१२ डिसेंबर २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः । मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६॥
मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा । मी हौनी होय पैठा । माझ्या रूपीं ॥ १२४६ ॥
स्वकर्माच्या चोखौळीं । मज पूजा करूनि भलीं । तेणें प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेतें ॥ १२४७ ॥
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे । तिया भजन समरसें । सुखिया होय ॥ १२४८ ॥
आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया । अनुसरे जो करूनियां । सर्वत्रता हे ॥ १२४९ ॥
सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ । कां हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमीं ॥ १२५० ॥
तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये । तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं ॥ १२५१ ॥
परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी । येक तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी ॥ १२५२ ॥
कां बावनें आणि धुरें । हा निवाडु तंवचि सरे । जंव न घेपती वैश्वानरें । कवळूनि दोन्ही ॥ १२५३ ॥
ना पांचिकें आणि सोळें । हें सोनया तंवचि आलें । जंव परिसु आंगमेळें । एकवटीना ॥ १२५४ ॥
तैसें शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासे । जंव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥ १२५५ ॥
अगा रात्री आणि दिवो । हा तंवचि द्वैतभावो । जंव न रिगिजे गांवो । गभस्तीचा ॥ १२५६ ॥
म्हणौनि माझिया भेटी । तयाचीं सर्व कर्में किरीटी । जाऊनि बैसे तो पाटीं । सायुज्याच्या ॥ १२५७ ॥
देशें काळें स्वभावें । वेंचु जया न संभवे । तें पद माझें पावे । अविनाश तो ॥ १२५८ ॥
किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता । लाहे तेणें न पविजतां । लाभु कवणु असे ॥ १२५९ ॥
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः । बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७॥
याकारणें गा तुवां इया । सर्व कर्मा आपुलिया । माझ्या स्वरूपीं धनंजया । संन्यासु कीजे ॥ १२६० ॥
परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणें करा । आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ति हे ॥ १२६१ ॥
मग तेणें विवेकबळें । आपणपें कर्मावेगळें । माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखिजेल ॥ १२६२ ॥
आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे । ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥ १२६३ ॥
तेथ प्रकृति आपणयां । वेगळी नुरे धनंजया । रूपेंवीण का छाया । जियापरी ॥ १२६४ ॥
ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु । निफजेल अनायासु । सकारणु ॥ १२६५ ॥
मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरें आपणपयां । तेथ बुद्धि घापे करूनियां । पतिव्रता ॥ १२६६ ॥
बुद्धि अनन्य येणें योगें । मजमाजीं जैं रिगे । तैं चित्त चैत्यत्यागें । मातेंचि भजे ॥ १२६७ ॥
ऐसें चैत्यजातें सांडिलें । चित्त माझ्या ठायीं जडलें । ठाके तैसें वहिलें । सर्वदा करी ॥ १२६८ ॥
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्क्ष्यसि ॥ ५८॥
मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां । माझा प्रसादु जाण तेधवां । संपूर्ण जाहला ॥ १२६९ ॥
तेथ सकळ दुःखधामें । भुंजीजती जियें मृत्युजन्में । तियें दुर्गमेंचि सुगमें । होती तुज ॥ १२७० ॥
सूर्याचेनि सावायें । डोळा सावाइला होये । तैं अंधाराचा आहे । पाडु तया ? ॥ १२७१ ॥
तैसा माझेनि प्रसादें । जीवकणु जयाचा उपमर्दे । तो संसराचेनी बाधे । बागुलें केवीं ? ॥ १२७२ ॥
म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया । तरसील माझिया । प्रसादास्तव ॥ १२७३ ॥
अथवा हन अहंभावें । माझें बोलणें हें आघवें । कानामनाचिये शिंवे । नेदिसी टेंकों ॥ १२७४ ॥
तरी नित्य मुक्त अव्ययो । तूं आहासि तें होऊनि वावो । देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगीं ॥ १२७५ ॥
जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदीं आत्मघातु । भुंजतां उसंतु । कहींचि नाहीं ॥ १२७६ ॥
येवढेनि दारुणें । निमणेनवीण निमणें । पडेल जरी बोलणें । नेघसी माझें ॥ १२७७ ॥
यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९॥
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । कां दीपद्वेषिया अंधकारु । विवेकद्वेषें अहंकारु । पोषूनि तैसा ॥ १२७८ ॥
स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु । संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥ १२७९ ॥
इया मती आपुलिया । तिघां तीन नामें ययां । ठेऊनियां धनंजया । न झुंजें ऐसा ॥ १२८० ॥
जीवामाजीं निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । तो वायां धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥ १२८१ ॥
आणि मी अर्जुन हे आत्मिक । ययां वधु करणें हें पातक । हे मायावांचूनि तात्त्विक । कांहीं आहे ? ॥ १२८२ ॥
आधीं जुंझार तुवां होआवें । मग झुंजावया शस्त्र घेयावें । कां न जुंझावया करावें । देवांगण ॥ १२८३ ॥
म्हणौनि न झुंजणें । म्हणसी तें वायाणें । ना मानूं लोकपणें । लोकदृष्टीही ॥ १२८४ ॥
तऱ्ही न झुंजें ऐसें । निष्टंकीसी जें मानसें । तें प्रकृति अनारिसें । करवीलचि ॥ १२८५ ॥
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा । कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥ ६०॥
पैं पूर्वे वाहतां पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं । तरी आग्रहोचि उरे तें आणी । आपुलिया लेखा ॥ १२८६ ॥
कां साळीचा कणु म्हणे । मी नुगवें साळीपणें । तरी आहे आन करणें । स्वभावासी ? ॥ १२८७ ॥
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा । आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तूं ॥ १२८८ ॥
पैं शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता । गुण दिधले जन्मतां । प्रकृती तुज ॥ १२८९ ॥
तरी तयाचिया समवाया\- । अनुरूप धनंजया । न करितां उगलियां । नयेल असों ॥ १२९० ॥
म्हणौनियां तिहीं गुणीं । बांधिलासि तूं कोदंडपाणी । त्रिशुद्धी निघसी वाहणीं । क्षात्राचिया ॥ १२९१ ॥
ना हें आपुलें जन्ममूळ । न विचारीतचि केवळ । न झुंजें ऐसें अढळ । व्रत जरी घेसी ॥ १२९२ ॥
तरी बांधोनि हात पाये । जो रथीं घातला होये । तो न चाले तरी जाये । दिगंता जेवीं ॥ १२९३ ॥
तैसा तूं आपुलियाकडुनी । मीं कांहींच न करीं म्हणौनि । ठासी परी भरंवसेनि । तूंचि करिसी ॥ १२९४ ॥
उत्तरु वैराटींचा राजा । पळतां तूं कां निघालासी झुंजा ? । हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥ १२९५ ॥
महावीर अकरा अक्षौहिणी । तुवां येकें नागविले रणांगणीं । तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूंतें ॥ १२९६ ॥
हां गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? । परी भोगविजे बळिया । अदृष्टें जेणें ॥ १२९७ ॥
तें अदृष्ट अनारिसें । न करील ईश्वरवशें । तो ईश्वरुही असे । हृदयीं तुझ्या ॥ १२९८ ॥
No comments:
Post a Comment