अध्याय ९ : ओव्या १-४६

७ एप्रिल २०१९ निरुपण 
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक १ / ज्ञानेश्वरी ओव्या  १-४६)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


॥  श्री परमात्मने नमः ॥
। अथ नवमोऽध्यायः – अध्याय नववा । । । राजविद्याराजगुह्ययोगः ।
तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥
परी प्रौढी न बोलों हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २ ॥
कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसीं ॥ ३ ॥
तुमचे या दिठिवेयाचिये वोलें । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणौनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहों । येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ? ॥ ५ ॥
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडा विचुका पाउलीं । ते चोज करूनि माउली । रिझे जेवीं ॥ ६ ॥
तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरी आम्हांवरी हो । या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करीत ॥ ७ ॥
वांचूनि माझिये बोलतिये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे ॥ ८ ॥
अवधारा आवडे तेसणा धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं । अमृताचिया ताटीं वोगरूं । ऐसी रससोय कैंची ? ॥ ९ ॥
हां हो हिमकरासी विंजणें । कीं नादापुढें आइकवणें । लेणियासी लेणें । हें कहीं आथी ? ॥ १० ॥
सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणें ठायीं नाहावें ? । हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा ? ॥ ११ ॥
तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये । ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणें रिझा तुम्ही ? ॥ १२ ॥
तरी विश्वप्रगटितिया गभस्ती । काय हातिवेन न कीजे आरती ? । कां चुळोदकें आपांपती । अर्घ्यु नेदिजे ? ॥ १३ ॥
प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितुसें भक्ती । म्हणौनि बोल जर्‍ही गंगावती । तर्‍ही स्वीकाराल कीं ॥ १४ ॥
बाळक बापाचिये ताटीं रिगे । आणि बापातेंचि जेवऊं लागे । कीं तो संतोषिलेनि वेगें । मुखचि वोढवी ॥ १५ ॥
तैसा मीं जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती । तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची असे ॥ १६ ॥
आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्हीं संत घेतले असा बहुवें । म्हणौनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥ १७ ॥
अहो तान्हयाचें लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥ १८ ॥
म्हणौनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें । तें चेइलें ऐसें जी जाणवलें । यालागीं बोलिलो मीं ॥ १९ ॥
एर्‍हवीं चांदिणें पिकविजत आहे चेपणीं ? । कीं वारया घापत आहे वाहणी ? । हां हो गगनासि गंवसणी । घालिजे केवीं ? ॥ २० ॥
आइका पाणी वोथिजावें न लगे । नवनीतीं माथुला न रिगे । तेवीं लाजिलें व्याख्यान निगे । देखोनि जयातें ॥ २१ ॥
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मर्‍हाठिया बोलिजे । हा पाडु काई ? ॥ २२ ॥
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढति याचि येकी आशा । जे धिटींवा करूनि भवादृशां । पढियंतया होआवें ॥ २३ ॥
तरि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें । तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथां माझिया ॥ २४ ॥
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थ सिद्धि मती पिके । एर्‍हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ २६ ॥
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावोचि अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥ २७ ॥
म्हणौनि संवादाचा सुवावो ढळे । तर्‍ही हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥ २८ ॥
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे । म्हणौनि वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिविण ॥ २९ ॥
परि आतां आमुतें गोड करावें । ऐसें तांदुळीं कायसा विनवावें ? । साइखडियानें काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ? ॥ ३० ॥
तो काय बाहुलियांचिया काजा नाचवी ? । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी । म्हणौनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥ ३१ ॥
तवं श्रीगुरू म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें । आतां सांगैं जें निरोपिलें । नारायणें ॥ ३२ ॥
येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणौनि उल्हासें । अवधारा श्रीकृष्ण ऐसें । बोलते जाहले ॥ ३३ ॥
श्रीभगवानुवाच ।
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १॥
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज । जें हें अंतःकरणींचें गुज । जिवाचिये ॥ ३४ ॥
येणें मानें जीवाचें हिये फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें ? । ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
तरी परियेसी गा प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करूं ॥ ३६ ॥
म्हणौनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलणेंही बोलावें घडो । परि आमुचिये जीवींचें पडो । तुझ्या जीवीं ॥ ३७ ॥
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड । म्हणौनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्यु मिळे ॥ ३८ ॥
मुडांहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें । तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ? ॥ ३९ ॥
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥ ४० ॥
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचून आणिक नाहीं । म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपऊं नये ॥ ४१ ॥
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज । तरी ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥ ४२ ॥
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें । मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें । तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
मग वारयाचिया धारसा । पडिन्नला कोंडा कां नुरेचि जैसा । आणि कणांचा आपैसा । राशिवा जोडे ॥ ४५ ॥
तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठीं । लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेच्या ॥ ४६ ॥


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099