१० जानेवारी २०२१ निरुपण
तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाच्या अंतीं । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥ २९ ॥
जें ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये ॥ ३० ॥
कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे ॥ ३१ ॥
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवीं डोळसु । तेवीं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो ॥ ३२ ॥
तरी तया ज्ञानालागीं । कवणा पां योग्यता आंगीं । हें पाहतां जगीं । देखिला एकु ॥ ३३ ॥
जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥ ३४ ॥
तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन । परी तेंचि थारे ऐसें मन । शुद्ध होआवें ॥ ३५ ॥
तरी विरक्तीवांचूनि कहीं । ज्ञानासि तगणेंचि नाहीं । हें विचारूनि ठाईं । ठेविलें देवें ॥ ३६ ॥
आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी । हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे ॥ ३७ ॥
जे विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये । तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥ ३८ ॥
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता । तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे ॥ ३९ ॥
आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें । सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं ॥ ४० ॥
उपडिलें कवतिकें । झाड येरिमोहरा ठाके । तें वेगें जैसें सुके । तैसें हें नोहे ॥ ४१ ॥
यातें एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥ ४२ ॥
करूनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥ ४३ ॥
आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें । उपलविजेल जीवें । आकर्णिजे ॥ ४४ ॥
तरी महानंद समुद्र । झॊ पूर्ण पूर्णीमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे ॥ ४५ ॥
अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥ ४६ ॥
तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु । हा जाणिजे महातरु । थांवला असे ॥ ४७ ॥
परी येरां रुखांसारिखा । हा तळीं मूळें वरी शाखा । तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥ ४८ ॥
आगी कां कुर्हाडी । होय रिगावा जरी बुडीं । तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी ॥ ४९ ॥
जे तुटलिया मूळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥ ५० ॥
अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥ ५१ ॥
जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके ।संसार हें कावरुखें । झाड तैसें ॥ ५२ ॥
आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें । कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें ॥ ५३ ॥
कां रवीच्या अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनीं । मांडला असे ॥ ५४ ॥
यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां । जें कांहीं पंडुसुता । तें रुखुचि हा ॥ ५५ ॥
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेंचि हा होये । शाड्वळु गा ॥ ५६ ॥
आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे । परी अधींही असोसें । मूळें यया ॥ ५७ ॥
प्रबळला चौमेरी । पिंपळा कां वडाचिया परी । जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ॥ ५८ ॥
तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ॥ ५९ ॥
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडें । सासिन्नलें ॥ ६० ॥
जालें गगनचि पां वेलिये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें । नाना अवस्थात्रयें । उदयला असे ॥ ६१ ॥
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥ ६२ ॥
आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण । कां अधोमुखपण । शाखा कैसिया ॥ ६३ ॥
अथवा द्रुमा यया । अधीं जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥ ६४ ॥
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासीं । निर्णयो केला ॥ ६५ ॥
हें आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगों सोलिंवें । विन्यासें गा ॥ ६६ ॥
परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा । कानचि करीं हो सर्वांगा । हियें आथिलिया ॥ ६७ ॥
ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववीरें । तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें ॥ ६८ ॥
देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें । जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं ॥ ६९ ॥
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हनौनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ॥ ७० ॥
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली । तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥ ७१ ॥
श्रीभगवानुवाच ।
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १॥
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया । येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥ ७२ ॥
एर्हवीं मध्योर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद । अद्वयासीं एकवद । जया ठायीं ॥ ७३ ॥
जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥ ७४ ॥
जया जें आर्हां परौतें । जया जें पुढें मागौतें । दिसतेविण दिसतें । अदृश्य जें ॥ ७५ ॥
उपाधीचा दुसरा । घालितां वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयातें ॥ ७६ ॥
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान । सुखा भरलें गगन । गाळींव जें ॥ ७७ ॥
जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण । आपणयां जें जाण । आपणचि ॥ ७८ ॥
ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें । तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ॥ ७९ ॥
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । कां वांझेची संतती । वानणें जैशी ॥ ८० ॥
तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचें नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥ ८१ ॥
जे नानातत्त्वांची मांदुस । जे जगदभ्राचें आकाश । जे आकारजाताचें दुस । घडी केलें ॥ ८२ ॥
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका । विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥ ८३ ॥
ते माया वस्तूच्या ठायीं । असे जैसेनि नाहीं । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होये ॥ ८४ ॥
