अध्याय १३ : ओव्या २७-१८४

१४  जून  २०२० निरुपण 
अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक २ -३   / ज्ञानेश्वरी ओव्या २७-७२  )


ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।  ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ ४॥


एक म्हणती हें स्थळ । जीवाचेंचि समूळ । मग प्राण हें कूळ । तयाचें एथ ॥ २७ ॥
जे प्राणाचे घरीं । अंगें राबती भाऊ चारी । आणि मना ऐसा आवरी । कुळवाडीकरु ॥ २८ ॥
तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अंवसीं पाहाटीं । विषयक्षेत्रीं आटी । काढी भली ॥ २९ ॥
मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचें बीज वाफवी । कुकर्माचा करवी । राबु जरी ॥ ३० ॥
तरी तयाचिसारिखें । असंभड पाप पिके । मग जन्मकोटी दुःखें । भोगी जीवु ॥ ३१ ॥
नातरी विधीचिये वाफे । सत्क्रिया बीज आरोपे । तरी जन्मशताचीं मापें । सुखचि मवीजे ॥ ३२ ॥
तंव आणिक म्हणती हें नव्हे । हें जिवाचेंचि न म्हणावें । आमुतें पुसा आघवें । क्शेत्राचें या ॥ ३३ ॥
अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणौनि जागे ॥ ३४ ॥
अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती । क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा ॥ ३५ ॥
आणि इयेतेंचि आघवा । आथी घरमेळावा । म्हणौनि ते वाहिवा । घरीं वाहे ॥ ३६ ॥
वाह्याचिये रहाटी । जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं । ते इयेच्याचि पोटीं । जहाले गुण ॥ ३७ ॥
रजोगुण पेरी । तेतुलें सत्त्व सोंकरी । मग एकलें तम करी । संवगणी ॥ ३८ ॥
रचूनि महत्तत्त्वाचें खळें । मळी एके काळुगेनि पोळें । तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भली ॥ ३९ ॥
तंव एकीं मतिवंतीं । या बोलाचिया खंतीं । म्हणितलें या ज्ञप्ती । अर्वाचीना ॥ ४० ॥
हां हो परतत्त्वाआंतु । कें प्रकृतीची मातु । हा क्षेत्र वृत्तांतु । उगेंचि आइका ॥ ४१ ॥
शून्यसेजेशालिये । सुलीनतेचिये तुळिये । निद्रा केली होती बळियें । संकल्पें येणें ॥ ४२ ॥
तो अवसांत चेइला । उद्यमीं सदैव भला । म्हणौनि ठेवा जोडला । इच्छावशें ॥ ४३ ॥
निरालंबींची वाडी । होती त्रिभुवनायेवढी । हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥ ४४ ॥
मग महाभूतांचें एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥ ४५ ॥
यावरी आदी । पांचभूतिकांची मांदी । बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं ॥ ४६ ॥
कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं ॥ ४७ ॥
तेथ येरझारेलागीं । जन्ममृत्यूची सुरंगी । सुहाविली निलागी । संकल्पें येणें ॥ ४८ ॥
मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविलें बुद्धि । चराचर ॥ ४९ ॥
यापरी निराळीं । वाढे संकल्पाची डाहाळी । म्हणौनि तो मुळीं । प्रपंचा यया ॥ ५० ॥
यापरी मत्तमुगुतकीं । तेथ पडिघायिलें आणिकीं । म्हणती हां हो विवेकीं । कैसें तुम्ही ॥ ५१ ॥
परतत्त्वाचिया गांवीं । संकल्पसेज देखावी । तरी कां पां न मनावी । प्रकृति तयाची ? ॥ ५२ ॥
परि असो हें नव्हे । तुम्ही या न लगावें । आतांचि हें आघवें । सांगिजैल ॥ ५३ ॥
तरी आकाशीं कवणें । केलीं मेघाचीं भरणें । अंतरिक्ष तारांगणें । धरी कवण ? ॥ ५४ ॥
गगनाचा तडावा । कोणें वेढिला केधवां । पवनु हिंडतु असावा । हें कवणाचें मत ? ॥ ५५ ॥
रोमां कवण पेरी । सिंधू कवण भरी । पर्जन्याचिया करी । धारा कवण ? ॥ ५६ ॥
तैसें क्षेत्र हें स्वभावें । हे वृत्ती कवणाची नव्हे । हें वाहे तया फावे । येरां तुटे ॥ ५७ ॥
तंव आणिकें एकें । क्षोभें म्हणितलें निकें । तरी भोगिजे एकें । काळें केवीं हें ? ॥ ५८ ॥
तरी ययाचा मारु । देखताति अनिवारु । परी स्वमतीं भरु । अभिमानियां ॥ ५९ ॥
हें जाणों मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा । परी काय वांजटा । पूरिजत असे ? ॥ ६० ॥
महाकल्पापरौतीं । कव घालूनि अवचितीं । सत्यलोकभद्रजाती । आंगीं वाजे ॥ ६१ ॥
लोकपाळ नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे । स्वर्गींचिये आडवे । रिगोनि मोडी ॥ ६२ ॥
येर ययाचेनि अंगवातें । जन्ममृत्यूचिये गर्तें । निर्जिवें होऊनि भ्रमतें । जीवमृगें ॥ ६३ ॥
न्याहाळीं पां केव्हडा । पसरलासे चवडा । जो करूनियां माजिवडा । आकारगजु ॥ ६४ ॥
म्हणौनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता । ऐसे वाद पंडुसुता । क्षेत्रालागीं ॥ ६५ ॥
हे बहु उखिविखी । ऋषीं केली नैमिषीं । पुराणें इयेविषीं । मतपत्रिका ॥ ६६ ॥
अनुष्टुभादि छंदें । प्रबंधीं जें विविधें । ते पत्रावलंबन मदें । करिती अझुनी ॥ ६७ ॥
वेदींचें बृहत्सामसूत्र । जें देखणेपणें पवित्र । परी तयाही हें क्षेत्र । नेणवेचि ॥ ६८ ॥
