अध्याय १६ : ओव्या २७१-३३६

२ मे  २०२१ निरुपण 

अध्याय १६ । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ( श्लोक  ६-११ / ज्ञानेश्वरी ओव्या २७१-३३६ )


द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च । दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥ ६॥

आणि दैवां आसुरां । संपत्तिवंतां नरां । अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे ॥ २७१ ॥
जैसें रात्रीच्या अवसरीं । व्यापारिजे निशाचरीं । दिवसा सुव्यवहारीं । मनुष्यादिकीं ॥ २७२ ॥
तैसिया आपुलालिया राहाटीं । वर्तती दोन्ही सृष्टी । दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ॥ २७३ ॥
तेवींचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावीं । मागील ग्रंथीं बरवी । सांगितली ॥ २७४ ॥
आतां आसुरी जे सृष्टी । तेथिंची उपलऊं गोठी । अवधानाची दिठी । दे पां निकी ॥ २७५ ॥
तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु । कां अपुष्पीं मकरंदु । न लभे जैसा ॥ २७६ ॥
तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जंव एकाधें शरीर । माल्हातीना ॥ २७७ ॥
मग आविष्कारला लांकुडें । पावकु जैसा जोडे । तैसी प्राणिदेहीं सांपडे । आटोपली हे ॥ २७८ ॥
ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसा । देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ॥ २७९ ॥
आतां तयाचि प्राणियां । रूप करूं धनंजया । घडले जे आसुरीया । दोषवृंदीं ॥ २८० ॥

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः । न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७॥

तरी पुण्यालागीं प्रवृत्ती । कां पापाविषयीं निवृत्ती । या जाणणेयाची राती । तयांचें मन ॥ २८१ ॥
निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा । कोशकिटु जैसा । जाचिन्नला पैं ॥ २८२ ॥
कां दिधलें मागुती येईल । कीं न ये हें पुढील । न पाहातां दे भांडवल । मूर्ख चोरां ॥ २८३ ॥
तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरीं जनीं । आणि शौच ते स्वप्नीं । देखती ना ते ॥ २८४ ॥
काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटों शके ॥ २८५ ॥
परी आसुरां प्राणियां । शौच नाहीं धनंजया । पवित्रत्व जेवीं भांडिया । मद्याचिया ॥ २८६ ॥
वाढविती विधीची आस । कां पाहाती वडिलांची वास । आचाराची भाष । नेणतीचि ते ॥ २८७ ॥
जैसें चरणें शेळियेचें । कां धावणें वारियाचें । जाळणें आगीचें । भलतेउतें ॥ २८८ ॥
तैसें पुढां सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर । सत्येंसि कीर वैर । सदाचि तयां ॥ २८९ ॥
जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया । तरी साचा बोली बोलिया । बोलती ते ॥ २९० ॥
आपानाचेनि तोंडें । जरी सुगंधा येणें घडे । तरी सत्य तयां जोडे । आसुरांतें ॥ २९१ ॥
ऐसें ते न करितां कांहीं । आंगेंचि वोखटे पाहीं । आतां बोलती ते नवाई । सांगिजैल ॥ २९२ ॥
एर्‍हवीं करेयाच्या ठायीं चांग । तें तयासि कैचें नीट आंग । तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगें परीस ॥ २९३ ॥
उधवणीचें जेवीं तोंड । उभळी धुंवाचे उभड । हें जाणिजे तेवीं उघड । सांगों ते बोल ॥ २९४ ॥

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् । अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम् ॥ ८॥

तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो । चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥ २९५ ॥
वेदीं अन्यायीं पडे । तो निरयभोगें दंडे । सन्यायी तो सुरवाडें । स्वर्गीं जिये ॥ २९६ ॥
ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था । इयेतें म्हणती ते वृथा । अवघेंचि हें ॥ २९७ ॥
यज्ञमूढ ठकिले यागीं । देवपिसें प्रतिमालिंगीं । नागविले भगवे योगी । समाधिभ्रमें ॥ २९८ ॥
येथ आपुलेनि बळें । भोगिजे जें जें वेंटाळें । हें वांचोनि वेगळें । पुण्य आहे ? ॥ २९९ ॥
ना अशक्तपणें आंगिकें । वेगळवेंटाळीं न टकें ।ऐसा गादिजेवीण विषयसुखें । तेंचि पाप ॥ ३०० ॥
प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचें ।तरी सर्वस्व हाता ये तयांचें । हें पुण्यफळ कीं ? ॥ ३०१ ॥
बळी अबळातें खाय । हेंचि बाधित जरी होय । तरी मासयां कां न होय । निसंतान ? ॥ ३०२ ॥
आणि कुळें शोधूनि दोन्ही । कुमारेंचि शुभलग्नीं । मेळवीजती प्रजासाधनीं । हेतु जरी ॥ ३०३ ॥
तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाहीं संतती । तयां कोणें प्रतिपत्तीं । विवाह केले ? ॥ ३०४ ॥
चोरियेचें धन आलें । तरी तें कोणासि विष जालें ? । वालभें परद्वार केलें । कोढी कोणी होय ? ॥ ३०५ ॥
म्हणौनि देवो गोसांवी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गांवीं । करी तो भोगी ॥ ३०६ ॥
परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि तें वावो । आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ? ॥ ३०७ ॥
येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा कां स्वर्गलोकीं । तैसाचि कृमिही नरकीं । लोळतु श्लाघे ॥ ३०८ ॥
म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु । जे दोहीं ठायीं सुखभोगु । कामाचाचि तो ॥ ३०९ ॥
याकारणें कामें । स्त्रीपुरुषयुग्में । मिळती तेथ जन्मे । आघवें जग ॥ ३१० ॥
आणि जें जें अभिलाषें । स्वार्थालागीं हें पोषे । पाठीं परस्परद्वेषें । कामचि नाशी ॥ ३११ ॥
एवं कामावांचूनि कांहीं । जगा मूळचि आन नाहीं । ऐसें बोलती पाहीं । आसुर गा ते ॥ ३१२ ॥
आतां असो हें किडाळ । बोली न करूं पघळ । सांगतांचि सफोल । होतसे वाचा ॥ ३१३ ॥

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः । प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९॥

आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी । हेंही नाहीं चित्तीं । निश्चयो एकु ॥ ३१४ ॥
किंबहुना उघड । आंगी लाऊनियां पाखांड । नास्तिकपणाचें हाड । रोंविलें जीवीं ॥ ३१५ ॥
ते वेळीं स्वर्गालागीं आदरु । कां नरकाचा अडदरु । या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला ॥ ३१६ ॥
मग केवळ ये देहखोडां । अमेध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकीं सुहाडा । बुडाले गा ॥ ३१७ ॥
जैं आटावें होती जळचर । तैं डोहीं मिळतीं ढीवर । कां पडावें होय शरीर । तैं रोगा उदयो ॥ ३१८ ॥
उदैजणें केतूचें जैसें । विश्वा अनिष्टोद्देशें । जन्मती ते तैसे । लोकां आटूं ॥ ३१९ ॥
विरूढलिया अशुभ । फुटती तैं ते कोंभ । पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ॥ ३२० ॥
आणि मागांपुढां जाळणें । वांचूनि आगी कांहीं नेणें । तैसें विरुद्धचि एक करणें । भलतेयां ॥ ३२१ ॥
परी तेंचि गा करणें । आदरिती संभ्रमें जेणें । तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु ॥ ३२२ ॥

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः । मोहाद् गृहीत्वाऽसद्ग्रहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १०॥

तरी जाळ पाणियें न भरे । आगी इंधन न पुरे । तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ॥ ३२३ ॥
तया कामाचा वोलावा । जीवीं धरुनिया पांडवा । दंभमानाचा मेळावा । मेळविती ॥ ३२४ ॥
मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा । तैसा मदाचा ताठा तंव जरा । चढतां आंगीं ॥ ३२५ ॥
आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या{ऐ}सा सावावो । मग काय वानूं निर्वाहो । निश्चयाचा ॥ ३२६ ॥
जिहीं परोपतापु घडे । परावा जीवु रगडे । तिहीं कर्मीं होऊनि गाढे । जन्मवृत्ती ॥ ३२७ ॥
मग आपुलें केलें फोकारिती । आणि जगातें धिक्कारिती । दाहीं दिशीं पसरिती । स्पृहाजाळ ॥ ३२८ ॥
ऐसेनि गा आटोपें । थोरियें आणती पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ॥ ३२९ ॥

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः । कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ ११॥

याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती । आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ॥ ३३० ॥
पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये सानें गगन । जें पाहातां त्रिभुवन । अणुही नोहे ॥ ३३१ ॥
ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । जे सांडूं नेणें मरणीं । वल्लभा जैसी ॥ ३३२ ॥
तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवीं सूनि असार । विषयादिक ॥ ३३३ ॥
स्त्रिया गाइलें आइकावें । स्त्रीरूप डोळां देखावें । सर्वेंद्रियें आलिंगावें । स्त्रियेतेंचि ॥ ३३४ ॥
कुरवंडी कीजे अमृतें । ऐसें सुख स्त्रियेपरौतें । नाहींचि म्हणौनि चित्तें । निश्चयो केला ॥ ३३५ ॥
मग तयाचि स्त्रीभोगा- । लागीं पाताळ स्वर्गा । धांवती दिग्विभागा । परौतेही ॥ ३३६ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099