अध्याय १८ : ओव्या ६९९-७४४

३ ऑक्टोबर २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक  ३०-३३ / ज्ञानेश्वरी ओव्या ६९९-७४४ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३०॥

म्हणौनि अधिकारें मानिलें । जें विधीचेनि वोघें आलें । तें एकचि येथ भलें । नित्य कर्म ॥ ६९९ ॥
तेंचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ । कीजे जैसें कां जळ । सेविजे ताहनें ॥ ७०० ॥
येतुलेनि तें कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥ ७०१ ॥
ऐसें करी तो भला । संसारभयें सांडिला । करणीयत्वें आला । मुमुक्षुभागा ॥ ७०२ ॥
तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरंवसा । मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ॥ ७०३ ॥
म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळीं । इये कर्मीं बुडकुळी । द्यावीं कीं ना ? ॥ ७०४ ॥
तृषार्ता उदकें जिणें । कां पुरीं पडलिया पोहणें । अंधकूपीं गति किरणें । सूर्याचेनि ॥ ७०५ ॥
नाना पथ्येंसीं औषध लाहे । तरी रोगें दाटलाही जिये । का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ॥ ७०६ ॥
तरी तयाच्या जीविता । नाहीं जेवीं अन्यथा । तैसें कर्मीं इये वर्ततां । जोडेचि मोक्षु ॥ ७०७ ॥
हें करणीयाचिया कडे । जें ज्ञान आथी चोखडें । आणि अकरणीय हें फुडें । ऐसें जाण ॥ ७०८ ॥
जीं तिथें काम्यादिकें । संसारभयदायकें । अकृत्यपणाचें आंबुखें । पडिलें जयां ॥ ७०९ ॥
तिये कर्मीं अकार्यीं । जन्ममरणसमयीं । प्रवृत्ति पळवी पायीं । मागिलींचि ॥ ७१० ॥
पैं आगीमाजीं न रिघवे । अथावीं न घालवे । धगधगीत नागवे । शूळ जेवीं ॥ ७११ ॥
कां काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु । न वचवे खोपेआंतु । वाघाचिये ॥ ७१२ ॥
तैसें कर्म अकरणीय । देखोनि महाभय । उपजे निःसंदेह । बुद्धी जिये ॥ ७१३ ॥
वाढिलें रांधूनि विखें । तेथें जाणिजे मृत्यु न चुके । तेवीं निषेधीं कां देखे । बंधातें जे ॥ ७१४ ॥
मग बंधभयभरितीं । तियें निषिद्धीं प्राप्ती । विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ॥ ७१५ ॥
ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी । खरा कुडा पारखी । जियापरी ॥ ७१६ ॥
तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी । सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तूं जाण ॥ ७१७ ॥


यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च । अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१॥

आणि बकाच्या गांवीं । घेपे क्षीरनीर सकलवी । कां अहोरात्रींची गोंवी । आंधळें नेणे ॥ ७१८ ॥
जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठें कोरूं धांवे । परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवीं ॥ ७१९ ॥
तैसीं इयें कार्याकार्यें । धर्माधर्मरूपें जियें । तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ॥ ७२० ॥
अगा डोळांवीण मोतियें । घेतां पाडु मिळे विपायें । न मिळणें तें आहे । ठेविलें तेथें ॥ ७२१ ॥
तैसें अकरणीय अवचटें । नोडवे तरीच लोटे । येऱ्हवीं जाणें एकवटें । दोन्ही जे कां ॥ ७२२ ॥
ते गा बुद्धि चोखविषीं । जाण येथ राजसी । अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी ॥ ७२३ ॥


अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता । सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२॥

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये । कां राक्षसां दिवो पाहे । राती होऊनि ॥ ७२४ ॥
नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा । पैं असतें आपणपें जीवा । नाहीं जालें ॥ ७२५ ॥
तैसें धर्मजात तितुकें । जिये बुद्धीसी पातकें । साच तें लटिकें । ऐसेंचि बुझे ॥ ७२६ ॥
ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥ ७२७ ॥
किंबहुना श्रुतिजातें । अधिष्ठूनि केलें सरतें । तेतुलेंही उपरतें । जाणे जे बुद्धी ॥ ७२८ ॥
ते कोणातेंही न पुसतां । तामसी जाणावी पंडुसुता । रात्री काय धर्मार्था । साच करावी । ॥ ७२९ ॥
एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद । सांगितले स्वबोध\- । कुमुदचंद्रा ॥ ७३० ॥
आतां ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजातीं । खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया ॥ ७३१ ॥
तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग । सांगिजती चांग । अवधान देईं ॥ ७३२ ॥


धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३॥

तरी उदेलिया दिनकरु । चोरीसिं थोके अंधारु । कां राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवीं ॥ ७३३ ॥
नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु । आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ ॥ ७३४ ॥
कां अगस्तीचेनि दर्शनें । सिंधु घेऊनि ठाती मौनें । चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती ॥ ७३५ ॥
हें असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खालां । गर्जोनि पुढां जाला । सिंहु जरी ॥ ७३६ ॥
तैसा जो धीरु । उठलिया अंतरु । मनादिकें व्यापारु । सांडिती उभीं ॥ ७३७ ॥
इंद्रियां विषयांचिया गांठी । अपैसया सुटती किरीटी । मन मायेच्या पोटीं । रिगती दाही ॥ ७३८ ॥
अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥ ७३९ ॥
संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें ।  बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥ ७४० ॥
ऐसी धैर्यराजें जेणें । मन प्राण करणें । स्वचेष्टांचीं संभाषणें । सांडविजती ॥ ७४१ ॥
मग आघवींचि सडीं । ध्यानाच्या आंतुल्या मढीं । कोंडिजती निरवडी । योगाचिये ॥ ७४२ ॥
परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं । तंव लांचु न घेतां धृती । धरिजती जिया ॥ ७४३ ॥
ते गा धृती येथें । सात्विक हें निरुतें । आईक अर्जुनातें । श्रीकांतु म्हणे ॥ ७४४ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099