आणीक आणीकींही बहुतीं । महाकवीं हेतुमंतीं । ययालागीं मती । वेंचिलिया ॥ ६९ ॥
परी ऐसें हें एवढें । कीं अमुकेयाचेंचि फुडें । हें कोणाही वरपडें । होयचिना ॥ ७० ॥
आतां यावरी जैसें । क्षेत्र हें असे । तुज सांगों तैसें । साद्यंतु गा ॥ ७१ ॥


महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च । इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः । एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६॥


तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥ ७२ ॥
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु । सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥ ७३ ॥
आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती । सांगितली तुजप्रती । आघवीची ॥ ७४ ॥
आतां महाभूतें कवणें । कवण विषयो कैसीं करणे । हें वेगळालेपणें । एकैक सांगों ॥ ७५ ॥
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज । सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥ ७६ ॥
आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे । नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥ ७७ ॥
नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं । कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥ ७८ ॥
किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी । तेवीं प्रकृतिचिया पोटीं । गोप्यु जो असे ॥ ७९ ॥
जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिष पहातु । मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी ॥ ८० ॥
तैसी पांचांही गांठीं पडे । जैं देहाकारु उघडे । तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा ॥ ८१ ॥
नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं । सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥ ८२ ॥
आतां बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशियां चिन्हीं जाणिजे । बोलिलें यदुराजें । तें आइकें सांगों ॥ ८३ ॥
तरी कंदर्पाचेनि बळें । इंद्रियवृत्तीचेनि मेळें । विभांडूनि येती पाळे । विषयांचे ॥ ८४ ॥
तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उगाणों लागे जीवा । तेथ दोहींसी बरवा । पाडु जे धरी ॥ ८५ ॥
हें सुख हें दुःख । हें पुण्य हें दोष । कां हें मैळ हें चोख । ऐसें जे निवडी ॥ ८६ ॥
जिथे अधमोत्तम सुझे । जिये सानें थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विषो जीवें ॥ ८७ ॥
जे तेजतत्त्वांची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी । जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे जे ॥ ८८ ॥
अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण । आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची ॥ ८९ ॥
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं । प्रकृती जे महामती । तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥ ९० ॥
आणि सांख्ययोगमतें । प्रकृती परिसविली तूंतें । ऐसी दोहीं परीं जेथें । विवंचिली ॥ ९१ ॥
तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा । येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा ॥ ९२ ॥
तऱ्ही पाहालया रजनी । तारा लोपती गगनीं । कां हारपें अस्तमानीं । भूतक्रिया ॥ ९३ ॥
नातरी देहो गेलिया पाठीं । देहादिक किरीटी । उपाधि लपे पोटीं । कृतकर्माच्या ॥ ९४ ॥
कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । कां वस्त्रपणे तंतु- । दशे राहे ॥ ९५ ॥
तैसे सांडोनियां स्थूळधर्म । महाभूतें भूतग्राम । लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥ ९६ ॥
अर्जुना तया नांवें । अव्यक्त हें जाणावें । आतां आइकें आघवें । इंद्रियभेद ॥ ९७ ॥
तरी श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन । इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें ॥ ९८ ॥
इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखांची उखिविखी । बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं ॥ ९९ ॥
मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार । पांच आणिक ॥ १०० ॥
कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती । आइकें कैवल्यपती । सांगतसे ॥ १०१ ॥
पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं । तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं ॥ १०२ ॥
एवं दाहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे । परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें ॥ १०३ ॥
जें इंद्रियां आणि बुद्धि । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे ॥ १०४ ॥
