अध्याय २: ओव्या २४५-२६६

२४ जून  २०१७ निरुपण
अध्याय २: सांख्ययोग (गीता श्लोक ४२--४७ / ज्ञानेश्वरी ओव्या २४५-२६६ )


निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् । व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४॥

वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥
येथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
देखैं कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥
परी एकचि कुडें करितीं । जे स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥
जैसा कर्पूराचा राशी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे । कां मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे ? । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्य देखें ॥ २५३ ॥
जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी । तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तया वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५॥

तिन्हीं गुणीं आवृत । हे वेद जाणैं निभ्रांत । म्हणौनि उपनिषदादि समस्त । सात्विक तें ॥ २५६ ॥
येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥
म्हणौनि तूं जाण । हे सुखदुःखांसीच कारण । एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरीं । विसंब झणीं ॥ २५९ ॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्‍लुतोदके । तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपें ॥ २६० ॥
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेहि काय चालिजती । सांगैं मज ॥ २६१ ॥
कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहले असें महीतळ । तरी आपण घेपें केवळ । आर्तीचिजोगें ॥ २६२ ॥
तैसें ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ २६३ ॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥
म्हणोनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेचि हें मना आलें । जें न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥


सारांश :

श्लोक क्र ४२ to ४७


वरील ओव्यांमधे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग म्हणजे काय ह्याचा नेमका अर्थ समजावून सांगत आहेत. भगवंत म्हणतात वेद जाणणारे, कर्ममार्ग श्रेष्ठ म्हणणारे विद्वान सुद्धा कर्म फळाची आशा करतात. ह्यासाठी माऊली दृष्टांत देतांना म्हणतात कापराची रास करावी आणि तिला अग्नी लावावा किंवा पक्वान्नाचे जेवण करावे आणि त्यात विष कालवावे असे हे आहे. फळाची आशा करून कर्म करणे ही एक प्रकारची दुर्बुद्धी आहे.
हे अर्जुना, वेदांमधे अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु आपण फक्त आपल्या हिताचे तेवढेच घ्यावे. माऊली म्हणतात ज्यावेळेस सुर्यादय होतो त्यावेळी आपल्याला सगळे मार्ग दिसतात. पण आपण सगळ्या मार्गाने जात नाही. ज्ञानी लोक जेवढे हिताचे आहे तेवढेच घेतात आणि आचरणात आणतात. अर्जुना, स्वतःचे कर्म करणे हेच योग्य आहे. आपले कर्म मनापासून करावे परंतु फळाची अपेक्षा मनात कधीही बाळगु नये. आपल्या हातून होणारे प्रत्येक कर्म ईश्वरास अर्पण केल्यावर ते परिपूर्ण झाले, सफल झाले असे समज. कर्म पुर्ण झाले किंवा अपुर्ण राहिले हा मनातील भाव काढून टाक. कारण ते ईश्वरास अर्पण केल की परिपूर्णच असते. मनाची अशी स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजेच कर्मयोग आहे.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099