जेव्हां आपणया आली निद । करी आपणपें जेवीं मुग्ध । कां काजळी आणी मंद । प्रभा दीपीं ॥ ८५ ॥
स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी । निदेली चेववूनि वेगीं । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥ ८६ ॥
तैसी स्वरूपीं जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया । तेंचि रुखा यया । मूळ पहिलें ॥ ८७ ॥
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वीं आठुळैजे कंदु । वेदांतीं हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥ ८८ ॥
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥ ८९ ॥
ऐसी यया वेदांतीं । निरूपणभाषाप्रतीती । परी तें असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ ॥ ९० ॥
तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें ॥ ९१ ॥
मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें । ते चौपासि घेऊनि आगारें । खोलावती ॥ ९२ ॥
ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९३ ॥
तेथ् चिद्वृत्ति पहिलें । महत्तत्त्व उमललें । तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे ॥ ९४ ॥
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥ ९५ ॥
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणें ॥ ९६ ॥
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥ ९७ ॥
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हें पांच फोंक । महाभूतांचें सरोख । सरळे होती ॥ ९८ ॥
तैसीं श्रोत्रादि तन्मात्रें । तियें अंगवसां गर्भपत्रें । लुळलुळितें विचित्रें । उमळती गा ॥ ९९ ॥
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी । होता करित कांडीं । आकांक्षेचीं ॥ १०० ॥
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ॥ १०१ ॥
पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली । ते वेळीं व्यामोहता भली । पाहाळीं जाय ॥ १०२ ॥
आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें । जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें ॥ १०३ ॥
तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांबुं बांधे । तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा ॥ १०४ ॥
एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासनिजे ॥ १०५ ॥
किंबहुना इहीं आठें । आंगीं हा अधिक फांटे । परी शिंपीचियेवढें उमटे । रुपें जेवीं ॥ १०६ ॥
कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता आसारे । तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञानमूळ ॥ १०७ ॥
आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ॥ १०८ ॥
परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसें । अधोशाखा ॥ १०९ ॥
आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते । तेंही परिस हो येथें । सांगिजैल ॥ ११० ॥
तरी श्वः म्हणिजे उखा । तोंवरी एकसारिखा । नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥ १११ ॥
जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु । कां विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥ ११२ ॥
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा । कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें ॥ ११३ ॥
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा ॥ ११४ ॥
आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥ ११५ ॥
एर्हवीं पिंपळु म्हणतां विखीं । मियां गति देखिली असे निकी । परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज ॥ ११६ ॥
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥ ११७ ॥
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥ ११८ ॥
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीच असती ॥ ११९ ॥
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघानदींची ॥ १२० ॥
ऐसें या रुखाचें होणें जाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें । म्हणौनि ययातें लोकु म्हणे । अव्ययु हा ॥ १२१ ॥
एर्हवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेंचि संचकु । तैसा व्ययेंचि हा रुखु । अव्ययो गमे ॥ १२२ ॥
जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमीं रुतलें असे । रथाचें चक्र दिसे। जियापरी ॥ १२३ ॥
तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे। तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥ १२४ ॥
परी येकी केधवां गेली। शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढाभ्रें ॥ १२५ ॥
महाकल्पाच्या शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ॥ १२६ ॥
संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं सालडें । तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती ॥ १२७ ॥
रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेवीं ॥ १२८ ॥
कलियुगांतीं कोरडीं । चहुं युगांची सालें सांडी । तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥ १२९ ॥
वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ॥ १३० ॥
जैशा वारियाच्या झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती ॥ १३१ ॥
एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥ १३२ ॥
जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । येथ असंतचि असिजे जगें । मानिजे संत ॥ १३३ ॥
कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥ १३४ ॥
वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळीतां अपाडें । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवीं जगा ॥ १३५ ॥
पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥ १३६ ॥
हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥ १३७ ॥
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥ १३८ ॥
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात ॥ १३९ ॥
नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ । ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें ॥ १४० ॥
तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता । पैं वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥ १४१ ॥
योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें । किंबहुना जियालें । ज्ञानही त्याचेनी ॥ १४२ ॥
हें असो बहु बोलणें । वानिजैल तो कवणें । जो भवरुखु जाणें । उखि ऐसा ॥ १४३ ॥
No comments:
Post a Comment