६ जून २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
श्री भगवानुवाच ।
त्रिविध भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ २॥
म्हणे पार्था तुझा अतिसो । हेंही आम्ही जाणतसों ।जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि कीं ॥ ४९ ॥
नुसधियाची श्रद्धा । झोंबों पाहसी परमपदा । तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे ॥ ५० ॥
श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे ? ॥ ५१ ॥
गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें । तें घेऊं नये कांहीं केलें । विचारीं पां ॥ ५२ ॥
चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तैं हातीं धरितां जाळूं । न शके काई ? ॥ ५३ ॥
कां किडाचिये आटतिये पुटीं । पडिलें सोळें किरीटी । घेतलें चोखासाठीं । नागवीना ? ॥ ५४ ॥
तैसें श्रद्धेचें दळवाडें । अंगें कीर चोखडें । परी प्राणियांच्या पडे । विभागीं जैं ॥ ५५ ॥
ते प्राणिये तंव स्वभावें । आनादिमायाप्रभावें । त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥ ५६ ॥
तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती । तैं तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥ ५७ ॥
वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥ ५८ ॥
बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये । ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ॥ ५९ ॥
तियापरीं यियें अपारें । होत जात जन्मांतरें । परी त्रिगुणत्व न व्यभिचरें । प्राणियांचें ॥ ६० ॥
म्हणूनि प्राणियांच्या पैकीं । पडिली श्रद्धा अवलोकीं । ते होय गुणासारिखी । तिहीं ययां ॥ ६१ ॥
विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद । परी एका दोघे वोखद । येर आहाती ॥ ६२ ॥
सत्त्वाचेनि आंगलगें । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे । तंव रज तम उगे । कां पां राहाती ? ॥ ६३ ॥
मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशें जाये । तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥ ६४ ॥
मग तमाची उठी आगी । तेव्हां तेचि श्रद्धा भंगी । हों लागे भोगालागीं । भलतेया ॥ ६५ ॥
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यछ्रद्धः स एव सः ॥ ३॥
एवं सत्त्वरजतमा-/ । वेगळी श्रद्धा सुवर्मा । नाहीं गा जीवग्रामा-/ । माजीं यया ॥ ६६ ॥
म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पैं त्रिगुणात्मक । रजतमसात्त्विक । भेदीं इहीं ॥ ६७ ॥
जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक । कां मिरयामाजीं तीख । उंसीं गोड ॥ ६८ ॥
तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे ।तेथ श्रद्धा परीणमे । तेंचि होऊनि ॥ ६९ ॥
मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवीं श्रद्धा तामसी । सिनी नाहीं ॥ ७० ॥
तैसीच राजसीं जीवीं । रजोमय जाणावी । सात्त्विकीं आघवीं । सत्त्वाचीच ॥ ७१ ॥
ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु । श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ॥ ७२ ॥
परी गुणत्रयवशें । त्रिविधपणाचें लासें । श्रद्धे जें उठिलें असे । तें वोळख तूं ॥ ७३ ॥
तरी जाणिजे झाड फुलें । कां मानस जाणिजे बोलें । भोगें जाणिजे केलें । पूर्वजन्मींचें ॥ ७४ ॥
तैसीं जिहीं चिन्हीं । श्रद्धेचीं रूपें तीन्हीं । देखिजती ते वानी । अवधारीं पां ॥ ७५ ॥
यजन्ते सात्त्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः । प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४॥
तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तयां बहुतकरूनि मेधा । स्वर्गीं आथी ॥ ७६ ॥
ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकीं ॥ ७७ ॥
आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा । ते भजती राक्षसां । खेचरां हन ॥ ७८ ॥
श्रद्धां जे कां तामसी । ते मी सांगेन तुजपाशीं । जे कां केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वें ॥ ७९ ॥
जीववधें साधूनि बळी । भूतप्रेतकुळें मैळीं । स्मशानीं संध्याकाळीं । पूजिती जे ॥ ८० ॥
ते तमोगुणाचें सार । काढूनि निर्मिले नर । जाण तामसियेचें घर । श्रद्धेचें तें ॥ ८१ ॥
ऐसी इही तिहीं लिंगीं । त्रिविध श्रद्धा जगीं । पैं हें ययालागीं । सांगतु असें ॥ ८२ ॥
जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा । येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ॥ ८३ ॥
हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया । बागुल नोहे तया । कैवल्य तें ॥ ८४ ॥
तो न पढो कां ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र । सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हातीं ॥ ८५ ॥
परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त । अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे ॥ ८६ ॥
तयांचीं आचरती पाउलें । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले । तो तेंचि फळ ठेविलें । ऐसें लाहे ॥ ८७ ॥
पैं एक दीपु लावी सायासें । आणिक तेथें लाऊं बैसें । तरी तो काय प्रकाशें । वंचिजे गा ? ॥ ८८ ॥
कां येकें मोल अपार । वेंचोनि केलें धवळार । तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ? ॥ ८९ ॥
हें असो जो तळें करी । तें तयाचीच तृषा हरी । कीं सुआरासीचि अन्न घरीं । येरां नोहे ? ॥ ९० ॥
बहुत काय बोलों पैं गा । येका गौतमासीचि गंगा । येरां समस्तां काय जगां । वोहोळ जाली ? ॥ ९१ ॥
म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी । जाणे तयांते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे ॥ ९२ ॥
No comments:
Post a Comment