नीळिमा अंबरीं । कां मृगतृष्णालहरी । तैसें वायांचि फरारी । वावो जाहलें ॥ १०५ ॥
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा । वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥ १०६ ॥
मग तिहीं दाहे भागीं । देहधर्माच्या खैवंगीं । अधिष्ठिलें आंगीं । आपुलाल्या ॥ १०७ ॥
तेथ चांचल्य निखळ । एकलें ठेलें निढाळ । म्हणौनि रजाचें बळ । धरिलें तेणें ॥ १०८ ॥
तें बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । ऐसां ठायीं माझारीं । बळियावलें ॥ १०९ ॥
वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ॥ ११० ॥
जें प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ । जें अखंड सूये छळ । अहंकारासी ॥ १११ ॥
जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी । जें पाठी पुरवी । भयासि गा ॥ ११२ ॥
द्वैत जेथें उठी । अविद्या जेणें लाठी । जें इंद्रियांतें लोटी । विषयांमजी ॥ ११३ ॥
संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी । मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥ ११४ ॥
जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर । बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥ ११५ ॥
तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन । आतां विषयाभिधान । भेदू आइकें ॥ ११६ ॥
तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रसु गंधु । हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा ॥ ११७ ॥
इहीं पांचैं द्वारीं । ज्ञानासि धांव बाहेरी । जैसा कां हिरवे चारीं । भांबावे पशु ॥ ११८ ॥
मग स्वर वर्ण विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु । संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥ ११९ ॥
हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच । जे बांधोनियां माच । क्रिया धांवे ॥ १२० ॥
ऐसे हे दाही । विषय गा इये देहीं । आतां इच्छा तेही । सांगिजैल ॥ १२१ ॥
तरि भूतलें आठवे । कां बोलें कान झांकवे । ऐसियावरि चेतवे । जे गा वृत्ती ॥ १२२ ॥
इंद्रियाविषयांचिये भेटी- । सरसीच जे गा उठी । कामाची बाहुटी । धरूनियां ॥ १२३ ॥
जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धावणें । न रिगावें तेथ करणें । तोंडें सुती ॥ १२४ ॥
जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी । विषयां जिया गोडी । ते गा इच्छा ॥ १२५ ॥
आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥ १२६ ॥
आतां यावरी सुख । तें एवंविध देख । जेणें एकेंचि अशेख । विसरे जीवु ॥ १२७ ॥
मना वाचे काये । जें आपुली आण वाये । देहस्मृतीची त्राये । मोडित जें ये ॥ १२८ ॥
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें । सात्त्विकासी दुणें । वरीही लाभु ॥ १२९ ॥
कां आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचिया एकांतीं । थापटूनि सुषुप्ती । आणी जें गा ॥ १३० ॥
किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे । तेथ जें होये । तया नाम सुख ॥ १३१ ॥
आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था । जें जीजे तेंचि सर्वथा । दुःख जाणे ॥ १३२ ॥
तें मनोरथसंगें नव्हे । एऱ्हवीं सिद्धी गेलेंचि आहे । हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥ १३३ ॥
आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता । तिये नाम पंडुसुता । चेतना येथें ॥ १३४ ॥
जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं । जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥ १३५ ॥
मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं । प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥ १३६ ॥
जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥ १३७ ॥
पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥ १३८ ॥
नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन । कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥ १३९ ॥
अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥ १४० ॥
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं । सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥ ४१ ॥
मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना । आतां धृतिविवंचना । भेदु आइक ॥ १४२ ॥
तरी भूतां परस्परें । उघड जाति स्वभाववैरें । नव्हे पृथ्वीतें नीरें । न नाशिजे ? ॥ १४३ ॥
नीरातें आटी तेज । तेजा वायूसि झुंज । आणि गगन तंव सहज । वायू भक्षी ॥ १४४ ॥
तेवींचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे । आंतु रिगोनि वेगळें । आकाश हें ॥ १४५ ॥
ऐसीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें । कीं तियेंही ऐक्यातें । देहासी येती ॥ १४६ ॥
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं । एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥ १४७ ॥
ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें । तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥ १४८ ॥
आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥ १४९ ॥
एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलियातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥
रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥ १५१ ॥
करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । कां वाक्यें म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥ १५२ ॥
कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोकां सकळां । नाम जग ॥ १५३ ॥
कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानीं । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ १५४ ॥
तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें । तेणें समूह परत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥ १५५ ॥
आणि वाहतेनि भौतिकें । पाप पुण्य येथें पिके । म्हणौनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥ १५६ ॥
आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें । परी असो हें अनंतें । नामें यया ॥ १५७ ॥
पैं परतत्त्वाआरौतें । स्थावराआंतौतें ।जें कांहीं होतें जातें । क्षेत्रचि हें ॥ १५८ ॥
परि सुर नर उरगीं । घडत आहे योनिविभागीं ।तें गुणकर्मसंगीं । पडिलें सातें ॥ १५९ ॥
हेचि गुणविवंचना । पुढां म्हणिपैल अर्जुना ।प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं ॥ १६० ॥
क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार ।म्हणौनि आतां उदार । ज्ञान आइकें ॥ १६१ ॥
जया ज्ञानालागीं । गगन गिळिताती योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥ १६२ ॥
न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगा{ऐ}सें दुवाड । हेळसिती ॥ १६३ ॥
तपोदुर्गें वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥ १६४ ॥
नाना भजनमार्गी । धांवत उघडिया आंगीं । एक रिगताति सुरंगीं । सुषुम्नेचिये ॥ १६५ ॥
ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतान्ही । वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती ॥ १६६ ॥
देईल गुरुसेवा । इया बुद्धि पांडवा । जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे ॥ १६७ ॥
जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणें आणी । जीवा आत्मया बुझावणी । मांडूनि दे ॥ १६८ ॥
जें इंद्रियांचीं द्वारें आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जें दैन्यचि फेडी । मानसाचें ॥ १६९ ॥
द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचें सुयाणें होये । जया ज्ञानाची सोये । ऐसें करी ॥ १७० ॥
मदाचा ठावोचि पुसी । जें महामोहातें ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाष उरों ॥ १७१ ॥
जें संसारातें उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी । अनावरातें वेंटाळी । ज्ञेयातें जें ॥ १७२ ॥
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें । जयाचेनि विंदाणें । जग हें चेष्टें ॥ १७३ ॥
जयाचेनि उजाळें । उघडती बुद्धीचे डोळे । जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥ १७४ ॥
ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळलें मन । चोख कीजे ॥ १७५ ॥
आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥ १७६ ॥
तें अनिरूप्य कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धी आणिजे । वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं ॥ १७७ ॥
मग तेचि इये शरीरीं । जैं आपुला प्रभावो करी । तैं इंद्रियांचिया व्यापारीं । डोळांहि दिसे ॥ १७८ ॥
पैं वसंताचें रिगवणें । झाडांचेनि साजेपणें । जाणिजे तेवीं करणें । सांगती ज्ञान ॥ १७९ ॥
अगा वृक्षासि पाताळीं । जळ सांपडे मुळीं । तें शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥ १८० ॥
कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचारगौरव । सुकुलीनाचें ॥ १८१ ॥
अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्तिइ । कां दर्शनाचिये प्रशस्तीं । पुण्यपुरुष ॥ १८२ ॥
नातरी केळीं कापूर जाहला । जेवीं परिमळें जाणों आला । कां भिंगारीं दीपु ठेविला । बाहेरी फांके ॥ १८३ ॥
तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगों आतां अवधानें । चागें आइक ॥ १८४ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099