ ॥
ऐसें लेकरूं एक । प्रसवली हें देख । जयाचें तिन्ही लोक । बाळसें गा ॥ १०६ ॥
चौयांयशीं लक्ष योनी । तियें कांडां पेरां सांदणी । वाढे प्रतिदिनीं । बाळक हें ॥ १०७ ॥
नाना देह अवयवीं । नामाचीं लेणीं लेववी । मोहस्तन्यें वाढवी । नित्य नवें ॥ १०८ ॥
सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्रीं आंगोळियां । भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथें ॥ १०९ ॥
हें एकलौतें चराचर । अविचारित सुंदर । प्रसवोनि थोर । थोरावली ॥ ११० ॥
पै ब्रह्मा प्रातःकाळु । विष्णु तो माध्यान्ह वेळु । सदाशिव सायंकाळु । बाळा यया ॥ १११ ॥
महाप्रळयसेजे । खिळोनि निवांत निजे । विषमज्ञानें उमजें । कल्पोदयीं ॥ ११२ ॥
अर्जुना इयापरी । मिथ्यादृष्टीच्या घरीं । युगानुवृत्तीचीं करी । चोज पाउलें ॥ ११३ ॥
संकल्पु जयाचा इष्टु । अहंकारु तो विनटु । ऐसिया होय शेवटु । ज्ञानें यया ॥ ११४ ॥
आतां असो हे बहु बोली । ऐसें विश्व माया व्याली । तेथ साह्य जाली । माझी सत्ता ॥ ११५ ॥
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ ४॥
याकारणें मी पिता । महद्ब्रह्म हे माता । अपत्य पंडुसुता । जगडंबरु ॥ ११६ ॥
आतां शरीरें बहुतें । देखोनि न भेदें हो चित्तें । जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें ॥ ११७ ॥
हां गा एकाचि देहीं । काय अनारिसें अवयव नाहीं ? । तेवीं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ॥ ११८ ॥
पैं उंचा नीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया । येकाचि जेवीं जालिया । बीजाचिया ॥ ११९ ॥
आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेंकु जैसा । कां पटत्व कापुसा । नातू होय ॥ १२० ॥
नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा । आम्हां आणि चराचरा । संबंधु तैसा ॥ १२१ ॥
म्हणौनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ । तेवीं मी गा सकळ । संबंधु वावो ॥ १२२ ॥
जालेनि जगें मी झांकें । तरी जगत्वें कोण फांके ? । किळेवरी माणिकें । लोपिजे काई ? ॥ १२३ ॥
अळंकारातें आलें । तरी सोनेपण काइ गेलें ? । कीं कमळ फांकलें । कमळत्वा मुके ? ॥ १२४ ॥
सांग पां धनंजया । अवयवीं अवयविया । आच्छादिजे कीं तया । तेंचि रूप ? ॥ १२५ ॥
कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥ १२६ ॥
म्हणौनि जग परौतें । सारूनि पाहिजे मातें । तैसा नोव्हें उखितें । आघवें मीचि ॥ १२७ ॥
हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा । जीवाचिये ॥ १२८ ॥
आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळाला । गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें ॥ १२९ ॥
जैसें स्वप्नीं आपण । उठूनियां आत्ममरण । भोगिजे गा जाण । कपिध्वजा ॥ १३० ॥
कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिवळें । देखती तेंही कळे । तयांसीचि ॥ १३१ ॥
नाना सूर्यप्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे । तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं ॥ १३२ ॥
पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया । बिहोनि बिहालिया । आन आहे ? ॥ १३३ ॥
तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें । तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें ॥ १३४ ॥
बंधु कां न बंधिजे । हें जाणणें मज माझें । नेणणेनि उपजे । आपलेनि ॥ १३५ ॥
तरी कोणें गुणें कैसा । मजचि मी बंधु ऐसा । वडे तें परियेसा । अर्जुनदेवा ॥ १३६ ॥
गुण ते किती किंधर्म । कायि ययां रूपनाम । कें जालें हें वर्म । अवधारीं पां ॥ १३७ ॥
No comments:
Post a Comment